अंदाजे इयत्ता तिसरीच्या सुट्ट्या संपून चौथीच्या वर्गात गेलो होतो. शाळेच्या अगदीच पहिल्या काही दिवसांमध्ये केवळ सुट्ट्यांमध्ये केलेली धम्माल मजा एकमेकांना सांगणे, हा एकमेव उद्योग वर्गात सुरू होता. आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गावी जाणे म्हणजे 'मामाच्या गावा'ला जाणे हेच होते. त्याकाळी देखील 'मामाच्या गावाला जाऊया...' या गाण्याप्रमाणे सगळ्या सुट्ट्या अनुभवून आलेलो आम्ही सगळे होतो.
वर्गातील प्रत्येक जण आपापली गंमत, मस्ती, मजा सगळं काही अगदी आनंदाने सांगत होता. मी देखील या उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेली धम्माल मजा सांगितली.
मी अगदी सबंध बालपणात आठवणीत राहिल एवढा माझा जीव की प्राण तो 'आंबा' रोज सकाळ-संध्याकाळ खाल्ला होता. मला आंबा खूप आवडतो, म्हणून मामा रोज आंबा आणायचे. आमरसला अगदी एकही दिवस खंड पडला नव्हता. शिवाय बहीण-भावासोबत खेळलेलो खेळ याची मजा होतीच. पण स्मरणात राहिले ते मामांनी रोज आणलेले आंबे.
पण तेवढ्यात एक जवळच राहणारा मित्र म्हणाला, "का रे, तू तर मागच्या सुट्ट्यात वेगळ्याच मामाच्या गावी गेला होता. आणि या सुट्ट्यात वेगळ्या?"
त्याला बहुदा माझे नातेवाईक, माझे आजोळ माहीत असावे.
त्यावर मी म्हणालो, "अरे! तसे नाही. या वेळेस मी ज्या मामाच्या गावी गेलो होतो ना, ते माझ्या आत्याकडूनचे माझे मामा आहेत."
त्यावर क्षणार्धात तो मित्र म्हणाला, "म्हणजे तू खोट्यामामांच्या गावी गेला होता."
माझा चेहरा एकदमच पडला. मला दुःख कसे व्यक्त करावे ते कळत नव्हते. जणू त्याने माझ्या सर्व आनंदावर विरजण टाकले होते. मी हा धक्का न पचवून स्तब्ध होऊन उभा होतो. बहुदा त्याला माझी व्यथा कळाली असावी.
म्हणून स्पष्टीकरण देत तो म्हणाला, " अरे! असे बघ, आईच्या भावाला आपण नेहमीच 'अरे-तुरे' करत असतो. पण आत्याच्या नवऱ्याला करतो का? नाही ना! म्हणूनच ते नंतर झालेले मामा असतात. आणि म्हणूनच ते खोटेमामा असतात."
त्याच्या तर्कावर मी काहीही बोलू शकलो नाही. केवळ आठवत होतो, मामांनी केवळ आंबे आणलेले नव्हते. तर ते आणत असताना जीवही त्यामध्ये ओतला होता. आणि शिवाय स्वतःच्या मुलांना जेवढा जीव लावला, प्रेम लावले तितकेच मला देखील दिले होते.
पण माझा आनंद मी माझ्या पोटात ठेवून घेऊन गेलो.
त्यानंतर बालपण ओसरत गेले. तारुण्यात पोहोचलो. आणि नंतर शिक्षण आटोपून नोकरीला देखील लागलो. आणि आता जबाबदारीचे दिवस ही पटापट मागे पडत होते. जवळजवळ नोकरी लागल्यानंतरच्या पाच-सहा वर्षानंतर परत एकदा मामांच्या गावाला जाण्याचा योग आला.
मामांच्या गावाजवळ तालुक्याच्या ठिकाणी काम होते. सोबत ऑफिसची गाडी होती. दिवसभराचे काम आटोपले. आणि आता एकदा मामांना फोन करून त्यांच्या गावी जाऊन येऊ म्हणून त्यांना फोन केला. तर मामा नेमकेच तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांना जाऊन भेटलो. मी मामांच्या पाया पडणार तोच त्यांनी माझी गळाभेट घेतली.
खूप ऊर भरून आला.
मग आम्ही दोघेही गाडीत बसलो, मामांच्या गावी जाण्यासाठी. (होय! मी आजही 'मामांच्या गावी' असेच म्हणतो. आत्याचा उल्लेख तर त्यात आहेच, ती तर हक्काची आहेच, म्हणुन..) मामांनी आत्याला फोन करून कळवले, आम्ही येत आहोत म्हणून.
अंतर अगदीच सतरा-अठरा किलोमीटरचे होते. खूपच कमी. पण त्यात ही पूर्णवेळ मामा बोलत होते. गावात झालेले बदल, नवीन आलेल्या गोष्टी ऐकत अंतर जणू क्षणार्धात निघुन गेले. घर जवळ येताच मामांनी गाडी थांबवली. म्हणाले, "तू पुढे हो. मी आलोच."
मी घरी पोहोचलो. आत्याची भेट घेतली. हात-पाय धुतले. तेवढ्यात मामा आले. तर त्यांच्या हातात आंब्याची पिशवी होती.
ती माझ्या हातात देत म्हणाले, "मला अजूनही लक्षात आहे, तुला आंबा खूप आवडतो. पण आता आमरस तर नाही होऊ शकणार. म्हणून तुला सोबत देत आहे."
आत्याने माझ्यासाठी 'भजी-भाता'चा बेत केला होता. पण जेवत असताना माझे सगळे लक्ष मामांनी आणलेल्या आंब्यांच्या पिशवीकडे होते.
नंतर जेवणे आटोपली. थोडावेळ गप्पा मारल्या. आणि मामांच्या, आत्याच्या पाया पडून निघालो. गाडीत बसलो. आंब्याची पिशवी शेजारी ठेवली. नि त्या बालमित्राची आठवण आली. वाटून गेले, 'कोणत्या तोंडाने मामांना मी 'खोटेमामा' म्हणू किंवा समजून देखील...'
नाही. माझ्या मनात त्या बालमित्र विषयी राग मुळीच नाही आहे. उलट मला त्याची आठवण स्वाभाविकपणे राहीलच. कारण जणू त्याचा तर्क खोटा करण्याकरिता माझ्या जीवनात 'खरेमामा' 'खोटेमामा' बनून आले होते.
काही वर्षांपूर्वी मामा जात राहिले.
एव्हाना मी देखील 'खरामामा'ही झालो आहे. आणि 'खोटामामा' देखील.
पण आता केवळ एकच अपेक्षा आहे, 'माझ्या 'खोट्यामामां'प्रमाणे (बालमित्रांच्या म्हणण्यानुसार) मला 'खरेमामा' होता आले म्हणजे माझ्या मामांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे होईल...'
माहितीस्तव - माझे खरेमामा -
स्व. उदय संतुकराव पांडे, ढाणकीकर
मु.पो.ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
