Sunday, 28 November 2021
कारण मी मोठा झालो आहे...
Sunday, 21 November 2021
पुरस्कारांचे नामकरण
'मृत्यूचा व्यापारी' या शिर्षकाखाली संपादकीय लिहीत असताना, एका फ्रेंच वर्तमानपत्राने वर्णन केले, "माणसांच्या शरीराची चाळण करून त्यांना मृत्युमुखी धाडणारा आता या जगातून कायमचा निघून गेला."
असे स्वतःच्या मृत्यूचे वर्णन वाचण्याचा अत्यंत दूर्दैवी योग आला, ती व्यक्ती होती अल्फ्रेड नोबेल. ज्यांच्या नावे आज जगप्रसिद्ध 'नोबेल पुरस्कार' दिले जातात, ती व्यक्ती. वस्तुस्थितीत 'लुडविग नोबेल' या अल्फ्रेड नोबेल यांच्या भावाचे निधन झाले होते. आणि अशा प्रकारच्या वर्णना मागे कारण होते ते म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांचे 'डायनामाईट' चे संशोधन.
अल्फ्रेड नोबेल यांना 'मृत्यूचा व्यापारी' या संबोधनाचा प्रचंड धक्का बसला. म्हणून त्यांनी आधीच बनवलेले स्वतःचे मृत्यूपत्र बदलले. आणि स्वतःची केवळ माफक संपत्ती संततीच्या नावे करून उर्वरित अमाप संपत्तीच्या व्याजातून येणारी रक्कम जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या आणि तेही मानवजातीचा उद्धार करतील अशा समस्त सशोधकांना देऊ केली.
आज भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यक शास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिले जात असल्याचे आपण पाहतो.
हा पुरस्कार जसा महान आहे. तसेच त्यामागचा कर्ता देखील महान आहे. म्हणून त्याचे नामकरणही महान आहे. एकमेवाद्वितीय असेही अल्फ्रेड नोबेल ने केलेले कार्य आहे.
परंतु आपला भारत देश म्हणून वेगवेगळे दिन, पुरस्कार व योजना आखले जात असतात, तेव्हा त्यांचं नामकरण खरंच एवढ्या खोलवर विचार करून होते का?, हा मूळ प्रश्न आहे.
केवळ दिन, पुरस्कार व योजना हे तर केवळ उदाहरणादाखल दाखल झाले. शाळा, महाविद्यालय, चौक, महामार्ग, नाट्यमंदीर, सामजिक संस्था आदी असे सगळ्यांचेच नामकरण हे केवळ आणि केवळ राजकीय नेत्यांच्याच नावे आजवर झालेली आपण पाहतो.
'प्रेरणा' हा कार्यामागील स्त्रोत म्हणून पहिला तर अशाप्रकारे नामकरण असलेल्या गोष्टींमध्ये प्राण असेल का? गोष्टींमध्ये जिवंतपणा तेंव्हा येतो जेंव्हा त्यां नैसर्गिकपणे निर्माण होत असतात. हीच गोष्ट मग कार्य निर्मितीत ही लागू होते. कार्यरत राहण्याकरिता किंवा कार्याकडे आकर्षित होण्याकरिता त्याची ओढ वाढण्याकरिता ज्या क्षेत्रात आपण जात असतो त्या क्षेत्रातील व्यक्ती सदैव आदर्श म्हणून असेल तर ते कार्य नेहमीच पूर्णत्वास जाते. परंतु भारतात त्याचा विपर्यास पाहायला मिळतो.
नुकताच देशाच्या पहिल्या मा.पंतप्रधानांच्या नावे साजरा होणारा 'बालदिन' होऊन गेला. नेहरूंनी बालांसाठी काय कार्य केले?, मुळात हा प्रश्न असू शकत नाही. बाल कल्याणाकरिता कार्य व्हावे, या संकल्पनेतून प्रत्यक्ष नेहरूंच्या संमतीने हे नाव दिले गेले आहे.
तसेच 'पंतप्रधान आवास योजना', 'पंतप्रधान जनधन योजना' किंवा 'पंतप्रधान कर्मयोगी योजना' हे देखील त्याच श्रेणीतील उदाहरण आहे.
केवळ वानगीदाखल दिन, पुरस्कार व योजना यांचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात अनुभवास येते ते एकच की, राजकीय व्यक्तींच्याच नावाने नामकरण केले जाते. मग पक्ष कोणताही असो, ती गोष्ट बदलत नाही.
अर्थात मग या सगळ्यावर उपाय काय? खरंतर उपाय तो दिन, तो पुरस्कार आणि ती योजना यातच दडला आहे.
अतिप्राचीन, महान आणि गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या या भारतवर्षात कर्मयोग्यांची प्रचंड मोठी संख्या आहे. म्हणूनच ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या व्यक्तीने महान कार्य केले आहे त्यांची त्या त्या क्षेत्रांना नाव देणे, त्यांच्या नावे नामकरण करणे हा केवळ त्या व्यक्तीचाच नव्हे तर त्या कार्यक्षेत्राच्या ही सन्मान आहे.
'स्वच्छ भारत अभियान' हे वस्तुस्थितीच अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांमधे राबवले गेलेले वास्तववादी आणि अत्यंत गरजेचे असे अभियान आहे. परंतु आपल्या देशाचे दुर्दैव असे आहे की, या अभियानाचे नामकरण करता आलेले नाही. 'संत गाडगेबाबा' यांचे नाव 'स्वच्छ भारत अभियाना'ला सार्थ ठरू शकले असते. या निमित्ताने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून संत गाडगेबाबांचे कार्य सर्व प्रांतात नेता आले असते. परंतु ती गोष्ट करण्याची दृष्टी योजकांमधे नाही.
वस्तूस्थितीत अशी अन्य अन्य क्षेत्रांमध्ये अतुल्य कामगिरी करणारे, या अतुल्य भारतात अगणित आणि अनंत आहेत. परंतु राजकीय इच्छाशक्ती किंवा दृष्टिकोनाची कमतरता दिसायला लागते. कदाचीत राजकीय स्वार्थ ही असू शकतो.
परंतु असे नामकरण न केल्याने असे जाणवते की, जणू या भारत देशात कर्तृत्ववान, कौशल्यवान, गुणवान, प्रतिभावान व्यक्तींची वाणवा आहे. असे वाटते की, हा देश केवळ राजकारण्यांचाच आहे.
चार वेद, सहा शास्त्र, आठरा पुराण, बत्तीस विद्या आणि चौसष्ठ कला ज्या भारतवर्षाने जगाला दिल्या, त्या भारताची ओळख आपण येणाऱ्या पिढीसमोर काय म्हणून करणार आहोत?
स्वातंत्र्यानंतरही आपण वेगवेगळ्या क्षेत्रात क्रांतीची परिभाषा करत असतोच, नव्हे तसे कार्यदेखील करत असतो. मग ज्या गोष्टींमुळे ते कार्यक्षेत्र ओळखले जाणार आहे, ज्यामुळे त्या कार्यक्षेत्रामध्ये नवी पिढी आकर्षित होणार आहे, त्या पिढीला आदर्श हा त्या कार्यक्षेत्रातीलच हवा ना. मग तो दिन, तो पुरस्कार आणि ती योजना यांचे नामकरणही त्यानुसारच व्हायला आहे ना...
Sunday, 14 November 2021
पण तू केवळ रिस्क घे...
संकटांना घाबरू नकोस, आव्हानांसमोर झुकू नकोस
अपयश आले तर येऊ दे, पण तू केवळ रिस्क घे...
नभांना साद दे, सागराला हाक दे
हिमालयाला टाप दे,
क्षितिजही कवेत घेता येतं, या गोष्टीची जाणीव आधी तुझ्या मनाला करून दे...
पण तू केवळ रिस्क घे...
धान्य गोळा करणाऱ्या मुंग्यांना बघ,
भर रस्त्यावर संथगतीने चालणाऱ्या 'पैशा'ला बघ,
जन्मलेल्या पिलांना घरट्यात सोडून उंच भरारी घेणाऱ्या पक्षांना बघ,
देवाने तुझ्यात दिलेल्या आत्मविश्वासाला एकदा हाक दे...
पण तू केवळ रिस्क घे...
वाघ-सिंह प्रसंगी 'सावज' हेरत ही असतील,
परंतु आपल्या सौंदर्यासह बागडताना तू हरिणाला सदैव पाहशील
भित्रा ससा होऊन पृथ्वीच्या पोटात दडून बसू नकोस,
आभाळ कोसळलेच पाठीवर तर कोसळू दे...
पण तू केवळ रिस्क घे...
परिणामांची क्षिती बाळगून युद्ध टाळता येत नसतं,
आपल्या हातातील शस्त्र चालवत शत्रूला मारायचंच असतं,
अमरत्व हे विराचं सर्वोच्च मेडल असतं
म्हणूनच मनावरील भीतीचे वस्त्र फेकून दे...
पण तो केवळ रिस्क घे...
मी तुझी पत्नी म्हणून तुला पदराखाली झाकून नाही घेणार
उलट तुझी अर्धांगिनी म्हणून तुझ्या अपयशाचाही अर्धा वाटा उचलणार
परंतु आत्महत्येचे अस्त्र तू उचलू नकोस
उलट आपल्या मुलांना साहसाचा वारसा दे...
आणि म्हणूनच तू केवळ रिस्क घे....
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
Sunday, 7 November 2021
इनहेरीटंट कॉमन कॅज्युअलनेस
'जन्मजात गलथानपणा' असा शब्दप्रयोग केला असता तर खचित खूप वाईट वाटले असते. म्हणून छानपैकी इंग्रजाळलेल्या आपल्या बुद्धिमत्तेला कुठलीही इजा पोहोचू नये म्हणून शिर्षक इंग्रजीत लिहिले आहे. खरंतर अशा प्रकारचे लिखाण किंवा आपलीच असलेली सामाजिक वस्तुस्थिती अन्य कुठल्या तरी प्रकारे वर्णन करूया, मांडूया अशा विचारात गेल्या अनेक दिवसात होतो. परंतु गेल्या आठवड्यात सलग एकानंतर एक असे जीव गमवावे लागलेले अपघात पाहिल्यानंतर मन विषण्ण झाले.
औरंगाबाद आणि पुणे असे दोन्ही शहरात चारपदरी मार्गावरून जाणार्या युवतीला व युवकाला चुकीच्या दिशेने (अर्थात ज्याला आपण 'रॉंग साईड' असे शुद्ध मराठीत म्हणतो) येणाऱ्यांनी अक्षरशः चिरडले.
आपल्या देशातही गंमतच आहे, शुद्धीत असलेले अधिक प्रमाणात जीव गमावतात. अपघातांमध्ये बहुदा त्यांनाच खरी धुंदी चढलेली असते, बेधुंद असतात, खरी शुद्ध हरपलेल्यांपेक्षा. वेगाने वाहन चालवणे, या गोष्टीला क्षणभर जरी बाजूला ठेवले, तरी चुकीच्या दिशेने अत्यंत कमी वेगात येणाऱ्यांना कधीही क्षमा करता येणार नाही. नव्हे एकंदरीत आपली मानसिकता बदलणे अथवा स्वीकारलेल्या तंत्रज्ञाना सोबत प्रगत होणे हे दिवास्वप्न प्रमाणे भासते.
एकंदरीतच आपण वाहतुकीचे सर्व नियम अगदी सामान्यतः देखील पाळत नाही. एव्हाना आपला संयमाचा कालावधी काही सेकंदाचा देखील राहिलेला नाही.
असेच एके दिवशी कार्यालयीन कामानिमित्त पुण्यात जाणे झाले. भल्या पहाटे उतरलो. क्याब बुक केली. पण शेअरिंगमध्ये करावी लागली. माझ्या शेजारी एक परदेशी पर्यटक बसला होता. गाडी थोडी पुढे गेली आणि अचानक ब्रेक चालकाने लावला. तर लक्षात येईल की, रस्त्यात मांजर मरून पडले होते. जे अंधारात दिसले नाही. त्यावर तो विदेशी पर्यटक म्हणाला, "ठाऊक आहे तुम्हाला, असे का घडले?" अर्थातच मांजर रस्त्यात मरुन पडलेल्याचे उत्तर शोधायचे झाले तर आपण शास्त्राचा आधार घेणार. आपल्याला अपशकून घडणार होता तो तिच्याच जिवावर बेतला, असेच काहीतरी. पुढे उत्तरादाखल तो विदेशी पर्यटक स्वतःच म्हणाला, "कारण तुम्ही भारतीय वाहतुकीचे नियम पाळत नाही."
मी आश्चर्याने केवळ पाहतच राहिलो. थोडासा रागही आला. लगेच उत्तर देऊन अस्मिता, अभिमान दर्शवण्याचा विचार होता. पण मुग गिळून गप्प बसलो. आणि लक्षात आले की, 'अनुकरणाचा आचरणात सिंहाचा वाटा आहे'. जो त्या मांजराच्या जीवावर बेतला होता. अत्यंत सूक्ष्म स्तरांवरचा हा विचार आहे. परंतु समाजात सगळीकडेच पाहिले तर लक्षात येते की, आबालवृद्ध अनुकरणातून बहुतांश प्रमाणात आचरण करत असतात.
मग कधीही लाल, हिरवा, पिवळा दिवा न पाहता रस्ता ओलांडणारे आपण. आपण रस्ता ओलांडताना येणाऱ्या वाहनांनाच तिकडे दिवा कोणताही लागलेला असो, त्या वाहनांनाच 'थांबा' असा हात दाखवून रस्ता ओलांडतो. तेव्हा परिणाम सर्वांवरच होणार. तसा बहुदा प्राण्यांवरही झालेला असेलच. अर्थात विदेशातही प्राण्यांच्या रस्त्यावरील मृत्यूचे प्रमाण असणार, पण बहुदा अत्यंत नगण्य.
एकदा असेच परदेशातील एक व्हिडिओ यूट्यूब वर पाहण्यात आला, ज्यात 'एक मांजर काही व्यक्तींच्या मागे दिवे लाल झाल्यानंतर झेब्रा क्रॉसिंग वरून चालत जाते'. अर्थात आपल्याला 'शिस्त' ही नेहमी विदेशी उदाहरणांमधूनच द्यावी लागते, तरच ती आपल्याला पटते.
खरंतर आपली बेशिस्त किंवा गलथानपणा असा चव्हाट्यावर मांडणे हा उद्देश नसून जाणिव होणे हा आहे. आणि शिवाय असे जीव गमवावा लागणारे अपघात काही केवळ आज घडलेले नाही आहेत. ते अनेक वर्षांपासून असेच घडत आहेत, अशा चुका अनेक वर्षांपासून होत आहे. आणि शिवाय हा गलथानपणा एकंदरीतच सर्वप्रकारच्या सार्वजनिक जीवनांत आपणांस पाहायला मिळतो. वाहतुकीचे गांभीर्य अधिक आहे, कारण येथे थेट जीव गमवावा लागतो, खचित कोणतीही चूक नसताना. तर अन्य सर्व प्रकारांत 'सभ्यते'चा अर्थात 'सार्वजनिक सभ्येते'चा भाग येतो. परंतु विपर्यास इतका भयंकर आहे की, एक भारतीय म्हणून आपण आपल्या वैयक्तिक जीवनात स्वतःसाठी सर्व काही व्यवस्थित करतो, पाळतो. परंतु तोच व्यवहार सार्वजनिक जीवनात आल्यानंतर 'मला काय त्याचे' प्रमाणे वागतो. किंवा आपण सातत्याने काहीतरी मिळवण्याच्या वेगात एकंदरीतच जीवनात धावत असतो. म्हणून जे बाळकडू मिळायला हवे ते हरवले आहे.
'जपानी लोकांच्या वीस उत्कृष्ट गोष्टी' असा युट्युबवर अत्यंत सुंदर व्हिडीओ उपलब्ध आहे. आत्ताच्या या विषयाच्या संदर्भात एक गोष्ट त्यात आहे. जपानी माणसे मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या तीन वर्षात केवळ आणि केवळ 'सभ्यता' शिकवतात. हात धुऊन जेवायला बसणे, आपल्या वस्तू स्वतःहून आपआपल्या जागेवर ठेवणे, थोरामोठ्यांच्या आज्ञेचे पालन करणे इत्यादी. म्हणजे ज्या तीन वर्षात आपण एक भारतीय म्हणून आपल्या पाल्याला एक कारकून किंवा कर्मचारी किंवा फारच झाले तर एक प्रगत इंग्रजी बोलणारा नागरिक बनण्याच्या दिशेने 'नर्सरी'मध्ये पाठवत असतो, त्याच ठिकाणी जपानी लोकांची मुले भविष्यातील समजूतदार आणि जबाबदार नागरिक बनत असतात.
खरंतर आपल्या जागृत होण्याची आवश्यकता आहे. 'संस्कारां'पासून सुरु झालेल्या या प्रवासाला कवटाळून न बसता 'जवाबदार नागरिक' बनण्यापर्यंत नेण्याची खरी आवश्यकता आहे...
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
सासुरवाशीन
अलक ५७८
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
-
शेवटच्या परकीय गुलामगिरीतून मुक्त होऊन एव्हाना आपल्याला ७६ वर्षांचा कालावधी उलटून गेला. आणि त्याचा स्वातंत्र्य उत्सव देखील आपण मोठ्या प्रमाण...
-
'स्वीकारणे' हा अमूल्य असा दागिना अंगावर परिधान करुन, ती माप ओलांडून माझ्या घरात आली. अर्थात माझी सौभाग्यवती, बायको. बाबांच्या घरचे ...
-
नास्तिकाला ही दैवत असते ते मातेचे. कृतज्ञतेची कृतार्थता प्रकट करण्याचे एकमेव ठिकाण जगाच्या पाठीवर भगवंतानंतर अस्तित्वात आहे ते म्हणजे माता. ...