Sunday, 15 January 2023

अलक



'मी सासूबाईं पेक्षा अधिक भाग्यवान आहे.',

सून सासूबाईंच्या आठवणी सांगताना म्हणाली. 

सगळेजण आश्चर्याने पाहत होते.

ती पुढे म्हणाली,

"त्यांना तर सासूचं नव्हती. परंतु मला सासू असून कधीही सासुरवास भोगावा लागला नाही."

अलक


आई गेल्यानंतरचे बाबा तिला पाहवत नव्हते.

ती बाबांना म्हणाली,

"तुम्ही खूप दुष्ट आहात. मला वाटले, 'माझी पाठवणी करतानाच तुम्ही अधिक रडला असाल.'" 

अलक

 

आईच्या स्मरणार्थ प्रत्येक भावंडानी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग केला.

परंतु त्याला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता.

तो नास्तिक होता.

त्याने उलट केले.

आईला आवडणारी गोष्ट करायची त्याने ठरवली.

नि ती म्हणजे दर गुरुवारची 'पंचपदी'.  

    

अलक


आईचे अंत्यदर्शन घेतांना तिला तिच्या सहा वर्षाच्या मुलीचे शब्द आठवले,

'तुला दोन-दोन आई आहेत.'

नि इतक्या वेळ डोळ्यांत अडकून पडलेल्या अश्रूंना वाट मिळाली.

Sunday, 1 January 2023

साहेब


'एखाद्या लेखकाच्या व्यक्तीत्वाची खरीखुर कल्पना यायला त्याच्या आत्मचरित्रापेक्षा त्याच्या अर्पण पत्रिकाच वाचाव्यात', असे कोणीतरी म्हटले आहे. आणि यावर विशेषत्वाने 'अर्पण पत्रिका' म्हणून एक सुंदर असा लघुनिबंध श्री वि.स.खांडेकर यांनी लिहिलेला आहे. ते पुढे लिहितात की, 'पुस्तक ज्या तन्मयतेने आपण लिहिले त्याच पद्धतीने नवे पुस्तक जेव्हा छापखान्याकडे जाते त्यावेळेला ते कुणाला अर्पण करावे या गोड कल्पनातरंगात लेखक गुंतत राहत असतो.'

याच गोष्टीचा दृष्टांत घेत मला असे वाटते की, आपल्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही खरी तर एखाद्या कादंबरी प्रमाणे असते. तिच्या आयुष्यातील अनेक घटनाक्रम आपण खरे तर मांडू शकतो. परंतु त्यांच्याबद्दलची आपली कृतज्ञता ही सर्वस्वाने एका छोट्याशा लघु निबंधाच्या स्वरूपात का होईना आपण मांडली तर कुठे ना कुठेतरी आपण ती कृतज्ञता व्यक्त करू शकत आहोत, याचे समाधान वाटते.

त्यातही तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने...' अर्थात जे काही कोणाबद्दल वाटते ते किमान वाचन आणि त्यानंतर लिखाणाची आवड असल्यामुळे आपण ते शब्दांच्या रूपातून प्रकट करून त्यांच्यापर्यंत अथवा आपल्या आप्तेष्टांपर्यंत पोहोचू शकतो या गोष्टीचा एक वेगळा आनंद देखील मिळतो. म्हणून हा सगळा लेख प्रपंच.

आणि त्यातही हा लेख 'साहेब' या व्यक्तित्वाविषयी. खरंतर साहेब म्हटलं की एक प्रकारचा रुबाब, ऐट, धाक आणि वर्चस्व गाजवणारी व्यक्ती, असे सातत्याने प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षेत्रातच वाटते. त्यातही 'सूचना' हा कोणालाही न आवडणारा शब्द आणि 'मदत' अर्थात प्रत्येकाला  हवीहवीशी वाटणारी गोष्ट.

परंतु साहेब म्हणाले की, क्वचित याच दोन गोष्टी उलट्यात क्रमाने त्यांच्या सहकाऱ्यांच्या समोर येत असतात. सूचना अधिक असतात मदत कमी असते. किंवा मदत जरी झाली तरी ती सूचनेसह असते. अशा वेळेला ती मदतही नकोशी वाटते. त्यामुळे स्वाभाविकचपणे साहेबांचे सोबत असणं किंवा अशा प्रकारे मदत करणं देखील नकोस वाटतं.

परंतु आताच्या कॉर्पोरेट जगतामध्ये मॅनेजर अर्थात साहेब यांना नवीन शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित झालेला आहे. त्यांना 'पीपल मॅनेजर' असं आता म्हटलं जातं. मला वाटतं खरंतर साहेब या उपाधीच्या पुढे जाऊन 'पीपल मॅनेजर' ही जी संज्ञा आलेली आहे, ती अधिक व्यापक अशी आहे.

आणि आधी म्हणाल्याप्रमाणे सूचना आणि मदत ज्या पूर्वापार पद्धतीने चालत आलेले आहेत, त्या पीपल मॅनेजर या संकल्पनेमध्ये अधिकाधिक मदत आणि अत्यंत नगण्य अशा सूचना अशा पद्धतीचे पीपल मॅनेजर आताच्या कॉर्पोरेट जगताला अपेक्षित आहेत.

आणि याच व्यक्तित्वाची व्यक्ती श्री निरव चंदन, हे मला साहेब या रूपाने माझ्या वर्तमान कंपनीत डेंट्सप्लाय इंडियामध्ये लाभले. ते नुकताच राजीनामा देऊन त्यांच्या पुढच्या व्यावसायिक आयुष्याकरिता पुढील कंपनीमध्ये रुजू होणार आहेत.

त्यांच्यासोबत अनुभवलेल्या काही गोष्टींचा शब्द रूपाने उल्लेख करावासा वाटला, म्हणून हे सगळे अनुभव शब्दांमध्ये मांडतो आहे.

अगदी ग्राउंड लेवल या स्तरावर टेरिटरी मॅनेजर या पदावर काम करत एरिया बिजनेस मॅनेजर अर्थात पीपल मॅनेजर पर्यंतचा माझा प्रवास त्यांच्याच नेतृत्वामध्ये करण्याची संधी मिळाली. या एका प्रमुख कारणामुळे मला त्यांच्यासोबत राहुन 'साहेब' ही संकल्पना माझ्या दृष्टीने खूप व्यापक अशा स्वरूपाने अनुभवायला आली.

खरेतर त्यांच्यापेक्षा वयाने मी खूप लहान. परंतु वयाने लहान असणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांसोबतची त्यांची हाताळणी ही अत्यंत साधेपणाची होती. कुठल्याही पद्धतीचा रुबाब न करता त्यांनी अगदी मित्राप्रमाणे प्रत्येकांसोबत व्यवहार केला.

खरेतर ते डिवाइस इंडस्ट्रीतून आलेले. परंतु या पूर्णपणे नव्या क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये सर्व लागणारे प्रॉडक्ट नॉलेज आत्मसात केले. आणि त्यातही कस्टमर हँडलिंगच्या त्यांच्या ज्या स्टेप्स होत्या त्या अत्यंत प्रभावी अशा पद्धतीच्या होत्या.

कुठलाही विक्रेता आपल्या ग्राहकासमोर थेट ती गोष्ट जाऊन विकण्यासाठी अधिक उत्सुक असतो. परंतु ते विकण्यासाठी त्याकरिता तयार करावे लागणारे वातावरण किती नैसर्गिक पद्धतीने तयार झालं पाहिजे, याच्यासाठी उदाहरण त्यांनी अनेक वेळेला त्यांच्यासोबत काम करत असताना प्रत्यक्षात दृष्टांत म्हणून दाखल केले. त्यामुळे सेल्सचा जॉब किती सुकर होऊ शकतो, हे अनेक वेळेला अनुभवायला आले.

जसे कस्टमर हँडलिंग हा महत्त्वाचा भाग येतो तसेच कंपनीच्या आतील सहकाऱ्यांसोबतची देखील आपली एकंदरीत वागणूक नेमकी कशा पद्धतीने असावी, याचा देखील त्यांनी स्वतःच्या उदाहरणांमधून शिकवून एक प्रकारची शिकवण अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने दिली.

आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे मदत अधिक आणि सूचना नगण्य अशा स्वरूपाची ती शिकवण होती. मी एरिया बिजनेस मॅनेजर झाल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांसोबत काही गोष्टींवर मतभेद देखील झाले. परंतु तो समेट कसा घडवून आणायचा. आणि दोघांचे मनोमिलन कसे करायचे, हे अत्यंत सुंदर, साध्या आणि प्रगल्भतेने त्यांनी मला समजून सांगितले. माझ्या दृष्टीने ही गोष्ट खूप खूप मोलाची अशी होती.

साहेब म्हणून अशा ठिकाणी समज देणे, समजावून सांगणे खरे तर अत्यंत सोपे आणि कुणालाही सहज जमणारे अशी गोष्ट. परंतु सहकाऱ्यांसोबत काम करताना स्वतःच्या उदाहरणांमध्ये त्या गोष्टी प्रस्थापित करणे, यासाठी मनाची तयारी आणि प्रगल्भतेची उंची असावीच लागते. ती निरवसरांच्या प्रत्येक वेळी वागण्यातून अनुभवायला आली.

शिवाय आपल्या कंपनीतील आपला सहकारी आहे म्हणजे त्यावर डोळे झाकून विश्वास टाकलाच पाहिजे, हा त्यांचा गुण देखील खूप उल्लेखनीय आहे. सोबतच आपल्या सहकाऱ्यांच्या कल्पना, विचारांना संधी देणे आणि त्यांच्यासोबत त्यांनी ठरवलेल्या योजनेप्रमाणे काम करणे आणि मी तुझ्यासोबत आहे, हा एक प्रकारचा धीर देणे, ही जी शिकवण आहे ती माझ्या एरिया बिजनेस मॅनेजर म्हणून अत्यंत कमी अशा कालावधीच्या व्यावसायिक जीवनात मिळाली.

काही प्रसंगांमध्ये ते मला रागवले देखील, त्यांचे बोलणे त्या क्षणापर्यंत मनाला लागणारे असे होते. परंतु आगीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय आपण घडणार नाही, हे मात्र मला अशा प्रसंगांमध्ये त्या त्या वेळेला कळाले . आणि म्हणून माझा पुढचा प्रवास देखील सोपा होत गेला.

निरव सरांच्या विषयी उल्लेख करण्यासारखी अजून एक अशी गोष्ट. ती म्हणजे त्यांचे भाषा प्रभुत्व. मातृभाषा म्हणून गुजराती मध्ये तर ते अत्यंत अस्सलखितपणे बोलायचेच. परंतु सोबत मराठी, हिंदी आणि इंग्रजीवरही त्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभुत्व आहे. अस्सलखित इंग्रजी बोलणारे अनेकजण आपण पाहतोच. परंतु माझ्या दृष्टीने इंग्रजी अत्यंत उत्कृष्ट बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये निरोवसर अधिक मोडतात. त्याचे कारण असे की, इंग्रजी बोलत असताना केवळ नवीन शब्दांचाच प्रयोग नाही तर त्यांच्या बोलण्यामध्ये वाक्प्रचार आणि म्हणी हे ते सहजतेने वापरायचे.

मी खरोखरच स्वतःच भाग्यवान समजतो की माझ्या वीस वर्षाच्या व्यावसायिक जीवनामध्ये मला प्रत्येक वेळेस ज्या साहेब म्हणून व्यक्ती मिळाल्या त्या निरवसरांप्रमाणेच समजून घेणाऱ्या मदत करणाऱ्या आणि घडवणाऱ्या अशा होत्या. 

श्री अभिजीत कुलकर्णी, श्री उदय डोणगावकर, श्री सुभाष शहा, श्री मनीष मुक्कावार, श्री सत्येन पाध्ये आणि आता श्री निरव चंदन. या सर्वांचेच योगदान खूप खूप मोठ्या प्रकारचे आहे.  या सर्वांच्याच मी सदैव ऋणात राहू इच्छितो. निरव चंदनसरांच्या पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा.


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...