Sunday, 24 March 2019

मदरवर्ड्स



अप्रतिम, सुंदर, छानच, लय भारी ही आणि अशी कितीतरी विशेषणं आपण एखादी कलाकृती पाहिली, अनुभवली की उस्फूर्तपणे उच्चारतो. अर्थात ही संगीत मैफिल असू शकते, शास्त्रीय गायन-वादन बैठक असू शकते, एखादी साहित्यकृती असू शकते, एखादं चित्र असू शकतं वा एखादी शिल्पकला असू शकते. तसे पाहता आपल्याकडे चौसष्ट कला आहेत, यापैकी कुठलीही कलाकृती असू शकते.

आणि कलाकारांनी त्याच्या सादरीकरणात ती हरकत घेतली, ती जागा घेतली की, रसिकांच्या मनाला स्पर्शून जाते. ही जागा खरंतर आनंदाची जागा असते. कारण अनुभूतीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा तो एक महत्वाचा ठहराव असतो. जिथे उत्साह सर्वोच्च असतो. आणि ही जागा प्रत्येक कलाकृतीत असते. फक्त ती रसिकांपर्यंत पोहोचली की प्रतिक्रिया येते अप्रतिम’. आणि आधी म्हटल्याप्रमाणे अर्थातच ती उत्स्फूर्त असते. ती कलाकाराच्या लेला मनातून दिलेली दाद असते.

त्याक्षणी इतर काही सूचन अपेक्षित नसतंच मूळी. नव्हे तेवढा वर्णनाचा कालावधीही नसतो.

परंतु हा वर्णनाचा कालावधी नंतर केव्हातरी हवा आहे. कारण सुंदर, अप्रतिम इत्यादी प्रतिक्रिया दाखल म्हटलेल्या विशेषणांना मदरवर्ड्स असं म्हटलं जातं. अर्थात आई बाळाला जे अगदी प्राथमिक बोलणे शिकवते ते. म्हणूनच अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून हे खूप वरवरचे असतात. आपण कलेच्या सादरीकरणाची किंवा गृहणाची चर्चा करीत आहोत. त्यामुळे कलाकार कला सादर करून व्यक्त होऊन जातो. आता वेळ असते रसिक श्रोताच्या, रसिक  प्रेक्षकाच्या, रसिक वाचकाच्या अभिव्यक्तीची.

ही अभिव्यक्ती रंगमंचासमोरील बैठकीत लगेच होऊ शकणार नाही. परंतु खागी बैठकीत, एकांतात, विशेष करून मित्रांसमोर नक्कीच होऊ शकते. नव्हे ती होतही असते. परंतू या साऱ्या प्रकारात कलाकाराची स्तुती मुळीच अपेक्षित नाही. आणि केवळ तेच होत असेल तर मूळ विषयाला तडा गेल्यासारखा होईल.

तर मुळात ती कला मनाला भिडलेली असते. कलाकाराने कुंचल्यातून चित्रित केलेला भाव खरंतर रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटलेला असतो. आता ती कलाकृती कलाकाराची नसते, ती रसिकाची होऊन जाते. या हृदयीचे त्या हृदयी, असे काहीसे झालेले असते. त्यामुळे आपल्या मनाला भावलेल्या गोष्टीची अभिव्यक्ती होणे अपेक्षित आहे.

खरंतर व्यक्त होणे अपेक्षित आहे, असं म्हटलं तरी चाललं असतं. व्यक्त व्हावसं वाटणं स्वाभाविक असतं. आणि व्यक्त होण्याने हलकेही वाटत असते. परंतु कलेच्या या दालनात व्यक्त या शब्दा पूर्वी अभि हा उपसर्ग लावला जातो. ज्याचे स्वतःचे वेगळे स्थान आहे. अभिम्हणजे प्रकटीकरण किंवा पुढे जाणे अर्थात व्यक्त होण्याचाही पुढे जाणे कदाचित आत्मप्रकटीकरण. अर्थात अनेक अंशाने भावलेल्या कलेच्या माध्यमातून स्वतःची अभिव्यक्ती स्वतः अभिव्यक्त होणं.

मग ही अभिव्यक्ती एक दोन विशेषणांमधून नक्कीच करता येणार नाही ना! नाही. निबंध लिहिणे 
हे अपेक्षित नाही. भाषण देणे हे तर नाहीच नाही. किंवा अशा क्षणांकरिता आपल्याजवळ काही विशेष शब्द असणे यांचीही आवश्यकता नाही. केवळ मोकळे होणे अभिप्रेत आहे. (बघा अभि उपसर्ग किती उच्च स्थान प्राप्त करून देतो. प्रेत शब्दापुढे लागला की जीवंत झाल्या सारखं वाटतं).

म्हणूनच की काय, कलाकार कलेची साधना करतात, उपासना करतात. आणि रसिक त्या कलेच्या साधनेतून साकार होणारं रूप पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी जमतात.
आणि म्हणूनच की काय, एक मैफिल रंगमंचावर जशी सुरू असते. तशीच दुसरी मैफिल रंगमंचाच्या समोर रसिकांच्या मनात ही रंगत असते. ही मैफील सादर केलेल्या कलेला सामावून घेण्याची मैफिल असते आणि बऱ्याच वेळेला या मैफिली नंतर ही मैफील भरते. त्या बैठकीत मग कुठलीही विशेषणं सतात. असते ती केवळ अभिव्यक्ती.

या क्षणाला एक गोष्ट विशेषत्वाने सांगावीशी वाटते, ज्या क्षणांना ही अभिव्यक्ती सुरू होते त्या क्षणी रसिकाची साधना पूर्ण होते.

कारण आता तो कलाकारही मागे पडलेला असतो. मुळात तो कलाकार काय किंवा ती कला काय दोघेही अभिजात असतात. कलेचं सर्वोत्तम सादरीकरण हे कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं असतं. कदाचित त्यांना उपमा देता येईल पुजाऱ्याची आणि देवाची. जसे मंदिरातील पुजारी देवाची मनोभावे पूजा करून सारी वस्त्र, उपवस्त्र, हा, फुलं, नैवेद्य, आरती इत्यादी देवाला अर्पण करून देतो. आणि त्यानंतर आलेल्या भक्तांना मात्र त्याचा आनंद मिळतो, त्याचा लाभ मिळतो.

म्हणूनच मनात घर करून राहते ती केवळ कला असते. हा क्षण अभिमंत्रित करणारा असतो (पुन्हा अभि’). हा क्षण जगणे अनुभवी अधिक महत्त्वाचे असते.

आणि असे जर झाले तर कलेच्या उपासनेत मदरवर्ड्सपासून अभिव्यक्ती पर्यंतचा प्रवास पूर्ण झाला म्हणजे कलेचा एक चक्र पूर्ण झाल्यासारखं होईल. एवढेच.

©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 17 March 2019

दहापट


एका मित्राच्या घरी नुकतेच लग्न पार पडले होते. लग्नात खर्च खूप झाला होता. परंतु परिस्थिती बेताचीच होती. त्याच्याशी सहज गप्पा झाल्या नंतर लक्षात आले की, सगळ्या कुटुंबाचा मिळून मासिक पगार वीस हजार आणि लग्नातील खर्च मात्र पाच लाखांपेक्षा अधिक झाला होता.
हा एक प्रसंग.
आणि आता दुसरा प्रसंग.
अशाच एका मित्राची भेट बऱ्याच दिवसानंतर झाली. जुन्या आठवणी गप्पाटप्पा झाल्या नंतर न राहुन त्याने त्याचं दुःख व्यक्त केलं. घरात कमावता तो एकटाच. बायको गृहिणी. आईला हाय डायबिटीजमुळे दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदूचे नुकतेच झालेले ऑपरेशन आणि वडिलांना किडनीच्या त्रासापायी सुरू झालेले विकली डायलिसिस. शिवाय मुलांच्या शाळा व शिक्षणाचा खर्च वेगळाच. तो म्हणाला, “पगारापेक्षा जास्तच खर्च होतो”.

वरील दोन्ही प्रसंग अंगावर शहारे आणणारे होते. दोन्ही मित्रांचे कष्ट अपार होते. आर्थिक नियोजनाला अर्थातच कुठेही संधी नव्हती. पण एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अपरिमित होती.
पण ही शक्ती आली कुठून? आणि मग या प्रश्नाचे उत्तर इतरत्र aअनेक प्रसंगांमधून शोधायला लागलो. आणि अशा आशयाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, असे दिसायला लागले. संकटे नाही अशी व्यक्ती अर्थातच नाही. परंतु संकटांमुळे पुरते संपून जाऊ असे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात आहे, असे लक्षात आले. विशेष म्हणजे अशा अवघड संकटांमधून तरून गेलेले प्रसंगी खूप आहेत हेही लक्षात आले.

पण मग याच रहस्य काय? ही उत्सुकता वाढली. आणि विचार करताना लक्षात आलं की, उत्तर प्रसंगांमधे नाही. संकटांमधे तर नाहीच नाही. तर उत्तर त्या त्या व्यक्तींमध्ये आहे.
अस्तित्व, स्वत्व पणाला लावणाऱ्या संकटे आल्यामुळे की काय, त्या त्या व्यक्तीने आपली अंतर्भूत शक्ती ‘दहापटी’ने उपयोगात आणली आणि संकट टळलं.
स्वतःतच अंतर्भूत असलेली गोष्ट किमान 'दहापट' अधिक प्रयत्नाने केली तर हा परिणाम होऊ शकतो हे लक्षात आलं.

आणि मग वाटलं 'दहापट'च का ?
तर एक जुना प्रसंग आठवला, आमचे काका म्हणायचे - कार्य यशस्वी करायचा असेल तर प्रयत्न किती करावा लागतो याचे उदाहरण पहायचं असेल तर दहावीचं मराठीचं पाठ्यपुस्तक पहावं. दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एकूण प्रश्नांची गोळाबेरीज केली तर ती 1065 येते आणि परीक्षा त्यापैकी 100 गुणांची असते आणि त्यातही उत्तीर्ण होण्याची मर्यादा केवळ 35 गुणांची’.

खरंच आपण दहापट तर फार आधीपासून आपण आचरणात आणतो. पण तिची आठवण फक्त परीक्षेच्या काळात येते. म्हणून वरील दोन्ही प्रसंगांमधून मित्रांचा अभिमान वाटला. त्यांनी केलेल्या कष्टाचा अभिमान वाटला.

आणि पुढचा प्रश्न ही पडला की, ही दहापट आपण प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीत का आणत नाही? केवळ संकटातच का आणतो? खरंतर दहापट हे काही वज्रास्त्र नाही की महत्त्वाच्या संकटावर मात करण्यासाठी उपयोगात आणलं आणि संपलं. दहापट ही खरंतर एक अक्षय थाळी आहे. आपलं तर नित्य भागतेच शिवाय अचानक येणाऱ्या मोठ्या संकटांना पण सामावता येतं.
पण नित्याचे भागणे किंवा संकट टाळणे हे देखील फारच तांत्रिक होऊन जाते. एकच शक्ती जर जी व्यक्ती कडून महत्त्वाच्या क्षणांमधे व्यक्तीला तारुन नेत असेल तर ती नित्य का असू शकत नाही?
कदाचित हा आत्मविस्मृतीचा शाप तर नाही ना?
होय. आपण हनुमंताचे वंशज आहोत. समुद्र उल्लंघून जाऊ शकतो, हे सांगण्यासाठी कुणी एक जांबुवंत लागतोच आपल्याला.
किंवा यक्षाने धर्मराजाला विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर आपण एव्हाना विसरलो आहोत. यक्षाचा प्रश्न होता की, मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? त्यावर धर्मराज युधिष्ठिराचे उत्तर होते, “दक्षता”. अर्थात अखंड सावधानता. बहुदा ही अखंड सावधानता केवळ महाभारताच्या कथेतच राहिली. आणि प्रत्यक्षात आपण आपल्या जीवनात, आहे त्या वातावरणात आणि परिस्थितीत रममाण झालो.

म्हणून वाटतं दहापटीचा उपयोग काहीसा वेगळा करता का?
दुःखाच्या दिवसात प्रकट होते तिला सुखाच्या, आनंदाच्या दिवसात सादर करता येईल का? कारण दुःखाच्या दिवसात पावणारा भगवंत सुखाच्या दिवसात अधिक आनंदाने पावेल ना!
म्हणून मग आनंदाची दहापट. दहापट आनंद. जमेल ना! 
स्वप्न पूर्ण करण्यासाठी घ्यावयाच्या प्रयत्नांची दहापट. प्रिय व्यक्तीच्या सहवासाची दहापट. समजून सांगण्यापेक्षा समजूतदारपणाची दहापट. नातं टिकवण्यापेक्षा यशस्वीपणे निभावून नेण्याच्या प्रयत्नांची दहापट.
आणि अगदी शेवटी प्रेमात कोणत्याही नात्यातील ओलावा जपण्यासाठी, जिवंतपणा आणण्यासाठी वेळप्रसंगी आपलं खरं असतानाही समोरच्यासाठी माघार घेण्याची आपल्या मनाची दहापट तयारी.
कदाचित हे सारं झालं तर जीवन दहापट सुंदर होईल. हे निश्चितच.

©हे. वि. पोहनेरकर


Saturday, 2 March 2019

नवी पिढी


आमची पिढी 81 ची. आमच्या पिढीने किंवा आमच्या पिढीच्या दोन-तीन वर्ष आधी किंवा नंतरच्या पिढीने अनुभवलेलं जग हे वेगळं होतं. विशेष करून बालपणीचा काळ लपंडाव, डब्बा ऐसपैस, लिंगोरचा, विटी-दांडू,लोखंडी सळईची पावसाळ्यातली खूपसा खूपसी, कांदाफोडी, कुरघोडी अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्या आठवल्या तरी देखील आता तेवढाच आनंद देऊन जातात.
अंगत-पंगत, सायकलवरची सहल, मित्राच्या घरी अभ्यासाला जाणे, आपली वही भरली म्हणून मित्राकडून जोडपान मागून घेणे असे अनेक अवर्णनीय आनंदाचे क्षण आमच्या पिढीने अनुभवलेले आहेत.

सायंकाळची प्रार्थना ते सुट्टीत सगळी भावंडे जमल्यानंतरची अंताक्षरी, आई-बाबांनी अभ्यासासाठी दाखवलेला धाक ते इतर सांगितलेली कामे या साऱ्या बालपणीच्या अनुभवांनी खरतर तारुण्य समृद्ध झालं आहे.

पण काळ कोणासाठी थांबत नाही. आमची पिढीही आता मोठी झाली आहे. प्रत्येकजण स्वतःच्या संसारिक जीवनात रममाण झाला आहे. ग्रामीण भागातून शहरी भागात गेलेली आमची पिढी ही डिजिटल युगाची सगळी आव्हाने झेलत आहे.

पण एक आव्हान बाकी सगळ्या आव्हानांपेक्षा वेगळे आहे. पूर्वी पिढी वीस पंचवीस वर्षात एकदा बदलायची. आताची पिढी आठ दहा वर्षातच बदलते आहे. म्हणून आमच्या पिढीने पाल्यांसोबत कसे वागायचे हे तर फार पुढे आहे. परंतु आमचे धाकटे भाऊ बहीण वा नातवंड यामधील सगळेजण ज्यांच्या वयात अंतर साधारण दहा ते बारा वर्षांपर्यंत असेल, त्यांचे जग आमच्या जगापेक्षा फार वेगळ आहे.

कदाचित आम्ही अनुभवलेल्या गोष्टी त्यांनीही काही प्रमाणात अनुभवल्या असतील परंतु तारुण्यातील त्यांचे संदर्भ आमच्या पेक्षा वेगळे आहेत. त्यांची भाषा वेगळी आहे. त्यांची रिती वेगळी आहे. त्यांचं एकंदरीतच अनुभवाचं जग वेगळ आहे.

आमच्या आधीच्या पिढीकडे एक छान अस्त्र होतं. आमचं काही चुकलं, जमलं नाही किंवा मागणं असेल तर आमच्या आधीची पिढी ही पटकन म्हणायची, “आमच्या काळी असं नव्हतं, मग तुम्हाला काय अडचण आहे?’ ही आणि अशा प्रकारची ठरलेली अनेक वाक्य कानी पडायची. आणि ऐकावही लागायचं.

त्याकाळी ते बरोबरही होतं. आम्हाला त्यांच्या बद्दल कोणतीही तक्रार नाही. उलट त्यांचा आदरच आहे की, त्यांच्यामुळे आम्ही इथवर पोहोचलो.

पण अशी वाक्य आता आम्हाला नव्या पिढीसमोर काढता येत नाहीत. क्वचित प्रसंगी प्रयत्न जरी केला, पिढीत फारसे अंतर नसले तरी आम्ही आउटडेटेड होऊन जातो. कदाचित संवादाचा दुरावाही निर्माण होऊ शकतो.

वर प्रसंगी खरी जबाबदारी आमच्या पिढीची आहे . तरीही खरे तर आम्हाला सामावून घेणारी ही नवी पिढी अधिक हुशार, कर्तबगार आणि प्रगल्भ आहे.

आमची पिढी जीवनमूल्य किंवा संस्कार यांचेही संदर्भ नव्या पिढीसमोर काढू शकत नाही कारण नवी पिढी या दोन्ही गोष्टींना जपते. केवळ त्यांचे प्रकटीकरणाचे प्रकार वेगळे आहेत, माध्यम वेगळे आहेत.

अगदी वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे, पूजाअर्चा करणे किंवा कोणत्याही धार्मिक विधी मध्ये एका पारंपरिक चौकटीत बसवून ते करणे, असे नवी पिढी करतही नसेल. पण आदर आणि सन्मान त्यांच्या कृतीत नित्य जपलेला आहे.

नव्या पिढीचे खेळाचे प्रकार आणि माध्यम किंवा अभ्यासाचे प्रकार आणि व्यवहाराची साधनं वेगळी असतील. परंतु यशाचे श्रेय वाडवडिलांच्या पाय ठेवतात, तेव्हा ‘संस्कार’ नावाचे शस्त्र कधीकाळी ऐकलेल्या आमच्या पिढीसमोर नवी पिढी ‘संस्कार नावाचं शास्त्र’च आधुनिक माध्यमातून आचरणात आणताना दिसते आणि एक नवा दृष्टीकोण प्रस्थापित करते.

म्हणून अशा प्रसंगांमध्ये केवळ आनंदच होत नाही तर अभिमान वाटतो नव्या पिढीच्या प्रगल्भतेचा. आणि म्हणून नव्या पिढीला केवळ आमचे वारसदार म्हणण्यापेक्षा आमच्या पिढीची ओळख करून देताना नव्या पिढीचा संदर्भ आमच्या परिचयात करून देणे यात आमची पिढी विकसित होण्यासारखे आहे, एवढेच.

                                                                    ©हेमंत विनोद पोहनेरकर

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...