Sunday, 26 December 2021

चारोळी

 

अशी सहजच पाहू नकोस मला

हृदय धडधडायला लागतं

पण तुला कसं कळणार

त्याला प्रेम असावं लागतं

 -------------------------------------------

  

सुखाची परिभाषा मजपाशी नाही 

परंतू आनंदाची व्याप्ती आहे

म्हणूनच प्रत्येक क्षणांवर माझी

सारखीच भक्ती आहे...

 

©हेमंत पोहनेरकर

९५९५९६९९८९

 

सरस्वती

 

 

मुलगी झाल्यावर 

ती म्हणाली,

" 'कृष्णा' नाव ठेवूया."

 

म्हणालो, " नको.

सरस्वती ठेवू."

 

तिने स्ववाभाविकपणेच

प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

 

आणि मी म्हणालो,

"असं समज,

तुझ्या नि माझ्या मनातील

सुप्त भावना जन्माला आली आहे."

 

©हेमंत पोहनेरकर

९५९५९६९९८९

 


आरती



'देव'
कधीही न समजलेला एक शब्द
मी मनात खोलवर अगदी खोलवर
रुजत गेली आरती

श्रद्धेच्या ठाई देव असतो
परंतु देवावरची श्रद्धा येते कोठून ?

(तसा मी नास्तिक आस्तिक
या शब्दांच्या पलीकडला)

भावनेच्या बंधनात का कधी
श्रद्धा असते ?
परंतु आरती असते ना
जाणिवेच्या शब्दात

ही जाणीवच तर
देवत्व निर्माण करत नाही ना !

प्रकटीकरणाचा नियम वा
साक्षात्काराची अनुभूती,
आदिदैविक किंवा आदिभुतीक
व्यक्ता कडून अव्यक्तकडे
जाणाऱ्या या प्रवासात
पुण्यापेक्षा आनंदच जर
अधिक असेल मिळणार
तर तूर्तास मी देवाला
'थांब' म्हणेन
कारण 'आरती' अधिक आर्त
होत जात आहे...


©हेमंत पोहनेरकर

एकांत

 


तो : माझ्याजवळ बसशील.
ती : नको. कुणी बघेल.
तो : माझं जरा ऐकशील
ती : आता नको. पुन्हा कधी.
तो : ठीक आहे.
       तू जा.
       माझ्या आयुष्याचा गुंता
       असाच वाढू दे.
        माझ्या एकांताला
        पुन्हा रडू दे...

©हेमंत पोहनेरकर

ऋतू

 




फुलेल ! 
माझी कविता ही फुलेल...
'वसंताला'च नव्हे तर
'शिशिरा'लाही तिचं भान असेल...


कधीकाळी 'ग्रीष्मा'ने होरपळले
तर
'शरदा'णे चांदणे शिंपीत करावं...
वा
'वर्षां'ने न्हाऊ घालावं..
अशी तिची अपेक्षा नसेल

कारण...
तिला ठाऊक असेल
तिच्यात सदैव 'हेमंत' नांदतो...


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

तिचं प्रेम



कृष्णे काठून परतत असताना
मी तिला म्हणालो, 
"तुझ्या हाताने
कृष्णाची ओटी भरू"

ती म्हणाली,
"आधी आपल्या नात्याला
नाव तरं देऊ"

म्हणालो, "कसे सांगू तुला मी,
माझे जीवन माझे नाही.
कृष्णेचा प्रवाहा सारखा
मी तर तुला दिसेण,
पण माझं सारं अस्तित्व
सागरात जाऊन विसावेण" 

"वेडा आहेस", ती म्हणाली,
"मी कुठे तुला मागते!
तू फक्त एकदा
प्रेमभराने 'माझी' म्हण
मी कृष्णेची 'सदेह ओटी' भरेण...


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

गझल

मी काय वेगळे म्हणालो...

कृपाळू सावळ्या मजवर भाळू नको रे
ओंजळभर सुखासाठी, का कळवळून म्हणालो .१.

निराळ्या कळा ह्या सोसताना
आभाळाला कोसळरे म्हणालो .२.

हा पावसाळाही आला नि गेला
मृगजळा तू ही हसरे म्हणालो .३.

पळून थकलो आता मनारे
होरपळून जाळ मज वणव्यास म्हणालो .४.

पळभर ही नको ती सळसळ पळसाची
तळमळही संपव काळ पुरूषा म्हणालो .५.

( प्रस्तुत गझलमधे '' हे अक्षर २३ वेळेस आहे )



©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

Monday, 20 December 2021

दुसरी नोकरी/व्यवसाय

 


'दुरून डोंगर साजरे', ही उक्ती आपणांस ठाऊक आहेच. पण तरीही एक मानसिकता असते, दूरवर दिसणारी हिरवळ अधिक सुंदर, मनमोहक आहे. प्रत्यक्षात तिथेही परिस्थिती फारशी वेगळी नसते. पण मन ही अशी गोष्ट आहे की, जी सदैव आशाळभूत असते.

आणि हीच गोष्ट आपण करत असलेली नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत त्याच मानसिकतेची आहे. बहुतांश व्यक्तींना आपण करत असलेली नोकरी किंवा व्यवसायापेक्षा दुसरी नोकरी किंवा दुसरा व्यवसाय हा अधिक खुणावत असतो. त्या दुसऱ्या नोकरी किंवा व्यवसाय मध्ये अधिक नफा आहे, अधिक संधी आहे, असे सातत्याने वाटत असते. आणि ते देखील सुरू असलेली वर्तमान नोकरी किंवा व्यवसाय करत असताना.

वर्तमान परिस्थितीत किंवा अधिक अधिक असलेल्या अपेक्षांचा जगात स्पर्धेत पुढे राहण्यासाठी, अधिक अधिक असलेल्या अपेक्षा, अधिक साधन संपत्ती मिळवण्यासाठी हे सर्व असू शकते. किंवा यापेक्षा वेगळे म्हणजे आपली इच्छाच वर्तमान नोकरी व्यवसाय करण्याची नसून दुसरे काहीतरी करण्याची आहे. अर्थात आपले कदाचित 'स्वप्न' अधिक काहीतरी वेगळे आहे! म्हणून दुसरी नोकरी दुसरा व्यवसायाचा मागे धावणारे अनेक जण असू शकतात, नवे असतीलही.

परंतु या थोडसा विपर्यास आहे. जर आपले स्वप्नच दुसरे काहीतरी आहे तर ते 'पार्ट-टाइम प्रयत्न' करून पूर्ण होईल? अर्थात या धावत्या जगात दुसरी नोकरी/ व्यवसाय करण्यास असा कितीसा वेळ मिळतो? जेणेकरून आपण ते स्वप्न पूर्ण करू शकू.

गरज भागवणे यापेक्षा अधिक काही दुसरी नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून होत नाही. कुण्या एका महापुरुषाने सांगून ठेवले आहे की, आपली आवड अर्थात आपली नोकरी वा व्यवसाय इतका वेडा होऊन केला पाहिजे की, आपल्याला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तीच गोष्ट दिसली पाहिजे. त्याच गोष्टीचे चिंतन केले पाहिजे. आपल्या रंध्रारंध्रात त्याचाच ध्यास असला पाहिजे. आणि असे झाले तरच ती गोष्ट निश्चितच आपल्याला प्राप्त होते. अर्थात आपले स्वप्न आपल्याला पूर्ण करण्याचा हा एक मार्ग सर्वांना ज्ञात आहेच.

आणि ही काही खूप आदर्श कल्पना आहे, असे मुळीच नाही. अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये व्यवसाय करणारे कितीतरी व्यापारी हे प्रगत आहेत. वर्षानुवर्षाच्या अथक प्रयत्नातून त्यांनी त्यात जम बसवलेला असतो. आणि तोच व्यवसाय आहे ते सातत्याने करताना आढळतात. दुसरा व्यवसाय करत नाही. अलीकडच्या काळात फार फार तर असे पाहायला मिळते की, त्यांनी त्यांची 'दुसरी शाखा' इतरत्र सुरू केलेली आहे. अर्थात ते व्यवसायाचे 'एक्सपान्शन' असते.

शिवाय दुसरी नोकरी असा विचार करायचा या ऐवजी, पहिलीच नोकरी पण दुसऱ्या संस्थेत, दुसर्‍या कंपनीत वा दुसऱ्या शहरात असा विचार होत नाही. आणि झालाच तर चाकोरीच्या बाहेर पडण्याचे धाडसही केले जात नाही. आणि जे असे धाडस करतात ते अर्थातच यशस्वी होतात. वा त्यांना अपेक्षित ते मिळते. स्वप्न पूर्ण होते. कारण आताचा काळ पूर्वीप्रमाणे 'आजीवन सभासद' याप्रमाणे एकाच संस्थेची चाकरी करण्याचा निश्चितच नाही.

आणि वर्तमान काळात अजूनन एका मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. आणि ते म्हणजे एखादी नोकरी वा व्यवसायात 'स्कोप' असणे. खरेतर स्कोप पाहून दुसरी नोकरी, दुसरा व्यवसाय करणाऱ्यांना तसे उमगलेच तर पहिली नोकरी/व्यवसाय सोडण्याचे धाडस होत नाही. परंतु सत्य तर हे आहे की, 'स्कोप' वगैरे असे शब्द आजच्या काळात कालबाह्य झाले आहेत. त्याचे कारण म्हणजे 'स्काय इज द लिमिट' ही नवीन संज्ञा रूढ झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात करू तेवढी संधी प्राप्त होणारे दिवस आहेत. म्हणूनच स्वप्नांचा पाठलाग 'हाफ हार्टेडली' होत नसतो.

 फार फार तर या तेवढीच गोष्ट असू शकते की, आपण आपला एखादा छंद हा दुसरी नोकरी व व्यवसाय प्रमाणे जगू शकतो. अर्थात तो आपल्या आनंदाचा भाग आहे म्हणून. कारण त्याकडे आपण उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता निर्भेळ आनंद म्हणून पाहत असतो.

एका प्रकट मुलाखती मध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते श्री अशोक सराफ यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता की, 'तुम्ही अभिनेता नसते तर काय झाले असते?'

त्यावर त्यांचं स्पष्ट उत्तर होतं की, 'काहीच झालो नसतो. मला अभिनेता व्हायचं होतं. आणि मी अभिनेताच झालो.'

अर्थात खुणावणारी 'क्षितीजं' ही अनेक असू शकतात. पण ज्याचा सातत्याने एक व्यक्ती म्हणून आपण पाठलाग करून प्राप्त करू, समाधानाने जगू असे कोणतेही एकच असू शकते. दुसरे नाही...

म्हणूनच दुसरी नोकरी किंवा दुसरा व्यवसाय याचा गांभीर्याने विचार व्हावा...

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 12 December 2021

मराठी साहित्य संमेलन घडले-बिघडले


श्री नरहर कुरुंदकर यांचे एक प्रसिद्ध विधान आहे, 'एखाद्या व्यक्ती विषयी मनात आदर असणे आणि त्या व्यक्तींची मते निदान प्रमुख मते अजिबात मान्य नसणे, या दोन गोष्टी एकत्र संभवतात. हेच आपण विसरून गेलो आहोत.'

या विधानाचा दाखला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देण्याचे कारण असे की, एवढा मोठा समारंभ होणार आहे, असे म्हटल्यानंतर साहित्य संमेलनामध्ये काही न पटणार्‍या गोष्टीची घडणारच. आणि त्या आपण मोठ्या मनाने स्वीकारल्या पाहिजे. परंतु सोबतच ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत त्या दाखवून देणे ही देखील प्रत्येक साहित्यिकाची वाचकाची प्रमुख जबाबदारी असते.

मुळात नाशिक येथील साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात अडकले ते प्रामुख्याने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना डावल्याने. एकीकडे कुसुमाग्रज यांची जन्मभूमी म्हणून प्रत्यक्ष साहित्य संमेलननगरीला 'कुसुमाग्रज नगरी' असे नाव दिले जाते. तर दुसरीकडे प्रत्यक्ष साहित्यसंमेलनाच्या गीतांमध्ये सावरकरांचा उल्लेख देखील नसतो. आणि 'स्वातंत्र्य सूर्य' याचा अर्थ तुम्ही सर्वजण समजून घ्या, अशा पद्धतीने तो विषय मांडला जातो. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष सर्व वाचक वर्ग, नागरीक या विरुद्ध बंड करुन उठला त्या वेळेला मात्र नाईलाजास्तव कुठेतरी सावरकरांचं नाव परत या संमेलनाच्या गीतांमध्ये घेतले. ही खरंच खूप साहित्याच्या दृष्टिकोनातून वाईट अशी बाब आहे. सावरकरांचे हिंदुत्व न आवडणं, न झेपणं, न स्वीकारणं हा भाग एकीकडे ठेवून एक साहित्यिक म्हणून सावरकरांना स्वीकारणं हे खरंतर नाशिककरांच्या आणि तथाकथित राजकारण्यांनी ज्यांनी संमेलनामध्ये अधिक सहभाग घेतला त्यांना स्वतःच्या मनाचा उदारपणा दाखवण्याची ही खरं तर फार मोठी संधी होती. परंतु मुख्य प्रवेशद्वाराला आणि गीतांमध्ये त्यांचं नाव न घेता तो स्वतःचा रेटा पुढे ढकलणे यातच त्यांना धन्यता वाटली.

पण नाईलाजास्तव की काय म्हणून कवी कट्ट्याला स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांचे नाव दिलं. आणि त्यांनी शेवटी एका पद्धतीने सावरकर प्रेमींची बोळवण केली. खरे तर शिकागोची धर्म परिषदेमध्ये स्वतःचे भाषण मांडण्यासाठी विवेकानंदांना जेव्हा पत्राची गरज होती, त्यावेळेस प्राध्यापक राईट यांनी विवेकानंदांना उद्देशून म्हणाले होते की, 'तुम्हाला संमेलनात भाषण करण्यासाठी पत्र देणे म्हणजे प्रत्यक्ष सूर्याला प्रकाशन्यासाठी परवानगी देण्यासारखे आहे.' तसेच सावरकरांचे देखील आहे.

सावरकरां चे नाव प्रवेशद्वाराला असो किंवा त्यांच्या संमेलनाच्या गीतातील त्यांचा उल्लेख असो अथवा नसो यामुळे सावरकरांच्या एकंदरीतच प्रतिमेला, त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीला कुठेही तडा बसत नाही. उलट बहुदा मराठी साहित्यामध्ये सावरकर हे असे व्यक्तिमत्त्व आहे की, ज्यांच्या स्वतःच्या नावाने साहित्य संमेलन होतात. त्यामुळे अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वाला डावलणे म्हणजे खरं तर स्वतःच्या बौद्धिक पातळी चा देखावा मांडण्यासारखे आहे.

तसे पाहता भुजबळांनी आणि पवार साहेबांनी सावरकर यांचा उल्लेख स्वतःच्या भाषणामध्ये केला, ही देखील उल्लेखनीय बाब आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवादच.

दुसरा मुद्दा म्हणजे संमेलनामध्ये अनेक साहित्यिक स्वतःला 'सारस्वत' म्हणून मोठ्या आनंदाने संबोधून घेत होते, एकमेकाला संबोधत होते. परंतु 'वदतो व्याघ्यात' या उक्तीप्रमाणे अगदी संमेलनाच्या सुरुवातीलाच सरस्वतीपूजन नाकारून त्यांनी परत एकदा स्वतःची बौद्धिक पातळी दाखवलेली आहे.

मराठी साहित्य संमेलनामध्ये जावेद अख्तर यांच्या सारख्या थोर गीतकाराला बोलावणे यामध्ये आक्षेपार्ह गोष्ट अशी मला तरी कोणतीही जाणवलेली नाही. त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे, या त्यांच्या विधानाला पुरताच जर विचार केला तर निश्चितच तो राष्ट्रद्रोह आहे. याबद्दल शंका नाही. त्याकरता त्यांनी पाकिस्तान सारख्या देशांमध्ये निश्चितच जाऊन राहू वास्तव्य करायला हवं.

परंतु एक साहित्यिक म्हणून, गीतकार म्हणून त्यांची उंची आणि त्यांचे कौतुकच आहे. त्यांनी संमेलनामध्ये एक अत्यंत सुंदर असा मुद्दा मांडला. आणि तो मुद्दा म्हणजे 'मराठी ही जगातील एकमेव अशी भाषा आहे की, ज्या भाषेमध्ये आठशे वर्षांपूर्वी एक कवयित्री होऊन गेली. आणि तिचे नाव मुक्ताबाई'. पुढे त्यांनी उल्लेख केला की, 'याच कालावधीमध्ये जगभरात साहित्य लिहिल्या जात होते आणि खूप मोठी वैचारिक आणि वैज्ञानिक अशी प्रगती होत होती, त्या वेळेला जगातील महिलांना स्वतःचे साहित्य प्रकाशित करायचे असेल तर ते पुरुषांच्या नावाने करावे लागायचे. अर्थात मराठी भाषा ही किती समृद्ध होती आणि मराठी समाज हा स्त्री-पुरुष या दोघांनाही समान लेखणारा असा होता' असा मराठीचा गौरव जावेद अख्तर यांनी केला, जो कौतुकास्पद आहे. 

संमेलनाध्यक्ष नारळीकरांनी मराठी साहित्यामध्ये वैज्ञानिक साहित्य हे तुलनेने अत्यल्प आहे आणि ती मराठी भाषेची कमतरता, उणीव आहे, असं त्यांनी नमूद केलं. वास्तवाला नाकारता तर निश्चित येणार नाही. पण असं साहित्य का नाही, याचं कारण मात्र त्यांनी सांगितले नाही. किंवा त्यांनी त्या कारणाचा विचारही केला नाही.

सुमारे आठशे-नऊशे वर्ष सातत्याने होणाऱ्या आक्रमणामध्ये भारतीय समाज पूर्णपणे अडकलेला होता. स्वतःचं अस्तित्व टिकवणे हा प्रत्येकाचा एकमेव उद्योग होता. मग या सगळ्या कालावधीमध्ये विज्ञानाची प्रगती कशी होणार? जिथे तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकणार का नाही हे माहीत नाही, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या विज्ञानाचं प्रदर्शन कसं करणार? आणि जिथे प्रदर्शनच होणार नाही तिथे त्याची प्रात्यक्षिक कसे होणार आणि मग तिथे विज्ञान साहित्याच्या माध्यमातून येणार तरी कसं? नारळीकरांची विद्वत्ता प्रचंड आहे. परंतु साहित्यिक म्हणून वैज्ञानिक म्हणून काही गोष्टी लोकांच्या समोर मांडत असताना त्या का नाही झाल्या हे देखील मांडणे ही त्यांची जबाबदारी होती, असे मी अत्यंत आदराने आणि नम्रपणे सांगू इच्छितो.

उर्वरित संमेलनातील सर्वच कवी कट्टा, गझल कट्टा, सर्व संवाद, परिसंवाद देखील चांगल्या पद्धतीने झाले. श्री गिरीश कुबेर यांच्या तोंडावर शाई फेकून त्यांना विरोध करणे ही मात्र खरंच वाईट अशी घटना साहित्य संमेलनात घडली. विरोध साहित्यिक मार्गाने व्हायला हवा होता. असो.

संमेलनामध्ये एक अत्यंत सुंदर असे दालन होते. प्रामुख्याने मराठी भाषेची एक खूप छान प्रकाप्रकारे मांडणी केली गेलेली होती. ज्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी बहुदा आयोजकांनी, महाराष्ट्र सरकारने कोणी ते नेमकं ठाऊक नाही परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता हा उपक्रम केला होता. 

 २००४ पासून चे भारत सरकारने प्रत्येक भाषेला अभिजात दर्जा देऊ केलेला आहे. त्यासाठी मराठी भाषेविषयीची सर्व प्रकारची मांडणी एका पंधरा ते वीस मिनिटांच्या व्हिडीओ क्लिप मध्ये सादर केली होती. ज्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामधील मुद्देसूद मांडणी ही सर्व रसिक, प्रेक्षक, वाचक आणि साहित्यिकां समोर करण्यात आली होती. मराठी भाषेला दोन हजार दोनशे पन्नास वर्षांचा इतिहास आहे, आणि त्यामधील साहित्यिकांचा उल्लेख आहे, ही मांडणी पाहून खूप अभिमान वाटला. आणि अशा प्रकारची मांडणी 'शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे...' या छोट्याशा पंधरा पंधरा वीस मिनिटांच्या नाटकाच्या माध्यमातून आयोजकांनी केली होती. ही खरंच खूप कौतुकास्पद, आनंदाची आणि अभिमानाची अशी बाब आहे.

एकंदरीतच एक लेखक या नात्याने मराठी साहित्य संमेलनामध्ये काय अनुभवलं ते नि:पक्षपातीपणे मांडावं याच उद्देशाने हा लेख प्रपंच.

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Tuesday, 7 December 2021

एकांगीपणा विचार जिंकला... साहित्यिक हरला



हे शीर्षक मिनाज लाटकर यांनी लिहिलेल्या 'नफरत जीत गई कलाकार हार गया' या दै.मराठीच्या रसिक पुरवणीत प्रकाशित झालेल्या लेखाच्या प्रतिक्रियाकरिता दिले आहे.

थेट नेमकेपणाने विषय मांडतो. मुळात हिंदु धर्मावर पाहिजे तेवढे विडंबन करणारे हिंदूच आहेत. हिंदू धर्मात चुकीच्या चालीरीती-परंपरा असतील. त्या नाकारता येणारच नाही. त्याच्यावर भाष्य केलेच पाहिजे. नव्हे ती साहित्यिकांची जबाबदारी आहे.

पण काय मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात अशा वाईट चालीरिती नसतील!

मुनव्वर फारुकी मुस्लिम धर्मातील संत आणि देवतेवर विडंबन करू शकेल का? चित्रकार हुसेन यांनी हिंदू देवतांची नग्न चित्र काढण्याचा भीमपराक्रम केला. काय मुस्लिम देवतेचे नग्न चित्र ते काढू शकेतील का?

मुळात तुमची उदारता एकांगी आहे. जेव्हा जेव्हा हिंदूधर्मातील गोष्टींवर तुम्ही भाष्य कराल तेव्हा तेव्हा इतर धर्मावर ही करत जा.

जावेद अख्तर, आमिर खान, शाहरुख खान, नसरुद्दीन शहा यांना भारतात असुरक्षित वाटत होतं. मग ते सुरक्षित मुस्लीम देशांमध्ये का गेले नाहीत?

म्हणून जावेद अख्तर यांना विरोध हा त्यांच्या संकुचित मानसिकते साठी केलेला आहे.

हिंदू धर्मावर भाष्य करा. पण तुमची अभिव्यक्ती इतर धर्मावर भाष्य करून जिवंत राहते का, ते तरी पाहू या एकदा.

तुम्ही मुस्लिम विक्रेत्यांच्या उल्लेख केला. नुकतेच सोशल मीडियावर अन्नात थुकून ते ग्राहकांना खाऊ घालण्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच. त्यावर आपली प्रतिक्रिया मात्र अजून आलेली नाही!

मुस्लिमांचे कलेतील योगदान कोणीही नाकारू शकत नाही. भारताच्या सांस्कृतिक वाटचालीतील त्यांचे योगदान प्रचंड मोठे आहे. म्हणूनच आजवर केवळ मुस्लिमच नाही तर जगातील प्रत्येक धर्मातील नागरिकांना भारतात अनादी कालापासून आनंदाने नांदवण्यात आलेले आहे. यहुदी, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान हे आता भारताचा अविभाज्य भाग झाले आहेत.

पण म्हणून जहांगीर, अकबर तैमुर, औरंगजेब अशी कलाकारांनी आपल्या मुलांची नाव ठेवणे म्हणजे आक्रमकांचे उदात्तीकरण केल्यासारखं तुम्हाला नाही वाटत का?

गणेश चतुर्थीला उर्दूतील शुभेच्छा मान्य करूया. पण काय तुमच्या मनात कधीतरी ईद मुबारक या ऐवजी ईदच्या हार्दिक शुभेच्छा किंवा शुभ ईद अशा शब्दांचा विचार आला होता का?

तात्पर्य तुमचे विचार केवळ एकांगी आहेत. ज्यांचा तुम्हाला विजय हवा आहे. परंतु त्याने साहित्यिक हरणार आहे, हे निश्चित.

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 5 December 2021

लाशीन मठातील खीर


मराठीत वाक्प्रचारांचं प्रचंड मोठं भांडार आहे. अगदीच दोन-तीन शब्दाने तयार होणारे वाक्प्रचार संपूर्ण विषय अत्यंत समर्पकपणे मांडतात.

समोरील व्यक्तीपर्यंत तो विषय थेट पोहोचतो. पण ही केवळ शब्दांचीच किमया नाही. कारण अनेक वाक्प्रचार हे त्या त्या स्थानिक जीवनमानामुळे देखील तयार होत असतात. एक प्रकारे तत्कालीन जनजीवन, परंपरा, पद्धती यांचा देखील या सर्वातून परिचय होत असतो.

शिवाय अशा जर काही वाक्प्रचारांतून स्थानिक समृद्धी प्रकट होत असेल तर ती गोष्ट सदैव अभिमानाची असते. 

तीच गोष्ट 'लाशीन मठातील खीर' या  वाक्प्रचारा संबंधीची आहे.

आज नेमकेपणाने सांगता येत नाही की नेमक्या किती वर्षांपूर्वी 'लाशीन मठातील खीर' हा वाक्प्रचार जनमाणसांत आला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील एका प्राचीन मठाशी संबंधित हा वाक्प्रचार आहे. तो मठ म्हणजे सिद्धेश्वर मठ किंवा त्याला लाशीन मठ असेही संबोधतात.

स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक मंदिरांमध्ये अन्नछत्रालय चालायचे. त्याच धर्तीवर लाशीन मठात देखील सण-समारंभाच्या दिवशी, सर्व उत्सवांना तसेच दैनिक तत्वावर मठातील देवतेला महादेव 'सिद्धेश्वराला' खिरीचा नैवेद्य असायचा. आणि मग स्वाभाविकच मठात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला किंवा या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला ही प्रसादाची खीर अर्थातच विनामूल्य आणि पोटभर असायची.

स्वाभाविकच प्रत्येक जण तृप्त होऊन जात असणार. संपूर्ण जेवण जेवल्यानंतर तृप्तीचा ढेकर येत असतोच. पण दुधाच्या खीरी मुळे पूर्णान्न मिळाल्याचे समाधान असते. हा अनुभव अज्ञात काळापासून अनेकांनी घेतलेला आहे.

पण काळाच्या ओघात जनमाणसांत मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या लाशीन मठातील खीरीचा दाखला वाक्प्रचारांतून दिला जाऊ लागला.

लाशीन मठातील प्रत्येक भक्ताला, वाटसरूला खीर मोफत होती. म्हणून कोणी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही गोष्ट विनासायास स्वतःच्या उपयोगाकरिता अगदी मोफत मागत असेल अर्थात ती व्यक्ती कुठलेही कष्ट न घेता केवळ मागणी करत असेल तर त्या व्यक्तीला 'ती गोष्ट म्हणजे काय लाशीन मठातील खीर आहे का?' असे उपहासाने विचारले जायचे.

वसमत तालुक्यात हा वाक्प्रचार आजही रूढ आहे. एका बाजूने मागणाऱ्या व्यक्तीला नकळतपणे त्याची कष्ट न करण्याच्या स्वभावाची जाणीव करून देणारा 'लाशीन मठातील खीर' हा वाक्प्रचार अगदी चपखलपणे बसतो. तर सोबतच लाशीन मठाची दानत किती समृद्ध होती याचे देखील दर्शन घडते.

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 28 November 2021

कारण मी मोठा झालो आहे...

 



नोकरीला एव्हाना वीस वर्ष पूर्ण होत आहेत
कामाविषयीकुठलीहीकसलीही काडीची ही तक्रार नाही
नीटनेटकेपणाप्रामाणिकपणासमय पालन या सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर करतो
म्हणूनच मी कोणाचेही ऐकून घेत नाही
अगदीच वेळ पडली तर साहेबांनाही ऐकवतो
कारण मी मोठा झालो आहे...

आई-बाबा आता खूप थकले आहेत
पण तरीही ते दोघंही आज माझंच ऐकतात
त्यांच कामही माझ्याप्रमाणेच पक्क होतं
पण मि सांगितलेल्या गोष्टी त्यांनाही मान्य असतात
माझ्या सल्ल्याशिवाय ते कोणतेही पाऊल उचलत नाही
घरामधे माझाच शब्द अंतिम ठरतो
कारण मी मोठा झालो आहे...

मुलांचा आणि बायकोचा तर प्रश्नच नाही
बायको घरात असते मुलाबाळांची काळजी घेते
पण मी सांगितल्याशिवाय अगदी किरणा सुद्धा आणत नाही
भाजीकपडेविकत घेण्याच्या वस्तू या सगळ्यांची जागा मी ठरवतो
कारण मला अधिक कळतं
मी बाहेरच जग जास्त पाहिले आहे
म्हणून घरात माझाच शब्द चालतो
कारण मी मोठा झालो आहे...

मित्रांशीही भेटणं बऱ्यापैकी होतं प्रत्येकजण वेगळ्या हुद्या वरती आहेत
पण माझा स्तर त्यांच्या पेक्षा काही वेगळाच आहे
म्हणून माझ्याशी चर्चा केल्याशिवाय त्यांची गाडी पुढे सरकत नाही
अगदी बारीकसारीक गोष्ट मी स्पष्ट करून सांगतो
नव्हे तसा माझा हातखंडा आहे
माझ्यासारखं विषय ज्ञान खरंच कुणाचा नाही
कारण मी मोठा झालो आहे...

प्रत्येक नातेवाईकाकडे कार्य प्रसंगाला मी न चुकता जातो 
अगदी वाढदिवस ते लग्नकार्य मी एका एका आमंत्रण मध्येच पूर्ण करतो
म्हणून माझ्या घरी कुणी चुकूनही नाही आलं
तर त्याला झापायला मी कमी करत नाही
कारण माझा मान तर राखला गेलाच पाहिजे
हा माझा अहंकार नसून अभिमान आहे,
हे देखिल मलाच कळतं 
कारण मी मोठा झालो आहे...

परवा मी माझ्या मोठ्या मुलाला धाकट्या बहिणीला झापताना पाहिलं
आणि पहिल्यांदा जाणवलं की,
आता हा पण मोठा होणार...
आता या क्षणाला मी त्याला समजावयचा प्रयत्न केला नाही
माझ्याच कृतीत बदल करायचं ठरवलं
आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागलो
आणि लक्षात आलं की,
छोटं राहण्यातला आनंद खूप मोठा आहे...
हे उमगायला, मला खूप मोठी किंमत मोजावी लागली
पण आजवर मला सहन केलेल्या सगळ्यांची मी माफी मागणार आहे
ते देतील ती शिक्षा भोगणार आहे,
अगदी कर्तृत्वाचा डंका कुठेही न बडवता
आपुलकीचा आणि मायेचा ओलावा छोट्या-छोट्या क्षणात भरणार आहे
कारण मी आता मनाने मोठा झालो आहे...


©हेमंत पोहनेरकर

Sunday, 21 November 2021

पुरस्कारांचे नामकरण

'मृत्यूचा व्यापारी' या शिर्षकाखाली संपादकीय लिहीत असताना, एका फ्रेंच वर्तमानपत्राने वर्णन केले, "माणसांच्या शरीराची चाळण करून त्यांना मृत्युमुखी धाडणारा आता या जगातून कायमचा निघून गेला."

असे स्वतःच्या मृत्यूचे वर्णन वाचण्याचा अत्यंत दूर्दैवी योग आला, ती व्यक्ती होती अल्फ्रेड नोबेल. ज्यांच्या नावे आज जगप्रसिद्ध 'नोबेल पुरस्कार' दिले जातात, ती व्यक्ती. वस्तुस्थितीत 'लुडविग नोबेल' या अल्फ्रेड नोबेल यांच्या भावाचे निधन झाले होते. आणि अशा प्रकारच्या वर्णना मागे कारण होते ते म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांचे 'डायनामाईट' चे संशोधन.

अल्फ्रेड नोबेल यांना 'मृत्यूचा व्यापारी' या संबोधनाचा प्रचंड धक्का बसला. म्हणून त्यांनी आधीच बनवलेले स्वतःचे मृत्यूपत्र बदलले. आणि स्वतःची केवळ माफक संपत्ती संततीच्या नावे करून उर्वरित अमाप संपत्तीच्या व्याजातून येणारी रक्कम जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या आणि तेही मानवजातीचा उद्धार करतील अशा समस्त सशोधकांना देऊ केली.
आज भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यक शास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिले जात असल्याचे आपण पाहतो.

हा पुरस्कार जसा महान आहे. तसेच त्यामागचा कर्ता देखील महान आहे. म्हणून त्याचे नामकरणही महान आहे. एकमेवाद्वितीय असेही अल्फ्रेड नोबेल ने केलेले कार्य आहे.

परंतु आपला भारत देश म्हणून वेगवेगळे दिन, पुरस्कार व योजना आखले जात असतात, तेव्हा त्यांचं नामकरण खरंच एवढ्या खोलवर विचार करून होते का?, हा मूळ प्रश्न आहे.

केवळ दिन, पुरस्कार व योजना हे तर केवळ उदाहरणादाखल दाखल झाले. शाळा, महाविद्यालय, चौक, महामार्ग, नाट्यमंदीर, सामजिक संस्था आदी असे सगळ्यांचेच नामकरण हे केवळ आणि केवळ राजकीय नेत्यांच्याच नावे आजवर झालेली आपण पाहतो.

'प्रेरणा' हा कार्यामागील स्त्रोत म्हणून पहिला तर अशाप्रकारे नामकरण असलेल्या गोष्टींमध्ये प्राण असेल का? गोष्टींमध्ये जिवंतपणा तेंव्हा येतो जेंव्हा त्यां नैसर्गिकपणे निर्माण होत असतात. हीच गोष्ट मग कार्य निर्मितीत ही लागू होते. कार्यरत राहण्याकरिता किंवा कार्याकडे आकर्षित होण्याकरिता त्याची ओढ वाढण्याकरिता ज्या क्षेत्रात आपण जात असतो त्या क्षेत्रातील व्यक्ती सदैव आदर्श म्हणून असेल तर ते कार्य नेहमीच पूर्णत्वास जाते. परंतु भारतात त्याचा विपर्यास पाहायला मिळतो.

नुकताच देशाच्या पहिल्या मा.पंतप्रधानांच्या नावे साजरा होणारा 'बालदिन' होऊन गेला. नेहरूंनी बालांसाठी काय कार्य केले?, मुळात हा प्रश्न असू शकत नाही. बाल कल्याणाकरिता कार्य व्हावे, या संकल्पनेतून प्रत्यक्ष नेहरूंच्या संमतीने हे नाव दिले गेले आहे.
तसेच 'पंतप्रधान आवास योजना',  'पंतप्रधान जनधन योजना' किंवा 'पंतप्रधान कर्मयोगी योजना' हे देखील त्याच श्रेणीतील उदाहरण आहे.

केवळ वानगीदाखल दिन, पुरस्कार व योजना यांचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात अनुभवास येते ते एकच की,  राजकीय व्यक्तींच्याच नावाने नामकरण केले जाते. मग पक्ष कोणताही असो, ती गोष्ट बदलत नाही.

अर्थात मग या सगळ्यावर उपाय काय? खरंतर उपाय तो दिन, तो पुरस्कार आणि ती योजना यातच दडला आहे.


अतिप्राचीन, महान आणि गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या या भारतवर्षात कर्मयोग्यांची प्रचंड मोठी संख्या आहे. म्हणूनच ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या व्यक्तीने महान कार्य केले आहे त्यांची त्या त्या क्षेत्रांना नाव देणे, त्यांच्या नावे नामकरण करणे हा केवळ त्या व्यक्तीचाच नव्हे तर त्या कार्यक्षेत्राच्या ही सन्मान आहे.

'स्वच्छ भारत अभियान' हे वस्तुस्थितीच अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांमधे राबवले गेलेले वास्तववादी आणि अत्यंत गरजेचे असे अभियान आहे. परंतु आपल्या देशाचे दुर्दैव असे आहे की, या अभियानाचे नामकरण करता आलेले नाही. 'संत गाडगेबाबा' यांचे नाव 'स्वच्छ भारत अभियाना'ला सार्थ ठरू शकले असते. या निमित्ताने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून संत गाडगेबाबांचे कार्य सर्व प्रांतात नेता आले असते. परंतु ती गोष्ट करण्याची दृष्टी योजकांमधे नाही.

वस्तूस्थितीत अशी अन्य अन्य क्षेत्रांमध्ये अतुल्य कामगिरी करणारे, या अतुल्य भारतात अगणित आणि अनंत आहेत.  परंतु राजकीय इच्छाशक्ती किंवा दृष्टिकोनाची कमतरता दिसायला लागते. कदाचीत राजकीय स्वार्थ ही असू शकतो.

परंतु असे नामकरण न केल्याने असे जाणवते की, जणू या भारत देशात कर्तृत्ववान, कौशल्यवान, गुणवान, प्रतिभावान व्यक्तींची वाणवा आहे. असे वाटते की, हा देश केवळ राजकारण्यांचाच आहे.

चार वेद, सहा शास्त्र, आठरा पुराण,  बत्तीस विद्या आणि चौसष्ठ कला ज्या भारतवर्षाने जगाला दिल्या, त्या भारताची ओळख आपण येणाऱ्या पिढीसमोर काय म्हणून करणार आहोत?
स्वातंत्र्यानंतरही आपण वेगवेगळ्या क्षेत्रात क्रांतीची परिभाषा करत असतोच, नव्हे तसे कार्यदेखील करत असतो. मग ज्या गोष्टींमुळे ते कार्यक्षेत्र ओळखले जाणार आहे, ज्यामुळे त्या कार्यक्षेत्रामध्ये नवी पिढी आकर्षित होणार आहे, त्या पिढीला आदर्श हा त्या कार्यक्षेत्रातीलच हवा ना. मग तो दिन, तो पुरस्कार आणि ती योजना यांचे नामकरणही त्यानुसारच व्हायला आहे ना...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 14 November 2021

पण तू केवळ रिस्क घे...



संकटांना घाबरू नकोस, आव्हानांसमोर झुकू नकोस

अपयश आले तर येऊ दे, पण तू केवळ रिस्क घे...


नभांना साद दे, सागराला हाक दे

हिमालयाला टाप दे,

क्षितिजही कवेत घेता येतं, या गोष्टीची जाणीव आधी तुझ्या मनाला करून दे...

पण तू केवळ रिस्क घे...


धान्य गोळा करणाऱ्या मुंग्यांना बघ,

भर रस्त्यावर संथगतीने चालणाऱ्या 'पैशा'ला बघ,

जन्मलेल्या पिलांना घरट्यात सोडून उंच भरारी घेणाऱ्या पक्षांना बघ,

देवाने तुझ्यात दिलेल्या आत्मविश्वासाला एकदा हाक दे...

पण तू केवळ रिस्क घे...


वाघ-सिंह प्रसंगी 'सावज' हेरत ही असतील,

परंतु आपल्या सौंदर्यासह बागडताना तू हरिणाला सदैव पाहशील

भित्रा ससा होऊन पृथ्वीच्या पोटात दडून बसू नकोस,

आभाळ कोसळलेच पाठीवर तर कोसळू दे...

पण तू केवळ रिस्क घे...


परिणामांची क्षिती बाळगून युद्ध टाळता येत नसतं,

आपल्या हातातील शस्त्र चालवत शत्रूला मारायचंच असतं,

अमरत्व हे विराचं सर्वोच्च मेडल असतं

म्हणूनच मनावरील भीतीचे वस्त्र फेकून दे...

पण तो केवळ रिस्क घे...


मी तुझी पत्नी म्हणून तुला पदराखाली झाकून नाही घेणार

उलट तुझी अर्धांगिनी म्हणून तुझ्या अपयशाचाही अर्धा वाटा उचलणार

परंतु आत्महत्येचे अस्त्र तू उचलू नकोस

उलट आपल्या मुलांना साहसाचा वारसा दे...

आणि म्हणूनच तू केवळ रिस्क घे....


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 7 November 2021

इनहेरीटंट कॉमन कॅज्युअलनेस


    'जन्मजात गलथानपणा' असा शब्दप्रयोग केला असता तर खचित खूप वाईट वाटले असते. म्हणून छानपैकी इंग्रजाळलेल्या आपल्या बुद्धिमत्तेला कुठलीही इजा पोहोचू नये म्हणून शिर्षक इंग्रजीत लिहिले आहे. खरंतर अशा प्रकारचे लिखाण किंवा आपलीच असलेली सामाजिक वस्तुस्थिती अन्य कुठल्या तरी प्रकारे वर्णन करूया, मांडूया अशा विचारात गेल्या अनेक दिवसात होतो. परंतु गेल्या आठवड्यात सलग एकानंतर एक असे जीव गमवावे लागलेले अपघात पाहिल्यानंतर मन विषण्ण झाले.

    औरंगाबाद आणि पुणे असे दोन्ही शहरात चारपदरी मार्गावरून जाणार्‍या युवतीला व युवकाला चुकीच्या दिशेने (अर्थात ज्याला आपण 'रॉंग साईड' असे शुद्ध मराठीत म्हणतो) येणाऱ्यांनी अक्षरशः चिरडले.

    आपल्या देशातही गंमतच आहे, शुद्धीत असलेले अधिक प्रमाणात जीव गमावतात. अपघातांमध्ये बहुदा त्यांनाच खरी धुंदी चढलेली असते, बेधुंद असतात, खरी शुद्ध हरपलेल्यांपेक्षा. वेगाने वाहन चालवणे, या गोष्टीला क्षणभर जरी बाजूला ठेवले, तरी चुकीच्या दिशेने अत्यंत कमी वेगात येणाऱ्यांना कधीही क्षमा करता येणार नाही. नव्हे एकंदरीत आपली मानसिकता बदलणे अथवा स्वीकारलेल्या तंत्रज्ञाना सोबत प्रगत होणे हे दिवास्वप्न प्रमाणे भासते.


    एकंदरीतच आपण वाहतुकीचे सर्व नियम अगदी सामान्यतः देखील पाळत नाही. एव्हाना आपला संयमाचा कालावधी काही सेकंदाचा देखील राहिलेला नाही.


    असेच एके दिवशी कार्यालयीन कामानिमित्त पुण्यात जाणे झाले. भल्या पहाटे उतरलो. क्याब बुक केली. पण शेअरिंगमध्ये करावी लागली. माझ्या शेजारी एक परदेशी पर्यटक बसला होता. गाडी थोडी पुढे गेली आणि अचानक ब्रेक चालकाने लावला. तर लक्षात येईल की, रस्त्यात मांजर मरून पडले होते. जे अंधारात दिसले नाही. त्यावर तो विदेशी पर्यटक म्हणाला, "ठाऊक आहे तुम्हाला, असे का घडले?" अर्थातच मांजर रस्त्यात मरुन पडलेल्याचे उत्तर शोधायचे झाले तर आपण शास्त्राचा आधार घेणार. आपल्याला अपशकून घडणार होता तो तिच्याच जिवावर बेतला, असेच काहीतरी.  पुढे उत्तरादाखल तो विदेशी पर्यटक स्वतःच म्हणाला, "कारण तुम्ही भारतीय वाहतुकीचे नियम पाळत नाही."


    मी आश्चर्याने केवळ पाहतच राहिलो. थोडासा रागही आला. लगेच उत्तर देऊन अस्मिता, अभिमान दर्शवण्याचा विचार होता. पण मुग गिळून गप्प बसलो. आणि लक्षात आले की, 'अनुकरणाचा आचरणात सिंहाचा वाटा आहे'. जो त्या मांजराच्या जीवावर बेतला होता. अत्यंत सूक्ष्म स्तरांवरचा हा विचार आहे. परंतु समाजात सगळीकडेच पाहिले तर लक्षात येते की, आबालवृद्ध अनुकरणातून बहुतांश प्रमाणात आचरण करत असतात.


    मग कधीही लाल, हिरवा, पिवळा दिवा न पाहता रस्ता ओलांडणारे आपण. आपण रस्ता ओलांडताना येणाऱ्या वाहनांनाच तिकडे दिवा कोणताही लागलेला असो, त्या वाहनांनाच 'थांबा' असा हात दाखवून रस्ता ओलांडतो. तेव्हा परिणाम सर्वांवरच होणार. तसा बहुदा प्राण्यांवरही झालेला असेलच. अर्थात विदेशातही प्राण्यांच्या रस्त्यावरील मृत्यूचे प्रमाण असणार, पण बहुदा अत्यंत नगण्य.


    एकदा असेच परदेशातील एक व्हिडिओ यूट्यूब वर पाहण्यात आला, ज्यात 'एक मांजर काही व्यक्तींच्या मागे दिवे लाल झाल्यानंतर झेब्रा क्रॉसिंग वरून चालत जाते'. अर्थात आपल्याला 'शिस्त' ही नेहमी विदेशी उदाहरणांमधूनच द्यावी लागते, तरच ती आपल्याला पटते.


    खरंतर आपली बेशिस्त किंवा गलथानपणा असा चव्हाट्यावर मांडणे हा उद्देश नसून जाणिव होणे हा आहे. आणि शिवाय असे जीव गमवावा लागणारे अपघात काही केवळ आज घडलेले नाही आहेत. ते अनेक वर्षांपासून असेच घडत आहेत, अशा चुका अनेक वर्षांपासून होत आहे. आणि शिवाय हा गलथानपणा एकंदरीतच सर्वप्रकारच्या सार्वजनिक जीवनांत आपणांस पाहायला मिळतो. वाहतुकीचे गांभीर्य अधिक आहे, कारण येथे थेट जीव गमवावा लागतो, खचित कोणतीही चूक नसताना. तर अन्य सर्व प्रकारांत 'सभ्यते'चा अर्थात 'सार्वजनिक सभ्येते'चा भाग येतो. परंतु विपर्यास इतका भयंकर आहे की, एक भारतीय म्हणून आपण आपल्या वैयक्तिक जीवनात स्वतःसाठी सर्व काही व्यवस्थित करतो, पाळतो. परंतु तोच व्यवहार सार्वजनिक जीवनात आल्यानंतर 'मला काय त्याचे' प्रमाणे वागतो. किंवा आपण सातत्याने काहीतरी मिळवण्याच्या वेगात एकंदरीतच जीवनात धावत असतो. म्हणून जे बाळकडू मिळायला हवे ते हरवले आहे.


'जपानी लोकांच्या वीस उत्कृष्ट गोष्टी' असा युट्युबवर अत्यंत सुंदर व्हिडीओ उपलब्ध आहे. आत्ताच्या या विषयाच्या संदर्भात एक गोष्ट त्यात आहे. जपानी माणसे मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या तीन वर्षात केवळ आणि केवळ 'सभ्यता' शिकवतात. हात धुऊन जेवायला बसणे, आपल्या वस्तू स्वतःहून आपआपल्या जागेवर ठेवणे, थोरामोठ्यांच्या आज्ञेचे पालन करणे इत्यादी. म्हणजे ज्या तीन वर्षात आपण एक भारतीय म्हणून आपल्या पाल्याला एक कारकून किंवा कर्मचारी किंवा फारच झाले तर एक प्रगत इंग्रजी बोलणारा नागरिक बनण्याच्या दिशेने 'नर्सरी'मध्ये पाठवत असतो, त्याच ठिकाणी जपानी लोकांची मुले भविष्यातील समजूतदार आणि जबाबदार नागरिक बनत असतात. 


खरंतर आपल्या जागृत होण्याची आवश्यकता आहे. 'संस्कारां'पासून सुरु झालेल्‍या या प्रवासाला कवटाळून न बसता 'जवाबदार नागरिक' बनण्यापर्यंत नेण्याची खरी आवश्यकता आहे...


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 31 October 2021

चौथी मूलभूत गरज




मनोरंजन.
होय. 'मनोरंजन' ही चौथी मूलभूत गरज आहे. आणि ती देखील अनादिकालापासून. अर्थातच अनादिकालापासून असे असल्यामुळे तिने मानवाच्या विकासाच्या सगळ्या अवस्था पाहिल्या आहेत. या विकासाच्या मार्गात अनेक वर्ष मानवाला तिची अत्यंत गरज होती. अगदी आपल्याला बाल्यावस्थेपासून शिकवलेल्या तीन मूलभूत गरजां इतकीच महत्वाची होती. किंबहुना आहे देखील.

मुळातच मानवाचा विकास, उत्क्रांती पाहत असताना तो जसा भौतिक दृष्ट्या अधिक आधुनिक होत गेला, प्रगत होत गेला हे पाहिले जाते, तसेच सांस्कृतिक, सामाजिक दृष्ट्या देखील त्याची प्रगती पाहिली जाते. परंतु का कुणास ठाऊक, नकळतपणे कदाचित केवळ शासन व्यवस्थेच्या दृष्टिकोनातूनच विचार केला गेला की काय, म्हणून अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, असेच आजवर मानले गेलेले आहे.

परंतु या तीन गरजां शिवाय जसा माणूस जगू शकत नाही. जशा या गरजा शरीराशी संबंधित आहेत. तसेच जी दिसत नाही त्या मनाशी ही मानवाची एक गरज संबंधित असते तीच मनोरंजन...

आजच्या डिजिटल युगात मनोरंजनाची अनंत साधने आहेत म्हणून की काय ती आजच्या काळात आपल्याला मूलभूत गरज बनलेली आहे, असे मुळीच नाही. तर 'रंजन' हीच मानवाची मूलभूत गरज आहे. केवळ 'पोटभरणे' इथपर्यंतच जीवन असते. तर 'मनभरे' पर्यंत काम करणारी माणसेच निर्माण झाली नसती. खचित पोट नाही भरले तरी मन भरलं की, माणूस सुखी होतो. ही अवस्था असते. अर्थात मनाचा विचार संपूर्ण दिवसात कोणत्याही क्षणाला सोडून देता येत नाही.

हल्ली म्हणून मनोरंजनावर अफाट खर्च होतो, खरंतर हा देखील आपला एक गैरसमज आहे. आपल्या प्राचीन इतिहासावर एक दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येईल, आपल्या पूर्वजांची मनोरंजनाची साधने सर्वार्थाने प्रगत होती. म्हणूनच की काय चौसष्ठ कलांचा शोध हा त्यांच्याच काळातील आहे. उलटपक्षी आज आपल्याला कितीजणांना या चौसष्ठ  कला ठावूक आहेत? अर्थातच अत्यंत नगण्य लोकांना. आपल्याला तर त्यांची नावे देखील सांगता येणार नाहीत.

गरज ही शोधाची जननी आहे, या उक्तीप्रमाणे आपल्या पूर्वजांनी मूलभूत गरजां सोबतच मना करीता या चौसष्ठ कलांचा शोध लावलेला आहे, असे लक्षात येते. भजन, किर्तन, प्रवचन, संगीत इत्यादी पासून आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या त्यांच्या प्रवासात चौसष्ठ कलां पर्यंत ते जाऊन पोहोचले.

अर्थातच केवळ उदरनिर्वाहाच्या गरजां इतकेच आपले पूर्वज अडकून राहिले असते तर मात्र 'मनुष्यप्राणी' म्हणून राहिले असते. परंतु त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रसंगी स्वतःची आबाळ करून त्यांनी ती कला जोपासली. अर्थातच त्यांचे जिथे मन रमत होते, ते त्यांनी केले अर्थातच मनोरंजन केले.

मुळात मनोरंजन होत नाही, तिथे मनुष्य राहूच शकत नाही. हल्लीच्या काळात तर मन रमत नाही म्हणून नोकरी व्यवसाय सारं काही खचित वडिलोपार्जित गोष्टी सोडून देखील अन्य गोष्टींकडे गेलेला मनुष्य पाहायला मिळतो. आपल्याला कौतुक वाटते पण ही गोष्ट नवीन नाही, तिचा आधारच 'मन' आहे म्हणून....

अजिंठा, वेरूळ, एलिफंटा अशी कितीतरी लेण्यांमधील कला पाहिल्यानंतर जाणवते, ज्या कलाकारांनी हे महान कार्य केले, त्यांना किती असे मानधन मिळाले असेल? अर्थातच अत्यल्प. किंवा मिळाले असले तरी त्यांचे नाव इतिहासात प्रसिद्ध ही नाही. पण तरीही तीन मूलभूत गरजांचा विचार न करता, चौथ्या गरजेचा अर्थात मनाचा अधिक विचार केला. प्रचंड अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जागतिक  आश्चर्यात गणना करता येईल एवढे महान कार्य त्यांनी केले.

शिवाय पूर्वी राजे-महाराजे त्यांच्या राज्यसभेमध्ये अनेक मंत्र्यांसह भाट देखील असत. अर्थातच एक प्रकारचे भाट  म्हणजे स्तुतिपाठक होते. बहुतांश वेळेला राजाचं मनोरंजन करणे, हेच त्यांचे एकमेव  कार्य असे. आजच्या युगातही महानगरांमध्ये अति श्रीमंतांकडे अशाच प्रकारचे भाट बोलवून कार्यक्रम करण्याची देखील प्रथा आहे. सुट्टीच्या दिवशी हे एक प्रकारचे लाईव्ह मनोरंजनही असते, जे सामान्य माणूसदेखील आता करु लागला आहे.

आणि हो! गरीब ही त्याची मनोरंजनाची साधने शोधतच असतो. केवळ त्यांना आर्थिकतेच्या मापात मोजायला नको. एवढेच. तात्पर्य गरीब असो वा धनिक मनोरंजन हे लागतेच. शिवाय मनुष्य असो वा देव मनोरंजना शिवाय राहू शकत नाही. बघा ना कोणत्याही देवाची प्रतिमा, शस्त्रास्त्रांच्यासह प्रत्येक देवतेच्या हातात कोणते ना कोणते तरी वाद्य आहे....

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 24 October 2021

आत्मविस्मृती

                             


            'अग्निपंख' या आपल्या आत्मचरित्रात डॉ.अब्दुल कलाम यांनी एक प्रसंग वर्णन केलेला आहे. अमेरिकेतील नासाच्या मुख्य सेंटरला ते भेट द्यायला गेलेले असतात त्याच वेळेला वर्जिनीयातील नासाच्या अन्य एका सेंटरला देखील ते भेट द्यायला जातात. आणि त्या सेंटर मध्ये प्रवेश केल्यानंतर स्वागतकक्षाच्या मागे एक युद्धाचे रेखाटलेले चित्र त्यांचे लक्ष वेधून घेते. त्या चित्राकडे थांबून पहाण्याचे कारण म्हणजे त्या चित्रातील युद्धात असलेला क्षेपणास्त्राचा प्रसंग. आणि क्षेपणास्त्र चालवणारे सैनिक 'गोरे' नाही आहेत. 'सावळे' आहेत. पुढे विचारपूस  केल्यानंतर त्यांना कळतं, जगातली ही पहिली युद्धाची घटना होती ज्यात भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध करत असताना क्षेपणास्त्राचा प्रयोग केला होता. टिपू सुलतानच्या एका सेनापतीने असे महान कार्य केले होते. बरे झाले. डॉ.अब्दुल कलाम यांनी हा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केला. नाही तर हाच उल्लेख अन्य एखाद्या भारतीयानी केला असता तर पुराणातली कथा म्हणून त्यास हिणवण्यात आले असते.


औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली ती केवळ युरोपातून. उर्वरित जग आणि विशेष करून भारत तोपर्यंत अज्ञान अंधकारात जगत होता, असेच आपण मानतो.

यावरही अजून एक वेगळा विचार करुन पाहू की, डॉ.अब्दुल कलाम यांनी वर्णन केलेल्या प्रसंगानंतर किती जणांना आनंद झाला असेल? कितीजणांचा ऊर भरून आला असेल? भारतासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची घटना आहे असे किती जणांना वाटले असेल?
याउलट प्रत्येकाला आश्चर्य वाटले असेल हे निश्चितच.

अर्थात आपण आत्मविस्मृत तर आहोतच आणि म्हणूनच आत्माभिमानी नाही आहोत. आणि पर्यायाने स्वदेश, स्वभाषा आणि संस्कृतीचा आपल्याला अभिमान नाही आहे. अगदी ठरवून 'अभिमान' हा शब्दप्रयोग केला 'गर्व' नाही. कारण 'अभिमान' हा माणसाचे अधःपतन होऊ देत नाहीत 'गर्व' तसे करतो, म्हणून.

जगात जी औद्योगिक क्रांती झाली त्याच्या अभिनंदनास ते ते देश पात्र आहेतच. पण त्या काळात आपण गहन अंधकारात होतो, असे समजण्याचे कारण नाही. इंग्रज आल्यानंतरच काय ती भारताची प्रगती झाली, असे गोड गैरसमज असलेले आपण सारे भारतीय आहोत. प्रकांडपंडित आणि इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार श्री शशी थरूर यांनी ब्रिटन युनियनमधे दिलेले साधारण पाच वर्षां पूर्वीचे संसदीय भाषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजले होते. त्या भाषणात त्यांनी वर्णन केले की, इंग्रज येण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था कशी संपन्न आणि परिपूर्ण होती. याऊलट इंग्रज आल्यानंतर भारताचा जीडीपी कसा घसरला.

परत एकदा बरेच आले, हा संदर्भ देखील काँग्रेसच्या नेत्यांनी दिला म्हणून. असे अजूनही अनेक उदाहरणे सांगता येतील की ज्यातून स्पष्ट होयील आपला इतिहास गौरवशाली आणि अभिमानाचा आहे. पण तथाकथित पुरोगाम्यांना 'आमचे अजून ग्रहण सुटले नाही' या आशयाच्याच सार्‍या घटना पाहायच्या असतात.

खरं तर जगाच्या पाठीवर असा कोणताही देश नसेल ज्यातील नागरिक व तथाकथित बुद्धिवादी लोक स्व्तःच्याच देशाला सातत्याने एक तर नाव ठेवतात किंवा इतर देशच काय ते प्रगत आहेत, असे गुणगाण गात असतात.

जगातील प्रगत देशांना स्वतःचा इतिहास मांडत असताना इसवी सनाचा आधार घ्यावा लागतो. इसवी सन पूर्व शंभर वर्ष, पाचशे वर्ष, एक हजार वर्ष अशी उलटी कालगणना करून स्वतःच्या अस्तित्वाचे संदर्भ द्यावे लागतात. त्याच ठिकाणी भारतीय कालगणना युगाब्द ५१२१ पासूनची अस्तित्व दर्शवते.

कोणत्याही शास्त्राच्या कलेचा किंवा विज्ञानाच्या खोलात गेलो तरी भारतीयांचे अस्तित्व दिसेलच. हो! पण आजच्या डिजिटल युगात एक तर ते आपण जगासमोर व्यवस्थितपणे मांडू शकलो नाही आहोत किंवा त्याचे पेटंट देखील मिळवू शकलो नाही आहोत. उदाहरणार्थ कडुनिंब. कडुनिंबा सारख्या गोष्टीचे पेटंट पाश्चात्य देशांकडे जाते, या पेक्षा खेदाची बाब ती कोणती? अर्थात हा देखील आत्मविस्मृतीचाच परिणाम आहे. म्हणूनच 'आत्मवृस्मृती' हा भारतीयांना लागलेला सगळ्यात मोठा अभिशाप आहे.

शिवाय स्वातंत्र्यानंतर आपल्यावर लादल्या गेलेल्या मेकॉलेच्या शिक्षणप्रणालीला देखील दोष देऊन चालणार नाही. कारण जशी आत्मविस्मृती प्रगतीला मारक ठरते तसेच इतरांना दोष देऊनही विकास होऊ शकत नाही.

किंवा विशेषत्वाने अधोरेखित करण्याची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या भारतीय परंपरेत सगळेच काही होते. आणि जगात कोणताही शोध लागला तरी देखील प्राचीन भारतीय ज्ञानाचा संबंध आहे असे दाखवतो असे स्तोम माजवणाऱ्या पासून देखिल सावध होणे गरजेचे आहे. कारण आत्मविस्मृती इतकाच अनावश्यक अभिमानही घातक आहे.

थोडक्यात काय तर आपल्या एकंदरीत आजच्या स्थितीला आपली आत्मविस्मृतीच जबाबदार आहे. याचे कारण जर डॉ.बाबासाहेब आंबेडकरंच्या शब्दांत सांगायचे झाले तर, जसे अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. तसेच 'जाणीव' झालेले अकार्यक्षम लोक अधिक जबाबदार असतात.

म्हणूनच या ठिकाणी जे सुशिक्षित असण्यापेक्षा ही सुजाण आणि सूसंकृत नागरिक आहेत अर्थात आत्मविस्मृत नाही आहेत असे नागरिक, त्यांची जबाबदारी अधिक आहे. आपले जुने सारे विज्ञाननिष्ठ संबंध घेत, त्याचा संदर्भ वर्तमानात लावत उपयोग करता आला पाहिजे. आणि भविष्यातील भारत घडवता येतो याची जाणीव मग आपोआपच येत जाईल. आणि इतरांना आत्मविस्मृतीतून प्रत्यक्ष उदाहरणांमधून बाहेर काढता येईल.


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...