रंगदेवतेच्या साधकांनी केलेल्या परमोच्च साधनेचे प्रसंग अगणित आहेत. बहुदा रंगदेवतिची साधना करण्याची तयारी बाळकडू मिळाल्याप्रमाणे लहानपणापासूनच अभिजात कलाकारांमध्ये असते. ज्याचे प्रकटीकरण प्रत्यक्षात प्रायोगिक किंवा व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केल्यावर होत असते. तसेच अशी रंगदेवतिची साधना कुठेना कुठेतरी रसिक प्रेक्षकही करत असतात. सगळेच कलाकार असू शकत नाहीत. पण सगळेच साधक मात्र नक्की असतात. काही रंगमंचावरील तर काही रंगमंचासमोरील.
आणि असाच प्रसंग अनुभवायला मिळाला, तो रंगमंचासमोरील रंगदेवतेच्या साधकाचा.
"काय आपण दर्दी प्रेक्षक आहोत. सतत दीड वर्ष झाले तरी परभणीतील एकही नाटक चुकवले नाही."
अशी आमच्या आजवरच्या एकंदरीत सगळ्याच नाटकांच्या उपस्थितीबद्दल मी आणि माझा मित्र एक नाटक पाहत असताना बोलत होतो. आणि ते खरंही होतं.
सर्वसाधारणपणे कॉलेज संपले की, हे सर्व छंद व्यावसायिक जीवनात लुप्त होऊन जातात. जवळ उरतात त्या फक्त आठवणी. नि मग त्याच आयुष्यभर उगाळात रहायच्या.
पण आम्ही दोघेही कॉलेज संपून नोकरी करत असताना दीड वर्ष झाले तरी कुठलेच नाटक चुकवले नव्हते. म्हणून त्या दिवशी आम्हाला खरोखरच लक्षात आलं होतं की, गेल्या दीड वर्षात घर सांभाळत असताना (तसे पाहता दोघांचेही लग्न झाले नव्हते म्हणा) नाटकांचं वेड जपलं होतं. बहुदा हा थोडासा अभिमान नि बरचसा गर्व झाला होता.
ज्या गर्वाच्या 'गर्वहरणा'चे नाटक पुढील काही क्षणातच पार पडले. आणि ज्यांच्यामुळे असे झाले ते आजी-आजोबा आमच्या शेजारीच बसलेले होते.
बहुदा त्यांनी आमचे बोलणे ऐकले होते.
थोड्या वेळानंतर आजोबा म्हणाले, "मी पुर्णेत शिक्षक आहे. पुढच्या वर्षी निवृत्त होईन. लग्नाआधी एकटा आणि लग्नानंतर आम्ही दोघं असे परभणीला नाटक पहायला येतोय. संध्याकाळी डबा घेऊन येतो. नाटक साधारण साडेबाराच्या सुमारास सुटते आणि मग रात्री एकच्या रेल्वेने परत जातो. असे आम्ही गेली जवळजवळ २८-२९ वर्ष करत आहोत."
एवढे बोलून आजोबा थांबले. अर्थातच आम्ही नि:शब्द झालो होतो. आमच्या गर्वासमोर आजोबांनी, रंगदेवतेच्या एका निस्सीम साधकाने स्वतःच्या साधनेचा प्रचंड मोठा पडदा मोकळा केला होता.
©हेमंत पोहनेरकर
3 comments:
फारच छान
Very nice
गेली 28 वर्षे आजोबांनी कुटुंबाची रंगदेवतेच्या प्रती असणारी साधना आणि हेमंत त्या दिशेने होणारी वाटचाल दोन्ही प्रेमींसाठी कौतुकास्पद आहे सर्वांचे अभिनंदन.
श्रीकृष्ण
Post a Comment