Thursday, 30 June 2022

अलक क्र.६१


आधीच सामाजिक कार्याची आवड आणि त्यातुन वाढत जाणारी कौटुंबिक जवाबदारीमुळे त्याच्यावरील ताण वाढत चालला होता.

तो वडिलांना म्हणाला, "मी सामाजिक संस्थेचा राजीनामा द्यायचा विचार केला आहे."

"मल्टिटास्किंग तुला शिकावीच लागेल", वडील म्हणाले.

पण एक गोष्ट सोडणे त्याला सोईस्कर वाटत होते.

तेंव्हा त्याच्या समोर वडिलांनी नोकरी करून सर्व कौटुंबिक जवाबदारी सांभाळणाऱ्या त्याच्या आईचे उदाहरण त्याच्या समोर ठेवले.     

Wednesday, 29 June 2022

अलक क्र.६०


"संसाराच्या रहाटगाडग्यात स्वतःच्या आवडी-निवडी जपायच्या राहून गेल्या",

निवृत्त झाल्याच्या दिवशी त्याने मित्राजवळ खंत व्यक्त केली.

"वेडा आहेस?", मित्र म्हणाला,

"नीट बघ. बालपणापासूनची 'आपली मैत्री' आपण जपली आहे ना!"

Tuesday, 28 June 2022

अलक क्र.५९

 

पहिल्या पावसावर लिहिलेली एक सुंदर कविता त्याने मित्रांना वाचून दाखवली.

पडणाऱ्या पावसात जसे सगळे चिंब ओले झाले होते तसेच त्याच्या कविताने त्यांची मने देखील ओली झाली होती.

तो मात्र कोरडाच होता. त्याच्या प्रियसीच्या आठवणीत त्याने ती कविता रचली होती.

Monday, 27 June 2022

अलक क्र.५८


आयआयटी इंजिनीअर होऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागत असताना त्याने आजन्म अविवाहित राहून सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला.

एकुलत्या एक मुलाच्या निर्णयाने आई प्रचंड दुखावली गेली.

म्हणाली, " तूच का?"

तो तिला समजावत म्हणाला,

"तू नाही का मला दरवर्षी बैलपोळ्याला माझ्या डोक्यावर अक्षता टाकत विचारायचीस 'अतीत कोण', म्हणून." 

Sunday, 26 June 2022

अलक क्र.५७


'दुर्बोध' असा शेरा लिहून संपादकांनी त्याचे सगळे लेख त्याला साभार परत पाठवले.

त्याने उत्तरादाखल पत्रात धन्यवाद देत केवळ 'अबोध' लिहून पाठवले.

Saturday, 25 June 2022

अलक क्र.५६


"टी-शर्ट आणि जीन्स पॅन्टवर टिकली आणि मंगळसूत्र चांगलं दिसत नाही",

असे म्हणून नववधू तिच्या कामाला निघून गेली.

तो निशब्द होऊन त्याच्या आईकडे पाहत होता.

आई म्हणाली, "देवाकडे पार्थना करते, तुला पहिली मुलगी होऊ दे."

Friday, 24 June 2022

अलक ५५


नेतृत्वगुण नसतानाही केवळ वारसाहक्काने त्याची एका सामाजिक संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

परिणामतः अनेक निष्ठावान कार्यकर्ते संघटना सोडून जात होते.

तरीही तो एक वाक्य सदैव म्हणायचा, "माझे कोणावाचून अडत नाही."

नि एके दिवशी लोकोपयोगी असणारी ती सामाजिक संघटना बंद करावी लागली.

आता लोकं म्हणत होती, "खरंच कोणावाचून कोणाचं अडत नाही."

Thursday, 23 June 2022

अलक क्र.५४

 

'पूर्ण विचार' नावाने त्याने एक सामाजिक संस्था सुरु केली.

या संस्थेच्या माध्यमातून घटस्फोटाचे घेण्याचे प्रमाण कमी करण्यात त्याला यश आले.

नवदाम्पत्याला घटस्फोट घेत असतानां तो एकच प्रश्न विचाराचा,

"जसा 'पूर्ण विचार' करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तसा 'पूर्ण विचार' घटस्फोट घेत असताना करत आहात का?" 

Wednesday, 22 June 2022

अलक क्र.५३


'कोणत्याही एका विचारवंतांच्या विचारांनी भारावून जायचे नाही', असे त्याने ठरवले.

जगभरातील अनेक विचारवंत वाचुन झाल्यावर तो आता एक चांगला समीक्षक झाला आहे.

तो आता भरभरून लिहितो आहे,

'सामान्य नागरिकांनी कोणत्याही एका विचारवंताच्या का होईना विचारांनी प्रेरित होऊन जीवन जगावे', म्हणून.

Tuesday, 21 June 2022

अलक क्र.५२

 

त्याने पहिल्यांदा टूर्नामेंट जिंकली. सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला.

कोचनी मात्र त्याला पुढच्या टूर्नामेंटसाठी शुभेच्छा दिल्या. त्याला प्रचंड वाईट वाटले.

पुढे २०-२५ वेळेस असेच झाले. तरीही कोच त्याला 'चांगला खेळ खेळण्यास सांगत राहिले.

नि पुढे तो एक टूर्नामेंट हरला.

त्याचं सांत्वन करत कोच म्हणाले, "सदैव असेच चांगले खेळत राहा." 

Monday, 20 June 2022

अलक क्र. ५१

 

पंढरीची वारी करण्याची अकरा पिढ्यांची परंपरा त्याच्या घरी चालत आलेली होती. परंतू त्याचा अशा कोणत्याही कर्मकांडावर विश्वास नव्हता.

एके दिवशी त्याचे वडिल वृद्धापकाळाने जात राहीले.

आता आईला काळजी लागली वारी कशी होणार.

गोड जेवणाच्या दिवशी तो मनोगत व्यक्त करताना म्हणाला, "आई-वडिलांपैकी कुणी गेल्यानंतर त्यांच्या आवडीचा पदार्थ सोडण्याची परंपरा आहे. परंतू मी वडीलांच्या आवडीची गोष्ट म्हणजेच वारी स्विकारणार आहे."

Sunday, 19 June 2022

अलक क्र.५०


घराशेजारील झोपडपट्टीच्या मुलांची सावली आपल्या मुलांवर नको म्हणून ती 'घर बदलूया' म्हणून त्याच्या खूप मागे लागली. परंतु त्याच्याने वडिलोपार्जित घर सोडवेना.

नि मग काही दिवसांनी काहीतरी जाणवून तिने तिचा निर्णयाचे बदलला.

तिने झोपडपट्टीतील मुलांसाठी विनामूल्य शिकवणी आणि संस्कारवर्ग घेण्यास सुरुवात केली.

Saturday, 18 June 2022

अलक क्र.४९


"मी नेहमीच तुझ्या हिताचे सांगत असतो तरी तू माझे ऐकत नाहीस",

तो नेमकेच कळू लागलेल्या मुलाला रागावत होता.

वारंवार घडणाऱ्या या गोष्टीमुळे तो कंटाळून गेला होता.

नि मग पुढे केंव्हातरी त्याच्या वाचनात एक वाक्य आले,

"मुले अनुकरणातून अधिक शिकत असतात."

Friday, 17 June 2022

अलक क्र.४८


त्याने वयाच्या अकराव्या वर्षी केलेल्या भाषणाने सर्वच मंत्रमुग्ध झाले.

त्यांनंतर त्याची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली.

आता तो एक उत्तम वक्ता आहे.

एकदा एका रसिक श्रोत्याने त्याला त्याच्या यशाचे रहस्य विचारले.

त्यावर तो म्हणाला, "गुरूंनी शिकवलेली 'श्रवणभक्ती."

Thursday, 16 June 2022

अलक क्र.४७

 

ती : मला जॉब बदलायचा आहे.

तो : काय झाले आहे?

ती : बॉस ची नजर खूप वाईट आहे.

तो : अगं! सगळ्या जगाचीच तशी असते.

ती : आणि तुझी?

आता तो नजर चोरत निघून गेला.

Wednesday, 15 June 2022

अलक क्र.४६


त्याची इटुकली परी म्हणाली ,

"बाबा, मला आता 'राजा-राणीच्या गोष्टी' नाही आवडत.

मला तू सुपरहीरोच्या गोष्टी सांगत जा."

लेक मोठी होत आहे पाहून, तो विचारात पडला.

नि मग त्याने तिला 'संतांच्या गोष्टी' सांगायला सुरुवात केली.

Tuesday, 14 June 2022

अलक क्र.४५

  

पहिला मित्र : तुला कविता प्रसिध्द झाल्यावर खूप आनंद होत असेल ना!

दुसरा मित्र : मला वाटते, रसिकांनी तुझी प्रशंसा केल्यानंतर तुला अधिक आनंद होत असेल.

तो : दोन्ही नाही. मला कविता शब्द बद्ध केल्यानंतर सर्वाधिक आनंद होतो.

Monday, 13 June 2022

अलक क्र.४४


आठ दिवसाच्या सुट्ट्या संपवून कामाला जाणे त्याला जड जात होते.
आळस टाळण्याचा तो प्रयत्न देखिल करत नव्हता.
परंतु पत्नी कडे पाहून तो कामावर जाण्यास तयार झाला.
ती बापडी गेल्या आठ दिवसांत घरात राहिलेले सगळी कामे करण्यात मग्न झाली होती.

Sunday, 12 June 2022

अलक क्र.४३


'देवपूजेसाठी त्याने काही शिळे फुले घेतली, नेमकेच कळु लागलेले वय त्याचे, परंतु त्याला असे करतांना पाहून आई प्रचंड रागावली',

हा प्रसंग आईला आठवला तेंव्हा तिच्या तरूण मुलाचे पार्थिव शरीर तिरंग्यात गुंडाळलेले होते.

एकाही अश्रू नढाळता तिने भारतमातेसह तिला अर्पण केलेल्या ताज्या फुलाला देखील नमन केले.

Saturday, 11 June 2022

अलक क्र.४२


कळत्या वयात आल्यानंतर तो एकदा जेवतांना आईला म्हणाला,

"आई, मला नुसता भात, विना तूप, दूध, दही, वरणाचा आवडायला केव्हा पासून लागला?"

आई काही बोलणार तोच त्याचे वडील म्हणाले,

"बाळा, खालावलेली आर्थिक परिस्थिती आनंदाने हाताळत मात करणे, हे केवळ घरातील पुरुषांचे काम नसते तर महिलांचे देखील असते. आणि तुझी आई त्याचे आदर्श उदाहरण आहे."

Friday, 10 June 2022

अलक क्र.४१


एव्हाना मानवाने परग्रहावरील मानवाचा शोध लावला होता.

परग्रहावरील मानव सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रगत होता.

पृथ्वीवरील शास्त्रज्ञ त्या मानवाला 'देव मानव' म्हणत होते.

Thursday, 9 June 2022

अलक क्र.४०


कमी वयात यश आणि प्रसिद्धी मिळाल्यामुळे त्याचा अहंकार खूप वाढला आहे, ही गोष्ट लक्षात आल्यावर त्याच्या गुरुंनी आज्ञा केली, "'गरिबांची सेवा कर."

परंतु अहंकार त्याला ती देखील करू देत नव्हता.

गुरुंनी खोलात जाऊन पहिले.

नी परत त्याला आज्ञा केली,

"आधी माता-पित्यांची सेवा कर."  

Wednesday, 8 June 2022

अलक क्र.३९


वेशभूषा, रंग, खाद्यपदार्थ, महापुरुष, ध्वज मानवाने सगळे काही वाटून घेतले.

स्वपंथाचे श्रेष्ठत्व आणि वर्चस्व स्थापण्याची जणू वरचढच निर्माण झाली होती.

शतकानुशतके उलटली आताचा प्रगत मानव त्याकाळातील मानवाला 'प्राणिमात्र' संबोधीत होता.

Tuesday, 7 June 2022

अलक क्र.३८

 

तरुण वयातच 'समाधी' प्राप्त करण्याची त्याची तीव्र इच्छा झाली.

मग त्याने अष्टांग योगसाधना सुरु केली.

परंतु तो यम-नियम या पहिल्या दोनच पायऱ्यांमध्ये अडकला.

आणि त्याने संतवृत्तीने समाजसुधारणेचे व्रत हाती घेतले.

Monday, 6 June 2022

अलक क्र.३७


तो एका दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन कोवळा संसार तसाच ठेवून दिगंताच्या प्रवासाला निघाला होता.

"तू पुनर्विवाह कर", त्याने तिला शेवटची इच्छा बोलून दाखवली.

तिने गळ्यातील मंगळसूत्र टेबलवर ठेवत त्या भोवती सात प्रदक्षिणा मारल्या.

Sunday, 5 June 2022

अलक क्र.३६


'समर्पण' हा शब्द कळल्यापासून त्याने 'देणगी', 'दान', 'दक्षिणा' हे शब्द आयुष्यातून काढून टाकले.

एव्हढेच काय तर त्याने त्याच्या घराला देखील 'समिधा' नाव दिले आहे.

Saturday, 4 June 2022

अलक क्र.३५


पहिलाच कविता संग्रह प्रकाशित केल्यांनतर त्याला अपेक्षा होती कि,

त्याला पुरस्कार मिळावा.

त्याची प्रत्येक कविता उत्तुंग प्रतिभेचा अविष्कार होतीच.

परंतु त्याला कोणताही पुरस्कार मिळाला नाही.

तो खूप दुःखी झाला.

त्यावर त्याच्या पत्नी म्हणाली,

"रसिक वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांना तू पुरस्कार का मानत नाही?"   

Friday, 3 June 2022

अलक क्र.३४

 

लग्नाच्या एका तपानंतर ती त्याला म्हणाली,

"लग्नापूर्वी तू चंद्र-तारे आणून देण्याच्या आणाभाका घेतल्या होत्यास. आठवतंय तुला!"

त्यावर त्याने अलगद खिशातून गजरा काढत तिच्या वेणीत माळला."

Thursday, 2 June 2022

अलक क्र.३३


तो प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा.

आनंदाच्या प्रसंगाची त्याने कधीही वाट पहिली नाही.

"सांसारिकाला हे कसे काय सध्या होऊ शकते?",

एकदा न राहवून त्याच्या मित्राने त्याला विचारले.

त्यावर तो उत्तराला,

" कारण माझा ठाम विश्वास आहे कि, 'प्रकाश' मुळातच स्वयंपूर्ण असतो."

Wednesday, 1 June 2022

अलक क्र.३२


तो प्रत्येक कामात आळस करायचा. त्याचा कोणताच जॉब टिकत नव्हता.

त्याची पत्नी म्हणाली, "मला प्रपोज करतानाची तन्मयता माझ्यासोबत संसार करताना ठेवशील का?"

त्यानंतर मात्र त्याने कामावर खूपच लक्ष दिले.

आता ती म्हणत आहे, "त्याचे काम म्हणजे जणू माझी सवतच आहे."

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...