बाबा. बाबा म्हटलं की डोळ्यासमोर उभ राहतं एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व. अगदीच धाक, दरारा हे जरी आमच्या पिढीने अनुभवलेल नसलं. तरी एक आदरयुक्त भीती नेहमीच अनुभवली. आई जवळ सगळा हट्ट चालायचा. पण बाबांना मागायची बिषाद नसायची. पण आईमार्फत तो बाबा पर्यंत पोहोचला की काही क्षणात पूर्ण देखील व्हायचा.
पण आता काळ एवढा वेगाने बदलतो आहे की, हा मधला मार्ग आता राहिला नाही. पूर्वी पिढी विस-पंचेवीस वर्षाला बदलायची. आता तर ती अगदीच पाच-सात वर्षात बदल बदलते आहे.
'प्राप्तेतू षोडशे वर्षे पुत्रं मित्र वदाचरेत', हे विधान एव्हाना पाच सहा वर्ष वयापर्यंत येऊन पोहचल आहे.
म्हणूनच की काय आता 'ओ बाबा' 'ए बाबा' झाला आहे.
मुलांना मारणे तर खूप दूरचा विषय, त्यांना रागवणे देखील कधीतरी होतं.
तसं पाहता हे काही काळाच्या प्रवाहात वाहण्यासारखा नाही. कारण नवी पिढी अधिक प्रगत होत चालली आहे आणि प्रगल्भ देखील.
आमच्या पिढीला बाबासोबत खेळल्याच कधी आठवत नाही. पण आता नवी पिढी बाबा खेळायला नसेल तर रुसून बसते. बाबा कामावरून आला की, काय काय करायचं याचे जणू वेळापत्रकच तयार असतं.
बाबा आता साखरेच पोत होतो. बाबा जेवू घालतो, प्रसंगी न्हाऊ घालतो. अगदी डायपर बदलतो, शी सुद्धा काढतो.
घरात सगळ्यात जास्त धिंगाणा कोण करतं, तर उत्तर येते बाबा.
'बाबा तू कुठे जायचं नाही'. 'बाबा आज सुट्टी घे'. 'बाबा किती काम करतोस'? 'बाबा जरा आराम करत जा'. अशा सूचना आता सर्रास ऐकू येतात.
बाबाला आता सुट्टीच नियोजन कराव लागत नाही. शॉपिंगची काळजी करावी लागत नाही.
'बाबा या रविवारी डोंगरावर जाऊ'. 'बाबा आज रात्री आईस्क्रीम खायला जाऊ'. एवढेच काय कोणत्या हॉटेलमधे जेवण कसं आहे इथपासून ते बाबांना कोणते कपडे घातले तर चांगले दिसतात, हे पण ठरवलं जातं.
'बाबा या रविवारी डोंगरावर जाऊ'. 'बाबा आज रात्री आईस्क्रीम खायला जाऊ'. एवढेच काय कोणत्या हॉटेलमधे जेवण कसं आहे इथपासून ते बाबांना कोणते कपडे घातले तर चांगले दिसतात, हे पण ठरवलं जातं.
थोडक्यात काय तर प्रेम, विश्वास आणि आदर हा पूर्वीच्या बाबांकडून मिळालेल्या वारश्यामध्ये नव्या पिढीचा बाबा मित्रत्वाची भर घालतोय एवढेच.
@हेमंत विनोद पोहनेरकर