दारावरची बेल वाजली.
आई हातामधे पोळीचा तुकडा घेऊन तयार होतीच. लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी पहिल्यांदा घरी येत आहे, तिला ओवाळायचे आहे, म्हणून. सबंध रात्रभर कोणालाही डोळा लागला नाही. तशी तिची पोहोचण्याची वेळ सकाळी सात ते आठच्या सुमारास होती. धाकटा भाऊ तिला घ्यायला गेला होता. पण त्याला ही जाऊन बराच वेळ झाला होता. तिचे आई आणि बाबा अगदी आतुरतेने तिची वाट पाहत होते.
आणि विशेष करून तिचे बाबा. तिचा जन्म झाल्यानंतर, पहिली मुलगी झाल्यानंतर अगदी ज्याकाळी मुलगाच पाहिजे, असाच समज असायचा त्याकाळी तिच्या वडिलांनी सगळ्यांना अगदी वेड्याप्रमाणे पेढे वाटले होते. कितीतरी आनंद त्यांना झाला होता. त्यांनी कधीही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला नाही.
आईने दार उघडले. तिच्या अंगावरून पोळीचा तुकडा उतरवून बाजूला ठेवला. पायावर पाणी घातलं न घातलं तोच आई समोर असताना तिचा प्रश्न, "बाबा कुठे आहेत?" आईला हे माहीत होतेच की, तिचा हा प्रश्न येणार म्हणून. आई काही बोलायच्या आत सगळं सामान धाकट्या भावाजवळ दारात सोडून ती तशीच घरात शिरली.
ते पूजा करत होते. तिच्या लहानपणी जसे ते तिला हाक मारायचे अगदी तशीच आज सासुरवाशीण झालेल्या मुलीला त्यांनी तशी हाक मारली, "लाडोsss".
सोवळ्यात पूजा करत असलेल्या बाबांना ती तशीच बिलगली. ही तिची वेळ नि सवय लहानपणापासूनची. बाबा पूजेला बसलेले असायचे आणि तिची उठायची वेळ एकच असायची. मग ती तशीच पारश्यानेच बाबांच्या मांडीवर जाऊन पूजेला बसायची. आज अनेक वर्षांनी तसाच प्रसंग आला होता.
धाकटा भाऊ आणि आई हे दृश्य पाहत होतेच. पण आता त्या दोघांनाही या गोष्टीची सवय झाली होती. या बाप लेकीला रागावून काही उपयोग नाही.
तिच्या कोणत्याच गोष्टीला त्यांनी कधीही विरोध केला नाही, उपदेश केले नाही, शिकवले नाही, केवळ जीव लावत गेले.
डोळ्यातून वाहणाऱ्या आनंद अश्रूंचा ओघ कमी झाल्यानंतर तिने नेमका हाच प्रश्न बाबांना विचारला,
"तुम्ही मला एवढा जीव का लावला?"
कार्त्यव्याचे कठोर दायित्व पार पडणाऱ्या पित्याला जणू त्यांच्या कन्येने थेट प्रश्न विचारला होता की, 'नात्यांमधे 'कर्तव्य' आणि 'प्रेमा'ची सांगड कशी घालायची ?'
ते हसले म्हणाले, "लाडो, तू आहेसच गोड, म्हणून."
ती म्हणाली, "नाही. मला खरं उत्तर हवं आहे."
तिचे बाबा म्हणाले, "वेडाबाई, तुम्ही बायकां स्वयंपाक करत असताना, तो अधिक गोड व्हावा, अधिक तृप्तता वाटावी म्हणून त्यात जीव ओतता. अगदी तसेच मी तुला जीव लावला, एवढेच."
पण अशा कोणत्याच वेगळ्या उत्तराने तिचे समाधान होणार नव्हते.
ती म्हणाली, "नाही. मला नेमके उत्तर हवे आहे."
मग तिचे बाबा म्हणाले, "तुम्ही मुली मुळातच खूप गुणी असता. आईच्या पोटातून सगळं काही शिकुन येता. आम्हां पुरुषांना शिकण्याची खरी गरज असते. म्हणून मी नेहमी या गधड्याला रागवत असतो. तुम्हाला वेगळं काही शिकण्याची मूळी गरज नसते.
पण कोणतेही नाते तीन मूळ गोष्टींवर टिकून असते.
आणि त्या तीन गोष्टी म्हणजे,
'प्रेम', 'विश्वास' आणि 'आदर'.
आणि त्यात तुम्ही मुली 'गृहिणी' झाल्यावर दोन्ही घरांची ओळख बनता, म्हणून या तीनही गोष्टींचे संस्कार तुला न शिकवता मी उदाहरणांमधून मांडत गेलो आणि त्याकरिता 'जीव लावत' गेलो. एवढेच."
आता तिने बाबांच्या पोटाशी अजूनच घट्ट आवळले. आनंदाश्रू आता थांबत नव्हते.
सकाळच्या देवपूजेच्या मंगलप्रसंगी अगदी देवादिकांनाही धन्यता वाटावी, असं जीवनातील प्रत्येक नात्यांचं सार बाबांनी लाडो समोर मांडलं होतं.
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९