तीन मिनिट.
संयमाचा कालावधी सांगत असताना अगदी कुठल्याही लेखाला असणारी प्रस्तावना असावी तशी न करता, अगदी तीन वाक्य, तीन शब्द किंवा तीन अक्षरही थांबता येईल, एवढा संयम एव्हाना
नसल्यामुळे पहिल्याच अक्षरात किंवा शब्दात संयमाचा कालावधीत सांगून टाकला.
तसेच आपल्याला फ्लॅशबॅकचीही आता खुप सवय झाली आहे. कथानकाच्या शेवटाशी संबंधित प्रसंग सुरुवातीला सांगायचा व नंतर कथानक रंगवत न्यायचं, हा साहित्याचा अत्यंत सुंदर प्रकार आहे. पण या प्रकारातही संयम लागतोच. असो.
वैयक्तिक संयम व सामाजिक संयम अशी बहुदा संयमाची विभागणी देखील करता येईल. पण तूर्तास वैयक्तिक संयमाचा सुविचार करूया.
अगदी छोटया छोटया उदाहरणांपासून सुरुवात केली, तर काही प्रसंग अनुभवास आलेले असतील. जसे,
बराच वेळ आपण कोणासाठी तरी वाट पाहून पाहून थकतो, मग निघून जातो. आणि नंतर लक्षात येतं, कळतं की, ती व्यक्ती पुढच्या काही मिनिटातच पोहोचली होती.
हाच प्रसंग कोणाची तरी घरी जेवणाकरिता वाट पाहत असताना देखील घडतो,
आपण ताटावर बसतो आणि ती व्यक्ती हजर होते.
आपल्याला हवी असणारी गोष्ट आपण घरात कुणाला तरी सांगतो आणि त्याच क्षणी ती नाही मिळाली की, आपण व्यक्त होतो.
आपल्या आवडीच्या सार्या गोष्टी आपण घरात सांगून ठेवलेल्या असतात.
पण नावडती गोष्टी नेमकी समोर आली की, आपण लगेच पाढा वाचायला सुरुवात करतो.
असेच सगळे छोटे छोटे प्रसंग नेहमीच घडत असतात.
आणि विशेष म्हणजे आपल्या कामाची आपल्या प्रतिक्रियेची घरातील सगळ्यांना सवय देखील झालेली असते. आपल्या अशा सवयींना त्यांनी देखील स्वीकारलेलं असतं.
पण थोडंसं थांबता आलं तर नवं काहीतरी घडू शकतं. वय निश्चितच थांबवता येणारं नाही. पण सवय कुठेतरी थांबवता येईल. आणि तो थांबण्याचा कालावधी तीन मिनिटांचा आहे.
तो कालावधी संयमाचा आहे.
या छोट्या प्रसंगांचं जसं आहे. तसेच तुलनेने थोडे मोठे पण अधिक परिणाम करणारेही काही प्रसंग आहेत. जसे,
क्रियेनंतर प्रतिक्रीया किंवा फारच प्रगल्भता असेल तर प्रतिसाद देण्यासाठी केवळ संयमाचा बांध लागत नाही तरी बहुतांशी वेळा उत्तर क्रियेतच असते तेच शोधण्यासाठी समोरच्याला वेळ देण्यासाठी संयम लागतो.
वादविवादात रागावर नियंत्रण मिळवण्यासाठीच केवळ संयम लागत नाही तर सुखसंवादाचा मार्ग अशा गंभीर प्रसंगात शोधण्यासाठी संयम लागतो.
निर्णय घेतल्यानंतर परिणामांशी लढण्यासाठी संयम लागत नाही तर नेमकी फलनिष्पत्ती खचित मनाविरुद्ध असतानाही निर्णय घ्यावा लागतो, याकरिता संयम लागतो.
कर्तव्याच्या अशा सगळ्या आयामांमधे संयम अपेक्षित आहे. पण तो उपेक्षित अवस्थेत असतो. अनपेक्षित घडणाऱ्या प्रसंगांची वाट पाहण्यापेक्षा, सुरक्षितपणे संयमाचा कालावधी उपयोगात आणणे कधीही सोयीचे आहे. आणि तो संयमाचा कालावधी तीन मिनिटांचाच असतो.
जगातील सगळ्या छोट्या-मोठ्या घटना या तीन मिनिटांच्या कालावधीत घडलेल्या आहेत.
अन्यथा असे आपण अनेक वेळेला म्हणताना पाहिले आहे की,
‘थोडसं थांबायला हवं होतं’,
‘चुकून बोलून गेलो’,
‘थोडीशी घाई झाली’,
असे म्हणत नंतरचा पश्चाताप टाळण्यासाठी तीन मिनिटांचा संयमाचा कालावधी आवश्यक आहे.
अर्थातच संयम समोरच्याला जिंकण्यासाठी नसतोच मुळी. तसाच तो केवळ स्वतःला जिंकण्यासाठी ही नसतो. तर संयम समयासोबत राहण्यासाठी असतो. कारण या नश्वर जगात समय तेवढा शाश्वत आहे.
समयासोबत राहणे, हे अर्थातच प्रगतीचे आणि प्रगल्भतेचे लक्षण आहे.
‘मुमुक्षू’ आणि ‘तितिक्षा’ असे शब्दप्रयोग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमधे केले आहेत. आणि त्यांचे सुंदर विवेचनही केले आहे. पण ती कदाचित ती सिद्ध पुरुषाची लक्षणे आहेत.
अनेक संसारीक त्या मार्गावर गेलेही आहेत.
पण सर्वसामान्याला, प्रत्येकाला या मार्गावर जाण्यासाठीचे पहिले पाऊल असेल ते संयमाच्या कालावधीचे. अर्थात तीन मिनिटांचे.
©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९

1 comment:
हेमंत लेख खूपच छान आहे केवळ तीन अक्षरांचा वापर फक्त तीन मिनिटांसाठी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात योग्य रीतीने केल्यास आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याचशा चुकीच्या घटना वरती आपण ताबा मिळवू शकतो खरंतर तसं विषय खूप अवघड आहे पण तुझं लेखातून तो इतका सोप्या पद्धतीने शब्दबद्ध झाला आहे खूप छान.
Post a Comment