'माणसाला काम नि बाईला स्वयंपाक चुकला की, संसार मोडलाच म्हणून समजा', असं लहानपणी थोरामोठ्या मंडळींकडून ऐकायला मिळालं. आणि त्यानंतर आजूबाजूचं सातत्याने निरीक्षण सुरू झालं. अनेक सुखी संसार जसे दिसायला लागले तशीच अनेक निष्क्रिय माणसे देखील दिसायला लागली.
त्यामुळे अशा कार्यक्षेत्रांचा शोध त्यावेळेला घेतला जायचा की, जेणेकरून त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी म्हणा किंवा व्यवसायामध्ये परतावा मिळेल. म्हणून 'स्कोप' शब्दाचा 'बायस्कोप' अधिक मोठा होता. परंतु आताचे जग हे सुपरसुपर स्पेशालिटीचेे झाले आहे. किंबहुना 'स्कोप' शब्द आता कालबाह्य झाला आहे. कारण ज्या क्षेत्रात आपण काम करू त्या क्षेत्रात आपण स्कोप निर्माण करू असं आताच जग झालेला आहे.
या ठिकाणी दृष्टांत आमच्या गावचा वसमतचा देता येईल. साधारण एक दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका महिलेने आपला काजूचा वसमत सारख्या ठिकाणहून एव्हढा मोठा केला की, प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन कौतुक केले.
परंतु दुःखाची बाब आजही तीच आहे की, एकीकडे उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी तरुण तयार होत आहेत. परंतु दुसरीकडे कुठल्याही प्रकारची नोकरी अथवा व्यवसाय न करता घरात बसून राहणे आणि बापजाद्यांच्या कमाईवरती जीवन जगणे, याला नकळतपणे प्राधान्य देताना पाहायला मिळतं. त्यांच्याकडे अशा प्रकारे आपण काही कार्य करू शकतो, असा दृष्टिकोनच नाही. हा आळस, निष्क्रियता या गोष्टीने आपण आपलं भावी आयुष्य संकटात टाकतोय, बहुदा हा जीवनाचा दृष्टिकोन अशा उच्चशिक्षितांकडे पाहायला मिळत नाही.
कदाचित संसार म्हणून आपलं पुढचं आयुष्य कसे असेल याचेही चित्रच त्यांच्या डोळ्यापुढे रंगवलं गेलेलं नाही.
स्वतःच्या आनंदाचं काम मिळालं नसेल असं खरं तर सुरुवातीला या सगळ्या निष्क्रिय तरुणांकडे पाहत असताना वाटायचं. पण नंतर नंतर लक्षात आलं की, यांनी कधीतरी 'कामाचा आनंद' तरी मिळवला असेल का?
पूर्व राष्ट्रपती मा.अब्दुल कलाम यांना नाही का पायलट व्हायचं होतं. सचिन तेंडुलकरला फास्ट बॉलर व्हायचं होतं. अमिताभ बच्चनला रेडिओ ने नाकारलं होतं. ही सगळी आपाआपली दिशा बदलून पुढच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या अशा स्तरावर कार्य करत जगप्रसिद्ध झाली.
अर्थात प्रत्येक वेळेलाच आयुष्याची दिशा आपण ठरवू शकत नाही. पण आपल्यात जिद्द मात्र असायला हवी. मुळात काम कोणतंहि लहान मोठं असतच नाही. अशी अजून कितीतरी उदाहरणे देता येतील. परंतू या सगळ्या गोष्टीचे सार एकच आहे की, माणसाने सातत्याने कोणतं ना कोणतं तरी काम करत राहिलं पाहिजे. अन्यथा संसार तर किड्या मुंग्यांची ही होत असतातच. पण माणसाचा संसार करायचा असेल तर कार्य, कर्तृत्व आणि कर्तव्य जगाला नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीला वर्षात देण्यासाठी.
सामान्यपणे प्रत्येक आपत्याला वाडवडिलांकडनं वारस्यामध्ये काही ना काही तरी मिळतच असतं. जगातल्या सगळ्याच पिढींची ही अपेक्षा असते की आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी काही ना काहीतरी करून जावंं. वारस्या मध्ये घर, शेत, बंगला, गाडी या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजेत. परंतु यापेक्षाही अधिक अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत आवश्यक अशी असणारी गोष्ट वारस्यामध्ये जी मिळायला पाहिजे ती म्हणजे कर्तृत्व.
एका घरातील वडिलांच्या कठोरतेचे उदाहरण नक्कीच देता येईल. मुलगा उच्चशिक्षित होता. परंतु सातत्याने तीन वर्षांपर्यंत काहीच न करता वडिलांच्या कमाईवर घरामध्ये आळस करत लोळत पडलेला होता. एके दिवशी वडिलांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला. 'नोकरी नाही केली तर घरातून बाहेर जावे लागेल अशी सक्त ताकीद दिली. आणि काय आश्चर्य पुढील पाच दिवसातच त्यांने छान अशी नोकरी मिळवली आणि कामाला लागला.
परंतु ही वेळ यावीच कशाला. कर्तृत्व रक्तामध्ये असायला हवं. आपलं आपल्या संसाराच्याप्रतीचं कर्तव्य पार पडायला लागोलो तर कदाचित समाजाप्रतीच्या कर्तव्याची देखील जाणीव होईल. म्हणूनच आजच्या या धावत्या युगात संसाधनांची प्रचंड मुबलकता असताना कार्य, कर्तृत्व आणि कर्तव्य ही गोष्ट निष्क्रिय तरूणांना कळावी एव्हढीच अपेक्षा.
