अगदी शुल्लक गोष्टीवरून सुरू झालेल्या गप्पांचे रुपांतर वादांत झाले. मित्र त्याचे म्हणणे मांडत होता. नि मी माझं. वस्तुस्थितीत माणसांच्या अशा वादांच्या विषयांमध्ये त्यांना स्वतःला असे काही करायचे नसते. बहुतांश वेळा गप्पांचे विषय सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी असे जागतिक स्तरावरील असतात. आणि आपलं मत मांडत असताना कुठेतरी त्याचा दुराग्रह होतो. आणि त्याचे रूपांतर पुढे वादांत होत जात असते. असेच त्या दिवशीही झाले.
गप्पांमध्ये मी अगदी संदर्भ देऊन सांगत होतो. माझं मत मांडत होतो. पण सगळं काही कळत असताना, अगदी जिवाभावाचा मित्र मात्र चुकीच्या दिशेने जात होता. त्याचे म्हणणे खोटे आहे, हे बहुदा त्यालाही कळत होते. तरीही तो त्याच्या मतांवर तो ठाम होता. माझी चिडचिड झाली. मी तसाच विषय अर्धवट टाकून निघालो. घरी पोहोचलो.
अर्थात घरी पोहोचल्यानंतर आमच्या मुखकमलावरून बायकोने ओळखलेच, आज नक्कीच कोणाशी तरी वाद झाला असेल म्हणून.
असा मानसिक हवामानाचा अंदाज बायकां व्यतिरिक्त चांगलं कोणीही सांगू शकत नाही.
हात पाय धुऊन झाल्यावर इतर कोणताही विषय न करता पाणी आणि चहाचा कप पुढे करत तिने थेट प्रश्न केला, "काय, आज कोणाशी भांडण झालं?" बरे झाले तिने विषयाला वाट मोकळी करून दिली म्हणून. मग मी ही मनातील सगळी भडास बाहेर काढली. आणि बोलून मोकळा झालो.
तर त्यावर तिने समारोपाचा विधान केलं, म्हणाली, "जाऊद्याना, आपण केवळ 'गाढवाला गोपाळशेठ म्हणावे.' "
आणि स्वयंपाकाच्या तयारीला निघून गेली.
मी मात्र आवाक झालो होतो.
माझ्या मित्रा सोबत झालेल्या एकंदरीत वादांवर तिने अगदी रामबाण उपाय दिला होता. समोरचा चुकतो आहे, कदाचित हे त्यालाही कळते आहे. आपल्याला कळत असतंच. पण समोरचा जर स्वत:चे म्हणणे मान्य करत नसेल तर ते म्हणने आपण मान्य करायचे, चुकीचे असताना देखील!
आणि 'गाढवाला गोपाळशेठ म्हणायचे'!!! अर्थात उघडपणे नाही.
वादाने भंडावून गेलेलं माझा डोकं शांत झालं. आणि लहान मुलाला जणू नवीन खेळणी मिळावी, तसा प्रचंड आनंद झाला. खुप वेळ त्या म्हणीच्या भोवती घुटमळत राहिलो. नि मग ठरवलं ज्या ज्या वेळी असे वादाचे प्रसंग निर्माण होतील, त्या त्या वेळेला हाच उपाय अवलंबवायचा, म्हणजे आपल्याला शांतता मिळेल.
या आनंदाच्या मन:स्थिती मध्ये आणखी थोडा वेळ गेला. आणि वीज कडकडावी तसा साक्षात्कार झाला.
मी बसल्या जागेवरून बायकोकडे पाहायला लागलो. की, आजवर कितीतरी वेळा आमच्या दोघांमधील वादांमध्ये तिने माझ्या म्हणण्यात हो मधे हो मिसळले होते. जणू माघार घेण्यात तिचा पुढाकार अनेक प्रसंगांमधे असायचा. मलाही विजयाचा आनंद मिळाला होताच. बहुदा माझा पुरुषीबाणाही तिने जपला होता.
म्हणजे एवढ्या वर्षात मी अनेकदा चुकलो असेल म्हणा, पण त्या प्रत्येक वेळेला बायको शांत राहिली होती आणि मला 'गोपाळशेठ' म्हणाली होती!!!
बापरे! मी मात्र समजायचो बायको खूपच 'शांत' आणि 'समजूतदार' आहे, म्हणून. पण आज कळाले याही पेक्षा ती 'चाणाक्ष' अधिक आहे.
तसा कोणत्याही पुरुषाचा संसार टिकण्यामागे बायकाच असतात म्हणा. पण तो टिकवण्याचा हा आधुनीक मंत्र खूपच भयंकर होता. अर्थात माझ्या दृष्टीने.
मी आजवर घडलेले असे सगळे वादाचे प्रसंग आठवले, आणि त्या-त्या वेळी तिने घेतलेली माघार ही आठवली. थोडासा हिरमुसून गेलो आणि बराचसा सुखावलो देखील.
हवं तर 'गोपाळशेठ'ला आनंद झाला असे म्हणा...
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९