Sunday, 18 September 2022

नाटक - 'दादा एक गुड न्यूज आहे' ... - एक समीक्षा

 


 'फ्लॅशबॅक' हा प्रामुख्याने चित्रपटांचा विषय. तर नाटकांना असते ती थीम. अत्यंत छोटा, अत्यंत सूक्ष्म असा विषय घेऊन, गाभा घेऊन नाटककार नाटक लिहीत असतो. जो की विषय प्रामुख्याने एखाद्या छोट्याशा अशा कथेचा होईल असे वाटते, तो विषय नाटककार त्याच्या कौशल्याने सबंध नाटकाचा बनवत असतो. मूळ त्या विषयाकडे पाहिले तर सुरुवातीला आपल्याला असे वाटते की, हा विषय इतका सूक्ष्म आहे की याचा एक वटवृक्ष तयार होईल का नाही. परंतु नाटककार त्याच्या कौशल्याने त्या सूक्ष्म अशा विषयाला न्याय देत सबंध नाटकाची रचना करत असतो. आणि नेमकं याच पद्धतीने 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक कल्याणी पाठारे यांनी अत्यंत कौशल्याने लिहीले आहे.

धक्का तंत्र तर सर्वच ठिकाणी वापरावे लागत असते. परंतु नकळतपणे नाटकाच्या सुरुवातीलाच जो काही नाटकांमध्ये विषय मांडायचा आहे तो अगदी पहिल्या पाच मिनिटातच जाहीर करून टाकणे म्हणजे नाटक खूप समर्थपणे पेलण्याचे ते एक दर्शनच आहे. आणि नेमकेपणाने 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये अवघ्या वीस वर्षांची धाकटी बहीण दादाला गुड न्यूज देते. आणि खरे तर नाटकाच्या काही वेळानंतर हा विषय फुलवत जात समोर येईल आणि मग नाटकाच्या मूळ गाभ्यापर्यंत जाऊ आणि नेमकेपणाने तो विषय कळेल अशा आशयामध्ये अशा विचारांमध्ये रसिक प्रेक्षक असतो. परंतु नाटकाच्या सुरुवातीलाच नाटकाचा विषय जाहीर प्रकट केल्यामुळे या नाटकाला एक छान अशा स्वरूपाची उंची प्राप्त झालेली आहे.

अगदी सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे नाटकातील प्रत्येक प्रसंग अगदी नेमकेपणाने लिहिण्यात आलेला आहे. नाटकातील विषय तोच तोच पद्धतीने समोर न येता कोणत्याही क्षणाला आपण नाटकाच्या मूळ विषयापासून सुटून दूर चालले आहोत, असे कुठेही जाणवत नाही, याचे श्रेय कल्याणी पठारे यांना दिलेच पाहिजे.

आणि सोबतच नाटकाचे दिग्दर्शक अद्वैत दादरकर आणि सर्व कलाकार यांनी ते समर्थपणे पेलले आहे. आपल्या अभिनयातून नाटकाचा विषय प्रेक्षकांपर्यंत यथार्थपणे घेऊन जाण्यामध्ये सर्वजण यामध्ये यशस्वी ठरले आहेत. त्याबद्दल नाटकाच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.

आता नाटकाच्या थीम विषयी थोडेसे.

अवघी वीस वर्षाची धाकटी बहीण ज्यावेळेला दादाला गुड न्यूज देते त्यावेळेस 'घाबरलेल्या आणि सावरलेल्या दादा'ची भूमिका उमेश कामत यांनी छानपणे साकारलेली आहे. बाबांपर्यंत पोहोचण्याच्या आधी नक्कीच प्रत्येक वेळेला प्रत्येक मुलाच्या बाबतीमध्ये आई सहाय्यकारी ठरत असते. परंतु त्यासोबतच दादा जर असेल तर आई-वडिलांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सुखकर होत असतो. कारण 'दादा' नावाप्रमाणे सगळा अनुभवही घेतलेला असतो. आणि नकळतपणे त्याच्या दादागिरीचा कुठे ना कुठेतरी धाकट्या भावंडांना लाभ देखील होत असतो.

म्हणूनच गोष्ट कळाल्यानंतरचा सुरुवातीचा चिडचिडपणा आणि नंतर मात्र वडील भाऊ या भूमिकेत जाऊन दादा म्हणून नंतरचं धाकट्या बहिणीला सावरून घेतल्याचा एकंदरीत सगळा भाग हा अत्यंत समर्थपणे यामध्ये आला आहे.

परंतु दादाला दिलेलं एकंदरीत सगळं काही महत्त्व, मानपान, प्रेम हे सगळं सादर करत असताना, कुठेतरी वडिलांना मात्र अगदी ठरवून वाईट ठरवलं, याचं अत्यंत वाईट वाटतं.

'दादा गुड न्यूज आहे' या नाटकात दादा आहे प्रमुख पात्र असल्यामुळे कदाचित नाटककाराला हे नकळतपणे करावं लागलं असेलही. परंतु याच्या ऐवजी नकळतपणे कुठेतरी वडिलांना वेगळ्या भूमिकेतही नक्कीच दाखवता आलं असतं, ही खंत मात्र कुठे ना कुठेतरी जाणवते.

बाकी नाटकातील सर्व जागा कलाकारांनी अत्यंत सुंदरपणे भरलेल्या आहेत. अद्वैत दादरकरची गाणं म्हणताना ची जागा तर विशेष टाळ्या घेऊन जाते. आणि वन्स मोर घेतल्याशिवाय नक्कीच राहत नाही.


आजची तरुण पिढी आव्हान झेलणारी, स्वतःचं करियर करत असताना हा असा वेगळा विषय देखील घेऊन समोर आपल्या येते, ही गोष्ट नाटककाराने खूप छान पद्धतीने नाटकाच्या माध्यमातून मांडली आहे.

अर्थातच नाटकाचे संपूर्ण कथानक सांगणे या ठिकाणी अपेक्षित नाही. तसेच नाटकाचा शेवट सांगणे हे तर निश्चितच नाही. परंतु वेगळा विषय घेऊन मांडलेले नाटक नक्कीच पाहिले पाहिजे, हे मात्र अगदी खात्रीने सांगू शकतो. तेव्हा अवश्य पहा... 'दादा एक गुड न्यूज आहे...'

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

अलक

तो प्रत्येकाला ओळख करून घेत असताना त्यांचे '' आधी विचारायचा.

एकदा एका गृहस्थाने थेट म्हणाले,

"नावाच्या आडून '' माहीत करून घेण्याची सवय आता सोडली पाहिजे".

Saturday, 17 September 2022

अलक

 डिजिटलायझेशनचा काळात तो एकदा म्हणाला, "उपवास अन्नचाच करायचा असतो".

त्याचे मित्र त्याला 'ऑर्थोडॉक्स' म्हणाले.

त्यावर तो उत्तराला, "अनादी काळापासून आपली संस्कृती कशामुळे टिकून आहे, हे तुम्हाला अजून कळायचे आहे."

Friday, 16 September 2022

अलक

 एव्हाना त्याचे व्यसन खूप वाढले होते. सर्व इलाज करून झाल्यावर आई वडील त्याला एका महाराजांकडे घेऊन गेले.

सर्व समजावून घेतल्यावर महाराज म्हणाले,

"'तृष्णे ने तृष्णा' कधीच शमत नाही. त्याला 'कृष्णा'वर ध्यान देण्यास सहाय्य करा".

Thursday, 15 September 2022

अलक

 'कवीकल्पना' या नावाखाली एका कवीने 'चावट पाऊस' अशी कविता सादर केली.

अर्थातच ही एक अत्यंत वाईट अशी कवीकल्पना होती.

परंतु लगेचच दुसऱ्या एका कवीने शीघ्र कविता करत 'कवी आणि रवी' यांची सामाजिक जबाबदारी मांडली.


Wednesday, 14 September 2022

अलक

मंगळावर मानवाने आता वस्ती केली होती.

त्यावर एक महान साहित्यिक म्हणाले,

"आता 'आकाश ठेंगणे झाले' हा वाक्प्रचार प्रत्यक्षात आला."

Tuesday, 13 September 2022

अलक

 एका शहराला केंद्र सरकारने 'पर्यटन राजधानी' म्हणून घोषित केले.

त्या शहरातील नागरिकांनी मोठा उस्तव साजरा केला.

परंतू काही व्यापाऱ्याांनी एकत्र येऊन निर्णय केला, 'या निमित्ताने येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ केवळ आपल्या उद्योगालाच झाला पाहिजे.'

Monday, 12 September 2022

अलक

 एमबीए झाल्यानंतर त्याने पर्सनल गोल सेट केले. ते पाहून त्याचे वडील "अपूर्ण", असे म्हणाले.

त्यावर तो म्हणाला, "मी त्यात कुटुंबाचा देखील विचार केला आहे."

स्मित हास्य करत वडील उत्तरले, "वैश्विक कुटुंबाच्या जबाबदारीचा देखील एक गोल सेट कर."

Sunday, 11 September 2022

अलक


"उत्साह आणि उत्सव रोज असला पाहिजे", एक महाराज त्याला म्हणाले.

त्यावर तो म्हणाला, "उसनं अवसान आणता येईल. परंतु रोज उत्सव कसा असेल?"

"तीच तर गमंत आहे", महाराज उत्तरले, "जीवनाचा उत्सव छोट्या छोट्या प्रसंगात शोधत साजरा करायचा असतो."

Thursday, 8 September 2022

अलक

 गणेश मंडळाच्या कार्यक्रमात गल्लीतील मुलांनी आपआपल्या आवडीप्रमाणे गायन, नृत्य, भाषण, विनोद, सूत्रसंचालन इत्यादी गोष्टी सादर केल्या.

एका किशोरवयीन मुलाला घरी गेल्यावर त्याचे वडील रागावत म्हणाले, "गाढवा, बघ त्या मुलांकडे. तुझ्यात एकही कलागुण नाही!"

"आहे ना!", वडिलांना अगदी शांतपणे उत्तर देत तो म्हणाला, "एक रसिक, आस्वादक असण्याचा".

Tuesday, 6 September 2022

अलक


आज दिवसभरात काहीच लिहिले नाही, म्हणून तो विचार करत होता. 

तोच स्वयंपाक घरातून आवाज देत बायको म्हणाली,

"अहो, महिना संपत आला आहे, किराणाची यादी लिहून काढा ना !"

Sunday, 4 September 2022

अलक

 सुरवंटाचे फुलपाखरू होत असताना पाहून त्याला प्रचंड आनंद झाला. नि तो विचारत पडला.

घरी गेल्यावर आईला म्हणाला, "आई, असा बदल कधी जन्मलेल्या बाळात का होत नाही?"

बालवयातील मुलाचे कुतूहल पाहून आईने त्याची माया केली.

नि मनातल्या मनात म्हणाली, 'खरेतर माणसाचा जन्म आतून बदल करण्यासाठी असतो'.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...