१
नुकत्याच रेजिमेंटमध्ये दाखल झालेल्या सैनिकांना कॅप्टन 'शांतता' समजावून सांगत होते.
सगळे सैनिक अवाक् होऊन ऐकत होते.
आणि विषयाच्या समारोपात कॅप्टन म्हणाले, "केवळ सामर्थ्यच 'शांतता' प्रस्थापित करू शकते."
२
"युद्धस्य कथा रम्य:", एका सैनिकाच्या पत्नीला तिची मैत्रीण म्हणाली.
आणि सैनिकपत्नी शांतपणाने म्हणाली, "हो. तुमच्याकरिता".
३
एक सैनिक त्याच्या पत्नीला पत्र लिहिताना नेहमी पत्राच्या शीर्षस्थानी 'जय हिंद' असे लिहायचा. परंतु मधला सगळा मजकूर तिच्यासाठीच असायचा.
त्याच्या अनेक पत्रानंतर तिने त्याला एक पत्र लिहिले. त्या पत्राचा मजकूर होता.
'मला ठाऊक आहे, मी तुझे हृदय आहे. आणि देश तुझा आत्मा आहे.'
४
एका सैनिकाने एका मुलीला प्रपोज केलं. त्यावर ती म्हणाली, "मला तुझी व्हायला आवडेल. पण तू पहिले कुणाचा होशील?"
तो धीर गंभीर होऊन तिच्याकडे पाहत होता.
तिला उत्तर कळले.
आणि ती म्हणाली, "म्हणूनच मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करते".
५
"सैनिकावर मृत्यू केव्हा ही झडप घालू शकतो, असे असतानाही मुली सैनिकाशी लग्न का करतात?" एका तत्त्वज्ञाने एका सैनिक पत्नीला प्रश्न विचारला.
त्यावर ती सैनिक पत्नी म्हणाली, "आम्ही जिजाबाईच्या लेकी आहोत. शिवाजी आमच्या पोटी जन्माला यावा वाटतो. म्हणून."
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
No comments:
Post a Comment