'कुप्रसिद्धी नावाचा शब्द अस्तित्वात नसतो. असते ती केवळ प्रसिद्धी.' हा नियम लागू होतो तो चित्रपट जगतताला. कारण चित्रपट जगतातील सर्व कलाकार कोणत्याही प्रकारे आपला चित्रपट प्रसिद्ध व्हावा आणि अमाप पैसा त्यातून मिळवा, प्रसिद्धी मिळवी यासाठी प्रयत्न करत असतात. मग कोणत्याही स्तराला जाऊन त्याच्यासाठीचा प्रसार प्रचार ते करत असतात.
परंतु हीच गोष्ट आता राजकारणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लागू होत असताना दिसते. एक काळ होता ज्या काळामध्ये राजकीय पक्ष हे एका ठराविक विचारांसाठी तयार झालेले असायचे. त्यांची तत्व असायची. आणि त्या तत्त्वांना, मूल्यांना धरूनच पुढच्या सर्व निवडणुका आणि त्यांच्या सरकार स्थापन झाल्यानंतर त्या दिशेने ते कार्य करत असायचे.
परंतु गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय पक्ष आणि अन्य काही सामाजिक संघटना यांच्यामध्ये खूप मोठी विचारांची कमतरता पाहायला मिळते. कदाचित त्यांच्याकडे आता विचार शिल्लक नाहीत असेही असू शकते.
तत्त्वांसाठी विरोधाचा एक काळ होता. विरोधासाठी विरोधाचा देखील एक काळ होता. परंतु प्रसिद्धी च्या झोतात राहून सदैव चर्चेत राहण्याचा काळ आला आहे. आणि मग ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी जुने प्रकाराने उकरून काढत महापुरुषांवर चिखलफेक केली जाते.
राहुल गांधी यांना गांधी घराण्याचा प्रचंड मोठा आणि समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. परंतु विरोध करण्याचे कोणतीही मुद्दे शिल्लक राहिलेले नाही म्हणून की काय ते असे मुद्दे उपस्थित करत आहेत की जेणेकरून आपण सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहू. मग त्याकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती त्यांनी पुन्हा पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये चिखलीफेक केलेली आहे. ज्या सावकारांबाबत स्वतः म. गांधींनी सदैव आदर केला आहे, ज्याचा उल्लेख त्यांच्या अनेक पात्रातून आपल्याला पाहायला मिळतो. याच गोष्टीचा खोलवर जाऊन विचार केला तर असे लक्षात येते कि एका अर्थाने राहुल गांधी म. गांधींचे विचार नाकारत आहेत.
इथे केवळ मुद्दा राहुल गांधीं पुरता मर्यादित नाही. तर एकंदरीत अशी मानसिकता होत चालली आहे, हे भयावह आहे.
आणि तीच गोष्ट हिंदू महासभेने म. गांधींच्या बाबतीत केली आहे, असे निदर्शनास येते. केवळ एका घटनेकडे आणि ते ही दूषित दृष्टिकोनातून पाहायचे आणि म. गांधींनी केलेल्या महान कार्याला विसरून केवळ विरोध करायचा आणि तो देखील इतका पराकोटीचा करायचा की जेणेकरून समाजामध्ये त्यांच्या प्रति घृणा निर्माण होईल. अशा वागण्यापर्यंतचे कृत्य हिंदू महासभेने केलेले आहे. जे की अत्यंत निंदनीय असे आहे.
मुळात भारत वर्ष काही गेल्या १०० वर्षात निर्माण झालेले नाही. भारताचा इतिहास राष्ट्र म्हणून आपण जर पाहिला तर तो हजारो वर्षांचा आहे.आणि म्हणूनच भारतवर्षामध्ये अगदी ठराविक राष्ट्रपुरुष आहेत असेही नाही. तर या राष्ट्राच्या उभारणीत अनंत असे संत, महंत, क्रांतिकारक, नेते, राजे यांचे अनेकांचे योगदान आहे. आणि अशा सर्वच राष्ट्रपुरुषांनी त्या त्या काळामध्ये त्या त्या काळाला अनुसरून राष्ट्राच्या उभारणीमध्ये महत्त्वाचे असे योगदान दिलेले आहे. या सगळ्यांनीच घेतलेल्या त्या त्या वेळेसच्या निर्णयाकडे आपण जर तुकड्यांमध्ये पाहायला लागलो, तर केवळ आपण आपल्या संकुचित बुद्धीचेच प्रदर्शन करत असू.
खरे
तर अशा प्रकारची महापुरुषांवरची
चिखलपेक करून आपण आपल्या
येणाऱ्या भावी पिढीसमोर एक
चुकीचे उदाहरण प्रस्थापित करत आहोत. बहुदा
या गोष्टीची जाणीव अशा चिखलफेक
करणाऱ्या कोणत्याही राजकीय नेत्यास नाही एवढेच या
सगळ्यातून दिसते.
खरेतर कोणत्याही व्यक्तीशी जेव्हा आपण नातं जोडतो तेव्हा त्या व्यक्तीला आपण तिच्या सर्व गुण देशदोषांसह स्वीकारत असतो.
जर आपण आपल्या वैयक्तिक जीवनात हा नियम पाळत असू तर सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाचा विचार करत असताना हाच विचार आपण व्यापक स्वरूपात नेत नाही, हेच वास्तव आहे.
असे म्हटले जाते की, प्रत्येक व्यक्तीस मातृऋण पितृऋण आणि ऋषीऋण असते. मात्यापित्यांबद्दलची कृतज्ञता आणि त्यांच्याबद्दलचं ऋण आपण त्यांची सेवा करत पूर्ण करत असतोच. परंतु ऋषीऋण म्हणजे अर्थात समाजाचे ऋण असतं. ज्या समाजामुळे आपण वाढतो, आपण आपलं कार्य करू शकतो, व्यवहार पूर्ण करू शकत असतो त्या समाजाबद्दल देखील आपण काहीतरी करणं अभिप्रेत असतं, अपेक्षित असतं. आणि अशा समाजासाठी जे एक व्यापक स्वरूपाचं काम करतात असे जे समाजपुरुष आणि राष्ट्रपुरुष असतात ते मग समग्र समाजाचा विचार करणारे असतात. म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना तुकड्यांमध्ये पाहता येणार नाही. पण काही समाजकंटकांना या गोष्टीची भान नसते.
अगदी टोकाचा विचार करून सांगायचे झाले तर आपले आई-वडील यांच्याकडे देखील आपण केवळ एक व्यक्ती म्हणून जर पाहायला लागलो तर ते देखील त्यांच्या जीवनामध्ये कधी न कधीतरी चुकले असणारच आहेत, परंतू त्याबद्दल आपण त्यांना कधीही दोषी धरतो का? निश्चितच असे कृत्य जगातील कोणतीही व्यक्ती करणार नाही. मग हाच नियम राष्ट्रपुरुषांना आणि महापुरुषांना लागू होणार नाही का? आपण सर्व अर्थाने प्रत्येक राष्ट्रपुरुषाचे या राष्ट्राच्या उभारणीत योगदान हे परिपूर्ण आहे, असे समजूनच सर्व राष्ट्रपुरुषांना स्वीकारले पाहिजे. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. असं जर केलं तरच आपल्या देशाचं, वर्तमानपिढीचं आणि भावीपिढीचं भविष्य हे उज्वल आहे असे होईल.
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९


.jpeg)


