Friday, 19 July 2019

नाही


'नाही'.
दोन अक्षरीच शब्द पण मन दुखावणारा. अगदी एखादं वाक्य किंवा उतारा हवा आहे, असेही नाही. मन दु:खी व्हायला 'नाही' हा दोन अक्षरी शब्द पुरेसा आहे.

पण गंमत अशी की, 'नाही' असो वा 'हो' असो, हे दोन्ही शब्दांच उगमस्थान एकच. आणि ते म्हणजे नाभी. अर्थात उत्तर पोटातून दिलेले असते, आणि म्हणूनच की काय, कदाचित त्याचा परिणाम मार्गात येणाऱ्या हृदयावरती होतो.

'नाही' हा मग प्रेमातील असो वा व्यवहारातील मन मोडणे हे पक्कच आहे. अर्थातच उत्तराची प्रतिक्षा करणारा हा नेहमीच आशाळभूत असतो. त्याचे कष्ट वा त्याची इच्छा वा त्याचा काही व्यक्तिगत लाभ ही असू शकतो, पण 'नाही' ऐकताच विषय संपतो.

आणि क्वचित प्रसंगी नवीन विषय पण निघत नाही. कारण 'नाही' ऐकल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल मनात कुठेतरी आढी  निर्माण होते. आपली मागणीच काय ती आपल्याला योग्य वाटत असते. आणि बहुतांशवेळा तिच्या अनुकूल घडावं वाटणे  पण स्वाभाविक आहे.

पण बहुदा 'नाही' ऐकणे हे सहन करणे हे वर पाहता अवघड किंवा नकोसे वाटते.

परंतु त्याहीपेक्षा 'नाही' म्हणणे, हे जास्त कठीण आहे. विंदांच्या 'देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या' कवितेप्रमाणे आहे. 'नाही' म्हणायला नुसतंच धाडस असावं लागत  नाही तर मन नाजूकही असावं लागतं. 'नातं तुटले तर ?' हा विचार मनात येण्यापूर्वी, 'हो' म्हणुन बळजबरीने इच्छा नसताना प्रसंग ओढवून नात्यातील रुक्षता टाळण्याइतकं मन प्रगल्भ असावं लागतं.

हा सगळा केवळ दृष्टिकोनातील फरक नाही तर दूरदृष्टी देखील असावी लागते.

'नाही' म्हणण्याचे परिणाम काही काळापुरते आहेत. पण 'नाही' म्हणायचं असताना 'हो' म्हणाल्यावर जास्त काळ सोसावे लागते. आणि विशेष करून 'नाही' म्हणणार्‍याला जास्त सहन करावं लागतं. 

आणि अनेकवेळा या 'नाही'च्या ऐवजी  काही नवे पर्याय शब्द 'नाही' म्हणायचं असणाऱ्याला सापडतात.

आणि ते म्हणजे, 'पहातो',  'सांगतो', 'बघतो'.

थेट 'नाही' म्हणायचं धाडस नसतं. समोरच्याच्या मनाचा अधिक विचार झालेला असतो. किंबहुना नातं नाजूक असतं. 'नाही' म्हणणं नवीन नात्यात वितुष्ट निर्माण करेल, असं वाटत असतं, म्हणून 'नाही' ऐवजी 'सांगतो',  'पाहतो', 'बघतो' म्हटलं की, सुटका झाल्यासारखं वाटतं.

पण खरंतर हे पर्यायी शब्द देवून 'नाही' म्हणायचं टाळणारा अधिक अडकतो. कारण आता समोरचा आश्वासित झाल्यासारखा राहतो. त्या प्रत्यक्ष प्रसंगा पर्यंत त्याची वाट पाहत असतो. थोड्याच वेळात 'सांगतो' म्हणाले होते, ते आता 'हो' म्हणतील. कदाचीत प्रसंग जवळजवळ येत असताना 'सांगतो' म्हणाले होते ते केवळ टाळण्यासाठीच, ही भावना मनामध्ये जागी होते. आणि अशावेळी या 'नाही' न म्हणण्यामूळे मन अधिक दुखावले जाते.

प्रसंग निघून जातो. 'नाही' न म्हणल्याचा कालावधीही लोटतो. आणि दोघांची प्रत्यक्ष भेट होते. आणि 'नाही' न म्हणू शकलेला नमस्कार-चमत्कार करण्यापूर्वीच स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करतो. की तो का, 'सांगतो', 'पाहतो', 'बघतो', असे म्हणाला होता. आणि कसे त्याला जमले नाही.

आणि या क्षणाला मात्र दोघांनाही माहित असतं की, ही वरवरची मलमपट्टी आहे. दोघेही उसणं हसू तोंडावर घेउन, असं होतच असतं, अशी स्वतःची फसवणूक करून निघून जातात.

'नाही' म्हणण्याचे धाडस परत कधी करू असं, म्हणून प्रसंग निभावून नेला जातो. पण तो पुढचाही 'नाही' म्हणण्याचा प्रसंग कधी येत नाही.

तेव्हा एक गोष्ट स्वीकारायला हवी, जेव्हा 
जेव्हा प्रेमात होकार घ्यायचा असतो किंवा द्यायचा असतो, त्या वेळेला 'हो' म्हणून सांगण्यासाठी प्रत्येक वेळेला शब्दांची गरज भासत नाही. 'या हृदयीचे त्या हृदयी',  असं प्रेमात शक्य होतं.

तर तेवढ्याच पवित्र, स्वच्छ आणि नि:संकोच मनाने 'नाही' म्हटलं तर स्वीकारले जाईल ना. नाही का?

©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९


Saturday, 6 July 2019

संयमाचा कालावधी



तीन मिनिट.
संयमाचा कालावधी सांगत असताना अगदी कुठल्याही लेखाला असणारी प्रस्तावना असावी तशी करता, अगदी तीन वाक्य, तीन शब्द किंवा तीन अक्षरही थांबता येईल, एवढा संयम एव्हाना  नसल्यामुळे पहिल्याच अक्षरात किंवा शब्दात संयमाचा कालावधीत सांगून टाकला.

तसेच आपल्याला फ्लॅशबॅकचीही आता खुप सवय झाली आहे. कथानकाच्या शेवटाशी संबंधित प्रसंग सुरुवातीला सांगायचा नंतर कथानक रंगवत न्यायचं, हा साहित्याचा अत्यंत सुंदर प्रकार आहे. पण या प्रकारातही संयम लागतोच. असो.

वैयक्तिक संयम सामाजिक संयम अशी बहुदा संयमाची विभागणी देखील करता येईल. पण तूर्तास वैयक्तिक संयमाचा सुविचार करूया.

अगदी छोटया छोटया उदाहरणांपासून सुरुवात केली, तर काही प्रसंग अनुभवास आलेले असतील. जसे,

बराच वेळ आपण कोणासाठी तरी वाट पाहून पाहून थकतो, मग निघून जातो. आणि नंतर लक्षात येतं, कळतं की, ती व्यक्ती पुढच्या काही मिनिटातच पोहोचली होती.
हाच प्रसंग कोणाची तरी घरी जेवणाकरिता वाट पाहत असताना देखील घडतो,
आपण ताटावर बसतो आणि ती व्यक्ती हजर होते.

आपल्याला हवी असणारी गोष्ट आपण घरात कुणाला तरी सांगतो आणि त्याच क्षणी ती नाही मिळाली की, आपण व्यक्त होतो.

आपल्या आवडीच्या सार्या गोष्टी आपण घरात सांगून ठेवलेल्या असतात.
पण नावडती गोष्टी नेमकी समोर आली की, आपण लगेच पाढा वाचायला सुरुवात करतो.

असेच सगळे छोटे छोटे प्रसंग नेहमीच घडत असतात.
आणि विशेष म्हणजे आपल्या कामाची आपल्या प्रतिक्रियेची घरातील सगळ्यांना सवय देखील झालेली असते. आपल्या अशा सवयींना त्यांनी देखील स्वीकारलेलं असतं.

पण थोडंसं थांबता आलं तर नवं काहीतरी घडू शकतं. वय निश्चितच थांबवता येणारं नाही. पण सवय कुठेतरी थांबवता येईल. आणि तो थांबण्याचा कालावधी तीन मिनिटांचा आहे.
तो कालावधी संयमाचा आहे.

या छोट्या प्रसंगांचं जसं आहे. तसेच तुलनेने थोडे मोठे पण अधिक परिणाम करणारेही काही प्रसंग आहेत. जसे,

क्रियेनंतर प्रतिक्रीया किंवा फारच प्रगल्भता असेल तर प्रतिसाद देण्यासाठी केवळ संयमाचा बांध लागत नाही तरी बहुतांशी वेळा उत्तर क्रियेतच असते तेच शोधण्यासाठी समोरच्याला वेळ देण्यासाठी संयम लागतो.

वादविवादात रागावर नियंत्रण मिळवण्यासाठीच केवळ संयम लागत नाही तर सुखसंवादाचा मार्ग अशा गंभीर प्रसंगात शोधण्यासाठी संयम लागतो.

निर्णय घेतल्यानंतर परिणामांशी लढण्यासाठी संयम लागत नाही तर नेमकी फलनिष्पत्ती खचित मनाविरुद्ध असतानाही निर्णय घ्यावा लागतो, याकरिता संयम लागतो.

कर्तव्याच्या अशा सगळ्या आयामांमधे संयम अपेक्षित आहे. पण तो उपेक्षित अवस्थेत असतो. अनपेक्षित घडणाऱ्या प्रसंगांची वाट पाहण्यापेक्षा, सुरक्षितपणे संयमाचा कालावधी उपयोगात आणणे कधीही सोयीचे आहे. आणि तो संयमाचा कालावधी तीन मिनिटांचाच असतो.

जगातील सगळ्या छोट्या-मोठ्या घटना या तीन मिनिटांच्या कालावधीत घडलेल्या आहेत.
अन्यथा असे आपण अनेक वेळेला म्हणताना पाहिले आहे की,
थोडसं थांबायला हवं होतं’,
चुकून बोलून गेलो’,
थोडीशी घाई झाली’,
असे म्हणत नंतरचा पश्चाताप टाळण्यासाठी  तीन मिनिटांचा संयमाचा कालावधी आवश्यक आहे.

अर्थातच संयम समोरच्याला जिंकण्यासाठी नसतोच मुळी. तसाच तो केवळ स्वतःला जिंकण्यासाठी ही नसतो. तर संयम समयासोबत राहण्यासाठी असतो. कारण या नश्वर जगात समय तेवढा शाश्वत आहे.
समयासोबत राहणे, हे अर्थातच प्रगतीचे आणि प्रगल्भतेचे लक्षण आहे.

मुमुक्षूआणितितिक्षाअसे शब्दप्रयोग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमधे केले आहेत. आणि त्यांचे सुंदर विवेचनही केले आहे. पण ती कदाचित ती सिद्ध पुरुषाची लक्षणे आहेत.
अनेक संसारीक त्या मार्गावर गेलेही आहेत.
पण सर्वसामान्याला, प्रत्येकाला या मार्गावर जाण्यासाठीचे पहिले पाऊल असेल ते संयमाच्या कालावधीचे. अर्थात तीन मिनिटांचे.


©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९









सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...