Tuesday, 30 July 2024

अलक ४१०



आजी इटुकला लाडोबाला शाळेत जाताना स्वतःच्या बूट सोबतच बाबांचेही बूट कपड्याने स्वच्छ करतांना पाहून म्हणाली, “बाळा, बाबांचे बूट का पुसून ठेवतो आहेस?”

“बाबाही ऑफिसला जाताना आजोबांचे बूट पुसून ठेवतो ना!”, लाडोबा उत्तरला.

डोळे भरून आलेल्या आजीने विचार केला, ‘पेरले ते उगवते’.

अलक ४०९



“बाबा, मोठं झाल्यावर माझाही असा कार्यक्रम करायचा आहे”, एक भरतनाट्यम मधील अरेंगेतरमचा कार्यक्रम पाहताना नृत्याची आवड असलेली त्याची इटुकली लाडो त्याला म्हणाली.

तत्क्षणी त्याने तिच्या भविष्याची चिंता करणे थांबवले.

तो आपल्या ‘पिलाने गरुडझेप घेण्याची क्षमता ठेवली आहे’, या विचारानेच समाधान पावला.

अलक ४०८



पणजी आजीने गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरु असलेला संतत धार पाऊस थांबावा म्हणून नग्न अवस्थेतील तान्हया बाळाकडून पावसाला चटका दिला.

त्यावर बाळाच्या आईने ‘अंधश्रद्धा’ म्हणून हिणवले.

तो मात्र दोघींनाही समजावत बसला नाही. तो ‘आपले पूर्वज कोपलेल्या निसर्गालाही शिक्षा करण्याची बुद्धी ठेवत होते’ या विचारनेच समाधानी होता.

Friday, 26 July 2024

अलक ४०७



मुंबईतील मुलांना ‘पाऊस’ विषयावर निबंध लिहायला सांगितले. तेव्हा जवळ जवळ सर्व विद्यार्थ्यांनी पुराचे वर्णन केले.

विद्यार्थ्यांची अशी दशा पाहून शिक्षकांनी आता ‘निसर्ग शाळा’ उपक्रम हाती घेतला आहे.

अलक ४०६



तो डॉक्टर झाला.

एकदा त्याच्या वाचनात आले,

‘रोग जसे सांसर्गिक आसतात तशी ऊर्जा देखील सांसर्गिकच असते’.

आता तो त्याच्या समुपदेशनानेच अनेक रुग्ण निरोगी होताना अनुभवतो आहे.

Wednesday, 24 July 2024

अलक ४०५



‘अभद्र युती हे वर्तमान राजकारणाचे विदारकरुप लोकशाहीला मारक आहे’, असे विधान एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने केले.

त्यावर एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने

‘राजकारणात सदैव मित्र अथवा शत्रु पक्ष असतं नाही’

या त्यांच्याच विधानाची त्यांना आठवण करुन दिली.

Tuesday, 23 July 2024

अलक ४०४



सरकारने अपघातातील मृतांच्या घरी काही रक्कम देण्याची घोषणा केली.

अपघातात वाचलेली लोकं आयुष्याची किंमत ओळखून आता वाहने चालवायला लागली होती.

परंतू उर्वरित नागरिकांनी अजून धडा घेतलेला नाही.

Monday, 22 July 2024

अलक ४०३


दुष्काळ दुष्काळ म्हणतांना ओला दुष्काळ कधी आला कळलेच नाही.

यंदा आनंद साजरा करायचे ठरवले होते. परंतू दुःखाचाच मुक्काम वाढला.

तेंव्हा तिने घरात आलेल्या गंगामाईची ओटी भरली,

भावना होती, ‘किमान पाण्याने का होईना घर भरले’.

Sunday, 21 July 2024

अलक ४०२



‘आजच्या धावत्या युगात गुरुंची आवश्यकता नाही’,

एका कोचनी विधान केले.

त्यानंतर त्यांच्याकडे शिकायला येणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी होत गेली.

परंतू त्यांना त्याचे कारण कधीही कळाले नाही.

Friday, 19 July 2024

अलक ४००


‘विशालगडावरील अतिक्रमणाकडे धार्मिक सहिष्णुतेच्या दृष्टीने पहिले पाहिजे’, असे विधान एका ज्येष्ठ नेत्यांनी केले.

दुसऱ्यादिवशी ‘एकांगी सहिष्णुतेचा सांगाती’ या शीर्षकाचा लेख वर्तमानपत्रात प्रकाशित झाला.

Thursday, 18 July 2024

अलक ३९९

 


“नुस्ती अंधश्रद्धा आहे”,

एक निधर्मी डोक्यावर तुळशीची रोपं घेऊन जाणाऱ्या वारकरींना पाहून म्हणाले.

‘पर्यावरण आणि वारकरी परंपरा’,

या आशयाचा आषाढी एकादशी निमित्त वर्तमानपत्रात आलेला लेख मात्र त्यांनी वाचला नाही.

Wednesday, 17 July 2024

अलक ३९८



त्याला तारुण्याच्या उंबरठ्यावर शक्तीची उपासना करायचा छंद जडला.

परंतू त्याने काही दिवसांनी किर्तनकारांना किर्तनांत ‘भक्तीमध्ये अपार शक्ती’ असते’, असे मांडतांना ऐकले.

त्याने आपल्या मनातील गोंधळ बुवांसमोर मांडला.

त्यावर ते म्हणाले, “देवाने मनुष्याला शरीर आणि मन दोन्ही दिले आहे.”

Tuesday, 16 July 2024

अलक ३९७

 एव्हाना तापमान ४५’ पर्यंत पोहंचले होते.

तिचा इटुकला लाडोबा म्हणाला,

“आई, सूर्यालापण खूप गर्मी होत असेल ना!”

त्यानंतर तिने त्याच्यासोबत जवळ जवळ ५० वृक्ष प्रकारातील रोपे लावली.

मोठं होत जातांना लाडोबाला लक्षात येत होते,

‘पृथ्वीला गर्मी होऊ द्यायची नाही’.

Sunday, 14 July 2024

अलक ३९६

 तो हिट अँड रन प्रकरणांत पकडल्या गेला. मृत तरुणाच्या वडिलांनी त्याला माफी मिळावी म्हणून न्यायालयाला विनंती अर्ज दिला.

या उलट अपराधी तरुणाच्या वडिलांना त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात फिर्याद मांडली होती.

एव्हाना न्यायालयाने ‘बाप माणसाचे’ मन समजून घेण्यासाठी वेळ मागितला.

अलक ३९५



एक दिसायला अत्यंत सर्वसाधारण मुलगी आरशात तिचे सौंदर्य न्याहाळत होती.

तिला पाहून त्याचे नैराश्य पळाले.

एव्हाना त्याच्या चेहऱ्यावर कोड यायलालागले होते.

Friday, 12 July 2024

अलक ३९४

 

व्यवस्थापकांना वधूवर सूचक मंडळात मुलींची नोंदणी मुलांच्या नोंदणीच्या व्यस्तप्रमाणात असल्याचे जाणवले.

खोलवर विचार केल्यावर त्यांची चिंता अधिक वाढली.

त्यांनी सुरुवातीला ‘उच्चशिक्षित मुली’ असे लिहून नंतर ते खोडले. नि नंतर ‘वधूपालक’ लिहून त्यावर बराच वेळ घुटमळत राहिले.

Thursday, 11 July 2024

अलक ३९३

 तो छोट्या छोट्या गोष्टींवरून मुलांना खूप रागावयाचा. पुढे मुले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठी झाली.

एव्हाना मुलांना मायक्रोमॅनेजमेंट चांगले जमायला लागले होते.

परिणाम त्यांची  कोणतीही नोकरी टिकत नव्हती.

त्याला काहीतरी चुकल्याची जाणीव झाली. आता तो मुलांना छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद शोधायला शिकवतो आहे.

Wednesday, 10 July 2024

अलक ३९२

 ‘जीवन हरवला आहे.

जीवन हरवले आहे.’

वडिलांनी वर्षासहलीत पाण्यात वाहून गेलेल्या तरुण मुलासाठी या दोनच ओळींचा शोकाकुल संदेश वर्तमानपत्रात दिला.

Tuesday, 9 July 2024

अलक ३९१



‘गतिशील विकास’.

त्याने हा विषय अत्यंत प्रभावीपणे व्याख्यानात मांडला.

सभागृह बाहेर पडताना त्याला एक तरुण त्याच्या आजोबांचे हात धरुन जाताना दिसला.

 त्याने तत्क्षणी व्याख्यानाचा विषय मिळाला, ‘पायाभूत गतिशील विकास’.

Sunday, 7 July 2024

अलक ३८९


तो ‘देश’ आणि ‘राष्ट्र’ या शब्दांच्या गोंधळात अडकला होता.

नंतर त्याच्या लक्षात आले,

‘आपण अजून प्रांतवाद सोडलेला नाही’.

Saturday, 6 July 2024

अलक ३८८


त्याने अनेक मुलींकडून नकार आल्यानंतर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

एव्हाना त्याला ‘यंदा कर्तव्य आहे’ आणि

‘किंकर्तव्यविमूढता’

हे दोन्ही वाक्य सारखीच वाटायला लागली होती.

Friday, 5 July 2024

अलक ३८७

 ‘गत १० वर्षातील भारताची प्रगती’, या विषयावर परिसंवाद सुरू होता.

अध्यक्षीय समारोपात वक्ते म्हणाले,

“प्रगती किती झाली वा नाही झाली यांवर अजूनही संवादसत्र होऊ शकते.

परंतू एक नक्की आहे,

आपण स्वावलंबी भारत होऊ पाहात आहोत”.

Thursday, 4 July 2024

अलक ३८६

 त्याची ‘मुलगी पसंत आहे’,

या शीर्षकाची कथा लिहायची राहून गेली.

कारण मुलगा इंजीनियर नाही आणि

त्याचे घर देखील पूण्यात नाही.

Wednesday, 3 July 2024

अलक



‘हिंदू हिंसक आहे’ आणि

‘आतंकवादाला धर्म नसतो’

अशी भूमिका एका विरोधीपक्ष नेत्याने घेतली.

एव्हाना अज्ञानात सुख असण्यापेक्षा

स्वार्थांत सुख अधिक आहे,

हे त्यांना कळून चुकले होते.

Tuesday, 2 July 2024

अलक


#अलक ३८४


‘जयां पुरुषांस ज्याचे ध्यान तयाशी तेची प्राप्त, त्याच्या वाचनात हे समर्थांचे वचन आले.

एव्हाना त्याला ज्योतिष आणि भविष्य यांतील फरक कळाल्यामुळे त्याने वर्तमानावर भर देण्यास सुरुवात केली.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...