Friday, 5 June 2026

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता.

ती आकार घेत होती.

काही युगे उलटली. 

ती पूर्ण साकारली.

नि तो अव्यक्त झाला.

एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून संबोधत होते.

Thursday, 4 June 2026

अलक ५७७

 तो व्यक्त होत होता.

ती आकार घेत होती.

कुणी त्याला प्रेम म्हणत होते, तर कुणी जन्मजन्मांचे नाते.

त्या दोघांचे मात्र इतर कुठेही लक्ष नव्हते.

छे! ‘ती दोघं’ आता वेगळी उरली नव्हती.

Wednesday, 3 June 2026

अलक ५७६


ती नवीन लग्न होऊन घरी आल्यानंतर दररोज सकाळीची पूजा झाल्यानंतर देवाकडे घरातील सर्वांसाठी सुखी, निरोगी आणि दीर्घ आयुष्याचे मागणं मागायची.

तो हे सर्व पाहत होता. आणि समजून घेत होता ‘सलग्न होणे म्हणजे काय?’

Sunday, 3 May 2026

प्रगल्भता

 संक्षिप्त कथा 


प्रगल्भता 


“आई, तुला यातलं काही कळत नाही. तू माझ्या गोष्टींमध्ये नको लक्ष घालत जाऊस”, तिचा किशोर वयीन फटकन बोलून गेला. ती त्याच्या विषयाच्या काही निर्णयांमध्ये सुचना करत होती. परंतु मिसरूड फुटायला लागलेला मुलगा लागले असं बोलेल. असं तिला मुळीच वाटले नाही. तिच्या मनाला असह्य वेदना झाल्या.

नि अश्रू डोळ्यांत तराळले.

परंतु आई म्हणून ती जुन्या वळणाची असली तरी विचारांची पक्की होती. तिने अश्रूंना पापणीच्या कळ्यांजवळच भावनांच्या संयमाचा बांध घातला.

त्याच्याकडे स्तब्धपणे पाहिले नि स्वयंपाक घरात निघून गेली. काही क्षण अनामिक शांतता पसरली. या शांततेतही स्वयंपाक घरातून भांड्यांचा आवाज येत नव्हता. 

परंतु काही वेळाने तिला पाऊलांचा आवाज आला.

ती विसरेल कशी! गेली केवळ सुरुवातीची पाच सातच नव्हे तर एकूण १८ वर्ष या पाऊलांनी तिच्या मनावर आधी राज्य गाजवलं होतं. 

चिरंजीव हळूच येऊन आईच्या पाठीशी उभी होते.

ती नेहमी प्रमाणे गोड स्वरात म्हणाली, “बोल बाळा, काय खायला देऊ?”

नि त्याच्याकडे वळली.

तो हात जोडून उभा होता.

म्हणाला, “आई, माझं चुकलं. मी तुला असं बोलायला नको होतं. मला माफ कर”. 

आता मात्र तिच्या अश्रूंनी पापण्यांच्या कडा ओलांडल्या. ते भळाभळा वाहत होते. 

ती स्वतःला सावरत म्हणाली, “बाळा, आई भावनिक अधिक आणि व्यावहारिक कमी असते. म्हणून तुझे भविष्यातील सगळेच निर्णय मला मान्य असतील.”

त्यावर तो म्हणाला “मी देखील यापुढे कोणत्याच प्रकारची घाई करणार नाही”. 

एव्हाना मातापुत्राच्या संवादाचा विहंगम संगम पाहून ‘प्रगल्भतेला’ धन्यता वाटत होती.

Friday, 1 May 2026

अलक ५७५


त्याचे तरुण मुलासोबत खूप वाद होत होते. तो एकदा तिला म्हणाला, “मी नेहमी मुलाचा एक चांगला मित्र व्हायचा प्रयत्न करतो. पण असे का होते?”

ती क्षणभर थांबून म्हणाली, “‘मैत्रीतील मोकळीक’ यावर विचार केला आहेस?”

तो स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिला. त्याचे तिच्यावर आजवर गाजवलेल्या अधिकाराने मन व्यथित झाले.

त्याचे यानंतर मात्र कधीही मुलगा आणि पत्नी यांच्यासोबत वाद झाले नाही.

Wednesday, 29 April 2026

अलक ५७४


“शब्दांमध्ये अफाट शक्ती असते. ते प्रसंगी शस्त्र म्हणूनही उपयोगात आणता येतात”, एक उत्कृष्ट वक्ते तरुणांना मार्गदर्शन करत होते.

काही तरुण भाषणानंतर त्यांना भेटले.

त्यातील एकाने त्यांना दिलेल्या निमंत्रणास त्यांनी स्वीकारले नाही.

तो तरुण म्हणाला, “ जमाव कसा पेटवावा हे तुम्ही शिकवले. आता विचार कसे रुजवावे असे भाषण करायला शिकायला या”.

Monday, 20 April 2026

अलक ५७३



‘यूनो’ जगातील काही प्रमुख आर्थिक महासत्ता असलेल्या देशांनी स्थापन केलेली संघटना. उद्देश होता, जग तिसऱ्या महायुद्धाकडे जाऊ नये.

परंतु अमेरिकेनेच, त्यांच्यातीलच एका प्रमुख देशाने हा नियम मोडून काढला.

एव्हाना भारत या स्पर्धेत कुठेही नव्हता.

तो पुन:श्च विश्वगुरुपदी विराजमान होण्याची तयारी करत होता.

Saturday, 18 April 2026

अलक ५७२

त्याने घरावरती सोलार बसवले.

ते पाहून किशोरवयीन मुलगा म्हणाला, “बाबा, आता कितीही लाईट वापरली तरी चालेल ना!”

त्यावर त्याने मुलाला ‘वस्तूंचा योग्य वापर’ शिकवण्यास सुरुवात केली.

Friday, 17 April 2026

अलक ५७१

ती लग्नानंतर पहिल्यांदा रुसली. त्याने तिची समजूत अनेक प्रकारे काढायचा प्रयत्न केला. शेवटी, त्याने एक गजरा आणून तिच्या वेणीत माळला. आता तिने तिच्या अबोल्याला वाटकरून दिली.

एव्हाना त्याला प्रेमातील तर्काचे नगण्य स्थान आणि भावनेचे महत्त्व कळून चुकले होते.

Wednesday, 4 March 2026

अलक ५७०


“आज नवीन काय?”, ती रोज स्वतःला प्रश्न विचाराची.

“उत्साह”, तिला हे उत्तर देखील माहीत होतेच.

परंतु तिची ‘स्वतःचा शोध कधी थांबू नये’ ही एकच निर्मळ भावना असायची.


Friday, 27 February 2026

अलक ५६९


मराठीत बोला। मराठीत चाला।

मराठीत घाला। शिव्याशाप॥

प्राध्यापक मराठी भाषा दिनाचे औचित्यसाधून वर्गात विषय मांडत होते.

काही उनाड मुलांना मराठी शिव्या हा प्रकार खूपच आवडला. परंतु उण्यापुऱ्या चारपाचच शिव्या आठवल्या. 

एव्हाना मुलांना कळून चुकले होते प्राध्यापकांनी सुरुवात मराठीत बोला’ इथपासून केली होती…


©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

अलक ५६८


“‘ती कविता करते’ हे वाक्य कोणत्या काळातील आहे?”, वर्ग शिक्षिकेने विद्यार्थिनींना प्रश्न केला. 

अपेक्षित उत्तर मिळाले नाही.

त्यानंतर त्यांनी मराठी व्याकरणाचे पुस्तक बंद केले. आणि मुक्ताबाई ते बहिणाबाई अशा कवयित्रींची चरित्रे सांगण्यास सुरुवात केली.


©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Wednesday, 25 February 2026

अलक ५६७

 ती कविता लिहीत होती, त्यावेळेस तिचा इटुकला लाडोबा तिला  म्हणाला, “आई, ‘खबडक खबडक लाडोबा’ हे गाणंपण तूच लिहिलं आहेस का?”

तिला त्याच्या निरागस जिज्ञासुपणाचे खूप कौतुक वाटले.

त्यानंतर ती ‘कविता’ आणि ‘लाडोबा’ या दोघांचीही वाढ करतांना तिच निरागसता जगण्याचा प्रयत्न करत गेली.

Saturday, 21 February 2026

अलक ५६६


“संसाराच्या राहाटगडग्यात सोसावे लागले कष्ट आपल्या माणसांसाठीच असतात”, व्याख्याते वाक्य पूर्ण करत थांबले. नि पुढे म्हणाले, “सांगा बरं, हे वाक्य स्त्री का पुरुषाच्या तोंडी अधिक शोभून दिसते?”

‘संसार दोघांचा’ या विषयावर व्याख्यान देत होते. एव्हाना श्रोतेवर्गातील तरुणाईला ‘लग्न म्हणजे करार नाही’, एव्हढे नक्की कळले.

Friday, 20 February 2026

अलक ५६५


तो रोज स्वप्न पाहायचा ‘आपण एके दिवशी खूप मोठ्ठे होऊ’ म्हणून. परंतु त्याने कधी स्वप्नांना कृतीची जोड दिली नाही. मग एकदा त्याला सुरवंटाचे फुलपाखरू होताना पाहायला मिळाले.

आता तो कृतीशील झाला आहे. त्याला ‘स्वप्न’ आणि ‘दिवास्वप्न’ यातील फरक कळला आहे.

अलक ५६४

तिच्या सासूबाई वारल्या, या गोष्टीला अवघे पाच दिवस झाले होते. तेव्हा तिच्या आईने तिला सर्वांसमोर 'मालकीणबाई' म्हणून हाक मारली. तिच्या सर्वांगातून वीज चमकावी, असे काहीसे घडले. कारण तिला कधी 'सासुरवास' भोगावा लागला नव्हता.

परंतु आता तिला मात्र 'माहेरवाशीण' होण्याचीही भीती वाटू लागली.


अलक ५६३

तो : तू नेहमीच कर्तव्याला प्राधान्य दिले आहेस. नि प्रेमाकडे दुर्लक्ष केले.

तो : हा दृष्टीदोषही असू शकतो.

ती : नाही. मला वाटते, तू आता केवळ प्रेमाचीच साधना करावीस.

तो : ठीकच. परंतु काही वर्षांनी तूच म्हणशील की, मी हे सगळे कर्तव्य म्हणून केले. तेव्हा आजच काळजी घे.

तिने या प्रसंगानंतर कर्तव्याकडे प्रेममय दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली.

Sunday, 1 February 2026

अलक ५६२

तो : तू नेहमीच कर्तव्याला प्राधान्य दिले आहेस. नि प्रेमाकडे दुर्लक्ष केले.

तो : हा दृष्टीदोषही असू शकतो.

ती : नाही. मला वाटते, तू आता केवळ प्रेमाचीच साधना करावीस.

तो : ठीकच. परंतु काही वर्षांनी तूच म्हणशील की, मी हे सगळे कर्तव्य म्हणून केले. तेव्हा आजच काळजी घे.

तिने या प्रसंगानंतर कर्तव्याकडे प्रेममय दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली.

अलक ५६१


ती भाषण करण्यासाठी उभी राहिली तरीही साशंकच होती. कारण तिला प्राध्यापकांनी ‘पुरुषार्थ’ हा विषय निवडण्यासाठी सांगितले होते.

परंतु तिने अवघ्या ७ मिनिटांच्या वक्तृत्वात सभा जिंकली.

त्यानंतर तिने कधीही ‘स्त्री-पुरुष समानते’वर भाषण दिले नाही.


अलक ५६०

.

एव्हाना दोघांनीही चाळिशीत पदार्पण केले होते. संसारात प्रगल्भता आली होती.

ती रुसायची नाही. तो रागवायचा नाही.

प्रेमातील ओलावा मात्र जाणवायचा.

त्याला कामावरून येण्यास कितीही उशीर होवो, ती जेवायला थांबायची. 

नि उशीर झालेल्या दिवशी, तो आठवणीने तिच्या वेणीत गजरा माळायचा.

ती दोघं व्यक्त ते अव्यक्त प्रेम अवस्था अनुभवत होते. 

Thursday, 22 January 2026

अलक ५५९


एव्हाना दोघांनीही तिशीत पदार्पण केले होते. अल्लडपणाचे दिवस संपले होते. परंतु ती अधूनमधून लाडाला येत असे.

तो देखील तिचे लाड पुरवायचा. 

बहुदा त्यांना लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही प्रेमातील नाजूकता जपण्याचे गमक कळले होते.

अलक ५५८

“मीच एकटा चांगले काम का करू. बाकीचे सहकारी तर कामचुकारपणा करतात”, मी वैतागून साहेबांना म्हणालो.

“ठीक. बघूया”, बहुतेक साहेबांनी टाळले. 

कालांतराने माझे प्रमोशन झाले. मला टीम मिळाली. आता मात्र माझा दृष्टिकोन बदलला. माझ्या लक्षात आले होते, ‘चांगले काम करणारे जगात एकटे कधीच नसतात.’

अलक ५५७

“‘जल्म’ नाही ‘जन्म’ असा शब्द आहे”, तो एका त्याच्या गावाकडच्या मित्राला कमीपणा दाखवत म्हणाला. एव्हाना मित्र मात्र शांतपणे ऐकत होता. 

त्याच्या मित्राला ‘भाषा शुद्धी आणि भाव शुद्धी’ यांतील अंतर बहुदा ठाऊक नव्हते.



Saturday, 17 January 2026

अलक ५५६

 नि तू दोघेही दीर्घ आहोत.

परंतु दोघांना जोडणारा मात्र ह्रस्व?

असो. मी ‘तू’झ्यात मिसळ्यानंतर मात्र ही सगळी बंधने संपून जातात.

‘आपण’ किती छान आहे.

नाही?

Sunday, 11 January 2026

अलक ५५५


त्याचा रसिक मित्र म्हणाला, “तू आता कथा ‘प्रथम पुरुषी एक वाचना’त लिही. म्हणजे कथांमध्ये नावीन्य येईल.”

त्याने कथा लिहिली. ‘मी’.

त्यावर त्याला खूप अडकल्यासारखे वाटले. तो परत मित्राकडे गेला.

मित्र म्हणाला, “तू शब्दश: प्रथम ‘पुरुषी’ अर्थ घेतलास”. 

त्यानंतर त्याच्या कथेने मोकळा श्वास घेतला. तो ‘मी’पण दोन्हीबाजूने अनुभवत होता.

अलक ५५४

तो नुकताच गवर्नमेंट काँट्रॅक्टर म्हणून काम करायला लागला होता. एका रस्त्याच्या कामाला चालला होता.

त्या रस्त्याचे नाव होते, एम.जी. रोड.

तो क्षणभरासाठी थांबला.

आपण सरकारी काम मिळवतांना योग्य मार्गावर नाही आहोत, याची त्याला जाणीव झाली. आपलेही ‘सत्याचे प्रयोग’ सुरू व्हावेत या विचारांच्या विश्वात हरवून गेला.

अलक ५५३

त्याची इटूकली लाडो म्हणाली, “बाबा, आज मी तुला मेपक करून देते”.

असे म्हणून तिने त्याची चांगली काळी कुळकुळीत दाढी देखील पांढरी केली”.

त्याला त्याचा नवीन अवतार तर आवडला.

पण खरोखरीच पांढरी दाढी होईल त्यावेळच्या त्याच्या लेकेची कल्पना करण्यात त्याचे मन रमून गेले.

Friday, 5 December 2025

अलक ५५२


सगळे म्हणायला लागले,


लग्नानंतर…

“तो तिचं ऐकतो.”


मुलगी झाल्यावर…

“तो तिचं ऐकतो.”


आणि आता सून आल्यावरही…

“तो तिचं ऐकतो.”


त्याने मात्र कधीही उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही.

नवोदितासाठी फक्त ‘मीपण’ विसरत गेला.

Thursday, 4 December 2025

अलक ५५१

तो लिहिता-लिहिता थांबला.

खरेतर अडखळला होता.

त्याला कारण लक्षात येताच तो वाचायला लागला.

आणि तो ‘वाचला’.

Saturday, 29 November 2025

अलक ५५०

तिला लहानपणी वाटायचे, ‘आपल्याला पंख असते तर जगभर फिरून आले असते’.

पुढे मोठं झाल्यावर तिने पर्यटनाची आवड तर जपली. परंतु त्या सोबत एक संस्था देखील स्थापन केली.

नाव ठेवले ‘पंख’.

ती कोणत्याही मुलीचे स्वप्न अपूर्ण राहणार नाही, या साठी काम करायची.

Friday, 28 November 2025

अलक ५४९



प्रेमात असतांना…

ती बोलायची. तो ऐकायचा.

लग्नानंतर…

ती बोलत असते. तो ऐकत असतो.


व्याकरणाचा काळ बदलला तरी तो बदलला नाही, असे नाही.

तर त्याने लग्नानंतरही त्याच्यातील प्रियकर जिवंत ठेवला आहे.

अलक ५४८

 मंदिराच्या ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.

या वेळी एका ठिकाणी रामकथा सुरू होती. कथाकार विषय मांडत होते, “रामाचा वनवास संपला म्हणजे रामराज्य आले असे नाही…”

एव्हाना भक्तगण रामराज्यातील ‘नागरी कर्तव्या’चा विचार करायला लागले होते.

अलक ५४७

 ती त्याला बाहेरगावी कामानिमित्त जातांना फाटकापर्यंत सोडायला जाऊ लागली.

त्याची आई दारातच थांबली.

म्हणाली, “आता इथून मागे वळून पाहायचे नाही.”

ती त्याला वाटिलावून लगोलग घरात आली. आणि सासूला बिलगली.

म्हणाली, “काहीही झाले तरी त्याच्यावर पहिला अधिकार तुमचाच…”

Tuesday, 25 November 2025

अलक ५४६

तो समाजात घडणाऱ्या वाईट घटनांना सकारात्मक रूप देत कथा लिखाण करत असे. प्रत्येकाला त्याच्या कथा आवडायच्या.

एकदा त्याला वाटले, ‘आपण आहे तसे कथानक रंगवावे.’.

मग त्यांने कथा लिहिली ‘समाजमन’.

आता तो केवळ टीकेचा धनी झाला आहे.

Monday, 24 November 2025

अलक ५४५

 लग्नानंतर ती त्याला बाहेरगावी कामानिमित्त जातांना बाहेरपर्यंत सोडायला येऊ लागली.

त्याने एकदा-दोनदा मागे वळून पाहिले, आई काही दारात दिसली नाही.

‘पोटचा गोळा’, असा सहज हस्तांतरित करण्याची कला केवळ स्त्रियांकडेच असू शकते, या गोष्टीचा त्याला अनुभव आला होता.

Saturday, 22 November 2025

अलक ५४४

 एका पक्षाला जनतेने पुन्हा एकदा निवडणुकीत एक हाती सत्ता स्थापन करण्याची संधी दिली.

त्यावर विरोधकांनी आत्मचिंतन बैठक बोलावली.

परंतू दोष कोणाला किंवा कशाला द्यायचा याचा काही निर्णय होऊ शकला नाही.

त्यावेळी नेते मांडली मोठ्या आशेने पक्ष्याध्यक्षांकडे पाहत राहिले.

Monday, 27 October 2025

अलक ५४३


स्नेह संमेलनातून परततांना प्रत्येक विद्यार्थी मित्र ‘लवकरच पुढच्या वर्षी भेटूया’, असे म्हणत जात होते.

स्थानिक राहणारे मित्र हसतमुखाने निरोप देत होते.

एव्हाना त्यांच्या कानात शाळेतील नीरव शांतता घोंघावत राहिली.

अलक ५४२


स्नेह संमेलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वसामान्य नोकरदार, दुकानदार ते उद्योजक, जिल्हाधिकारी झालेले विद्यार्थी होते.

शिक्षकांनी देखील कृतकृत्यतेची भावना व्यक्त केली.

तेंव्हा कोणीही हरखून न जाता, उलट प्रत्येकजण ‘आपली सामाजिक जबाबदारी अधिक वाढली आहे’, ही जाणीव घेऊन परतले.

अलक ५४१


‘आठवणींचा सोहळा’.

स्नेह संमेलनासाठी जवळजवळ तीस वर्षांनी जमलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला नाव द्यायचे ठरवले.

गुरुजनांसह सेवक कर्मचाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी मात्र वर्गातील फळ्यावर लिहिले होते,

‘कृतज्ञ आठवणींचा सोहळा’…

Saturday, 20 September 2025

गोदमाईची आरती



‘हर हर गोदा

हर हर गंगे’,

असा आरतीच्या प्रारंभीस निवेदिकांनी मंत्रघोष केला, तो नाशिक येथील राम घाटावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेल्या गोदामाईच्या आरतीच्या वेळी. गोदावरीस दक्षिणगंगा म्हणतात हे जरी सत्य असले तरी गोदावरी ही भारतातील प्राचीन नद्यांपैकी एक आहे. शिवाय गोदावरीचे स्थान हे नित्य स्नानाच्या वेळी ज्या सात नद्यांचा श्लोक म्हटला जातो त्या मध्ये समाविष्ट आहे. अर्थात गंगाप्रमाणे तिची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे, महती आहे. 


‘गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती…’ हा श्लोक स्नानाच्या वेळी म्हणत असताना स्नानाच्या पाण्यात प्रत्यक्ष गोदावरी आणि अन्य नद्या आहेत हा भाव समस्त भारतीयांच्या मनामध्ये असतो. अशी गोदावरी अतिप्राचीन आहे.


गोदामाईच्या आरतीच्या सुरुवातीस गोदामाईचा संपूर्ण इतिहास मांडला जातो. ज्यात गौतमऋषींच्या मार्फत नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीचा उगम झाला.

इथ पासून ते प्रभू रामचंद्रांचा सहवास, सातवाहन राजांच्या काळातील संपन्न राज्य, शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांची 

धर्मसेवा ते अगदी अलीकडच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म ते बालपण देखील गोदामाईच्या काठावरीलच होय.


पूढे समंत्र गोदामाईची आरती होते. खरेतर अशी आरती ही काही काशीवरून नाशिकपर्यंत आलेली आहे, असे वाटू शकते. परंतु कृष्णाकाठी राहणाऱ्या भक्तजणांना ठाऊक आहे, केवळ कृष्णेची आरतीच नाही तर कृष्णामाईचा स्वतंत्र उत्सवही होत असतो. अशी महाराष्ट्राची समृद्ध पारंपरिकता आहे.


गोदामाईची आरती सुरू झाली आहे हे ऐकले होते, परंतु पहिल्यांदाच आरती पाहायला जाताना आरती देखील करायला मिळेल याची कल्पना केली नव्हती.

ती संधी मिळाली आमच्या भाऊजींमुळे.

पितृपक्षातील दिवस होते. क्षणभर विचार आला ‘प्रभू रामचंद्र यांनी वडिलांच्या अस्थि विसर्जन करून त्यांच्या मोक्षाची कामना केली. तशीच आपणही आपल्या समस्त पितरांच्या मोक्षांचा संकल्प करावा.’

या विचारांनी भारावून गेलो. कदाचित असा विचार स्वतंत्रपणे कधी मनात आलाच नाही. तो संकल्प बाहेर पडण्यास देखील तीर्थक्षेत्रच असावे लागते. आणि तो ही गोदामाईच्या तीरावरील एक दैवी योग होता.


मी हा संकल्प सोडून भाव विभोर होऊन गोदामाईची आरती करत होतो. परंतु माझा हा विचार किती स्वार्थी आहे, हे पुढील काही क्षणात कळाले. 

मी याकरिता आयोजकांचा जीवनभराचा ऋणी आहे. 


माझ्या मनातील संकल्प सोडून झाला होता. तसा आयोजकांनी निवेदन करताना गोदामाईकडे प्रार्थनाकेली ‘समस्त हिंदू बांधवांच्या पूर्वजांचा उद्धार होवो. आणि गोदामाईची सेवा करत वर्तमानातील तसेच भविष्यातील हिंदू बांधवांना सुख, शांती आणि समृद्धी मिळो.’


मी क्षणभर खजील झालो.

नि पुढील काही क्षणातच जाणीव झाली की, खरंच प्रदीर्घ काळ चाललेल्या यावनी आक्रमणाच्या काळात आपला धर्म टिकवून ठेवत बलिदान करणाऱ्या हिंदू बांधवांची कृतज्ञता व्यक्त करायची राहिली होती. ती गोदामाईच्या आरतीच्या निमित्ताने पूर्ण झाली.


आणि हो एवढ्यावरच थांबून चालणार नाही हेही कळून चुकले. आणि पुढील संकल्प देखील गोदामाईच्या साक्षीने केला. ‘आता इथून पुढे आपल्या पूर्वजांचा वारसा चालवत भावी काळातील हिंदू बांधवांपर्यंत ही परंपरा, वारसा, समृद्ध इतिहास नेण्याची जबाबदारी आपलीच आहे. ती पूर्ण करण्याची शक्ती दे. बुद्धी दे.’

‘हर हर गोदा

हर हर गंगे…’


©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 24 August 2025

तीठा

नागपूरमधील लक्ष्मीनगर परिसरांत आठ रस्ते एकत्र येतात त्या जागेला ‘आठ रस्ता’ असे नाव आहे. असेच सोलापूर शहरांत सात रस्ता’ आहे. तर मुलूंड शहरांत पाच रस्ता आहे. आणि उर्वरीत सर्वच शहरांत चौक अर्थात चार रस्ते एकत्र येतात अशा जागा आहेत.

परंतू तीन रस्ते एकत्र येतात अशाही जागा असलेली शहरे आहेत. परंतू अशा जागांना काय म्हणतात हेच ठाऊक नाही. छ. संभाजीनगरमध्ये अशा जागा आहेत, त्यांना ‘टी-पॉइंट’ (हर्सूल टी-पॉइंट, जळगांव टी-पॉइंट किंवा हडको टी-पॉइंट) असे नाव प्रचलित झाले आहे.

माय मराठीच्या गौरवशाली आणि समृद्ध वारश्यातील ‘तीठा’ अर्थात तीन रस्ते एकत्र येतात ती जागा एव्हाना हरवली आहे. ती अपवादानेच कोकणांत सापडते. उदा. कासरडे तीठा किंवा फणसगाव तीठा.

इथे विषयाला दुसरी बाजू देखील आहे. आधुनिकीकरणाच्या काळात प्रगती होत असताना इंग्रजीला दोष देऊनही चालणार नाही. तर प्रगती करत असताना आपण आपली मातृभाषा किती जपतो, हा खरा प्रश्न आहे.

या ठिकाणी केवळ एक शब्द हरवलेला नाही आहे. तर संकल्पना हरवली आहे. ती म्हणजे 'तीठा'.

खरंतर काळाच्या ओघात अशा अनेक संकल्पना हरवल्या असतील. परंतु त्या वस्तूंशी संबंधित असतील. प्रचलित काळानुसार अनेक वस्तू बदलल्या आणि नवनवीन वस्तू व्यवहारात आल्या. त्यामुळे वस्तू समोर नसेल तर तो शब्द किंवा ती संकल्पना हरवणे स्वाभाविक आहे. परंतु इथे प्रत्यक्ष तीन रस्ते एकत्र येतात. परंतू त्या जागेला काय म्हणतात, हे आपल्याला माहीत नाही, हे चिंताजनक आहे.

अशा संकल्पना केवळ जपणे नाही तर व्यवहारात आणत जगणे, हे महत्त्वाचे आहे. असे झाले तर अशा अनेक 'तिठां'ना नकळतपणे एक संजीवनी मिळेल.

आणि माय मराठी अमृताते पैजा जिंकले, हे निश्चितच.

©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Saturday, 16 August 2025

अलक ५३६

तो लिहायला लागला होता.

तेंव्हा त्याच्या लक्षात आले, ‘लिखाणाला शस्त्र मानणारी’ काही लेखक मंडळी आहेत.

तो अधिक सजग झाला.

आणि त्याने अधिक घट्टपणे त्याच्या प्रतिभेचे अंतर्मनावरील वस्त्र धरून ठेवले.

अलक ५३५


ती तिच्या इटुकल्या लाडोबाला पाळणाघरातठेवून नोकरीकरण्यास जात असे. तिला काम संपण्यास कधीकधी उशीर होऊ लागला की मनात नोकरी सोडण्याचा विचार येई.

परंतू ती ‘घार उडे आकाशी…’ म्हणत मन शांत करत असे.

Thursday, 24 July 2025

अलक ५३४


एक नर्स ऑपरेशनची तयारी करत होती. ती फेसमास्क, हेडकॅप, ऍप्रन घालत असताना तिच्या मेकअपची खूपच काळजी करत होती.

ते पाहणाऱ्या महिला डॉक्टर तिची सुट्टी करत म्हणाल्या,

“नर्स म्हणून मेकअप किट आणि सर्जिकल किटमधील अंतर कळायला लागले की परत ये कामाला”.

अलक ५३३

 दोघे एकाच कंपनीत काम करत होते.

आणि पुढे काम करत असतांना तिची पगारवाढ त्याच्यापेक्षा अधिक झाली.

त्याने तो क्षण मोठ्या आनंदाने साजरा केला.

एव्हाना तिला कळूनचूकले होते, ‘प्रेमाने अभिमानावर मात केली आहे’.

Wednesday, 23 July 2025

अलक ५३२


तिचा घरातील आवराआवरी करतांना अगदी अवतार झाला होता. तो ही तिला मदत करत होता. तो काही वेळाने तिला थांबवून म्हणाला, “तू या अवतारातही खूप गोड दिसते आहेस”. ती क्षणभर लाजली.

एव्हाना घराच्या सौंदर्यात भर पडत होती.

Sunday, 13 July 2025

अलक ५३१

ती बस कंडक्टर म्हणून काम करायची. तिला तिकीट देत असताना होणाऱ्या ओंगळवाण्या स्पर्श्यामुळे असह्य व्हायचे.

परंतू ती रोज नव्या उमेदीने कामाला जायची. ती स्वत:शीच म्हण्याची, “आम्ही स्त्रीया सतीच्या वाणासोबत पदराला कर्मयोगाचा वसा देखील बांधत असतो.”

अलक ५३०



“आपल्या माणसांच्या चांगल्यासाठी प्रसंगी वाईटपणा देखील घ्यावा”, आजोबा तरुणवयीन नातवाला व्यावहारीक जगाचे धडे देत होते.

त्याने विषय अव्यवहार्य वाटून सोडून दिला.

त्याला कालांतराने नातेवाईकांमध्ये वावरतांना मात्र लक्षात आले की, आजोबा उपदेशाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.

अलक ५२८



त्याने ‘वेळ झाला आहे’ म्हणत घाईघाईने ओसंडून वाहणाऱ्या पुलावरून मोटरसायकल चालवली. आणि पाण्याचा जोरदार प्रवाह त्याला वाहून घेऊन गेला.

एव्हाना ‘काळ आला होता’ असे पाहणारे म्हणत होते.

अलक ५२७



‘बँक मॅनेजरचा मुलगा असून गणितात एवढे कमी मार्क्स घेतो’, असे म्हणत त्याने त्याच्या तरुण मुलाला अक्षरशः मारले.

त्यानंतर त्या दोघांचे सूत्र कधीही जुळले नाही.

ती मात्र त्याच्या अहंकाराचा ऋणभार कमी करण्यात गुंतून गेली.

अलक ५२६


आजोबा किशोरवयीन नातवाला आग्रहपूर्वक पंढरपूरच्या वारीत घेऊन गेले. तो वारीतील मंगलमय वातावरणांत भान हरवून गेला.

घरी आल्यानंतर मात्र त्याचे आईवडील मात्र म्हणत होते, ‘आम्हाला आमचा मुलगा सापडला आहे’.

अलक ५२५


तो : तू कधी माझ्या डोळ्यांतील तुझे सौंदर्य पाहिले आहेस का?

ती: माझ्या चेहऱ्यावरील कोडाची अशी थट्टा करू नकोस.

तो : क्षमा कर. मी समाजत होतो, तू कोडाचा विचार न करता नेहमी तयार होत असशील.

त्यांचे जीवन : एव्हाना त्याचे नितळ प्रेम तिला कळत चालले होते.



अलक ५२४


तो : मला तुझ्यातील आळस मुळीच आवडत नाही.

ती: नि मला तुझ्यातील अहंकार.

त्यांचा संसार: कशाचा त्याग करावा, हे दोघांनाही माहीत आहे. परंतू मला सुखी करण्यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही आहे.


Sunday, 8 June 2025

अलक ५२३

तिने जागतिक पर्यावरणाच्या दिवशी इटुकल्या लाडोबासोबत काही रोपं लावली. परंतू त्याला कोणतीही सूचना वा गोष्ट सांगितली नाही.

तो दुसऱ्या दिवसापासून स्वतःहून रोपांना पाणी घालू लागला.

एव्हाना तिच्या लक्षात आले होते, ‘आपली लागवड योग्य झाली आहे’.

Thursday, 5 June 2025

अलक ५२१

त्याने प्रेमात पडल्यावर तिला वचन दिले होते, ‘तूझ्यापदरांत जगातील सगळी सुखं आणून ठेवीन’. एका मध्यमवर्गीयाने पाहिलेले हे एक खूप मोठे स्वप्न होते.

त्याने काही वर्षांनी एक मोठा बंगला बांधला.

बंगल्याला नाव दिले होते ‘प्रेमाची शक्ती’.


Wednesday, 4 June 2025

अलक ५२०


'आलेल्या क्लेममध्ये जेवढ्या जास्त त्रुटी काढशील तेवढा जास्त इंसेण्टिव', त्याला इन्शुरन्स कंपनी जॉईन केल्यावर टार्गेट देण्यात आले. 

त्याने दुसऱ्याच दिवशी कंपनी सोडून दिली.

त्याला  'मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणे', या म्हणीची प्रचिती नको होती.   

Monday, 2 June 2025

अलक ५१९

 ‘एवढाच त्रास होत असेल तर जा तुझ्या वडिलांच्या घरी’, तो छोटाश्या वादांवरून तिला बोलून गेला.

तशी त्यालाच त्याची लाज वाटली नि क्षणाचाही विलंब न करता त्याने तिची माफी मागितली.

त्यानंतर त्याने तिला वचन दिले, ‘तुझ्यासाठी सर्व सुख मिळवण्याचा प्रयत्न करेनच. परंतू ‘शब्द दारिद्र्य’ कधी येऊ देणार नाही’.

Monday, 28 April 2025

अलक ५१८

तिच्या इटुकल्या लाडोबाला परीक्षेत अगदीच सर्व साधारण गुण मिळाले.

ती तरी देखील त्याच्या आवडीचा काजूपेढा घेऊन घरी गेली.

ती ‘यश म्हणजेच सर्व काही नसतं’, हे त्याच्या बालमनावर बिंबवत होती.

Friday, 25 April 2025

अलक ५१७

 पहलगाममध्ये पर्यटकांना धर्म विचारून जीवनीशी मारले,

तरीही ‘आतंकवादाला धर्म नसतो’,

हे विधान सर्व राजकीय नेते मंडळी करत होती.

तेंव्हा एका विचारवंताने विधान केले,

‘केवळ हिंदुच धर्मनिरपेक्ष असू शकतो’, हे समजायला किती वर्ष लागणार माहीत नाही.

Wednesday, 23 April 2025

अलक ५१६

 तिने नुकतीच धर्मपत्नी होऊन नव्या संसाराला सुरुवात केली होती. तर काही दिवसांच्या आंतच तिच्या पतीची धर्मांध आतंकवाद्यांनी हत्या केली.

आता तिला अधर्म काय आहे, हे कळले होते.

आणि म्हणूनच की काय तिने धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घातलेल्या संविधानाला दाद मागायची नाही, हे ठरवले.

Monday, 14 April 2025

आता कसे जायचे मामाच्या गावाला?


मामाच्या गावाकडे आगिनगाडी कधीच नव्हती. मामा गावातच राहायचा. पण मामाकडे जाण्याची मजा काही औरच होती. मामा सगळे लाड पुरवायचा. त्यामुळे सुट्ट्या लागण्याची तर वाट पाहिली जायचीच. शिवाय मामाकडे जाण्याचे इतरही काहीतरी कारण शोधले जायचे.

परंतु आता मामा नाहीये. त्यामुळे मामाच्या गावाला जावूया हे गीत आठवणे देखील असह्य झाले आहे. ऐन तारुण्यात देवाने मामाला स्वत:कडे बोलावून घेतले. भाच्यांची हौस मौज पळवून नेली. भाच्यांना धक्का बसला आहे. प्रसंगी समजत देखील नाहीये. हसणारा, धम्माल दंगा मस्ती करणारा मामा असा अचानक दूरच्या गावाला कसा काय निघून गेला?


खचित, असेही वाटत असेल, सगळेजणं खोटं बोलताहेत, मामा दूर गेला म्हणून. बहुदा मामा कामात असेल. आत्ता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. मामा असे नाही करणार. आमचे लाड न पुरवता मामा कधीच कुठे गेला नाही.

मग आत्ताच कसा काय लपून बसला आहे?


कदाचित देवच दुष्ट असणार. त्याने त्याला लप‌ले आहे, परंतु आता परत आणण्याचाही मार्ग नाहीये.

कोवळ्यावयांतील मामा विषयाच्या आठवणी किती नाजूक प्रेमळ आणि मायाळू असतात. आईनंतर मावशी असते, असे म्हणतात. परंतु मामाही असतो हे सांगायचे बहुदा बरेच कवी विसरले आहेत. तरी एका कवीने 'मामाच्या गावाला जावूया...' हे गीत लिहून मामाची थोरवी खूप सुंदरपणे, समर्पकपणे वर्णन केली आहे.


कदाचित मावशी भाच्यांना लहानपणी नक्कीच लागते. पण मामा मात्र आयुष्यभर लागतो. लहाणपणी भाच्यांना जपणारा, जीव लावणारा मामा ते आयुष्यभर पाठीशी उभा रहाणारा मामा.

बघा ना! आपली परंपरा किती महान आहे, जीवाचे रान करून मुलांना वाढवणाऱ्या बाबांना मुलाच्या, मुलीच्या लग्नात पाठीशी उभे रहायचा अधिकार नाहीये. तो हक्क मामाला दिला आहे. स्वाभाविकच आहे, प्रसंगी बाबा कठोर होऊ शकतात परंतु मामा नाही. मुळात ‘माय’ प्रमाणे मामाच्या नावातही ‘माया’च आहे. तो आई सारखे लाडही करेल आणि बाबासारखा पाठिशीही उभा राहील.


परंतू आता पाठीशी कोण उभे राहणार? पाठीवर बसायचेही राहून गेले.

देव दयाळू आहे, असे अनेकदा ऐकल्याचे जाणवते. परंतु ऐन तारुण्यात मामाला स्वतःकडे बोलवणाऱ्या देवा बद्दल कमी बोलायचे?

पण देव निष्ठूर ही नाहीये, स्वत: सगळीकडे पोहचू शकत नाही म्हणून त्याने जशी आई निर्मिली, तसेच प्रेमळ आणि मायाळू मामाची निर्मितीही त्याचीच ना!


कदाचित सगळ्या जगाला प्रेम वाटलता वाटता देवाची झोळी रिकामी होत असणार, म्हणून त्याने स्वतःला माया लावणारा कुणीतरी पाहिजे म्हणून मामाला स्वतःकडे बोलवले असणार.


आता भाच्यांनी मामाच्या आठवणीतच जगायचे, हे नक्की आहे. परंतु देवाने असे हे अकाली कोणाला नेणे थांबवावे.

मामाचे ओस पडलेले गाव, आता कसे आणि कधी सावरणार, देवालाच

ठाऊक!

————————


स्व. मयूर यज्ञेश्वर पाठक (वय-३० वर्ष)

माझ्या मुलांचा मामा, यांस भावपूर्ण श्रद्धांजली.

Tuesday, 1 April 2025

अलक ५१५


त्याला मोकळा भात आवडायचा तर तिला  अस्सट.

इटुकल्या संसारात अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी होत होत्या.

तरीही संसार सुखाचा झाला.

एकमेकांची स्वभावभिन्नता जपत प्रेम करता येतं, हा नवा अध्याय ते रचत होते.

Sunday, 23 March 2025

अलक ५१४

तो तिला कविता अर्पण करणार होता.

मग त्याने संपूर्ण काव्यच अर्पण केले.

त्याला तरीही काहीतरी शिल्लक राहिल्याचा भास होत होता.

या ‘अपूर्ण’तेच्या भावनेने त्याच्या कवितेची अवीट गोडी वाढत गेली.


अलक ५१३


तो तिला कविता अर्पण करणार होता.

मग त्याने संपूर्ण काव्यच अर्पण केले.

त्याला तरीही काहीतरी शिल्लक राहिल्याचा भास होत होता.

मग त्याने स्वतःला अर्पण केले.

तेंव्हा ‘प्रतिभे’चा सवतीमत्सर जागा झाला होता.




Friday, 21 March 2025

अलक ५१२


तो तिला कविता अर्पण करणार होता.

मग त्याने संपूर्ण काव्यच अर्पण केले.

त्याला तरीही काहीतरी शिल्लक राहिल्याचा भास होत होता.

मग त्याने स्वतःला अर्पण केले.

तेंव्हा त्याची कविता ‘प्रतिभे’ने ओतप्रोत भरून वाहत होती.

Sunday, 16 March 2025

अलक ५११

 


तो शास्त्रज्ञ म्हणून परग्रहावरील जीव सृष्टीचा शोध घेत होता. तर त्याच्या पत्नीच्या पीएचडीचा विषय जीवनमूल्यांशी संबंधित होता.

अनेक वर्षांतरही दोघांचे संशोधन 

अजून पूर्ण झालेले नाही.

खचित त्यांना कळून चुकले आहे, आपण जीव लावणे थांबवले तर संशोधन निश्चितच अपूर्ण राहील.

अलक ५१०



तो एक ‘अंध विद्यालय’ चालायचा.

त्याने कधीही रंगांची काळजी केली नाही.

त्याच्या डोळंस देशाला जाणीव झाली होती, ‘प्रेमाच्या रंगापूढे सर्व काही फिके आहे’.

Wednesday, 12 March 2025

अलक ५०९

 तो तिच्यासाठी गजरा घेत होता.

परंतू फुलारीने त्याला अत्यंत निर्दयीपणे गजरा काढून दिला.

त्याला क्षणभर वाटले, ‘फुलांच्या व्यापाऱ्याला प्रेम शिकवावे’

परंतू तो व्यवहाराने वागला,

त्याने फुलारीला चुरगळलेल्या फुलांचे देखील पैसे दिले.

Friday, 7 March 2025

अलक ५०८

  


“खरतरं गुणी पत्नी ही पुरुषाचे सौभाग्य असते”, तो बोलत होता आणि ती शांतपणे ऐकत होता.

एक क्षणी त्यालाच रडू कोसळले.

तेंव्हा तिने त्याला कुशीत घेतले.

त्याच्या कविमनाने विचार केला, ‘पुरुषाला पूर्णपुरुष होण्यासाठी साधना करावी लागते. स्त्री मात्र मातृ रूपात सर्वच साध्य करते.’

Saturday, 15 February 2025

अलक ५०७

‘तिला त्याच्यापेक्षा जास्त पगार होता. तो तिने केलेल्या अपमानाला देखील प्रेम समजत होता…’ कथाकार लिहिता लिहिता थांबला. कथेच्या दृष्टीने स्त्री पात्र दूष्ट दाखवणे सोईचे नाही, असे समजून कथाकाराने पुर्नलेखन करण्यास सुरुवात केली. आणि वीज गेली. 

एव्हाना कथाकाराच्या लक्षात आले होते, पत्नीने वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या पैश्यात त्याने चार पुस्तके विकत घेतली होती.

Wednesday, 12 February 2025

अलक ५०६

बसमध्ये एका भिकाऱ्याशेजारील जागेवर एक महिला जाऊन बसली. तसा तो भिकारी संकोचला.

परंतू त्या महिलेने कोणताही नकारात्मक भाव व्यक्त केला नाही.

बसमधील उर्वरीत प्रवाश्यांचा व्यवहार देखील सर्वसामान्यच होता.

एव्हाना भारत ‘स्पृश्य-अस्पृश्य’तेचा नवा अध्याय लिहीत होता.

Monday, 10 February 2025

अलक ५०५


तो चुकला.

त्याने माफी मागितली.

ती रडली.

प्रेमात चिंब भिजली.

खरंतर कथा इथं संपली.

परंतू कथाकाराने ती ‘चूकी’मूळे जीवंत ठेवली.

Sunday, 9 February 2025

आत्महत्या, आत्मत्याग आणि आत्मचिंतन

 


आत्माराम आणि अमृतानुभव हे अनुक्रमे रामदासस्वामी आणि ज्ञानेश्वर यांनी लिहिलेल्या दासबोध आणि ज्ञानेश्वरी नंतरचे परमोच्चप्रतीचे ग्रंथ.

परंतु सामान्य माणसांना दासबोध आणि ज्ञानेश्वरी हेच माहीत आहेत. आणि असावे देखील. अर्थात ‘एक तरी ओवी अनुभवावी’, हा ज्ञानेश्वरीतील प्रचिती यावा हा आहे.

परंतू ज्यांनी या धर्मग्रंथांना एका अर्थाने जगायचे काम केले. किंवा त्याचा प्रसार-प्रचार करून त्याची अनुभूती इतरांना मिळावी यांसाठी प्रयत्न केला. त्यांनीच जर त्याच्या विपरीत वर्तन केले तर…

एक सज्जन व्यक्ती, संत, महंत, कुटुंब प्रमुख म्हणून हानी आहेच. तसेच समाजाचे ही अतोनात नुकसान आहे. 

लाख मरो पण लाखोंचा पोशिंदा जगो, ही म्हण नकळत पण मागे पडत चालली आहे.

काही वर्षांपूर्वी भय्यूजी महाराजांनी केलेली आत्महत्या आणि आता शिरीषमहाराज यांनी केलेली आत्महत्या, या दोन्ही याच प्रकारे वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर घोर नुकसान करणाऱ्या होत्या.

समाजमाला या मुळे एक मोठा खड्डा पडला. ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहायचे त्यांनीच अपेक्षा भंग केला. नव्हे मित्र, नातेवाईक यांच्याकडे मन मोकळे करण्याची तसदी नाही घेतली, म्हणून एक टोकाचा निर्णय घेतला गेला. 

खरेतर आपल्या हिंदू संस्कृती मधे आत्महत्या हा प्रकारच नव्हता. परकीय आत्याचाऱ्याच्या काळातही शील रक्षण व्हावे म्हणून करवा लागणारा आत्मत्याग, आत्मरक्षण, देहत्याग होता. तसेच साधू संतांनी तर आत्मत्यागाचे अनेक सुंदर उदाहरणे प्रस्थापित केलीलेली आहेत.

एका विशिष्ट वयानंतर जेंव्हा आता थांबले पाहिजे असे वाटते तेंव्हा देहत्याग करण्याचा शास्त्रीय, आध्यत्माच्या मार्गाने जाणाऱ्या अवस्था आहेत. आत्मत्याग करण्याचा मार्ग अत्यंत खडतर असा असतो.

जीवनाची केवळ आसक्ती संपली आहे असे नव्हे तर जीवन कार्य आता पूर्ण झाले आहे आणि आपण हा देह त्याग केला पाहिजे, या भावनेने आत्मत्याग केला जातो. अर्थात त्याला प्रचंड आत्मविश्वास लागतो, धाडस लागते.

या विपरीत आत्महत्येला केवळ अविचार आणि आतातायी निर्णय लागतो.

प्रायोपवेषन किंवा संथारा ही आत्मत्यागची अन्य नावे. आजही अनेक जैन साधुसंत किंवा ज्येष्ठ व्यक्ती संथारा घेतात. त्यावेळी त्यांचे दर्शन घ्यायला जाणारे समाजबांधव हे हजारोंच्या संख्येने असतात.

कारण आत्मत्याग करत असताना दिवसागणिक एका एका अन्न पदार्थांचा त्याग करावा लागतो. सुरुवातीचे काही दिवस एक वेळेसचेब जेवन सोडून देणे. नंतर त्यातूनही अर्धे जेवण करणे. पुढेपुढे जाऊन पूर्ण जेवण सोडून केवळ एक वेळेस दूध घेणे. आणि अगदी शेवटी पाण्याचाही त्याग करणे. 

या सगळ्या अवस्थामधून जात असताना प्रचंड इच्छाशक्ती लागते. आणि ती योग किंवा साधनेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. 

ज्ञानेश्वरांनी घेतलेली संजीवन समाधी तर या सगळ्यांची परमोच्च अवस्था होती.

म्हणून प्रत्येक वेळी आत्मचिंतन हा एकच विषय शेवटी शिल्लक राहतो. ध्येय आणि स्वप्नांचा पाठलाग करत असताना निखळ कौटुंबिक आनंद हे देखील केवळ आपले कर्तव्यच महिन्यात जीवनात अनेक ध्येयासोबतीचे एका अर्थाने पहिल्या क्रमांकाचे ध्येय आहे, हे उमगले तर खचित कौटुंबिक साधना कामाला आली असे म्हणता येईल.

आणि सामान्य माणसाचा प्रवास देखील आत्मानंद पर्यंत पोहंचेल या शंका नाही.

Saturday, 8 February 2025

अलक ५०४

 तो सातत्याने फिशटॅंकमधील माश्याची जीवघेणी धडपड पाहत होता.

मग त्याला स्वत:वर आलेल्या आर्थिक संकटाची कीव आली.

आणि त्याने आत्महत्येचा निर्णय सोडून अजून प्रयत्न करण्याचे ठरवले.

Sunday, 2 February 2025

निर्णयाचा कालावधी


‘जगावं की मरावं?’, असा नटसम्राट मधील आप्पा बेलवरकरांना प्रश्न पडला होता. परंतु त्यांच्यासमोर जीवनाविषयीच्या समस्याही तेवढ्याच गंभीर स्वरूपाच्या निर्माण झालेल्या होत्या.

तीच गत अर्जुनाची देखील. महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीलाच आपल्याच स्वकीयांच्या विरुद्ध लढायचं आहे त्यावेळेला ‘कर्तूम, अकर्तूम?’ हा प्रश्न अर्जुनाला देखील पडला होता.

परंतु सामान्य माणसाची मात्र परिस्थिती यापेक्षा खूप भिन्न असते. त्याला अगदीच जीवन मरणाचे प्रश्न निश्चितच निर्माण होत नाहीत. त्याचे प्रश्न अगदी रोजच्या धकाधकीच्या जीवनातले सामान्यच असतात. त्याच्या समस्या ही सर्वसाधारण असतात.

परंतु त्या समस्या समस्यांवर उपाय शोधण्याकरिता मात्र घेतला जाणारा निर्णयाचा कालावधी मात्र हा खूप अधिक असतो. किंवा तो कालावधी विचारात घेतला जात नाही.

खरंतर द्वीधा मन:स्थिती ही सामान्य माणसाची त्याच्या रोजच्या जीवनामधली खूप नियमित अशी अवस्था आहे. 

कोणतीही छोट्यातली छोटी गोष्ट करत असताना, करावी का करू नये हा विचार करत असताना कितीतरी वेळ निघून जातो. आणि मग त्याच द्विधा मन:स्थितीमध्ये अनेक वेळ राहावं लागतं. परिणाम द्विधा मन:स्थितीमध्ये होणारी माणसाची एकंदरीत दुःखद अशी परिस्थिती.

म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा निर्णय घ्यायचा असतो. तेव्हा त्या निर्णयाचा कालावधी दोन मिनिटांपेक्षा जास्त असला तर त्रास होतो. दोन मिनिटाच्या आत ज्या ज्या वेळेला निर्णय घेतला जातो त्या त्या वेळेला आत्मविश्वास वाढतो.

खरंतर यामध्ये कुठल्याही प्रकारची घाई नाही. पण एक प्रकारचा ठामपणा आहे. दोन मिनिटांमध्ये मनामध्ये निर्माण होणारी जी आंदोलन आहेत, त्या आंदोलनांकडे पाहिलं तर लक्षात येतं की, आपण किती वेगाने ही निर्णय घेऊ शकतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे नेहमी असे म्हणायचे की, ‘मी आधी निर्णय घेतो आणि मग ते एक खरे करून दाखवतो’.

अर्थात जेव्हा निर्णय घेतला जात असेल त्यावेळेला त्याचा कालावधी दोन मिनिटांपेक्षा जास्त नक्कीच नसणार.

असंही म्हटलं जातं की, एखादा माणूस कसा आहे, हे पाहायचं झाल्यास त्याने त्याच्या आयुष्यात घेतलेले निर्णय पाहायचे.

अर्थातच मोठे निर्णय आपण कसे आहोत हे दर्शवतात. तर छोट्याछोट्या निर्णयांमधील तत्परता ही अचूकतेपर्यंत घेऊन जाणारी आहे, हे दिसतं.

खचित तत्परतेने निर्णय घेऊन पराजय आला तर एक प्रकारचे समाधान आपल्याला मिळत असते की, कमीत कमी मनस्थितीमध्ये निर्णय घेतला. कदाचित परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे त्या गोष्टींमध्ये यश मिळालं नाही.

परंतु निर्णय न घेतल्याची जी पश्चातापाची भावना असते, ती अधिक वाईट असते. किंवा निर्णय घ्यायलाच उशीर झाला तर त्यावेळेस हातातून गेलेला वेळ हा देखील कधीही न कमावता येणार नसतो. 

खरंतर आजंच जग धावत आहे. आपण डिजिटल युगातले प्रतिनिधी आहोत. त्यामुळे प्रिसिजन, परफेक्शन, फास्ट अशा प्रकारचे निर्णय जर आपल्याला घ्यायचे असतील तर त्यांचा कालावधी दोन मिनिटांपेक्षा जास्त असू नये. आपल्यालाही या धावत्या युगासोबत बदलावे लागेलच ना…


©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 19 January 2025

अलक ५०३

त्याची अनेक कथाबीज संसार आणि नोकरीच्या रहाटगाडग्यात हवेत विरून गेली.

नंतरनंतर तो हरवलेल्या कथेला आजूबाजूला शोधायचा प्रयत्न करायचा.

नि एखादा सुखी संसार पहिला की, त्याला कथा पूर्ण झाल्याचा आनंद व्हायचा.

Wednesday, 8 January 2025

अलक ५०२

 सलग तीन कसोटी मालिका गमावल्यानंतर संघ खचून गेला. 

पत्रकारांनी देखील खूप टीका केली. परंतू प्रत्येक वेळेस संघाने धावांच्या मार्फतच उत्तर दिले.

एव्हाना पत्रकारांना अनुभव येत होता, ‘क्रिकेट खरंच जेंटलमॅन्स गेम आहे’.

Sunday, 22 December 2024

अलक ५०१

 त्याच्या बोलण्यात कधीही एकही इंग्रजी शब्द यायचा नाही.

ती एकदा त्याला म्हणाली,

‘तुला इतकं साधं आणि शुद्ध मराठी कसं बोलता येतं?’

त्यावर तो उत्तरला,

‘कधीतरी मातृभाषेवरही प्रेम करून बघ.’

Sunday, 24 November 2024

अलक ५००



विश्वाच्या पसऱ्यात पृथ्वीचे स्थान एका टिंबापेक्षाही लहान आहे, त्याला विज्ञानशाखेचा अभ्यास करतांना लक्षात आले.

“मग मनुष्याच्या अस्तित्वाचे काय?”, त्याने कुतूहलाने शिक्षकांना विचारले.

त्यावर ते उत्तराले, “अस्तित्वाची काळजी न करता आभाळा एव्हढ मन करुन जगणे”.

Saturday, 23 November 2024

अलक ४९९



वय पुढे सरकत जात होते, तसा तो तिची अधिकाधिक काळजी करू लागला.

एव्हाना तिला कळून चुकले होते, त्याने आपल्या सौंदर्यापेक्षा सदैव आपल्या मनाच्यासौंदर्यावर अधिक प्रेम केले आहे’.

Friday, 22 November 2024

अलक ४९८



तो विचार करत होता, ‘आपल्या आवडीचा पक्ष सत्तास्थापन करू शकेल का?’

नंतर त्याच्या लक्षात आले, ‘निवडून आलेले सरकार जनतेचेच तर असते’.

एव्हाना लोकशाही रुजत चालली होती.

Thursday, 21 November 2024

अलक ४९७



सर्वच स्तरांवर अनेक प्रयत्नकरुनही मतदानाची टक्केवारी यावेळेंसदेखील वाढली नाही.

त्यावर एका राजकीय विश्लेषकाने विधान केले, ‘नागरिकांना ‘कर्तव्यदक्षता’ हा शब्द केवळ प्रशासनाशी संबंधीत हवा आहे’.

Wednesday, 20 November 2024

अलक ४९६



आजोबांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला.

पहिल्यांदा मतदान करणाऱ्या त्यांच्या नातवाला मात्र जाणीव झाली होती, ‘कर्तव्य’ सुरू व्हायचे तर वय असते परंतू संपायचे नाही.

Tuesday, 19 November 2024

अलक ४९५


‘अठरावं वरीस मोक्याचं’, तरुणांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने अशी जाहिरात केली.

टक्केवारी वाढली परंतू अत्यल्पप्रमाणांत.

ते पाहून शिक्षण समितीने ‘मूल्यधिष्टीत शिक्षणप्रणाली’वर भर देण्यास सुरूवात केली.

Monday, 18 November 2024

अलक ४९४



‘भारतीय राजकारणांत आरोप-प्रत्यारोपांची जागा आता हेवे-दावे किंबहुना प्रतिशोधाने घेतली आहे…’,

एक राजकीय विश्लेषक आपल्या पुस्तक प्रकाशन समारंभात मनोगत व्यक्त करत होते.

त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक होते,

‘नवमहाभारतातील राजकारण’.

Saturday, 16 November 2024

अलक ४९३


बांग्लादेशातील कट्टरपंथीयांनी इस्कॉन संस्थेला आतंकवादी घोषीत केले.

तेंव्हा भारतीय सनातन संस्थांना काळजी वाटायला लागली.

परंतू त्यांनी लगेचच ‘संघे शक्ती कलयुगे’ या वेदमंत्रांवर काम करण्यास सुरुवात केली.

अलक ४९२



एका नेते महहोदयांनी ‘निवडून आलो तर एका महापुरुषाचे मंदिर उभारू’, असे जाहीर केले.

त्यावर त्या गावांतील एक ज्येष्ठ व्यक्ती खंत व्यक्त करत म्हणाली,

‘महापुरुषांना देवत्व बहाल केले की नकळत आपण त्यांचे कर्तृत्व नाकारत असतो’.

Thursday, 14 November 2024

अलक ४९१



एका राजकीय पक्षाने एक गठ्ठा मतांसाठी एका संप्रदायाला अमर्याद अधिकार दिले.

काही वर्षांनी घटनेने ते अधिकार रद्द करण्याचा निर्णय दिला.

तेंव्हा त्या संप्रदायातील लोक म्हणू लागले, ‘हा देश आपल्याला राहण्यायोग्य  राहिला नाही.’

Wednesday, 13 November 2024

अलक ४९०



तिने वयाच्या चाळीशीत मुलीसोबत महाविद्यालयांत प्रवेश घेतला.

एव्हाना तिच्या मुलीला कळून चुकले होते, ‘आपल्याला आवडीचे क्षेत्र निवडण्याचा अधिकार किमान वीस वर्ष आधी मिळाला आहे’.

Tuesday, 12 November 2024

अलक ४८९



तो त्याच्या कळत्यावयांत आलेल्या लाडोला वाढदिवसाची काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करत होता.

तितक्यात तीच त्याला म्हणाली, “मी यावर्षीच्या माझ्या वाढदिवसाला तुम्हांसगळ्यांना काही देऊ का?”

तो तिच्याकडे पाहत विचार करू लागला,

‘मला तर ‘समृद्धी’ मिळाली आहे’.

Monday, 11 November 2024

अलक ४८८



तो तात्विक. ती भावनिक.

एकदा तो भावनिक झाला. तेंव्हा तिने त्याला पूर्णपणे समजून घेतले.

आता त्याला तिच्या सोबत वागण्याचा मार्ग कळाला होता.

Saturday, 9 November 2024

अलक ४८७



‘जय श्रीराम म्हणणारे हिंसक असतात’, असे एका राजकीय नेत्याने विधान केले.

त्यानंतर काही दिवसांनी एका शांतताप्रिय समजाने गणपती मिरवणुकीवर दगफेक झाली.

त्या वेळेला त्या राजकीय नेत्यानी धर्मनिरपेक्षतेचा मार्ग स्वीकारला.

अलक ४८६



एक मतदार ‘आपल्या आवडीचा उमेदवार निवडून आला नाही. म्हणून आपले मत वाया गेले आहे’, असे समजत होता.

त्यावेळेस लोकशाही विचार करत होती, ‘बहुदा मला भारतात रुजवायला अजून काही द्यावा लागेल’.

Thursday, 7 November 2024

अलक ४८५



मतदारांनी धर्माविषयी बोलणाऱ्या राजकीय नेत्याकडे दुर्लक्ष करत जातीविषयी बोलणाऱ्याला नेत्याला मतदान केले…

असो.

ही राजकीय नेत्याची कथा नाही, दिशाहीन नागरिकाची आहे.

Wednesday, 6 November 2024

अलक ४८४



‘माझ्या एका मताने काही फरक पडणार नाही. मी गावाकडे मतदान करायला, या वेळेस येणार नाही’, त्याचा मित्र त्याला फोनवर सांगत होता.

तेंव्हा त्याने मित्राला,

‘हिटलर एकाच मताने निवडून सत्तेत आला होता. नि नंतर जगाचा कसा इतिहास बदलला’ हे सांगितले.

त्यानंतर त्याच्या मित्राने प्रत्येकवेळेस मतदानाचा हक्क बजावला.

Tuesday, 5 November 2024

अलक ४८३



त्याने तिला दिवाळीचा फराळ करण्यापासून ते आवराआवारीपर्यंत अगदी सगळयां छोट्या छोट्या गिष्टींमध्ये मदत केली. स्वाभाविकच त्याचे खूप कौतुक झाले. ती मात्र तटस्थपणे विचार करत होती, ‘आपल्याला दोन नाही तर तीन मुलं आहेत’.

Monday, 4 November 2024

अलक ४८२



ती दिवाळीकरिता आलेल्या सर्व पाहुणेमंडळींना वाटीलावून घरात आली तसा तिला तयार झालेला कामाचा डोंगर दिसला. ती क्षणभर थांबली.

मग तिने गेल्या पाच दिवसांतील गोड आठवणींचा विचार केला. नि पदर कंबरेत खोचला. तेंव्हा कामाचा डोंगर दिवाळीच्या फटाक्याप्रमाणे धुडुंबकन ओडून गेला.

Saturday, 2 November 2024

अलक ४८१


एका नेतेमहोदयांनी निवडणुकीचा प्रचार करतांना एका महिला उमेदवाराविषयी असभ्यतेचे विधान केले.

“माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे”, ही त्यांची त्यावरची सारवासारव.

ती महिला उमेदवार त्यांच्यावर गुन्हा दाखल करत म्हणाली,

“घर असो वा राजकारण महिलांनीच कंबरकसून स्वच्छता केली पाहिजे”.

अलक ४८०



तो पर्यावरण प्रेमी होता. त्याने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करायचा निश्चय केला होता.

परंतू रशिया-युक्रेन, इस्राईल-हमास यांच्यातील युद्धांमुळे झालेल्या प्रदूषणाचा विचार केला आणि मनसोक्त फटाके वाजवत दिवाळी साजरी केली.

Wednesday, 30 October 2024

अलक ४७९



त्याला कोणताही उमेदवार सक्षम वाटत नव्हता. तो NOTA पर्याय निवडून मतदान करणार होता.

एकदा त्याच्या वाचनात आले, ‘NOTA चा लाभ अयोग्य उमेदवारालाच अधिक होतो.

मग त्याने ‘एव्हेलेबल बेस्ट’ हे सुत्र वापरुन मतदान केले.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...