Sunday, 26 September 2021

महापुरुषांचा पराभव होत नसतो


‘पेला अर्धा भरला आहे’, हा सकारात्मक दृष्टिकोण. तर ‘पेला अर्धा रिकामा आहे’, हा नकारात्मक दृष्टिकोण. बहुदा तो काळ येऊन ठेपला आहे, जिथे ही दोन्ही विधाने अपूर्ण वाटतात. म्हणून आता गरज आहे संपूर्ण सकारात्मक दृष्टीकोणाची. आणि ती कदाचित पूर्ण होईल ती या विधानाने, 

‘पेला अर्धा हवेने भरला आहे व अर्धा पाण्याने भरला आहे.अर्थात पूर्ण भरलेला आहे’.

तात्पर्य एवढेच की, घडणाऱ्या गोष्टींकडे संपूर्ण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे. आणि हेच जर सामान्य गोष्टींच्या बाबतीत लागू होत असेल तर मोठ्या-महान गोष्टींचा विचारही अधिक व्यापक करावा लागेल.

आजवर आपण ‘महापुरुषांचा पराभव’ किंवा ‘महापुरुषांच्या पराभवाची कारणे’ वाचली असतील, ऐकली असतील. पण आता याच विषयाला पूर्णतः वेगळ्या दृष्टीकोणातून पहावे लागेल. अर्थात संपूर्ण सकारात्मक दृष्टीकोणातून.

आणि विषयाच्या सुरुवातीला संस्कृतातील प्रसिद्ध वाक्प्रचार लक्षात येतो.
‘वदतोव्याघात’. अर्थात जी गोष्ट आपण बोलत आहोत तेच पुढच्या वाक्यात व पुढच्या क्षणाला आपण स्वत:च खोडून काढणे.

‘महापुरुषांचा पराभव’ या वाक्याची ही तीच गडबड आहे. एकीकडे ‘महापुरुष’ असा शब्दप्रयोग होतो. तर लगेचच त्यांच्या पराभवाचा विचार होतो. ज्या अर्थी कुणाला आपण महापुरुष संबोधतो किंवा ते महापुरुष असतात. तेव्हा त्यांना सामान्यपुरुषांचे नियम लावायचे का? हा विपर्यास आहे.

महापुरुषांनी पेलेली आव्हाने, ही वैयक्तिक पातळीवरील नसून समाज पातळीवरील असतात. ती आव्हाने काळानुसार असतात. जुन्या चालीरिती, रूढी, परंपरा विषयी असतात. काळ बदलतो. नवे आव्हान उभे राहतात आणि आपण मापदंड लावतो जुन्या आव्ह्नांचा, महापुरुषांच्या कार्याचा. महापुरुषांना मोजण्याच्या मापदंडात त्यांचे अनुयायी, विचारसरणी, कार्यपद्धती, संघटना, आंदोलने, कार्यक्रम हे सगळे आपण घेत जातो आणि आज त्यांची काय स्थिती आहे किंवा त्यांच्या काळातही ते कुठवर पोहोचली हे पाहतो.

वरकरणी ही विचारसरणीच काल विसंगत आहे. महापुरुष असे भौतिक पातळीवर मोजणे कितपत योग्य आहे. एकीकडे आपण शांतीच्या तिन अवस्था मानतो, जपतो. अर्थात आपण मंत्र उद्घोष करतो ‘ओम शांती: शांती: शांती:’. अर्थात आपल्याला आदीभौतिक, आध्यात्मिक व आदीदैविक अशा तीनही प्रकारची शांती हवी असते. मग या शांतीचे पुजारी जे महापुरुष असतात, त्यांना केवळ भौतिक पातळीवर मोजून चालेल का?

आपण आपल्या समस्यांशी झुंज देत असताना, आपल्या संबंध आयुष्याचा आलेख पाहतो. तेव्हा समाजाच्या समस्या पाहताना त्यांची तुलना व्यक्तीच्या आयुष्याशी निश्चितच करता येणार नाही. समाजाच्या आयुष्यात अनेक पिढ्या होत जात असतात. तेव्हा बदल घडत असतो, स्थित्यंतर होत जात असतात. आणि कदाचित यात कुठेतरी महापुरुष कारणीभूत असतात.

शिवाय आपण अवतारवादी आहोत म्हणून की काय, आपण महापुरुषांना कालनिरपेक्षतेच्या कसोटीवर पाहतो. पण त्यांचे कार्यही कालसुसंगत असते व ते ही कालसापेक्ष असतात. किंवा आपल्याला सातत्याने वाटत असते, महापुरुष हे दीपस्तंभासारखे असावेत. पण या साऱ्या विश्वाच्या पसाऱ्यात ते नंदादिपाप्रमाणे असतात. जिथे पृथ्वीच ब्रह्मांडात अगदी टिंबाप्रमाणे आहे. तिथे मानवाचे काय? नंदादीप जसे आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करतो. तसेच महापुरुष समाजजीवनाचा परिसर उजळून टाकतात. कालांतराने समाज बदलतो. आणि आपली अपेक्षा असते तेच सारे लागू व्हावे, तिच कार्यपद्धती योग्य आहे, तोच मार्ग योग्य आहे. परंतु काळानुरूप महापुरुषांनी कार्य केले नसते तर समाजजीवन उध्वस्त झाले असते. म्हणून प्रत्येक महापुरुषाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्याच्या स्वरूपाच्या व्यापकतेवर त्यांचा पराभव झाला म्हणणे योग्य नाही.

बहुदा महापुरुषांच्या पराभवाचा विचार श्रेयवादावरूनही होत असावा किंवा त्यांच्यावरच्या त्यांच्या अनुयायांच्या अधिकारवादावरून ही होत असावा. आपणच महापुरुष वाटून घेतो. आणि आपणच त्यांच्या कार्याच्या मोजमापाचे दाखले देतो. अर्थात हे दाखले आपल्या बुद्धिमत्तेची द्योतक असतात. 

समाजजीवन स्थिर आहे, असा कोणताही कालखंड नाही. म्हणूनच प्रत्येक कालखंडात वेगवेगळे महापुरुष होऊन गेले, पुढेही होत जातील. खरंतर हे वैविध्य आपल्या भूमीचे आहे, भारतभूचे आहे. म्हणून आपणच ठरवायचे आहे की, अशा काळाच्या सगळ्या मर्यादेसह आपण महापुरुषांना स्विकारायचं की, त्यांच्या पराभवाची चर्चा करून आपला पराभव करून घ्यायचा.

म्हणूनच खरी जवाबदारी सामान्य नागरिकांची आहे. सगळ्या महापुरुषांचा स्वीकार तर आहेच. शिवाय काळानुरूप त्यांच्या विचारांची छोट्या-छोट्या सामाजीक उपक्रमातून आणि नित्य वैयक्तिक आचरणातून अंमलबजावणी महत्त्वाची. अन्यथा आपली धन्यता आपण महापुरुषांची जयंती वा पुण्यतिथी करण्याइतपतच ठेवू.

©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 19 September 2021

यशस्वी पुरुषामागे स्त्री नसते

 

'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते'. हे विधान कोण्या एका महान विचारवंताने सांगून ठेवले आहे. जे आपण सर्वांनी केवळ स्वीकारलेच नाही तर त्याची उदाहरणे देखील आपण सांगत, ऐकत असतो. पण अगदी सुरुवातीलाच त्या महान विचारवंताची आणि त्याच्या विधानाचा दाखला घेत उदाहरण सांगणाऱ्यांची मी जाहीर क्षमा मागू इच्छितो.
कारण माझ्या दृष्टीकोनातून नव्हे तर वास्तविकतेच्या दृष्टीकोनातून या विधाना इतके धादांत असत्य विधान यशस्वी पुरुषांबाबत किंवा स्त्रीच्या बाबतीत अन्य कुठलीही नाही.

एक तर त्या महान विचारवंतांला अर्धांगिनी चे महत्व पटले नसेल किंवा प्रत्येक पुरुषाच्या यशस्वीता या दोन्हींची व्याख्याच उमगली नसेल. शिवाय निश्चितच असे विधान कोणत्याही संन्याशाच्या तोंडूनही निघणार नाही. कारण त्या सर्वांनी सर्वज्ञान झाल्यावरच सर्वसंग परित्याग केलेला असतो.

खरंतर 'यशस्वी जीवन' ही भारतीय संकल्पनाच नाही. एक तर ती पाश्चात्य संकल्पना आहे किंवा ती केवळ भौतिक पातळीवरील संकल्पना आहे.
भारतीय तत्वज्ञान 'आनंदी जीवनाचे तत्वज्ञान' आहे. जगातील पहिल्या ग्रंथात अर्थात वेदांमध्ये समग्र मानवी जीवनाच्या आनंदाचा विचार करणारे 'आनंद मिमांसा' हे स्वतंत्र प्रकरण आहे. त्यासंबंधीच्या अनेक ऋचा आहेत.

परंतु आता 'यशस्वी जीवना'ची संकल्पना मांडलीच आहे तर तिचा उपसंहार ही त्याच मार्गाने करावा लागेल. म्हणून हा लेखप्रपंच.

तर वरील संपूर्ण विधानच चूक आहे. शिवाय 'प्रत्येक यशस्वी पुरुष' असा शब्दप्रयोग करत असताना 'यशस्वीता' ही केवळ लौकिक अर्थाने मान्य केलेली आहे. आर्थिक सुबत्ता, मोठी पदवी, मोठा हुद्दा, मोठा व्यवसाय, प्रतिकूल परिस्थितीवर शारीरिक, मानसिक, आर्थिक सामाजिक इत्यादी प्रकारे केलेली मात, असे एकंदरीतच नावारूपाला आलेले कर्तृत्व, असा 'यशस्वीते'चा अर्थ निघतो.

मग अशा कर्तुत्ववान पुरुषाचा संसार सांभाळत, त्याला दाही दिशांना निश्चिंतपणे वावरू देणारी, त्याच्या महत्त्वाकांक्षेला, कष्टाला बळ देणारी त्याची सुविद्य पत्नी असते, असे विधान वरील विधानाच्या उत्तरार्धात जोडलेले आहे. जे देखील पूर्णपणे चुकीचे आहे.

ते याकरिता की, पुरुषाचे लौकिक कर्तृत्व मान्य करायचे आणि तिच्या अलौकिक कष्टाला आणि त्यागाला केवळ पाठीशी घालायचे. कारण काय तर ती एक कर्तव्यदक्ष गृहिणी असते, म्हणून.

वस्तुस्थितीत 'प्रत्येक पुरुषच यशस्वी पुरुष असतो'.
आनंद जसा वस्तूंवर अवलंबून नसतो. अगदी तसेच यशस्विता देखील लौकिकतेवर आधारित नसते.
म्हणूनच झोपडपट्टीत राहून संसार करणाऱ्या पुरुषापासून ते राजवाड्यात राहणाऱ्या पुरुषांपर्यंत सर्वच यशस्वी पुरुष आहेत. त्या प्रत्येक पुरुषांनी त्यांच्या जीवनातील त्यांची नोकरी, त्यांचा व्यवसाय, उद्योग इत्यादी करत असताना ते अपार कष्टाने आणि जिद्दीने पार पाडलेले असतात.

या सगळ्याच पुरुषांना प्रसंगानुसार सर्व प्रकारच्या संकटातूनही जावे लागलेले आहे. व्यापक स्तरावर विचार करत असताना, अनेक वेळा आर्थिक क्षमता नसताना देखील सांसारीक व व्यावहारिक जीवनातील कार्य पूर्ण केलेले पहायला मिळते.
मग अशा प्रकारे संकटांवर मात करणारा पुरुष एकटा कसा असेल? किंवा केवळ त्या पुरुषाच्या पाठीशी राहुन एका स्त्री मूळे तो यशस्वी कसा होऊ शकेल?
तर अर्थातच अशा प्रत्येक यशस्वी पुरुषासोबत, त्याच्या खांद्याला खांदा लावून, त्याच्या पाऊलाला पाऊल जोडत त्याची 'सोबत करणारी एक स्त्री' असते.

कपाळावरचं कुंकू पुरुषाच्या नावाचं, गळ्यातील मंगळसूत्र पुरुषाचं, मुलांच्या शाळेतील दाखल्यापासून ते घराच्या कागदपत्रांवर सगळ्या ठिकाणी नाव
पुरुषाचं, अर्थात त्याचं कर्तृत्व असलं किंवा यश असं असलं तरी देखील अगदी एका पाऊलानी देखील स्त्री ही पुरुषापेक्षा मागे नसते. नव्हे त्याच्या पाठीशी राहून
तिला 'श्रेयस' ही व्हायचे नाही आहे.

प्रसंगी संकटकाळी ती अनेकवेळा पुरुषाच्या पूढे असते. नव्हे तशी तिने सप्तपदीच्या चौथ्या फेरीनंतर प्रतिज्ञा घेतलेली असते. ज्याचे ती पालन करत असते, केवळ 'प्रेयस' राहून.
ती कधी गृहिणी असते तर कधी नोकरी व्यवसाय करणारी व्यवसायीकदेखील असते. नोकरी आणि व्यवसाय करत असताना, मुलाबाळांना पासून सासु-सासर्‍यां पर्यंत सगळ्यांसाठी राबत असताना, ती कधीही स्वतःचे कष्टाचे पाढे वाचत नाही किंवा कारणं पण सांगत नाही.

आणि कधी कधी तर पुरुषाच्या अकाली निधनानंतर स्त्रीनेच पुरुषाचा संसार यशस्वीपणे सांभाळलेला पाहायला मिळतो. आणि वरती आपण तिचा तो 'पुरुषार्थ'असे संबोधतो, तिला श्रेय देतो.

कदाचित म्हणूनच तिला शक्ती आणि अर्धांगिनी म्हणत असावेत. जी केवळ आनंदाच्या क्षणातच नाही तर संकटाच्या दिवसातही त्याच्या सह संकटाचा सामना करते आणि संकटांवर मात करते. याच गोष्टीची जाणीव प्रत्यक्ष अर्धनारीनटेश्वराला असावी म्हणून त्यांने हे त्याचं धारण केलेलं रूप जगासमोर ठेवलं असावं. पण आपण नेमकी त्याची पूजा करुन त्याचे आचरण करायचे विसरून गेलो आहोत.

अजून एक विशेष करून सगळ्या भारतीय पुरुषांच्या बाबतीत असलेले एक त्रिकालाबाधित सत्य आहे. ( होय. केवळ भारतीय पुरुषांच्या बाबतीत, कारण पाश्चात्य जगात एकाच स्त्री किंवा पुरुषाबरोबर जीवनभराच्या संसाराची संकल्पनाच नाही).
'सगळ्या पुरुषांचा संसार हा सुखाचा आणि आनंदाचा किंवा यशस्वी झाला आहे, त्याला एकमेव कारण ही स्त्री आहे.'
आणि असं कर्तृत्व असणाऱ्या सर्व स्त्रियांच्या तोंडून एक सामान विधान ऐकयला येत असतं, ते म्हणजे, 'माझा नवरा आहे लाखात एक आहे.'
अर्थात परत सगळी यशस्वीता ती पुरुषाला देते आणि स्वतः नामनिराळी राहाते.

म्हणूनच 'प्रत्येक पुरुष यशस्वी पुरुष
असतो आणि त्याच्यासोबत (मागे नाही) एक यशस्वी स्त्री असते.'

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 12 September 2021

उपवास, उपहास आणि उपासक

 

'उपवास' आणि 'उपहास' हे शब्द एव्हाना समानार्थी झालेले आहेत की काय असे वाटते. कारण 'उपवास' म्हणजे नवनवीन पदार्थ खण्याच्या पर्वणीचा दिवसअसंच उपवासाचं रसभरीत वर्णन किंबहुना प्रत्यक्ष कृती पाहायला मिळते.
तसेच ‘एकादशी दुप्पट खाशी’ हा  निबंध बालपणी कुणी लिहीला नाहीवाचला नाही वा ऐकला नाही असा विद्यार्थी देखील विरळाचतात्पर्य एकंच कीपालक असो शिक्षक असो वा कुणीही नातेवाईक असो उपवासाला उपहासाच्या परिभाषेतून आजवर व्यक्त करत आलेले पाहायला मिळतात.
आणि असं आपल्याच संस्कृतीचं जरी रूढी बदलत गेलीपरंपरा बदलत गेली तसं आपण स्वतःच उपवासाचा उपहास करत आलेलो आहोत.

खरंतर एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या घरातील गोष्टी चारचौघांत कधीही मांडत नाहीतजरी त्या चुकीच्या असल्यात्रासदायक असल्या तरीहीपण शास्त्राधार असलेल्या उपवासाचा मात्र आपण उपहास केला आहेआणि याकरिता आपणच कारणीभूत आहोत, एक उपासक म्हणूनउपभोक्ता म्हणून.

जगाच्या पाठीवर कुठेही उदाहरण नाही की, आपल्याच संस्कृतीमध्ये असलेल्या गोष्टींचं विडंबनात्मक स्वरूप चारचौघात मांडल्याचेआहे ते केवळ भारतातचजुन्या अयोग्य रूढीपरंपरा यांच्यावर प्रहर झालाच पाहिजेयोग्य त्या पद्धतीने आंदोलने झाली पाहिजेत, समाज प्रबोधन झाले पाहिजे. नव्हे तसा आपला इतिहास देखील आहेपण आपल्या वैभवशाली संस्कृतीचे विडंबनात्मक पद्धतीने मांडणी करून आपण अनवधानाने अवमान आपलाच करतो आहोत, हे आपल्या लक्षात येत नाही.

आणि याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे उपवासाला उपहासाच्या स्वरुपात आपल्या मनावर अगदी बालपणापासूनच बिंबवलं जातंएकादशी दुप्पट खाशी’, हा विषय अगदी सहज लहानमुलांशी बोलला जातो. नव्हे तशी वर्तवणूकही होते. याउलट आपल्या पाल्याला उपवासाचं महत्त्व पटवून देत नवे उदाहरण प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळत नाही. शिवाय आजवर कुणातरी पालकांनी आक्षेप घ्यायला हवा होता की एकादशी दुप्पट खाशी’ हा  निबंध शालेय अभ्यासक्रमातून काढून टाका म्हणूनपण आपले दुर्दैव असे कीहेच ते पालक आपल्या पाल्याने हा निबंध कसा छान लिहिला आहेयाचा अभिमान बाळगत असतात.

आणि आता तर काय आपण डिजीटल जगात प्रवेश केला आहे. म्हणून पारंपरिक उपवासाच्या ऐवजी ‘इंटरनेटचा उपवास’, ‘मोबाईलचा उपवास’, ‘टी.व्ही.,कॉम्प्युटरचा उपवास' अशा तथाकथित अतिप्रगत, अतिव्यापक, अतिउदार कल्पना मांडल्या जात आहेत.

पण या सगळ्याच्या  मुळाशी माणसाचे आरोग्य आहे आणि त्या सोबतच मन आहे. आज आपण सुपर सुपर स्पेशालिटीच्या जगात पोहोचलो असलो तरी सगळेच डॉक्टर मान्य करतात की, गोळ्या औषधांसोबतच योग्य प्रमाणात अन्न रस पोटात गेला की प्रकृतीमध्ये सुधारणा व्हायला अधिक मदत होते.

फलं आहाराचा आपण ‘फराळ’ केला आहे निरं आहाराचा आपण निऱ्हाळ केला आहेम्हणून ही सगळी गडबड आहे.

मी माझी आई आणि आजी यांना अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे. सोमवारमंगळवारशिवरात्र, चतुर्थी, एकादशी या दिवशी या दोघींनी कधीही काहीही खाल्ले नाहीथेट संध्याकाळी उपवास सोडायचा किंवा एकादशी सारख्या दिवशी उपवासाचे काहीतरी खायचे, पण तेही केवळ एक वेळेसंच. परिणाम पाहायला मिळाला तो असा कीआजी वयाच्या ८३ वर्षापर्यंत निरोगी होतीमधुमेहरक्तदाबदमा हे आजार तर सोडाच कधी दवाखाना पाहिल्याचेही आठवत नाहीआणि आता आई देखील तशीच ठणठणीत आहे.

सुरुवातीला वाटायचं पूर्वीच्या काळच्या लोकांच्या प्रकृती मुळातच  चांगल्या होत्यात्यांना अन्न देखील शुद्ध खायला मिळालेपण डॉ.आहसुमी या जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालेले वाचनांत आलेतो विषय ऑटोफेगी हा होताआपल्या संशोधनात डॉ.आहसुमी लिहितात की, ‘जगात सगळ्यात कमी प्रमाणात कर्करोग पाहायला मिळतो तो भारतातकारण भारतीयांना उपवास करायची सवय आहे’.

असा परकीयांनी संदर्भ दिला की, आपल्याला उपवासाचं महत्व पटायला लागतंपण वस्तुस्थितीत हे संशोधन देखील भौतिक पातळीपर्यंतच टिकणारे आहेकारण ते केवळ मानवाच्या शरीर रचनेचा आभ्यास करून झालेले आहेपण आपल्या धर्मातशास्त्रात त्याही पुढचा विचार केलेला आहे. कारण मनातील भावनामस्तिष्कातील विचार यांना देखील अन्न कारणीभूत असतंआपण ज्या ज्या  प्रकारचे अन्न खात असतो, त्या त्या प्रकारचे आपले विचार होत जात असतातम्हणून सात्विक आहार महत्त्वाचा आहे. तसेच पावसाळ्या सारख्या रोगराईच्या दिवसात, अर्थात चातुर्मासात निर आहार ही महत्त्वाचाअर्थात म्हणूनच चातुर्मासात अनेकजन आजही केवळ एक वेळ जेवण करतात.

म्हणून मुळातच भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून टिकण्याचे हेच कारण आहे कीमानवाचा सर्वांगीण विकासाचा विचार यात पाहायलाअनुभवायला मिळतोज्याचे उदाहरण उपवासाच्या माध्यमातून पाहायला मिळते.

म्हणूनच 'उपासका'करिता 'उपवासा'चा मार्ग हा शरीरशुद्धीकरणातून अन्त:करण शुद्धीकरणापर्यंत जाणारा मार्ग आहे...


©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 5 September 2021

दरमहा एक पुस्तक

"स्वतःसाठी काही करता का?"

 एका जेष्ठ व्यक्तीला भेटण्यासाठी गेलो असताना त्यांनी विचारलेला प्रश्न. म्हणालो, "एका खाजगी कंपनीत नोकरी करतो?" त्यावर त्यांचा प्रतिप्रश्न. "नोकरी घरच्यांसाठी, संसारासाठी, स्वतःसाठी काय?"

मी गोंधळात पडलो. माझे चिंताक्रांत मुखकमल पाहून ते म्हणाले, "काही छंद जोपासता का?" तरीही मी आपला स्तब्धच. कारण खरंच संगीत, कला, साहित्य असा विशेष कोणता छंद नव्हता. चित्रपट पाहायला तेवढे आवडायचे. पण तो छंद म्हणून कसा सांगायचे, म्हणून शांतच राहिलो.

त्यावर ते गृहस्थ म्हणाले, "प्रत्येकजण कलाकार नाही असू शकत वा होऊ शकत. पण प्रत्येक जण एक चांगला रसिक नक्कीच होऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात एक चांगला वाचक होणे ही स्वतःसाठी केलेली अजून एक छान बाब".

खरेच आहे. प्रत्येकजण लेखक नाही होऊ शकत. पण एक उत्तम वाचक मात्र नक्कीच होऊ शकतो. या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला लागलो. त्या अनुभवी गृहस्थांमुळे दिशा मिळाली. आणि सोबतच लक्षात आले की, वर्तमानपत्रातील बातम्यांचे वाचन म्हणजे वाचन नाही. उलट त्यामुळे नकारात्मकता पसरते. त्याऐवजी स्तंभलेख, अग्रलेख हे नक्कीच दिशादर्शक. मग हातात पडेल ते वाचायला लागलो. आणि विशेषकरून पुस्तकांवर भर दिला.

मागे कुठेतरी वाचनात आले होते, 'पुस्तक वाचत असताना आपण त्या वाचनासोबत स्वतःचे विश्व तयार करत असतो.' हे वाचल्यानंतर प्रचंड आनंद झाला. आज वरच्या वाचनाकडे मागे वळून पाहिले, खरंच तोच अनुभव होता.

नि मग ठरवले की, दरमहा किमान एक पुस्तक नक्की वाचायचे.

नवोदित, थोरामोठ्या लेखकांची पुस्तके असो किंवा अनेक वेगवेगळ्या विषयांवरची, अनेक क्षेत्रांवरची पुस्तके असो जे हातात मिळेल ते वाचायचे ठरवले. आणि गंमत म्हणजे जसा जसा मी वाचायला लागलो तसतसं माझ्या लक्षात आलं की, अशा प्रकारचे वाचन करणारी अनेक मंडळी आहेत. अगदी नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी सातत्याने प्रवासात असताना लक्षात आलं की, बस आणि रेल्वे मध्ये देखील हातात पुस्तक घेऊन वाचणारे वाचक देखील आजही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.

नाहीतरी एका जीवनात असे कितीशे अनुभव आपल्याला येणार? पण तीच गोष्ट अनेकांच्या रूपात स्वतःची संबंधित करून अनुभवायची असेल तर वाचन हेच त्याचे एकमेव उत्तर आहे. 

'मनोरंजन' हादेखील महत्त्वाचा भाग आहे. पण रंजनातून शिक्षण व दृष्टिकोन हा नकळत मिळणारा आणि अधिक प्रभावी असा भाग आहे.

चाळिशीत पदार्पण केल्यानंतर एका डॉक्टर मित्रानी सांगितले 'आता किमान रोज चाळीस मिनिट चाला. तर तुझे हृदय अधिक चांगले राहील.'

 डॉक्टरांचा सल्ला तो लगेच शिरोधार्य मानला. पण विचार केला, आपले 'विचार' देखील चांगले राहिले पाहिजेत, निरोगी आणि आनंदी राहिले पाहिजेत यासाठी किमान दररोज चार पानं का होईना वाचन नक्की करायचे.

वाचनालयातून, मित्रांकडून मिळेल तिथून पुस्तक मिळवायचे आणि विकत देखील घ्यायची. आज भलेही मराठी पुस्तकांच्या किमती जास्त आहेत. परंतु महिन्याला स्वतःवर दीडशे-दोनशे रुपये आपण नक्कीच खर्च करू शकतो. रोजचा एक कप चहाचाच खर्च समज ना!

वय वाढत जातं. पगारही वाढत जातो. पण सोबतच 'प्रगल्भता' आली का? या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे असेल तर मग प्रत्येक वेळी नवा दृष्टिकोन हवा. आणि प्रत्येक वेळेला दृष्टीकोण केवळ आपल्याच कल्पनेतून येणार नाही तर त्यासाठी मुबलक प्रमाणात वाचनही हवेच ना!

म्हणूनच 'दरमहा किमान एक पुस्तक वाचन'.

©हेमंत पोहनेरकर

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...