Sunday, 31 July 2022

अलक क्र.९२

 

त्याने बस नेमकीच चालू केली आणि त्याला घरून फोन आला, त्याचे 'वडील गेले' म्हणून.

तो थांबला नाही. त्याने ती बसची फेरी पूर्ण केली.

मग घरी गेला.

वडीलांच्या पर्थिवासमोर हात जोडून उभा राहिला. त्या वेळी वडिलांनी सांगितलेले वाक्य सारखं त्याच्या कानांवर पडत होतं,

'हाती घेतलेले कोणतेही काम कधीच अर्धवट सोडू नकोस'.

Saturday, 30 July 2022

अलक क्र. ९१


तिच्या सासरचे तिच्या भावाकडे सारखी काही ना काही तरी मागणी करायचे.

एकदा ती भावाला म्हणाली,

"आज बाबा असते तर तुला हा त्रास सहन करावा लागला नसता."

" मी वडील भाऊ आहे ना!", स्मित हास्य करत तो पुढे म्हणाला,

"अगं, उलट मला त्यांच्या वागण्याचा काही त्रास होत नाही.

कारण अशी माणसे आपल्याला आयुष्यात आपण कसे नाही वागायचे, ते शिकवायला येत असतात." 


Friday, 29 July 2022

अलक क्र. ९०


त्याने राजकारणात नवीन नवीन प्रवेश केला होता.

दरवेळेस आपल्याला कुणीतरी काहीनाकाही कारणांनी चांगले म्हणावे, असे त्याला वाटे.

परंतु तो चांगले काम करून ही  टीकेचा धनी व्हायचा.

आता त्याच्या लक्षात आले, पक्षाने 'कमळ' हे चिन्ह म्हणून का निवडले.

Thursday, 28 July 2022

अलक क्र. ८९

 

राफेल नदाल त्याचा आवडता खेळाडू.

हरणाऱ्या मॅच मध्ये देखील शेवटच्या क्षणा पर्यंत कोणतीही उद्विग्नता प्रकट न करता प्रयत्न करणे,

हा त्याचा गुण त्याला खूप आवडायचा.

परंतु तो स्वतः आयुष्यात खुप काही मोठे करू शकला नाही.

परंतु प्रयत्न कधीही न सोडल्यामूळे, 

तो स्वतःला आरशात पाहताना नेहमीच समाधानी असायचा. 

Wednesday, 27 July 2022

अलक क्र.८८

 

'लास्ट मिनिट रश' त्याला कधीच आवडत नसे. तो प्रत्येक काम वेळे आधी पूर्ण करायचा.

परंतू त्यांची टीम नेमकी त्याच्या या स्वभावाच्या विरुध्द होती.

त्याने टीमला काधीही सुधारणा करण्यासाठी लेक्चर दिले नाही.

तो प्रत्येकवेळी स्वतः उदाहरण म्हणुन त्यांच्या समोर उभा राहायचा.

Tuesday, 26 July 2022

अलक क्र. ८७


'यशाचं शिखर खूप निसरडं असतं. प्रत्येक पाऊल जपून टाक',

त्याला गुरूंनी उपदेश केला.

आता जवळ जवळ तो गेली २५ वर्ष यशाच्या शिखरावर विराजमान आहे.

त्याने गुरूंना दिलेल्या उपदेशात अपयशी होऊ नये म्हणून उपाय विचारला होता. 

ज्याचे तो तंतोतंत पालन करतो आहे. 

'ज्यांचे सहकार्य, प्रेमामुळे जीवन घडले, त्यांना कधी अंतर देऊ नको.

आणि त्यांच्यासोबत राहत असताना आत्मप्रौढी बाळगू नको.'


Monday, 25 July 2022

अलक क्र. ८६


एकदा रस्त्याने जाताना एका कुपोषित मुलाला पाहून

'समाजातील या कुपोषित घटकासाठी आपण काहीतरी करावे', हा विचार मनात आला.

परंतु हा विचार प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्यासाठी त्याला सहा महिन्यांचा कालावधी लागला.

या कालावधीमधे त्याच्या ताटात कधीही एकही अन्नाचा कण वाया गेला नाही.

Sunday, 24 July 2022

अलक क्र. ८५

 

स्वतःची सर्व सामान्य आर्थिक परिस्थिती असूनही त्याने जीवनभर गोरगरिबांसाठी सेवाकार्य चालवले.

अर्थातच त्यातून उत्पन्न नव्हतेच. उलट घरातूनच खर्च अधिक व्हायचा.

एकदा त्याची पत्नी म्हणाली,

"तुम्हाला सेवेतून मिळणारे समाधान मी समजू शकते. पण एव्हढे सातत्य तुम्ही कसे काय ठेवले?"

त्यावर तो उत्तरला,

"तुम्ही बायकां जशा सतीचे वाण घेऊन सुंदर संसार करता ना. तसेच काहीसे माझ्या हातून घडले."  

Saturday, 23 July 2022

अलक क्र. ८४

 

त्याची इटुकली लाडो झोपतांना त्याच्याकडून गोष्ट ऐकायची आणि नंतर आईच्या कुशीत जाऊन झोपायची.

तो एकदा लाडोला म्हणाला,

"तू माझ्याजवळ झोपणार असशील तरंच मी तुला गोष्ट सांगेन."

त्यावर लाडो आईच्या कुशीत अधिकच शिरली.

त्याची पत्नी म्हणाली,

"तुम्ही कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर तिला माझ्या कुशीत झोपतांना गोष्टीची गरज भासत नाही."

Friday, 22 July 2022

अलक क्र. ८३


त्याची आजी नेहमीच चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या अशा तिथी सांगतच सगळ्या आठवणी नि घटना सांगायची.

आजीचा त्याच्यात जीव खूप होता.

पण तो नव्या पिढीतला.

व्यावहारिक विचारांतून दिनदर्शिका आणि पंचांगाची सांगड घालून घटना समजावून घ्यायचा.

८१ वर्षांचं जीवन जगून आजी जात राहिली.

तो प्रचंड रडला.

आता त्याला सहस्त्र पौर्णिमा पाहिलेली आजी कोणताही प्रकाश दाखवणार नव्हती.

Thursday, 21 July 2022

अलक क्र.८२

 

लोकलच्या दाराजवळची जागा रिकामी असतानाही तो थोडासा आत सरकून उभा राहिला.

त्याच्याकडे बघून रोज त्याच लोकलने सोबत जाणारा प्रवासी म्हणाला,

"बहुदा नुकतेच तुझे लग्न झालेले दिसते."

तो गालातल्या गालात हसला.

त्यावर तो प्रवासी म्हणाला,

"जवाबदारीची जाणीव प्रत्येकक्षणी वागण्यात दिसणे म्हणजे उत्कृष्ट संसार झालाच समज."

Wednesday, 20 July 2022

अलक क्र. ८१


पिढीजात चालत येणारा राजकारणाचा वारसा त्याला नको होता.

परंतु वडिलांचा शब्द त्याला मोडणे शक्य झाले नाही.

नंतर तो अत्यंत अयशस्वीपणे राजकारण करू लागला.

त्यावर त्याला थांबवत वडील म्हणाले,

"सज्जनांची राजकारणातील अरुचीच बदमाशांना राजकारणात स्थिर करत असते." 

Tuesday, 19 July 2022

अलक क्र. ८०

 

मनाजोगते कथानक मिळेपर्यंत तो कुठेही वेड्यासारखा फिरायचा.

असेच एकदा त्याला कुणीतरी वेश्यावस्तीतून परतताना पहिले.

त्या गृहस्थाने ही गोष्ट त्याच्या पत्नीला सांगितली.

त्यावर स्मितहास्य करत ती म्हणाली,

"अहो! माझी खरी सवत त्यांची लेखणी आहे."

Monday, 18 July 2022

अलक क्र ७९

 

जीवघेण्या स्पर्धेकरिता ती मुलाला तयार करत होती.

मुलगा म्हणाला,

"आई, स्पर्धा ऐच्छिक असते ना!"

"हो, बाळा. पण यश मिळवणे अनिवार्य असते",

ती मुलाला समजावत पुढे म्हणाली,

"पण तू तुझा जीव तुझ्या आवडीच्या विषयात लाव.

मग तुला स्पर्धा जीवघेणी वाटणार नाही."    

Sunday, 17 July 2022

अलक क्र. ७८

अतिलघुकथा


एकदा एका नवोदित प्राध्यापकाने वर्गात एका कॉलेजकुमाराला विचारले,

"तुझा आवडता विषय कोणता?"

"रॅगिंग", तो उत्तराला.

वर्गात एकच हशा पिकाला. 

मग शांतपणे त्या प्राध्यापकाने त्या कॉलेजकुमाराची रॅगिंग घेतली. 

आता कुणीही हसले नाही.

त्यावर तो प्राध्यपक म्हणाला, 

"बहुदा माझी अपॉइंटमेंट तुमचा 'आवडीचे विषय' बदलण्यासाठीच झाली आहे."

Saturday, 16 July 2022

अलक क्र. ७७


"तू साधा चहा सोडू शकत नाहीस. तू काय गाव सोडून परदेशात झेंडा फडकावशील?",

असे म्हणत त्याच्या मित्रांनी त्याला टोमणे मारले.

हुशार विद्यार्थ्यांत कधीही नसणारा तो आता केवळ अथक प्रयत्नांवर परदेशात गेला आहे.

काही वर्षांनी तो गावी परतला.

मित्रांनी आता त्याची स्तुती करत त्याला चहा देऊ केला.

त्यावर तो म्हणाला,

"तुमची आठवण रोज येत राहावी. म्हणून मी चहा केव्हांच सोडला आहे."

Friday, 15 July 2022

अलक क्र. ७६

अति लघु कथा


विद्वान लोकांत आपली गणना व्हावी म्हणून तो खूप अभ्यास करायचा.

परंतु म्हणावी तेव्हढी विद्वत्ता त्याच्यात कधी आली नाही.

अनेक प्रकारे प्रयत्न करून आजही त्याची गणना विद्वानांत केली जात नाही.

म्हणून मग त्याने आता त्याने स्वतःचे  नामकरण 'पंडित' असे केले आहे. 

Thursday, 14 July 2022

अलक क्र.७५


एक गुणी अभिनेत्री असूनही प्रमुख भूमिका मिळण्यासाठी तिला खूप स्ट्रगल करावे लागले.

त्यावर एक पत्रकार खोचकपणे म्हणाला,

"बहुदा तुम्ही 'कास्टिंग काऊच'ला नकार दिला असणार!"

ती होकार देत म्हणाली,

"बाजार तर सदैव उघडा असतो, विकलं जाण्यासाठी.

परंतू मला अनेक तरुणींसाठी रोल मॉडेल व्हायचे होते.

म्हणून मी खडतर मार्ग स्वीकारला." 

Wednesday, 13 July 2022

अलक क्र ७४


"गुरूंच्या प्रतिमेची देखील पूजा कर", किशोरवयीन मुलाला पूजा करत असताना आई म्हणाली.

"पण आई, ही तर व्यक्तीपूजा होईल ना?", त्याने प्रश्न उपस्थित केला.

आई त्याला समजावत म्हणाली,

"बाळा, हा नियम गुरूंना लागू होत नाही."

परंतु नुकत्याच कळू लागणाऱ्या मुलाच्या बुद्धीला पटत नव्हते.

आई पुढे म्हणाली,

"तुला कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी माहीत आहेत."

त्याने मान डोलावली.

आई म्हणाली,

"'या सगळ्या गोष्टी आपण मागितले तेव्हढेच देत असतात.

गुरु मात्र न मागता ही आपल्याला प्रत्येकगोष्टीसाठी सक्षम करत असतात." 

Tuesday, 12 July 2022

अलक क्र ७३


'कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका', हे वचन मान्यच आहे.

परंतु कर्म करून ऍप्रिसिएशनची अपेक्षा तर ठेवू शकतो ना!",

त्याने एका गुरुमहाराजांना प्रश्न विचारला.

"ज्या अर्थी अशी अपेक्षा आहे त्या अर्थी तुमच्या कर्माने तुम्हाला

सॅटिसफॅक्शन दिले असे जाणवत नाही.", गुरु महाराज उत्तर देत

पुढे म्हणाले, "पहिले रिकग्निशन आपण आपल्याला दिले पाहिजे." 

Monday, 11 July 2022

अलक क्र ७२


'चातुर्मासातील व्रतवैकल्य - एक शास्त्रीय आधार',

त्याने अनेक दिवसांच्या अथक परिश्रमाने त्याचा शोध निबंध पूर्ण केला.

सर्व बिद्धीजीवींनी खूप प्रशंसा देखील केली.

त्याने एकदा तो शोध निबंध एका महाराजांना दाखवला.

आणि आग्रह धरला की त्यांनी तो सर्वांसमोर मांडावा.

त्यावर महाराज त्याला म्हणाले,

"आम्ही लोकांना केवळ 'भक्ती' सांगतो.

कारण भक्तीच साधन असते, भक्तीच सध्या असते

आणि भवसागर तरण्यास कारणही भक्तीच असते."     

Sunday, 10 July 2022

अलक क्र.७१

 



'समरस भारतीय समाज निर्मितीसाठी 'समरसता' प्रत्येक भारतीयाच्या जीवनात यावयास हवी',

एका संतांनी या आशयाचा विषय एका संत संमेलनांत मांडला.

नि दुसऱ्या दिवशीपासून

'हा उदात्त विचार मांडणारे संत आमच्या जातीतील',

असे म्हणत, काही लोक त्यांना त्यांच्या जाती पुरते मर्यादित करू लागले.



Saturday, 9 July 2022

अलक क्र.७०

 

त्याच्या इटुकल्या लाडो सोबत तो 'ट्रॅफिक सिग्नल' खेळ खेळत होता.

राज्यं त्याच्यावर आले.

तिने पाळायला सुरुवात केली.

तो, "रेड सिग्नल", म्हणाला.

परंतु ती थांबली नाही.

तो तिला थांबवत म्हणाला,

"'रेड सिग्नल' लागल्यावर थांबायचं असतं ना!"

त्यावर त्याची इटुकली लाडो म्हणाली,

"पण कधी कधी तू पण गाडी चालवताना रेड सिग्नल लागल्यावर थांबत नाहीस. तसंच मी पण एखाद्यावेळेस केलेतर चालेल ना!"

Friday, 8 July 2022

अलक क्र.६९

 

आपण कुणाच्यातरी मृत्यूचे चिंतन केले, म्हणून तो अंतर्बाह्य हादरला.

प्रायःश्चित्त करूनही त्याचे मन शांत होत नव्हते.

मग त्याच्या गुरुमहाराजांनी त्याला उपदेश केला,

"ज्याच्या मृत्यूचे चिंतन केले त्याला सर्वतोपरी मदत कर."

Thursday, 7 July 2022

अलक क्र.६८


त्याला युद्धात 'वीरमरण' आल्यानंतर मुलांना बोर्डिंगस्कुलमध्ये ठेवून ती देखील सैन्यात भरती झाली.

तिला समजावत तिचे आई वडील म्हणाले,

"परंतु एव्हढा अट्टहास का?"

ती उत्तरली,

"त्याने सुरू केलेल्या भारतमातेच्या पूजेची उत्तरपूजा करावीच लागेल ना."

Wednesday, 6 July 2022

अलक क्र.६७


"'शोधलेले राष्ट्रपती, झालेले पंतप्रधान नि केलेले मुख्यमंत्री', असा सध्या भारत देश चालू आहे",

असे एका राजनीतिक विशेषज्ञाने मत व्यक्त केले.

त्यावर प्रचंड वादळ उठलं. प्रसार माध्यमांत काही दिवस चर्चा चालू होत्या.

अशाच एका चर्चेत दुसऱ्या एका राजनीतिक विशेषज्ञाने मत व्यक्त केले,

"म्हणूनच विकास राजकारण्यांच्या धोरणांमुळे होत नसतो."

Tuesday, 5 July 2022

अलक क्र.६६


कन्टेन्ट रायटर असल्यामुळे त्याला अनेक वेळा मनाविरुद्धच्या असाइनमेंट केवळ क्लायंटला पाहिजे म्हणून करून द्यावे लागे. अशावेळी तो फीस अव्वाच्यासव्वा सांगायचं आणि लोकं देखील ती द्यायचे.

तेंव्हा तो शब्दांची माफी मागायचा.

एकदा त्याचा मित्र त्याला म्हणाला,

"परंतु तू माफी मागण्यापलीकडे काही प्रायश्चित्त करतो का?"

तो स्मितहास्य करत उत्तरला,

"मनाजोगती कथा हातावेगळी होत नाही तो पर्यंत अज्ञातवासात जातो."

Monday, 4 July 2022

अलक क्र.६५

         

अधःपतनाला एक छोटासा विचारही पुरेसा असतो.

तो मात्र 'तो प्रसंग म्हणजे केवळ एक अपघात होता', म्हणून बोळवणी करत होता. 

ती सावरली. म्हणाली,

"मला एक प्रश्न पडलाय. 'चारित्र्य' हे नपुंसक लिंगी का असते?" 

Sunday, 3 July 2022

अलक क्र.६४


त्याने नुकतीच 'तत्त्वज्ञान' विषयात पीएचडी पूर्ण केली.

तारुण्यातील सळसळता उत्साह घेऊन तो नेहमीच 'तत्त्वज्ञान' मांडायचा.

एकदा एका व्याख्यानात तो म्हणाला, 

"मनुष्य सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करत असेल तर ते स्वत:वर".

प्रचंड टाळ्यांचा कडकडाट घेऊन तो पत्नीसह घरी निघाला.

परंतु तिच्या प्रश्नापुढे त्याचे तत्त्वज्ञान हतबद्ध झाले.

ती म्हणाली, 

"वडिलांचे घर सोडून सासरी येणारी मुलगी सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करत असते?"

Saturday, 2 July 2022

अलक क्र.६३


तो खूप काटेकोरपणे कर्मकांड पाळायचा.

असेच एकदा ग्रहणाच्या दिवशी त्याने घरातील सगळे पाणी सांडायला सुरुवात केली.

ते पाहून त्याची किशोरवयीन मुलगी म्हणाली,

"बाबा, पाण्याला 'जीवन' म्हणतात ना!"

Friday, 1 July 2022

अलक क्र.६२


त्याला पांढरा रंग खूप आवडायचा. 

सगळे त्याला 'रंगांधळा चित्रकार' म्हणायचे.

एकदा त्याने 'शारदे'चे चित्र रेखाटले.

लोकांनी अक्षरश: घराघरात 'शारदा पूजन' करण्यास सुरुवात केली.

'रंगांधळा चित्रकार' तेंव्हा कोणालाही आठवला नाही. 

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...