Sunday, 30 January 2022

अव्यय

 


"तू नुसता अव्यय आहेस." वारंवार समजावून सांगून, शिकवुणही संस्कृत न समजणार्‍या मित्राला, एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी रागवले. आम्ही दहावीला होतो. शहरातील नावाजलेले व्यक्तिमत्व, एक गुरू म्हणुन संस्कृतचे पंडित आम्हाला संस्कृत विषयाचे शिक्षक म्हणून आले होते. अनुभव आणि वय या दोन्हीतूनही त्यांचा पांडित्य आम्ही अनुभवत होतो. परंतु त्या दिवशी त्यांनी 'अव्यय' असे संबोधल्याने त्याच्याप्रमाणे आम्हीदेखील गोंधळलो. सुरुवातीला आपल्याला काहीतरी छान उपाधी दिली आहे की काय असे वाटत होते.

पण नंतर ते शिक्षक म्हणाले, "अव्यय कळतो का?" तरीही तो शांत होता. "अरे! 'अव्यय' म्हणजे तुझ्यासारखा दगड, नर्मदेचा गोटा." शिक्षकांनी स्पष्टीकरण दिलं. आणि आता त्याच्या तोंडावर समजण्याची सगळी चिन्ह दिसायला लागली. तशी आमच्याही. कारण इतक्या उच्च प्रतीचे रागावणं कधी कोणाकडून झालंच नव्हतं. आमची एकंदरीत 'गुणवत्ता' नाही तर 'इयत्ता' तरी वाढल्यासारखं वाटलं.

पुढे शिक्षकांनी समजावून सांगितले की, ज्या शब्दांच्या मूळ रुपात कोणताही बदल होत नाही, त्यांना 'अव्यय' असे म्हणतात. उदाहरणार्थ इथे, तिथे, खाली, वर, आज, काल, सगळे अनेक, पण, परंतु इत्यादी. वाक्यात प्रयोग करत असताना मूळ शब्द जशास तसा राहतो. अर्थात अविकारी.

नंतर व्यवहारी जगात पदार्पण केल्यानंतर हे अक्षर वाङ्‌मय, अक्षय साहित्य, आणि अव्यय शब्द समजावून घेत, अनुभव घेत असा 'अ' उपसर्गाचा अनुभव घेत अनंत अवधी ओसंडला. 'अनुप्रास'च असावा.

परंतु अनुभव हा येत गेला की, आमच्यात 'बदल' नाही तर 'भेसळ' अधिक झाली आहे, एक मराठी भाषा म्हणून. आणि बहुधा अन्य भाषांपैकी मराठी मध्ये हे प्रमाण अधिक जाणवलं. सहजपणे हिंदी बोलणं किंवा इंग्रजीचा आकर्षण असं आहेच. परंतु त्याहूनही गंभीर बाब म्हणजे मराठी भाषिकांमध्ये आहे ती म्हणजे नकळत अमराठी शब्दांचा उपयोग नित्य व्यवहारात करणे.

परेशान, वापस, दरवाजा, घर खाली करणे, मेहनत, आलू, चेहरा, खुश होणे इत्यादी असे कितीतरी शब्द सांगता येतील जे आपण नकळतपणे व्यवहारांमध्ये उपयोगात आणतो. परंतु या सगळ्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द अगदी साधे, सोपे आहेत. परंतु परकीय आक्रमणांमुळे म्हणा किंवा एकंदरीतच अजाणतेपणा मुळे म्हणा, असे शब्द मराठीत 'मराठी' म्हणून सध्या वास्तव्य करत आहेत.

मुळात ज्या संकल्पना आपल्या नाहीत अशा संदर्भात काही शब्द परभाषेतून आले तर एक तर त्यांना आपल्याला नवा शब्द मराठीत अक्षरशः शब्दशः निर्माण करावा लागतो. किंवा तो मूळ शब्द जशास तसा स्वीकारावा लागतो. सावरकरांचे योगदान या क्षेत्रात अमराठी शब्दांना पर्यायी मराठी शब्द देण्यात प्रचंड मोठे आहे. त्यावर स्वतंत्र लेख किंबहुना पुस्तकही लिहिलेली आहेतच.

आणि जसा जसा काळ उलटत जातो तसे तसे नवनवीन शब्द ही येत जात असतात. तर भाषा म्हणून आपण त्यांना पर्यायी शब्द देऊ शकलो, तर तो मराठीचा गौरव असेण.

काही दिवसांपूर्वी फेसबुक वरील एका समूहात 'मराठी कल्चर अँड फेस्टिवल' या अमेरिकेतून भारतीयांनी चालवणाऱ्या समूहात 'हिटर' या शब्दाला पर्यायी मराठी शब्द 'उष्मक' सुचवण्यात आला. अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय उपक्रम होता.

अर्थात हा मराठीचा अभिमान, ही मराठी भाषेची अस्मिता आपण जपलेली आहेच. परंतु एकंदरीतच बदललेल्या शिक्षण पद्धतीमुळे ही बाब चिंतेची झाली आहे. काही मुलांशी बोलत असताना अनुभव आला, साधारण आठवी ते दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बालकवी, केशवसुत, कुसुमाग्रज, विंदा, ग्रेस किंवा अशी कोणतीही नावं ठाऊकच नाही आहेत.
अभ्यास क्रमचाही तो विषय राहिलेला नाही. किंवा पालकांना एव्हाना 'संस्कार शाळेतून मिळावेत', असे वाटू लागले आहे, म्हणून असे झाले असावे.
बाब इतकी गंभीर होती की, अशा विद्यार्थ्यांपैकी एकाला चक्क 'मराठीची शिकवणी' लावत असताना पाहायचं दुर्दैव वाट्याला आलं.
आणि वाटलं आता हा नवा 'अव्यय'.

आम्ही आमच्या दहावीच्या वेळी खचित संस्कृतभाषेची क्लिष्टता समजू शकलो नव्हतो. परंतु आताची पिढी माय मराठीच समजू शकत नसेल तर अस्मिता, अभिमान अस्तित्त्वातच राहणार नाही. आपण आत्ममग्न होऊन जाऊ 'अव्यय' राहून.


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Wednesday, 26 January 2022

अतिलघुकथा - अलक

नुकत्याच रेजिमेंटमध्ये दाखल झालेल्या सैनिकांना कॅप्टन 'शांतता' समजावून सांगत होते.

सगळे सैनिक अवाक् होऊन ऐकत होते.

आणि विषयाच्या समारोपात कॅप्टन म्हणाले, "केवळ सामर्थ्यच 'शांतता' प्रस्थापित करू शकते."


"युद्धस्य कथा रम्य:", एका सैनिकाच्या पत्नीला तिची मैत्रीण म्हणाली.

आणि सैनिकपत्नी शांतपणाने म्हणाली, "हो. तुमच्याकरिता".


एक सैनिक त्याच्या पत्नीला पत्र लिहिताना नेहमी पत्राच्या शीर्षस्थानी 'जय हिंद' असे लिहायचा. परंतु मधला सगळा मजकूर तिच्यासाठीच असायचा.

त्याच्या अनेक पत्रानंतर तिने त्याला एक पत्र लिहिले. त्या पत्राचा मजकूर होता.

'मला ठाऊक आहे, मी तुझे हृदय आहे. आणि देश तुझा आत्मा आहे.'


एका सैनिकाने एका मुलीला प्रपोज केलं. त्यावर ती म्हणाली, "मला तुझी व्हायला आवडेल. पण तू पहिले कुणाचा होशील?"

तो धीर गंभीर होऊन तिच्याकडे पाहत होता.

तिला उत्तर कळले.

आणि ती म्हणाली, "म्हणूनच मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करते".


"सैनिकावर मृत्यू केव्हा ही झडप घालू शकतो, असे असतानाही मुली सैनिकाशी लग्न का करतात?" एका तत्त्वज्ञाने एका सैनिक पत्नीला प्रश्न विचारला.

त्यावर ती सैनिक पत्नी म्हणाली, "आम्ही जिजाबाईच्या लेकी आहोत. शिवाजी आमच्या पोटी जन्माला यावा वाटतो. म्हणून."


©हेमंत पोहनेरकर

९५९५९६९९८९

 

Saturday, 22 January 2022

मातृवंदना


नास्तिकाला ही दैवत असते ते मातेचे. कृतज्ञतेची कृतार्थता प्रकट करण्याचे एकमेव ठिकाण जगाच्या पाठीवर भगवंतानंतर अस्तित्वात आहे ते म्हणजे माता.


वैयक्तिक पातळीवरील माते विषयीची ही जी भावना आहे, तीच पुढे समष्टीपर्यंत जात असताना मातृभूमीविषयी देखील आहे. आणि असा भारतमातेचा इतिहास गौरवशाली, अभिमानास्पद आणि सदैव प्रेरणादायी राहिलेला आहे.

'समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले।
विष्णूपत्नी नमस्तुभ्यम् पदस्पर्श क्षमस्वमे॥'
अशा उच्च भावनेसरशी दिवसाची सुरुवात करणारी भारतीय संस्कृती आहे. की, आपल्याला दिवसभरात पृथ्वीवरून वावरावे लागणार आहे, तरी तिला आपल्या पायाच्या स्पर्शामुळे इजा होणार नाही व अन्य कारणांनी त्रास होणार नाही ना म्हणून आधीच क्षमा मागितली गेली आहे.

ही गोष्ट काही परंपरा, रूढी वा कर्मकांड म्हणून सुरु नाही आहे. तर अगदी वैदिक काळापासून इतिहास पाहिला तरी सर्वत्र एकाच महामंत्राचा उद्घोष पहावयास मिळतो. आणि तो महामंत्र म्हणजे 'वंदे मातरम्'.

ऋग्वेदाच्या सुरुवातीलाच 'माता पृथ्वी महियम्' - ही धरती माझी माता आहे, असे सांगितले गेले आहे.
त्याच गोष्टीचे प्रतिपादन पुढे यजुर्वेद करतो, 'नमो मातरै पृथिव्या' - आम्ही भूमातेला नमस्कार करतो.
एवढेच नव्हे तर अथर्ववेदाच्या शैवक संहितेमध्ये पृथ्वीसूक्त येते. आणि यात वर्णन केले आहे, 'मातृभूमीला चार दिशा आहेत. जिथे शेती केली जाते, प्राण्यांची जी रक्षा करते, ती आमची उदरभरण ही करते, गाईकडून व अन्नातून. आणि हे मातृभूमि, तुझे प्रदेश सदैव रोगविरहित असो. भयापासून दूर असो. इथे सदैव आम्ही जागृत असो. प्राण तळहातावर घेऊन तुझ्यासाठी त्याग करावयास कटिबद्ध असो.'
अशी ज्या ठिकाणी मातृभूमीची स्तुती गायली गेली आहे. त्याच ठिकाणी आशीर्वादही मागितला आहे की, 'आमच्यावर होणाऱ्या आक्रमणांवर विजय मिळवता यावा आणि प्रसंगी प्राणांची आहुती ही द्यावयास आम्ही तत्पर असू'.

याठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, कुठेही असे उल्लेख आढळत नाही की, परकीयांवर आक्रमण करून त्यांचे राज्य वा भूमि मिळावी. आणि असाच संबंध भारताचा इतिहास आहे. भारतावर चाल करून अनेक परकीय आक्रमक आले. पण कधीही कोणत्याही राज्याने असे कृत्य केल्याचे आढळत नाही.

प्रत्यक्षात राम जेव्हा रावणाचा वध करतो. त्याची सोन्याची लंका जिंकतो. परंतु या 'सुवर्ण लंकेला सोडून जायचे का?', या लक्ष्मणाच्या प्रश्नावर उत्तर देतो. -
'अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।
 जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥'
 - 'लंका सोन्याची जरी असली तरी लक्ष्मणा, मला ती आवडत नाही. कारण जन्मदात्री आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा ही श्रेष्ठ असते'.

अर्थात, लंकेचे सौंदर्य, संपन्नता, वैभव इत्यादी सर्व काही असेल. पण जननी व जन्मभूमीची सेवा करण्याचे सौभाग्य जे आहे ते इतर कुठेही नाही.

हीच भावना सबंध भारतवर्षात सर्वच कवींच्या लेखणीतून प्रकट झालेली पहावयास मिळते.

'जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है।
इसके वास्ते ये तन है, मन है और प्राण है॥'
या आशयाचे गीत किंवा,
'तन समर्पित, मन समर्पित और यह जीवन समर्पित।
 चाहताहूं मातृभू तुझको अभी कुछ औरभी दुं ॥
'सारं सारं काही दिले तरी हे मातृभूमि, तुला आणखी काहीतरी देण्याची इच्छा आहे.'

आणि म्हणूनच प्रत्येक भारतीय ज्यांनी मातृभूमीच्या, भारतमातेच्या मुक्तीच्या यज्ञात प्राण आहुती दिली, त्यांनी अंतिम क्षणी एकाच गोष्टीची अभिलाषा ठेवली. की, 'हे मातृभूमि माझा जन्म तुझ्याच पदरी होवो. पुन्हा तुझीच सेवा करण्याचे सौभाग्य मला लाभो. आणि असे कैकवार मी तुझ्यासाठी प्राणार्पण करू इच्छितो.'

मातृभूमीची सेवा करत अमरत्व मिळावे आणि अशा मिळालेल्या अमरत्वाचे कवी वर्णन करतो,
'कोर बिलोरी तुझ्या कपाळी, शिरी मोत्यांची माळी गं।
तुझा लोचनी मुक्त आत्म्याची शाश्वत नित्य दिवाळी गं॥

अशा उदात्त आणि जाज्वल्य भावनेचा अविष्कार ठाई ठाई पहावयास मिळतो. याच भावनेचा आणखी एक उल्लेख विष्णू पुराणात आढळतो.
'गायन्ति देवः किल गीत कनि।
धन्यस्तुते भरतभूमी भागे॥'
- 'आम्हा देवतांमध्ये तेच लोक धन्य आहेत, जे भारतभूमीमध्ये उत्पन्न झाले'.
अर्थात, देवांनी देखील याप्रमाणे स्वर्ग आदी ठिकाणी न रमता भारतभूमीत जन्म घेण्यात स्वतःची धन्यता मानली आहे.

श्रीमद भागवतामध्ये देखील ह्याच गोष्टीचा उल्लेख आढळतो की, 'भारतभूमी मध्ये थोड्या वर्षांसाठी जन्म घेतला तरी तो पुण्यवान होतो'. याच भावनेला संत एकनाथांनी शब्दांत व्यक्त केले आहे.
'भारतखंडी नरदेहाची प्राप्ती।
ही तर परम भाग्याची संपत्ती॥'

तसेच याच संतपरंपरेत सर्वच संत जसे की, नरसी मेहता, श्रीमच्छदेव, श्रीदामोदर देव हीच मातृभूमीविषयीची भावना व्यक्त करत असताना पाहावयास मिळतात.

एवढेच नव्हे तर 'बृहत रत्नाकर स्तोत्र'मध्ये भारतभूमातृस्तोत्र हे तेवीस श्लोकांचे स्वतंत्र स्तोत्र पहावयास मिळते. त्याची सुरुवातच 'वंदे मातरमव्यक्तां...' अशी केलीली आहे. नि पुढे त्यामध्ये भारतभूमी मध्ये होऊन गेलेल्या सर्व महापुरुषांचा, सम्राटांचा, ऋषींचा, नद्या व पर्वत यांचा उल्लेख आढळतो. अर्थात या स्तोत्रात मातृभूमीची स्तुतीही आढळते आणि मातृभूमीच्या थोर पुत्रांचे वर्णनही आढळते. आणि शेवटी 'निरंतर भवतुमे...' - आम्ही तुझी निरंतर सेवा करावी.' अशी भावनाही व्यक्त केली गेली आहे.

याच भावनेला घेऊन पुढे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ' वन्देमातरम् सुजलाम् सुफलाम् सश्यशामलाम् मातरम्...'
 या क्रांतिकारी गीताला साऱ्या भारतीयांसमोर मांडले. त्या 'वंदे मातरम्'
या मंत्राने विराटरूप धारण केले. देशभक्त क्रांतिकारक ते अबालवृद्धांना पर्यंत सर्वांच्या मुखी एकच उद्घोष होता.
आणि संकटाच्या, कठीण प्रसंगांमध्ये कर्मकांडात न अडकता 'राष्ट्र प्रथम' या भावनेचा अविष्कार प्रकट केला तो कुसुमाग्रजांनी त्यांच्या गीतातून 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्...'

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Saturday, 15 January 2022

चाळीशी आली आहे, हे मन मान्य करत नसते...





चाळीशी आली आहे, हे मन मान्य करत नसते...

एव्हाना गुडघे दुखी सुरू झालेली नसते,

पाठ दुखत नसते, चष्मा लागलेला नसतो,

शुगर किंवा बिपीचा ही त्रास सुरू झालेला नसतो

डोक्यावरचे केस मात्र पांढरे व्हायला लागेलेले असतात

पण डाय करून 'तरुण' दिसण्याचा मार्ग अजूनही शिल्लक असतो

म्हणून चाळीशी आली आहे, हे मन मान्य करत नसते...


एव्हाना 'मामा' तर अनेक वेळेला झालेलो असतो

पण बाबा होऊनही कर्तव्य पार पडायला लागलेलो असतो

पण प्रवासात एखादी विशीतली तरुणी जेव्हा 'काका' म्हणून हाक मारते

त्या वेळेला मात्र चाळीशी आली आहे, हे मन मान्य करत नसते....


बायको सोबत भांडणांचं प्रमाण एव्हाना कमी झालेलं असतं

रुसवे-फुगवे यांची दोघांनाही सवय झालेली असते

ती बिचारी आधीच जुळवून घेणारी असते

आपली मात्र तिला समजुन घेण्यात वर्ष वाया गेल्याचा कुठेतरी पश्‍चाताप असतो

आणि वाटतं तिच्यासाठी आपण अधिक तरुण राहायला हवं

आणि म्हणूनच चाळीशी आली आहे, हे मन मान्य करत नसते...


नश्वरताच शाश्वत आहे, हे एव्हाना कळायला लागलेलं असतं

लौकिकता सोडून निस्पृह आनंदाकडे मन झुकायला लागलेलं असतं

जिंकण्या-हरण्यातील अंतरही उमगलेलं असतं

उर्वरित जीवनात या प्रगल्भतेची अंमलबजावणी करण्याची किती संधी शिल्लक आहे!,

याचीच थोडी शंका असते...

आणि म्हणूनच चाळीशी आली आहे, हे मन मान्य करत नसते...


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 9 January 2022

परभणी-नांदेड-परभणी



अगदी धावत पळत जाऊन त्याने रेल्वेचे तिकीट काढले. नंदिग्राम उभी होतीच. पण प्रचंड गर्दीमुळे तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत रेल्वे निघाली. अगदी डोळ्यासमोरून रेल्वे जात होती पण तिने वेग धरल्यामुळे त्याने डब्यात शिरायचे टाळले.

तसाच उलटा फिरला. लगोलग बाहेर निघाला. कारण आता परभणीला परत जाण्याकरिता देवगिरी दीड तासानंतर होती. तेवढ्या वेळात जर बस मिळाली तर घरी पोहचु, म्हणून तो रेल्वे स्टेशन बाहेर आला.

आणि योग चांगलाच होता. तो जसा बाहेर आला तशी परभणी-नांदेड-परभणी पाटी असलेली लालपरी अर्थात एसटी येतच होती. लगेच बस मिळाल्यामुळे त्याला आता रेल्वे चुकल्याचे दुःख नाही राहिले.

तो परभणीहून पहाटेच नांदेडला काही वैयक्तिक कामानिमित्त निघाला होता. शिवाय काही मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या भेटी घ्यायच्या होत्या. आणि रात्री जेवणाच्या वेळेपर्यंत पोहोचू, असा त्याचा बेत होता. तसे पाहता देवगिरी मिळाली असती तरी चालले असते. पण मग दीड तास काय करायचे आणि कामही आटोपले होते म्हणून त्याने थोडी धावपळ केली. 

या विचारात दहा-पंधरा मिनिटे गेली असतील. तोपर्यंत बस नांदेड बाहेर पडली होती. बाहेरची हवा लागली तसे त्याला झोप लागली. दिवसभराचा थकवा देखील होता. त्याला जाग आली तेव्हा वसमत आले होते. कदाचित बस थांबली नसती तर तो थेट परभणीत उठला असता.

एव्हाना प्रवासी बसमध्ये चढत होते. फारशी गर्दी नव्हती त्यामुळे येणारा एक एक प्रवासी दिसत होता. आणि बसही भरपूर रिकामी होती. म्हणून जो तो खिडकीची जागा पकडून बसत होता. त्याने एकवार सगळ्या बस मध्ये दृष्टी फिरवली. एकही ओळखीची व्यक्ती नाही! त्याला आश्चर्य वाटले.

आपले सारे आयुष्य याच मार्गावर आहे जात आहे, नि प्रवासात ओळखीचे कोणी भेटले नाही! त्याला थोडे वाईट वाटले. बसही निघाली. आणि पुढच्या थांब्यावर हात दाखवून कुणीतरी बसमध्ये चढले. तोंड ओळख आहे असे त्याला वाटले. आणि त्याने त्या गृहस्थांना हाक मारुन जवळ बसण्यास बोलवले.

ते गृहस्थ देखील त्याच्याजवळ येऊन बसले. आणि मग गप्पा सुरु झाल्या. अर्थातच सुरुवात नावांपासून झाली. नि मग पुढे ओळखी निघत गेल्या.  परभणी ते नांदेड मधल्या सगळ्या जागा शिवाजीनगर गार्डन, पारदेश्वर मंदिर, दत्तधाम इथपासून ते गोवर्धनघाट, नगीनाघाट, गुरुद्वारा, वजीराबाद मार्केट, तरोडानाका इत्यादी आणि त्यांच्यावरच्या आठवणी, बालपणापासून ते नोकरी पर्यंतचा प्रवास. या परभणी-नांदेड-परभणी प्रवासामध्ये अगदी दोघांनीही आठवणी भरभरून काढल्या.

वेळ कसा गेला ते दोघांनाही कळले नाही. एक तास उलटून गेला. आता परभणी आले होते. त्याला पुढच्या थांब्यावर उतरायचे होते. म्हणून त्यांने त्या गृहस्थांचा निरोप घेतला. तेवढ्यात निघता निघता ते म्हणाले, "बघाना आयुष्य किती छान आहे. एक तर तसे पाहता आपली केवळ तोंड ओळख. पण आपल्याला गप्पा मारायला कोणताही वैचारिक, राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक समस्यांच्या विषयाची गरजच भासली नाही. केवळ आपल्या गावाकडच्या आठवणी पुरेशा होत्या."

त्यांनेही स्मित हास्य  त्यांना मूक संमती दिली. आणि समाधानाने खाली उतरला. कारण तीच भावना त्याची ही होती, म्हणूनच परभणी-नांदेड-परभणी या प्रवासात कुणीतरी सोबती मिळाल्याचे त्याला समाधान होते....


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 2 January 2022

राष्ट्र संकटात नसते तेव्हा...

इतिहासाला काळीमा फासणाऱ्या दोन घटना गेल्या शतकात घडल्या. एक अमेरिकेने जपान शरणागती पत्करत नाही म्हणून दुसर्‍या जागतिक महायुद्धात जपान मधील दोन प्रमुख शहरांवर हिरोशिमा व नागासाकीवर टाकलेला अणूबॉम्ब. आणि दुसरी भारताची फाळणी.


दुर्दैवाने दोन्हीही घटना मानव निर्मीत होत्या. आणि त्यामुळे झालेली राष्ट्रीय क्षती ही अत्यंत भयावह होती. अतोनात मनुष्यहानी झाली. परंतु या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की, या अमानवीय कृती नंतर या राष्ट्रीय संकटानंतर चे राष्ट्र. तर लक्षात येईल की, जपानने ते सारेच चित्र बदलून टाकले आहे. गेल्या काही दशकांपासून जपान आर्थिक महासत्ता आहे. अगदी पहिल्या पाचमध्ये आपले स्थान जपाननी अबाधित ठेवलेले आहे.

म्हणूनच महत्वाची ही गोष्ट आहे की, राष्ट्रीय संकट नसते तेव्हाचे राष्ट्रीय जीवन.

आणि ते उदाहरणांमधून प्रत्यक्ष पहायचे असेल तर जपान हे त्याचे अत्यंत सुंदर आणि परिपूर्ण उदाहरण आहे. त्यामुळे जपान विषयी खूप काही लिहिता येईल. पण मुद्दा हा आहे की, या सगळ्यात एक भारतीय म्हणून आपण कुठे आहोत? 'एक राष्ट्र' म्हणून आपण आहोत का? हा खरा प्रश्न आहे. मुळात 'राष्ट्र' ही भावना आपल्यामध्ये अभावाने आढळते. किंबहुना प्रसंगी आलेल्या राष्ट्रीय जीवनाच्या अपयशाचे उदाहरणही आपल्याला इतिहासात पाहता येईल. आणि ते म्हणजे पानिपतचे तिसरे युद्ध. पानिपतच्या युद्धाच्या पराभवाचे प्रमुख कारण सांगितले जाते, आपण अनेक तुकड्या तुकड्यां मध्ये लढलो. नोंद या गोष्टीची आहे की मराठ्यांच्या छावणीत जाती निहाय चूली पेटत. अर्थात जे मनाने एक नाहीत ते सगळे कोणत्या 'एका' गोष्टीसाठी एकत्र येऊ शकतील? परिणीती साऱ्या जगाने पाहिली आहे.

बहुदा तीच गोष्ट आजही अस्तित्वात आहे. आपण भारतीय तर आहोत पण त्या आधी कोणीतरी अमुक अमुक जातीचे पंथाचे आहोत. 'राष्ट्र प्रथम' म्हणून आपण  सांस्कृतीक दृष्ट्या पूर्वीही होतोच. पण भौगोलिक दृष्ट्या किमान स्वातंत्र्यानंतरची एकता अजूनही प्रासंगिकच आहे.

घटनेने दिलेल्या अधिकारांचा आपण जास्तीत जास्त उपयोग करतो. किंबहुना प्रसार आणि प्रचार ही करतो. परंतु त्याच घटनेने दिलेले 'राष्ट्रीय मूलभूत कर्तव्य' मात्र आपण पूर्णपणे विसरलो आहोत.

मुळात राष्ट्रीय उत्थान आणि पतनाला कोणतेही सरकार हे कधीच कारणीभूत नसते. जबाबदार असतात ते त्या देशातील नागरिक आणि त्यांचे राष्ट्रीय जीवन. खरे तर राष्ट्रीय जीवन किंवा राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना खूप काहीतरी मोठे याठिकाणी अपेक्षितच नाही. नव्हे प्रत्येकाला युद्धावर ही जायचे नाही. परंतु एक गोष्ट महत्त्वाची की, ती कोणतीही गोष्ट करणे  वैयक्तिक जीवनात अपेक्षित नाही ज्याने वैयक्तिक फायदा तर होतो पण राष्ट्रीय नुकसान होते. मग ते अनावधानाने का असेना.

खरे तर लेखाचे शिर्षक 'राष्ट्र संकटात असते तेव्हा' असे असायला हवे होते. परंतु अशा सर्व परिस्थितीत, राष्ट्रीय संकटात आपण कार्य केलेले आहे. आणि त्यात यशस्वी देखील झालेलो आहोत. पासष्ठच्या भारत-चीन युद्धानंतर राष्ट्रीय स्तरावर पडलेल्या अन्नधान्याच्या तुटवड्यानंतर मा. पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्रींच्या वक्तव्यनुसार आठवड्यात एक दिवस उपवास करणारे लाखो भारतीय होते. परंतु दुर्दैव असे की, त्याच देशाच्या माननीय पंतप्रधानांना 'स्वच्छ भारत अभियान' ही मोहीम राबवावी लागते. आणि त्यावर करोडो रुपये जनजागृती करता खर्च करावे लागतात.

बहुदा यामागे प्रमुख कारण असावे ते म्हणजे प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली अनुकूलता. अर्थात सर्वच प्रकारची. आणि अशी सर्व प्रकारची अनुकूलता हीच खरी प्रतिकूलता असते. उदाहरण आपल्याला ठाऊक आहे, बारा वर्षांच्या वनवासात पांडवांनी सगळ्या प्रकारचे युद्ध कौशल्य, ज्ञान आणि सामग्री मिळवली. पण कौरव आत्ममग्न होऊन राहिले. आणि परिणाम सगळ्या जगाने अनुभवला.

त्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, भारत स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तर वर्षानंतरही 'विकसनशील' न राहता 'विकसित राष्ट्र' व्हावा म्हणून महत्त्वाचे आहे, 'राष्ट्र संकटात नसते तेव्हाचे आपण'...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...