Tuesday, 31 May 2022

अलक क्र.३१

 अलक क्र.३१

 

'आपली संस्कृती टिकली पाहिजे', या विषयावर काही तरुणी चर्चा करत होत्या.

न राहवून त्यांचा संवाद ऐकणारी एक तरुणी त्यांच्या जवळ आली,

त्यातील एकीच्या कपाळावर टिकली लावत म्हणाली, "सुरुवात स्वतःपासून करूया."

Monday, 30 May 2022

अलक क्र.३०

 

ओळीने ११ कविता संग्रह त्याने प्रकाशित केले.

उत्तुंग प्रतिभा शक्तीचा अविष्कार होताच.

त्याचा प्रत्यक्ष वेळी प्रयत्न होता 'प्रतिमा आणि प्रतिमान' प्रतिभाधीन आहे, पुरस्काराभिमुख नाही.

Sunday, 29 May 2022

अलक क्र.२९


'बायकोचं ऐकणारे नवरेच सुखी असतात', आख्यानांत दृष्टांत देत किर्तनकार म्हणाले.

ती त्याच्याकडे विजयी मुद्रेने पाहत होती.

तो शांतपणे तिच्या कानांत पुटपुटला, "किर्तनकार संन्यासी आहेत बरं का?"   


Saturday, 28 May 2022

अलक क्र.२८


तो प्रत्येकाला सूचना करायचा त्यांनी त्यांचे काम चांगले करावे म्हणून.

एके दिवशी त्याची पत्नी त्याच्या या स्वभावाला कंटाळून त्याला सोडून निघून गेली.

आता तो चांगला माणूस व्हावा, अशी सगळेजण सूचना करत आहेत.

Friday, 27 May 2022

अलक क्र.२७

 

चांभारकीचा वडिलोपार्जित व्यववसाय करण्यास तो तयार नव्हता.

वडील एके दिवशी त्याला एका साधुमहारांजांकडे घेऊन गेले.

सर्व काही ऐकून साधुमहाराजांनी त्यांना 'व्याधगीता' सांगितली.

आता त्याला त्याच्या वडिलांनी परवानगी दिली आहे, त्याच्या आवडत्या क्षेत्रात कर्म करण्याची. 

Thursday, 26 May 2022

अलक क्र.२६


तो मार्केटिंग च्या नोकरीमुळे सतत फिरती वर असायचा.

परिणामतः उन्हात फिरल्यामुळे त्याचा चेहरा खूपच काळवंडला होता. म्हणून त्याने एके दिवशी फेशिअल केले.

काही दिवसांनी त्याची भेट एका साधू महाराजांशी झाली. 

त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून त्याला लक्षात आले कि, चेहऱ्याला आतून देखील फेशिअल करावे लागते.

Wednesday, 25 May 2022

अलक क्र.२५


"...म्हणून घेतला वसा टाकू नये", आजी गोष्ट संपवत नातीला म्हणाली.

नातीने प्रश्न केला, " आजी, असा वसा काय केवळ मुलींसाठीच असतो?"

"नाही गं पोरी", आजी उत्तरली,

"मुलांसाठी पण असतो. पण त्यांच्या कधी कुणी गोष्टी लिहिल्याचं नाही."

Tuesday, 24 May 2022

अलक क्र.२४


कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी यांचा तो शोध घेत फिरत होता.

बऱ्याच दिवसांच्या कालावधी नंतर त्याला एक साधूपुरुष भेटले.

त्याला आता या तिन्ही गोष्टी व्यर्थ वाटत होत्या.

Monday, 23 May 2022

अलक क्र. २३


त्याला वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जीएम म्हणून बढती मिळाली.

सहकारी म्हणाले, "आता तुझी प्रथम भूमिका काय असेल?"

तो म्हणाला, "कामातील निर्णयांचा अधिकार ज्याच्या त्याच्या स्तरावर ठेवत नियंत्रण विरहित राहणे."  

Sunday, 22 May 2022

अलक क्र.२२

तो प्रगल्भतेचा सातत्याने विचार करत होता.

विचारविचारात आयुष्याची संध्याकाळ जवळ आली.

आता तो अगदी साधेपणाने जगत होता.

आणि त्याचे मित्र म्हणत होते "आता तो अधिक प्रगल्भ वाटतो आहे."

Saturday, 21 May 2022

अलक क्र.२१


तो तिला 'सखी' म्हणून संबोधायला लागला.

ती: म्हणजे आपले लग्न नाही होऊ शकणार?

तो: तसे मुळीच नाही

ती: मग असे 'सखी' का म्हणतो आहेस?

तो: एक प्रियसी किंवा पत्नी सगळ्यात चांगली मैत्रीण असते म्हणून. 

Friday, 20 May 2022

अलक क्र २०

 त्याला गड-किल्ले आवडायचे.

ती निसर्गात रमायची.

म्हणून फिरायला जाण्यावरून दोघांत नेहमीच वाद व्हायचे.

एकदा तो तिला म्हणाला,

"आपल्याला मनासोबत विचारानेही संलग्नित व्हावे लागेल." 

Thursday, 19 May 2022

अलक क्र १९


मुलाचे आता शिक्षण पूर्ण झाले आहे तेंव्हा त्याने आपल्या पिढीजात दुकानात लक्ष घातले पाहिजे,

म्हणून तो अनेक प्रकारे मुलासोबत तो विषय काढायचा.

परंतु तारुण्याच्या उनाडपणा पुढे मुलगा ऐकत नव्हता.

बऱ्याच दिवसांनंतर मुलगा स्वतःहुन दुकानावर आला.

आणि म्हणाला,

"मुलं 'मौज' केवळ वडिलांच्या पैशावर करू शकतात.

म्हणून मला एव्हढ्या लवकर दुकानाची जवाबदारी स्विकारायची नव्हती."

Wednesday, 18 May 2022

अलक क्र.१८

 

युद्ध सुरु झाल्याची बातमी मिळताच सैनिक सीमेवर जाण्यासाठी तयार झाला.

त्याची दोन वर्षाची मुलगी म्हणाली,बाबा, मला येताना काय आणणार?”

डोक्यात युद्धाचाच विचार सुरु असल्यामुळे तो म्हणाला,

"तिरंगा".

त्यावर क्षणाचाही विलंब होऊ देता त्याची पत्नी म्हणाली,

“हो. फडकणारातिरंगा’. गुंडाळलेला नाही.” 

 

Tuesday, 17 May 2022

अलक क्र.१७


२१/९० चा फॉर्म्युला कळाल्यानंतर तो आपल्या आवडीच्या गोष्टींवर लक्ष द्यायला लागला.

आणि सगळे जण म्हणत होते,

'तो आता प्रत्येकाच्या मनाचा विचार करतो आहे.'

Monday, 16 May 2022

अलक क्र. १६

 

तो अत्यंत सुंदर काव्य रचत होता.

त्याचे मित्र म्हणाले,

"तुझी कविता सोशल मीडियावर टाक. खूप व्हायरल होईल."

तो नकार देत म्हणाला,

"मी 'प्रकाशित' होण्यावर भर देईन."

Sunday, 15 May 2022

अलक क्र.१५


एव्हाना तिच्या भावाने देखील कार घेतली. तिच्या सगळ्या मित्र-मैत्रिणी नातेवाईकांपैकी तिच्याकडेच आता कार नव्हती.

त्यामुळे तिला प्रचंड वाईट होते.

तिचे दुःख एव्हढे होते की, मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तरी ती माहेरी जाण्यास तयार नव्हती.

तो ही तिला समजावून सांगून थकला.

नकळत तिच्या भावाला ही गोष्ट समजली.

भाऊ तिला माहेरी नेण्यासाठी आला. आणि म्हणाला, "मी 'जिवतीच्या गोष्टी'तील भाऊ नाही. आणि म्हणूनच तू भौतिकगोष्टी सर्वस्वी म्हणू नकोस."

Saturday, 14 May 2022

अलक क्र. १४

 

तो 'गोल्ड मेडल' विकण्याकरिता जात होता.

त्याला आडवत त्याची पत्नी म्हणाली,

"कितीही हालाखीची परिस्थिती येवो कोणतीही स्त्री मंगळसूत्र कधी विकत नसते."

Friday, 13 May 2022

अलक क्र. १३

 

चिता दीर्घायुष्य जगून मृत्युमुखी पडला.

पुढचा जन्म हरिणाचा मिळावा, अशी त्याने भगवंताला विनंती केली.

त्याला एव्हाना स्वतःची गती आवडत नव्हती.

चित्याला हिरणाप्रमाणे 'जीव तोडून धावायला' शिकायचे होते.

Thursday, 12 May 2022

अलक क्र. १२


'कोवळ्या वयातच घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर पडली', या गोष्टीची त्याला आठवण झाली.

कारण आता त्याचा मुलगा मोठा होऊ लागला आहे.

त्याला जबाबदारीची जाणीव कशी  करून द्यावी, या गोष्टीचा तो विचार करत होता.

मग त्याने एक गोष्ट निश्चित केली, 'कोणत्याही परिस्थितीत मुलासमोर आपल्या कष्टाचा पाढा वाचायचा नाही.'

Wednesday, 11 May 2022

अलक क्र. ११


तो नेहमीच त्याचीच गोष्ट सांगायचा. 'तिची गोष्ट' त्याने कधीच मांडली नाही.

एकदा काहीतरी जाणवून त्याने 'तिची गोष्ट' लिहिण्यास घेतली.

त्यावर त्याला थांबवत ती म्हणाली,

"माझ्या गर्भात असल्यापासून मला देखील 'तुझीच गोष्ट' आवडते. आणि नाहीतरी तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी सुप्तावस्थेत आहेच."

Tuesday, 10 May 2022

अलक क्र. १०


एमएससी ऍग्री पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तो शेती करायला लागला. त्याच्या सर्व मित्रांनी त्याला वेड्यात काढले.

प्रियसी देखील म्हणाली, "आता आपल्या लग्नाचा विचार न केलेलाच बरा."

त्यावर तो म्हणाला, "मला माझ्या निर्णयाचे परिणाम माहीत होते. तरीदेखील मी सुखाऐवजी सेवा निवडली."

Monday, 9 May 2022

अलक क्र. ९

 त्यांना भविष्य पाहण्याची खूप आवड होती.

एव्हाना त्यांचे वय ८० झाले होते.

Sunday, 8 May 2022

अलक क्र. ८

 

कामकेल्या नंतर वडील त्याला मागे काय झाले आहे हे पाहायला लावायचे.

खरे तर त्याला या गोष्टीचा खूप कंटाळा यायचा.

परंतु त्याच्या वडिलांनी असे विचाराने कधीही बंद केले नाही.

आता तो मोठा होऊन एका कंपनीचा सीईओ झाला आहे.

त्याच्या कामाच्या पद्धतीत तो सर्वाधिक 'सिंहावलोकना'वर भर देतो. 

Saturday, 7 May 2022

अलक क्र. ७


समाजकारणापेक्षा राजकारणच जास्त केले जाते,
म्हणून त्याला राजकारणात प्रवेश करायचा नव्हता.
अनेक वर्ष सक्रिय राजकारणात असलेले त्याचे वडील म्हणाले,
"एक गोष्ट सदैव लक्षात ठेव. नात्यात सर्वात जास्त राजकारण सामान्य माणूसच करत असतो."

Friday, 6 May 2022

अलक क्र. ६

 'महालक्ष्मी' सारख्या मोठ्या सणाला त्याने सवाष्ण-ब्राह्मण म्हणून गल्लीत कामाला येणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याला सांगितले.

त्याच्या निर्णयाला दुजोरा देत त्याची पत्नी म्हणाली,

"लक्ष्मीच्या सेवेकऱ्यांना बोलावून आपण 'महालक्ष्मी'चीच सेवा करत आहोत."

Thursday, 5 May 2022

अलक क्र. ५


 आजोबांनी सांगितलेली चिऊ-काऊची गोष्ट आता ती आजोबांनाच सांगायला शिकली आहे. 

पण गोष्ट संपताना ती प्रत्‍येक वेळेस हळवी होत प्रश्न विचारते,

"आपण काऊदादाला मेणाचे घर बांधायला शिकवायचे का?"

अलक क्र. ४



कर्मकांडप्रधान कुटुंबातील मुलीने कबड्डी मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

घरात जणू भूकंपच आला होता.

शेवटी आजोबांनी सर्वांना बोलावून निर्णय सांगितला,

"आपल्या सर्वांमध्ये 'खेळाडूवृत्ती' निर्माण झाली पाहिजे."

Tuesday, 3 May 2022

अलक क्र. ३

 प्रेम विवाह नुकताच झाला होता. ती आता त्याला लग्नापूर्वीप्रमाणे फोनवर बोलत नव्हती. तिचे फोन तर यायचे परंतु घरातील काही गोष्टी आणण्यासाठी.

तो न राहवुन एके दिवशी म्हणाला, "तू आता प्रियसी राहिली नाहीस."

त्यावर ती म्हणाली, "प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं. पण लग्नात नाही."


Monday, 2 May 2022

अलक क्र. २

 

वनवासी भागात विद्यादान करत जीवन व्यतीत करण्याचा त्याने निर्णय घेतला. अर्थातच घरातील सर्वांनीच विरोध केला.

शेवटी वडील त्याला म्हणाले, "वनवासी लोक खरच शिकतील का?"

त्यावर तो एवढेच म्हणाला "मी मुळाक्षरांसोबत दृष्टिकोण देखील शिकवणार आहे."


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९ 

Sunday, 1 May 2022

अलक क्र १.


दाढीचे केसही पांढरे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने डाय करणे बंद करायचे ठरवले.

परंतु त्याच्या मन काही केल्या प्रौढत्व स्वीकारण्यास तयार होत नव्हते.

तो अजूनही तारुण्य आणि प्रौढत्व या गोंधळात अडकला  होता.

परंतु त्याने खूप विचारांती निर्णय घेतला.

मग त्याने या दोन्हीना सोडून 'प्रगल्भत्व' स्वीकारले. 


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९ 

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...