Friday, 14 December 2018

सोपं आणि चांगलं

सोपं आणि अवघड. चांगलं आणि वाईट.

या दोन्ही प्रकारच्या गोष्टींमधे काहीतरी एक निवड करण्याचे प्रसंग नेहमीच येत असतात.

सोपं  आणि अवघड यामधे सोपं निवडतो तर चांगलं आणि वाईट यामधे आपण चांगल्याची निवड करतो. नव्हे तसा सहज मानवी स्वभावही असतो.

परंतू सोपं आणि चांगलं या मधे निवड करायची झाली तर वाईट वाटतं की, काय हा अवघड प्रसंग ओढवला आहे.

तरीही स्वभावतः सोपंच निवडल्या जातं. चांगलं प्राधान्यक्रमावर तेंव्हाच येतं जेंव्हा सोपं अवघड वाटायला लागतं.

सोपं सोयीच असतं. परंतू सोपं चांगलं असतंच याची शाश्वती देता येत नाही. आणि चांगलं सोपं नसतं याची खात्री मात्र नक्की देता येते.

चांगल्याची सांगड अवघाडासोबातच आजवर झालेली आहे. कारण चांगलं चांगल्या गोष्टींना वाईटापासून सहजपणे दूर ठेवतं.

खरं तर चांग्ल्याला सोपं करणं ही एक अवघड कला आहे.

अन्यथा अवघड वाईटाच्या संगतीत राहणे हे नेहमीच सोपं वाटत आले आहे.

तात्पर्य सोपं चांगलं आणि अवघड वाईट वाटण्यापेक्षा चांगलं सोपं आणि वाईट अवघड वाटले पाहिजे.

असं झालं तर अवघडही सोपं वाटायला लागेल आणि वाईट कधीच चांगलं वाटणार नाही.

यावरही चांगलं वाईट वाटत असेल तर समजावं की आता सगळं सोपं अवघड झालं आहे.

आणि अगदी 'चांगलच वाईट वाटलं' असा प्रसंग ओढवला तर नक्की खात्री देता येते की, आता कोणतही अवघड सोपं होऊ शकतं.

 ©हेमंत विनोद पोहनेरकर


Sunday, 2 December 2018

पत्र





शेवटचं पत्र कधी लिहिलं?’, असं जर कोणाला विचारलं तर किमान पंधरा-वीस वर्षे झाली असतील, असे उत्तर मिळेल. कदाचित कोणाचंतरी पत्र आलं होतं, या गोष्टीलाही त्यापेक्षा अधिक कालावधी झालेला असेल.

आता पत्र खेळातही राहिलेलं नाही. मामाच पत्र हरवलं तेच आम्हाला सापडलं’, असं खेळणारी मुलं मोठी झाली आहेत. पत्रातील छोटसं आकाश शोधण्यासाठी जणू ती बाहेर पडली आहेत.

पूर्वी आठवण आली, आनंदाचा किंवा दुःखाचा प्रसंग घडला, साधा निरोपही जरी असला तरी पंधरा पैशांचं पोस्टकार्ड पाठवला जायचं. अगदीच दहा-पंधरा वाक्यात मांडलेल ते पत्र कितीदा तरी वाचलं तरी प्रत्येक वेळेला अधिकच आनंद देऊन जायचं.

प्रेमीयुगालांनी तर पत्राचा आधार सर्वाधिक घेतला. आता व्यक्त होण्याची साधनं बदलली आहेत. स्वरूप बदललं आहे. पण आजही कोणाला पत्र वाचायला मिळालं तर तोच आनंद होणार किंबहुना जुन्या आठवणी अधिक जिवंत होतील.

पत्र जीर्ण होऊ शकतं पण पत्रातील ओलावा कधीच आटत नाही.

‘पत्राची परंपरा परत सुरू होईल का?’, तर कदाचित उत्तर ‘नाही’ असं असेल. परंतु ‘कुणाचं पत्र आलं तर कसे वाटेल?’, याचे उत्तर मात्र स्वाभाविकच ‘आनंद होईल’ असेच असेल.

पत्र पाठवण्याचा एक लाभ मात्र सर्वांना नक्कीच झालेला आहे. आनंदाला भाषा असते, हे  पत्रामुळेच तर कळालं. आनंदला शब्दाचा आकार देता येतो. तो आनंद कधीही ही इच्छा झाली की पुन्हा अनुभवता येतो, हे पत्रामुळेच तर शक्य झालं.

अशा न संपणाऱ्या आनंदाचा नित्य स्त्रोत म्हणजे पत्र.
काळ कितीही पुढे सरकला तरी पत्र आपलं स्थान अबाधित ठेवून आहे. कारण व्यक्ती कालसापेक्ष असते. पण पत्रातून व्यक्त केलेली भावना कोणत्याही काळात आनंद देणारी राहिलेली आहे आणि राहील देखील.

©हेमंत विनोद पोहनेरकर 

Sunday, 25 November 2018

अभिधा


खरं तर तुला मूर्त रुपात येऊन काही दिवसच झाले आहेत. 

पण माझ्या जाणत्या वयापासून तू माझ्या सोबत आहेस. 

माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून तू सातत्याने मला व्यक्त होत गेलीस.

तुझ अमूर्त रूप मला नेहमीच भगवंताच्या निराकार रुपाची आठवण करून देतं.

तू शब्दांची शक्ती. अगदी साधी सहज सरळ समजून येणारी. कुठल्याही अलंकाराशिवाय. 

तू सातत्याने जाणीवेच्या विश्वात घेवून जाणारी.

तू प्रतिभेचं रूप साकारणारी. तू तेज आणि तिमिराचा अर्थ सांगणारी.

तू उत्पती आणि लय यांची साक्ष देणारी. प्रतिमा आणि प्रतिमान यातील अंतर समजावून सांगणारी.

रूप, रंग, गंध या लेण्यांनासाज चढवणारी. कला, कलाकृती आणि कलाकार यांना शब्दातून व्यक्त करणारी.

तुझ्या सख्या व्यंजना आणि लक्षणा यांच्याशी कोणतीही तुलना न करता सहज सुंदरता जपणारी.

गुंतागुंत, दुर्बोधता, कठीणता उलगडून दाखवणारी.

तू विश्वरूप दर्शन स्पष्टपणे मांडणारी. तू प्रत्यक्ष विनायकाला जयग्रंथात स्थान बद्ध करणारी.

तुझ वर्णन अनादी, अनंत असंच आहे.

जीवनाच्या शेवटच्याक्षणापासून ते आत्म्याच्या प्रवासापर्यंत वर्णन करण्याकरिता केवळ तुझीच तर सोबत आहे.

अभिधा, तुझ्या या निर्गुण, निराकाररूपाचं व्यक्त होणार भांडार आमच्या समोर सातत्याने प्रगट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

©हेमंत पोहनेरकर

Sunday, 18 November 2018

तिचा मित्र


'त्याची मैत्रीण' हा तिने स्वीकारलेला शब्द.
आणि त्याला न पचणारा विषय म्हणजे 'तिचा मित्र'.

खरं पाहता ‘शक्ती’ ही स्त्रीवाचक. परंतू ती भगवंताने त्याला दिली.
आणि तिला स्वतःला अन्याय झाला असं वाटू नये म्हणून की काय,
मग भगवंताने सहनशक्ती मात्र तिला दिली.

समंजसपणा, नमतेघेणे, जुळवूण घेणे हे तिच्या साठी जणू अलंकारच झाले. आणि ती ते ही आनंदाने मिरवते.

मोकळेपणा, वेळेचं स्वातंत्र्य, विचारांचा-निर्णयांचा अधिकार मात्र
त्याने स्वतःजवळ ठेवला. आणि कदाचित नाव दिलं 'पुरुषार्थ'.

विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य तो ही मान्य करतोच.
पण आचरणाच्या वेळी त्याला कुलमर्यादेचा आधार घ्यावा लागतो.

जणू चारित्र्य संस्थेचा तोच मालक आहे.

शंका हा शब्द तसा नाकारात्मच. पण त्याने जर घेतली तर तिला सकारत्मकतेच वलय प्राप्त होतं. कारण त्याचा विचार हा कल्याणासाठीचाच असतो.
आणि ती ही नेहेमी तेवढीच सोशिक.
वेळोवेळी उत्तर देत आली आहे, त्याने नजरेने विचारलेल्या प्रश्नांची.
उत्तीर्ण होणं श्वासांइतकं आवश्यक असेल म्हणून की काय, ती प्रत्येक अग्नीपरीक्षेत उजळून निघाली आहे.

केवळ तिची एकच अपेक्षा आहे. अधिकार, कर्तव्य या सार्यांना बाजूला ठेवून
तोच जर तिचा मित्र झाला तर तिच मन अधिक हलकं होईल.

 ©हेमंत पोहनेरकर

Sunday, 4 November 2018

मनुष्य



एकात्मवाद, द्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद हे सारे वाद मनुष्याने मनुष्याकरिताच मांडले.
अर्थात सर्वांच साध्य मनुष्याचा मोक्ष हेच होतं.

पण एके दिवशी एक नवाच वाद निर्माण झाला.

हा वाद पंचमहाभूतांमधील होता.

पृथ्वी म्हणाली, "स्पर्शाला अर्थ आणि आकार मी प्राप्त करून दिला".
जल म्हणाले, "मी तर जीवन. माझ्या विना जीवनाची कल्पनाच व्यर्थ".
तेज म्हणाले, "चैतन्य तर माझ्यामुळेच निर्माण झाले".
वायु म्हणाला, "मी तर प्राणवायू. माझ्या संचाराविना सारे काही स्तब्ध".
आकाश म्हणाले, "काम, क्रोध, शोक, मोह, भय मी निर्माण केले. कल्पनाविलास ही मीच".

ही सगळी पंचमहाभूते आपआपल्या मतांवर खूपच ठाम होती.
प्रत्येकजन आत्मस्तुतीच रमाला होता.
आणि शेवटी वाद एवढा वाढला की, प्रत्येक महाभूतानी विभक्त व्हायच ठरवलं.

पण काळाचा महिमा इतका अगाध की,
मोक्षाच्या वाटेवरील मनुष्याला मात्र तिळमात्र काळजी नव्हती.


@हेमंत विनोद पोहनेरकर

Sunday, 28 October 2018

बाबा



बाबा. बाबा म्हटलं की डोळ्यासमोर उभ राहतं एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व. अगदीच धाक, दरारा हे जरी आमच्या पिढीने अनुभवलेल नसलं. तरी एक आदरयुक्त भीती नेहमीच अनुभवली. आई जवळ सगळा हट्ट चालायचा. पण बाबांना मागायची बिषाद नसायची. पण आईमार्फत तो बाबा पर्यंत पोहोचला की काही क्षणात पूर्ण देखील व्हायचा.

पण आता काळ एवढा वेगाने बदलतो आहे की, हा मधला मार्ग आता राहिला नाही. पूर्वी पिढी विस-पंचेवीस वर्षाला बदलायची. आता तर ती अगदीच पाच-सात वर्षात बदल बदलते आहे.
'प्राप्तेतू षोडशे वर्षे पुत्रं मित्र वदाचरेत', हे विधान एव्हाना पाच सहा वर्ष वयापर्यंत येऊन पोहचल आहे.

म्हणूनच की काय आता 'ओ बाबा' 'ए बाबा' झाला आहे.

मुलांना मारणे तर खूप दूरचा विषय, त्यांना रागवणे देखील कधीतरी होतं.
तसं पाहता हे काही काळाच्या प्रवाहात वाहण्यासारखा नाही. कारण नवी पिढी अधिक प्रगत होत चालली आहे आणि प्रगल्भ देखील.

आमच्या पिढीला बाबासोबत खेळल्याच कधी आठवत नाही.  पण आता नवी पिढी बाबा खेळायला नसेल तर रुसून बसते. बाबा कामावरून आला की, काय काय करायचं याचे जणू वेळापत्रकच तयार असतं.

बाबा आता साखरेच पोत होतो. बाबा जेवू घालतो, प्रसंगी न्हाऊ घालतो. अगदी डायपर बदलतो, शी सुद्धा काढतो.
घरात सगळ्यात जास्त धिंगाणा कोण करतं, तर उत्तर येते बाबा.
'बाबा तू कुठे जायचं नाही'. 'बाबा आज सुट्टी घे'. 'बाबा किती काम करतोस'?  'बाबा जरा आराम करत जा'. अशा सूचना आता सर्रास ऐकू येतात.

बाबाला आता सुट्टीच नियोजन कराव लागत नाही. शॉपिंगची काळजी करावी लागत नाही.
'बाबा या रविवारी डोंगरावर जाऊ'. 'बाबा आज रात्री आईस्क्रीम खायला जाऊ'. एवढेच काय कोणत्या हॉटेलमधे जेवण कसं आहे इथपासून ते बाबांना कोणते कपडे घातले तर चांगले दिसतात, हे पण ठरवलं जातं.

थोडक्यात काय तर प्रेम, विश्वास आणि आदर हा पूर्वीच्या बाबांकडून मिळालेल्या वारश्यामध्ये नव्या पिढीचा बाबा मित्रत्वाची भर घालतोय एवढेच.

@हेमंत विनोद पोहनेरकर

Sunday, 21 October 2018

निजरुप तुझे

                                               

'सांज खुलणे' हे निसर्गाच्या अनेक लोभस रूपांपैकी एक रूप. आनंद, प्रसन्नता, मंगलमय, शांत आणि तरीही तेजस्वी असे हे रूप मनाला नेहमीच भुरळ घालत आलं आहे.

त्यादिवशीही अशीच सांज खुलली. आणि थेट माणुसकीच्या कोलाहलातून बाहेर पडलो. शांत अशा निर्जन स्थळी जाऊन थांबलो. निसर्गाच्या या रूपाचा आनंद मनमुराद घेण्यासाठी.

काळ आणि वेळेच्या पाशातून मन विचलित होऊन परतताना असंच एक प्रगल्भ, सुंदर आणि मनमोहक स्त्रीरूप दिसलं आणि मन अजूनच उल्हसीत झालं.

 लोकलज्जेचं भान न ठेवता थेट मागणी घालावी इतकं प्रेम निर्माण झालं. मंगल्याच्या या मूर्त रुपात आपल्याला न्हाता येईल याचा मनस्वी आनंद झाला.

नि तत्क्षणी सौदामिनी कडाडावी असा साक्षात्कार झाला. बालपणी गायलेल्या सायं प्रार्थनेच्या ओळी आठवल्या, 'ज्या ज्या स्थळीये मन जाय माझे, त्या त्या स्थळीये निजरूप तुझे'.

माझं प्राक्तन तर कधीच भरून गेले आहे, याची जाणीव झाली. अशी प्रेममय रुपं तर मला पदोपदी मिळणार आहेत. मग मी एका रूपात कसा स्वतःला सामावून घेणार?

म्हणून त्या अनंताच्या रुपाचं स्मरण करत, तिन्हीसांजेची कृतज्ञता व्यक्त करून परत निघालो.



©हेमंत पोहनेरकर 
९५९५९६९९८९

Wednesday, 10 October 2018

आनंद

जीवनाला एकदा खूप दु:ख झालं.
म्हणून त्याने 'जीवन' संपवायचं ठरवलं.

खरे तर ती आत्महत्याच होती. 
परंतू 'आत्मत्याग' या गोंडस नावाखाली त्याने एक पत्र लिहिण्यास घेतलं.

दु:खाचे पाढे लिहित असतांना, जीवनाला जाणवले की,
'जीवनात कधी आनंदाचे प्रसंगही आले असतील (!)
ते ही लिहावे.'

असे वाटून त्याने ते ही लिहिण्यास सुरुवात केली.

नि लिहीता लिहीता, एका आनंदाच्या क्षणी जीवनाने पाहिलं की,
आनंदात आपण स्वतःला सामावून घेतलं होत, म्हणून आपण आनंदी होतो.

पण दु:खाशी मात्र परकेपणाने वागलो.

म्हणून एका अनामिक भावनेने जीवनाने दु:खाला गाढ आलिंगन दिलं.

आणि जीवनाला आनंद झाला.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...