शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेली प्राची रडत रडतच घरी आली. तिचे रडणे थांबत नव्हते. बहुदा शाळेत करमत नव्हते, असे तिच्या आई-वडिलांना वाटले. पण थोड्या वेळाने ती शांत झाल्यावर म्हणाली, "मला दोन नावे आहेत का ?"
त्यावर तिचे बाबा प्रतापराव म्हणाले, "तुला तर शंभर नावे आहेत. पिल्लू, गोडंबी, माऊ, चिऊताई... अशी कितीतरी तुला नावे आहेत." अगदी लडिवाळा भाषेत, विषयांतर होऊन ती शांत व्हावी या उद्देशाने ते म्हणाले.
परंतु प्राची मुद्दा सोडायला तयार नव्हती. ती म्हणाली, "मग 'सुकन्या' कोणाचे नाव आहे? तुम्ही मला या नावाने कधी हाक मारली नाही. आज शाळेत उपस्थित घेताना बाईंनी माझे नाव 'प्राची सुकन्या सरदेशमुख' असे घेतले. त्यानंतर वर्गातील सगळ्या मुली मला 'दोन नाव असलेली मुलगी' म्हणून चिडवत होत्या."
आता सारा मुद्दा प्राचीच्या आई-बाबांच्या म्हणजेच प्रतापराव आणि सुकन्या यांच्या लक्षात आला.
आणि सुकन्याच्या डोळ्यासमोर तो सगळा प्रसंग उभा राहिला.
सुकन्या आणि प्रतापरावांना पहिल्या मुलीच्या पाठीवर दुसरी मुलगीच झाली होती. घर तसे संपन्न. शेती, मोठा वाडा, गाडी, गडी, नोकर-चाकर अगदी कशाचीही कमतरता नव्हती. परंतु सुकन्याला एका गोष्टीची कायम खंत होती. की, आपण घराण्याला 'वारस' देऊ शकलो नाही.
त्यावर प्रतापरावांनी तिला अनेक वेळा समजावले देखील होते. आपल्या दोन्ही मुली आपल्या वारसदार आहेत. मुलीदेखील कौतुक कर्तृत्ववान असतात. म्हणून मुलेच काय तेवढा 'वंश' पुढे नेत असतात तर मुलींचाही वाटा तितकाच अमुल्य असतो.
पण स्वतः उच्चशिक्षित असून ही सुकन्याला तिचं मन सारखं खात होतं. तिने अनेक उपास-तापास केले, अनेक नवस केले, आता तिसऱ्या वेळेला मुलगाच व्हावा म्हणून. परंतु देवाच्या मनात काही वेगळेच होते. तिसऱ्या वेळेस ही मुलगीच झाली.
सुकन्याला अपार दुःख झाले. आपले आयुष्य वाया गेले, असे वाटायला लागले. तिने अबोला धरला. प्रतापरावांनी खूप समजावले. पण तरीही तिला तिचे दुःख शांत करता आले नाही.
मुलगी झाल्यानंतर जवळजवळ सव्वा महिना उलटला.
बारशाचा दिवस उजाडला. अगदी सकाळी सकाळी सूर्याच्या उगवतीच्या वेळी प्रतापराव सुकन्याला म्हणाले, 'बघ सुर्याची पहिली किरण पृथ्वीला प्रकाशमान करत आहे. सगळ्या जगाला अंतःकरणातून अंधकारातून बाहेर काढत आहे. म्हणून आपण आपल्या मुलीचे नाव या पहिल्या किरणांना घेऊन येणाऱ्या या दिशेप्रमाणे 'प्राची' ठेवूया. आणि तिचे पूर्ण नाव 'प्राची सुकन्या सरदेशमुख असे असेल."
सुकन्या अगदी आश्चर्य चकित होऊन प्रतापरावांकडे पाहत राहिली. पुढे प्रतापराव म्हणाले, " असे याकरिता की, कर्तृत्व आणि वारशाचा संबंध केवळ मुलांशीच नसतो. हे केवळ तुला, प्राचीलाच नव्हे तर सबंध जगतालाही कळावे. आणि मुलगा झाल्याची शल्य तुझ्या मनात नसावे. म्हणून विशेषत्वाने प्राचीच्या नावा मागे तुझे नाव लावूया."
सुकन्याच्या मनातील सारे मळभ दूर झाले होते. परंतु स्त्री म्हणून, पत्नी म्हणून आणि आई म्हणून तिला तिचा हा सर्वोच्च सन्मान वाटला होता.
हा सगळा प्रसंग आठवून रडणाऱ्या प्राचीतही तिला गोडपणा जाणवत होता. तिने प्राचीला कुठल्याही प्रकारे न समजावून सांगता घट्ट मिठी मारून कुशीत घेतले...
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९