Friday, 10 July 2020

दुसरा चहा


रोज सकाळी साधारण सहा सव्वासहाला जाग येतेच. रात्री झोपेपर्यंत बारा वाजलेले असतात, तरीही. पण आता ही नित्याचीच सवय झाली आहे. माझ्या आधीच आई-बाबा उठलेले असतात. आईने सकाळचा पहिला चहा देखील करून ठेवलेला असतो. जो तो आपाप
ला चहा पिऊन घेतो. थोड्या वेळानंतर आंघोळपांघोळ करून सात-साडेसात होत आले की, दुसरा चहा येतो.

यावेळी आई-बाबा आणि मी असे थोडेसे निवांत झालेलो असतो. सकाळच्या एकदम प्रसन्न वेळी खूप छान गप्पा होतात. आई-बाबांच्या प्रकृतीची चौकशी होते. आणि त्यांनाही काही बोलायचे असते, दिवसभराच्या कामाच्या धामधुमीत असा निवांतपणा परत मिळत नाही. बऱ्याच वेळा त्यांच्या अनुभवांचे प्रसंगही ऊर्जा देऊन जातात. धावत्या जगाकडे पाहण्याचा स्थिर दृष्टीकोन मिळतो. 'कष्टातील आनंद' कसा शोधावा, याचा जणू अगदी कमी वेळात परिपाठच मिळत असतो. असो.
तर हे सगळे घडते, ते अगदी सकाळच्या मंगलमय क्षणी आणि दुसऱ्या चहाच्या वेळी.

'चहा' हे खरेच अमृततुल्य आहे. संपर्कपेय आहे. चहा नसता तर खरंच काय मिळालं नसतं, हे कधीच कळलं नसतं. तर असा हा 'चहा' माझा जीव की प्राण आहे.

पण तो सौभाग्यवतींना मात्र आवडत नाही. परंतु घरात आल्या नंतर तिने हे चहाचे गुऱ्हाळ आणि त्यावर होणारे पुराण पहिले. त्या नंतर मात्र ती ही अधूनमधून चहा घ्यायला लागली. ती साधारण थोडीशी उशिरा उठते. म्हणजे माझ्या 'दुसऱ्या चहा'च्या वेळेपर्यंत.

तिचे तोंडधुणे होत आले की, मीच तिला विचारतो, "अगं, तुझ्यासाठी चहा टाकू का?" त्यावर तिचे उत्तर, "राहू द्या!" (यात तिच्यासाठी काम वाढेल, हा भाव असतो) मीच देते करून तुम्हाला." मी निरुत्तर होऊन वर्तमानपत्र चाळत बसतो. नि थोड्या वेळानंतर दुसरा चहा सौभाग्यवतींसह.

आता बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त असतं. आणि अधून मधून दुसऱ्या चहाची स्तुती. पण या अगदीच थोड्या वेळात दिवसभराचे सगळे नियोजन होऊन जाते. म्हणजे ऐकून पूर्ण होते!
आता केवळ करायचे शिल्लक राहिलेली असते. त्यातही एखादी गोष्ट 'हो माझ्या लक्षात राहील, मी करेण', असे म्हणण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. पण नंतर नंतर प्रचिती येत गेली की, आपल्या काही लक्षात राहत नाही. ज्याची उजळणी ती बिचारी लगेच कधीही करून देत नाही. त्यासाठी ती दुसऱ्या चहा पर्यंत थांबलेली असते. तिच्या संयमाचा मला सदैव कौतुक आहे.

तिच्या खरंच कुठलीही यादी न करता सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. आणि मी यादी करून देऊनही विसरतो. पण 'मला तू माझ्यावर रागवलीस की, चहा सोबतचा कुरकुरीतपणा वाढतो', असे सांगायचे असते. पण एवढ्या वर्षांच्या सहवासात ते कधीच जमले नाही.
'दुसरा चहा' गमावण्याची भीती! बाकी काही नाही...

पण ती नित्यनेमाने दुसरा चहा करत राहिली. आता मुले देखील मोठी झाली आहेत. ती चहा घेत नाहीत. पण अधून-मधून मुलगी मात्र दुसरा चहा करून देते. आणि आमच्या गप्पात सहभागी होते. खरंतर मला तिची मदतच होते. थोड्या शिव्या कमी बसतात ना! आणि तिचा मला वाचवण्यावर नेहमीच अधिक भर असतो. 

मग सौभाग्यवती कामाला निघून जातात. आणि मुली सोबतच्या गप्पा वाढायला लागल्या. तिलाही खूप सांगायचे असते. बाबा सगळ्यांत जवळचा आणि पहिला मित्र असतो ना!
मग मी तिच्यासोबत दुसरा चहा घ्यायला लागलो. चहाच्या कपात वादळे असतात, असं ऐकलं होतं. पण मला सातत्याने संबंध आयुष्यभर चहासोबत उत्तरे आणि प्रेम मिळत गेले.

आयुष्य ओसरत गेले. निवृत्तीला आलो. दुसरा चहा सुरूच होता. पण एव्हाना सून आली होती.
तिच्यासोबत पहिल्यांदा दुसरा चहा घेतला. आणि 'बाबा', 'आजोबा' किंवा 'सासरा' म्हणून वागण्यापेक्षा 'नातवा' प्रमाणे वागायला लागलो.

त्याचे श्रेय तिलाच. आता दुसऱ्या चहाच्या वेळी मी बोलत असतो आणि ती ऐकत असते. असे 'जीवाचे कान' करून ऐकणारा श्रोता मला पहिल्यांदाच मिळाला होता.

'संयम, धीर, शांत स्वभाव हा सगळ्या मुलींनाच मिळतो कसा?' हा मला कायम पडलेला प्रश्न होता. ज्याचे सुरुवातीला मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला देखील. पण नंतर नंतर लक्षात यायला लागले की, तो देह धारण करून आपली आयुष्यभर वेगवेगळ्या रुपात सोबत करत आहे, एवढेच पुरेसे आहे.

जीवनात आई, सौभाग्यवती, कन्या आणि आता सुनबाई अशी सगळीच नाती उलगडताना अनुभवायला मिळाली. ती केवळ 'दुसऱ्या चहा'च्या वेळी...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...