Saturday, 15 February 2020

सासुरवाशीन




'स्वीकारणे' हा अमूल्य असा दागिना अंगावर परिधान करुन, ती माप ओलांडून माझ्या घरात आली. अर्थात माझी सौभाग्यवती, बायको. बाबांच्या घरचे सगळे मोहपाश तिने मागे टाकले. आणि घरातील प्रत्येक गोष्ट सहजपणे स्वीकारली, अगदी उणीवांसह.
लग्नापूर्वी बोलत असताना कितीतरी वेळा तिच्या तोंडून ऐकायला मिळालं होतं,  'माझ्या बाबांच्या घरी असं आहे, तसं आहे'. अगदी तिच्या सगळ्या नातेवाईकनातेवाईकांविषयी देखील ती भरभरून बोलायची. तिच्या माहेरच्या गोष्टींविषयी 'माझं', 'माझे' या शब्दांचा उल्लेख मी कितीतरी वेळा ऐकाला. आणि विशेष करून 'माझे बाबा' तिच्या रोजच्या बोलण्यात एक अनिवार्य भाग.

त्याच मुलीच्या लग्नाच्या काही दिवसांतच तिच्या माहेरी पहिल्यांदा तिच्या सोबत गेल्यानंतर, तिच्या बोलण्यात एक वाक्य आलं. ज्याने मला आश्चर्य कमी आणि धक्का अधिक बसला.
बोलता, बोलता तिच्या बाबांना ती म्हणाली, 'तुमच्या घरी असं आहे'.
मी केवळ तिच्याकडे पाहतच राहिलो. 'माझे बाबा', 'माझं घर', असे म्हणणाऱ्या मुलीने लग्न होऊन सासरी आल्यानंतर अगदी सहजपणे स्वीकारली आणि त्यानूसार जगयलही लागली. किती सहजपणे ती सासरशी 'संलग्नीत' झाली. जिथे जीवनातील वीस-पंचवीस वर्षे घालवली, त्यांना क्षणार्धात 'तुमचं घर' असं संबोधलं. आणि सासुरवाशिन झाली. या सासुरवाशिनीचा अभिमान वाटला, तो हा पहिला प्रसंग होता.

पण नंतर नंतर तिने अक्षरशः माझ्या घरावर ताबा मिळवला. आता 'माझे घर' केवळ नावापुरतेच राहिले. माझे आई-बाबा तिचे आई-बाबा झाले. माझे नातेवाईक तिचे नातेवाईक झाले. माझी प्रत्येक गोष्ट तिची झाली. ती सहजपणे म्हणायला लागली, 'आपले आई-बाबा'. पण मी प्रयत्न करूनही तिच्या आई-बाबांचा उल्लेख कायमच 'तुझी आई', 'तुझे बाबा' असाच केला. तिच्या इतक्या सहजपणे स्वीकारायला मला जमलेच नाही.

जसजसा अनुभव येत होता, तसे तसे घरातील तिचे महत्त्व वाढत जात होते. माझ्या कौतुकाला अक्षरशः ओहटी लागली होती. आई घरातील प्रत्येक गोष्ट तिला विचारून करायला लागली. लग्नकार्य असो, अन्य कोणताही छोटासा कार्यक्रम असो, मला विचारणारी आई सगळं काही तिला विचारायला, सांगायला लागली. अगदीच 'सुनबाई' वगैरे म्हणणं नाही. पण नावानेच का होईना, कायम तिचेच नाव घ्यायला लागली. खुप प्रेमाने मी तिचे नाव लग्नात बदलले होते. तर त्यावरही सगळ्यांनीच अधिकार गाजवला. मी आपला वरवरच्या कामा पुरता राहिलो. मला घरातील गोष्टी कळायला लागल्या, त्या ठरल्यानंतर. साधी सत्यनारायणाची पूजा करायची आहे, हे प्रथम मला कळले, ते पूजेसाठी आणायच्या सामानाची यादी हातात आल्यानंतर.

हे प्रकरण इतकं हाताबाहेर गेलं की,  नातेवाईकांमध्येही तिचेच नाव ऐकू यायला लागले. पूर्वी नातेवाईकांकडे एकटा जायचो, प्रसंगी आई-बाबांनाही सोबत असायचे, सगळे कसे अगदी छान माझ्याशी गप्पा मारायचे, माझी चौकशी करायचे. पण बायको आल्यापासून नातेवाईकांकडे गेलो तर, केवळ तिच्याशीच गप्पा. तिचीच चौकशी. आणि ती सोबत नसेल तरीही तिच्याच विषयी विचारणार. बायकोने माझ्यावर जादू केली इथपर्यंत ठाऊक होते. पण सगळ्या नातेवाईकांना होईल, याची मुळीच कल्पना नव्हती.
'आपलेपणा' आणि 'अलिप्तपणा' इतक्या सहजपणे सोबत घेऊन ती आली होती की, मी प्रयत्न करूनही तसे वागू शकत नव्हतो. एकदा तिच्या बाबांच्या विषयी काही सुचवण्याचा, निर्णयाचा विषय निघाला. त्यावर ती ठामपणे तिच्या बाबांना म्हणाली, 'तुमचा निर्णय. तुम्ही घ्या. आता माझ्यापेक्षा दादाचा तुमच्या अधिक अधिकार आहे'.

'सासुरवाशीन' झालेली मुलगी कशी असते, हे मी अनुभवत होतो. आणि समृद्ध होत होतो. आणि कदाचित तिने मला दिलेल्या या नव्या अनुभवामूळे की काय मी केवळ आनंदीच झालो नाही तर व्यापक ही झालो. याच विचारांनी मी आजूबाजूला पाहायला लागलो. तर लक्षात आले की, सगळ्याच सासुरवाशीन अशाच असतात. ताई, आई, काकू, मावशी, आत्या, आजी अगदी कुणीही असो सगळ्या एकाच जातकुळीच्या.

जीवनात पहिल्यांदा वाटले की, पोटच्या पोरां व्यतिरिक्त अभिमान वाटावा आणि मनमोकळेपणाने कौतुक करावं अशी परक्याची एकच मुलगी असते. आणि ती म्हणजे बायको. अन्यथा इतरांच्या मुलांची स्तुती आणि प्रगती मनुष्य सहजपणे पाहू शकत नाही, करू शकत नाही. पण 'सासुरवाशीन' वेगळी असते.
आणि कदाचित पूर्वजन्माचे पुण्य आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद म्हणून की काय,  जगातील त्या सगळ्या भाग्यवंतांपैकी मी ही एक झालो, ज्याच्या पोटी देवाने मुलगी दिली.

आजही तो प्रसंग आठवतो. दवाखान्यात होतो. डिलिव्हरीचा दिवस होता. डॉक्टरांनी आवाज दिला. बोलावून सांगितले 'मुलगी झाली' आहे. पेढे आधीच आणून ठेवले होते. आई बाबांना पेढे दिले.  पाया पडलो. आणि वेड्यासारखा व्हरांड्यातील सगळ्यांना पेढे वाटायला लागलो.  आनंदाने सांगत होतो, 'मुलगी झाली आहे', 'मुलगी झाली आहे'. पेढे वाटता वाटता एका आजोबांनी कदाचीत खात्री करण्याच्या उद्देशाने की काय परत विचारले 'मुलगा झाला वाटते'.
अगदी नि:शब्द होऊन उभा राहिलो. आणि मनातल्या वाटून गेले, 'कुणाचेतरी घर संपन्न आणि समृद्ध करण्यासाठी माझ्यापोटी 'सासुरवाशीन' आली आहे...'

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९


Sunday, 2 February 2020

कर्तव्य आणि निवृत्ती

सचोटी, प्रामाणिकपणा, अपरिमीत कष्ट, मनमेळाऊपणा, साधेपणा आणि अगदी कोणत्याही क्षणी कशाचाही विचार न करता मदतीला धावून जाणे, अशी कितीतरी स्वभाववैशिष्ट्ये त्याच्या बाबांची सांगता येतील. याचा अनुभव त्यांच्या सहकाऱ्यांनी, वरिष्ठांनी, मित्र, नातेवाईक अशा सगळ्यांनीच अनुभवलेला. एकार्थाने  कर्तव्यदक्ष असे व्यक्तिमत्त्व म्हणजे त्याचे बाबा.

जे आज निवृत्त होत होते. अपार कष्ट करून छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करायचे काम, त्याच्या बाबांनी केले होते. त्यांच्या संस्थेचा नावलौकिक पंचक्रोशीत पोहोचलेला होता. पण ठरलेल्या नियमानुसार, वयोमानानुसार सगळ्यांप्रमाणेच त्याचे बाबा देखील आज निवृत्त होत होते.

निवृत्तीच्या निरोप समारंभात सगळेच भाऊक झाले होते. त्याच्या बाबांनीही एवढे सगळे कर्तृत्व असताना श्रेय सहकाऱ्यांना द्यायला ते विसरले नाहीत. आणि सर्वां विषयीची कृतज्ञता देखील त्यांनी व्यक्त केली.

पूढे अध्यक्षीय समारोपात त्यांच्या नवीन सहकाऱ्यांनी एक विधान केले ज्याचा ठाव उपस्थितांच्या काळजाने घेतला. ते म्हणाले, "आपण साक्षीदार आहोत या क्षणाचे की, प्रत्यक्ष 'कर्तव्य' निवृत्त होत असताना आपण पाहत आहोत."

अर्थात संस्थाचालक एका अर्थाने त्या संस्थेचा पालक असतो. आणि म्हणूणच वडिल कार्याने निवृत्त जरी झाले तरी कर्तव्याने कधीही होत नसतात. पण संस्था म्हणून असे होत होते हे मात्र निश्चित.

आणि या गोष्टीने त्यांच्या मनात घर केले. वरकरणी पूर्वीचा माणसांचा राबता आता घरात असणार नव्हता. आता पूर्ण दिवस अगदी निवांत असणार होता. आणि अशा दिवसांना सुरुवात देखील झाली. पण अविरत काम करत असलेल्या त्याच्या बाबांचा आता दिवस जाईनासा झाला. म्हणून त्यांनी विरंगुळा म्हणून अन्य सामाजिक, धार्मिक, सेवाभावी, पेन्शनर्स  असोशियन अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेळ घालायला सुरुवात केली. पण त्यासोबतच प्रकृतीच्या ही अडचणी होत्याच. मधुमेह, रक्तदाब, गुडघेदुखी यामुळे येणारी पथ्ये आजपर्यंत कधीही पाळली नव्हती. पण 'आता आपल्यामुळे मुलांना त्रास नको', अशा भावना त्यांच्या मनात घर केले.

थोडेसे दिवस बदलत गेले. तो कामावरून घरी यायचा. तेव्हा स्वभाविक बाबा घरी असायचे, आजवर तो बाबांसाठी सोबत जेवायला थांबलेला असायचा,  आता बाबा त्याच्यासाठी थांबत होते. मग ताटांवर बसल्यानंतर खूप प्रयत्नपूर्वक बाबा सांगायचे की, 'आज कुठे कुठे गेलो होतो. आजचा दिवस कसा घालवला. आणि अगदी पूर्वीप्रमाणेच काहीही जबाबदारी नसतानादेखील व्यस्तता आहे', असं सांगायचा प्रयत्न करायचे.

परंतु दोघांनाही कळायचे, ही वरवरची मांडणी आहे म्हणून. पण समोर आलेल्या प्रसंगापूरती स्तुती करून तोही निघून जायचा.

कितीही नाही म्हटलं तरी निवृत्तीनंतर त्यांच्यावर खूप बंधने आली होती. हळूहळू  त्यांची कासावीस वाढत जात होती. खूप वाढत जाणारी ही तळमळ पाहून एके दिवशी जेवणे आटोपल्यानंतर तो बाबांना म्हणाला, "चला, आपण लॉन्गड्राईव्हला जाऊ या. आणि तुमच्या आवडीचे आइस्क्रीम खाऊया".

तो आपल्याला काही बोलणार आहे. हे त्याच्या बाबांना एव्हाना कळून चुकले. कारण अशा प्रसंगाचा अनुभव त्यांनी स्वतः त्याला दिला होता. त्याच्या दहावीनंतर तो मोठ्या शहरात पुढील शिक्षणासाठी गेला होता. पण रोज एव्हढया माणसांमध्ये वावरणारा तो, त्याला अगदी एका खोलीत आणि परक्या गावात रहाणे अशक्य झाले होते. अगदी खूप रडून रडून तो परत आला होता. तेव्हा त्याच्या बाबांनी त्याला गाडीवर बसवून असेच दुरू त्याच्या आवडीची आईस्क्रीम खायला नेले होते. आईसक्रिम खात असताना बाबा त्याला जे म्हणाले होते त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. उत्तरोत्तर अधिक पुढच्या शिक्षणासाठी अधिक मोठ्या शहरात गेला. व अधिक अधिक प्रगती केली. त्याचे बाबा त्याला म्हणाले होते, "तुला करमत नसेल तर तू निर्धास्तपणे परत ये. आपल्या गावातही चांगले शिक्षण आहेच. पण निर्णय विचार करून घे. आणि एवढे नक्की समज की, तू घेतलेला निर्णय मग तो कोणताही असो तुझा निर्णय तो माझा निर्णय असेल. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या पाठीशी असेण".

कोण उत्साह, विश्वास आणि धैर्य त्याच्यात आले होते. या विश्वासपूर्ण वक्तव्यानंतर त्यांनी सातत्याने प्रगती केली होती. आणि आता तो मोठा झालेला होता. निवृत्त झालेल्या बाबांना सोबत घेऊन जात होता.

त्याने एका हातात आईस्क्रीम बाबांना दिले आणि त्यांचा दुसरा हात स्वतःच्या हातात घेतला. कितीतरी वर्षानंतर त्याने बाबांना स्पर्श केला होता. टचकन दोघांचेही डोळ्यात पाणी आले. तो पुढे म्हणाला, "मला ठाऊक आहे, तुम्हाला कोणता प्रसंग आठवला असेल. आणि मी ही अगदी तसेच सांगणार आहे. तुम्ही आजपासून कोणतीही बंधने पाळायची नाहीत. अगदी प्रकृतीची देखील. तुम्हाला पाहिजे तिथे, पाहिजे तेव्हा, पाहिजे ते करा. पाहिजे तिथे जा. शांत बसलेले बाबा मी पाहू शकत नाही. कारण तुम्ही माझ्यातील उत्साह आणि चैतन्य आहात. आणि हो माझा या गोष्टीवर मुळीच विश्वास नाही की, 'कर्तव्य निवृत्त झाले आहे' ".

ओघळणारे अश्रु बाबांनी पुसले. आता त्यांनी त्याचा हात हातात घेतला आणि उत्तरादाखल म्हणाले, "हो खरे आहे. कर्तव्य कधीही निवृत्त होत नसतं. झालेच तर ते केवळ हस्तांतरित होतं. जसे या क्षणाला मी माझे कर्तव्य तुझात अनुभवत आहे".


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...