Sunday, 16 October 2022

सिंबा



सिंबा नेहमीप्रमाणे त्याच्या आई-बाबांसोबत सिंह आणि सिंहणी सोबत खेळत होता. गवतात लोळणे, झाडावर चढणे, उंचावरून पाण्यात उडी मारणे, नदीत पोहणे, आई-बाबांच्या पाठीवर बसून जंगलाची सैर करणे, धमाल मस्ती छोट्याशा सिंबाशी अशी रोज सुरू असायची.

एके दिवशी खेळता खेळता तो आई-बाबांपासून दूर गेला. आणि नेमका तिथे रानडुकरांचा कळप आला. छोट्याशा सिंबाला एकदा पाहून त्यांना वाटले, 'वा! आज तर आपल्याला सिंहाची मेजवानी आहे'. म्हणून मग एकत्रितपणे रानडुकरांनी सिंबाला सगळ्या बाजूंनी घेरले.

सिंबाला खूप भीती वाटली. तो मोठमोठ्याने रडायला लागला. त्याने अशी कधीही एवढी रानडुकरे एकदाच पाहिली नव्हती. रानडुकरे सिंबावर हल्ला करणार तोच त्यांना सिंहगर्जना ऐकू आली. 

आता घाबरून जायची वेळ रानडुकरांची होती. सुरुवातीला डरकाळीचा आवाज दुरून आला. पण काही वेळातच पुन्हा तीच सिंहगर्जना साक्षात जंगलाचा राजा देत समोर उभा आहे, असे पाहताच रानडुकरांनी पळापळ सुरू केली. काही क्षणातच रानडुकरे दिसेनाशी झाली.

परंतु सिंह त्यांना मारण्यासाठी त्यांच्या मागे धावला नाही. तो सिंबा जवळ केला. त्याने सिंबाला कुशीत घेतले. घाबरलेल्या सिंबाला आता खूप छान वाटत होते. तितक्यात सिम्बा आई देखील आली.

सगळा प्रकार लक्षात आल्यावर ती सिंबाला म्हणाली,  "तू जंगलाचा भावी राजा आहेस. तेव्हा तू असे घाबरायचे नाही. आणि रडायचे तर मुळीच नाही."

"पण एकदम एवढी रानडुकरे पाहिल्यामुळे काय करावे मला कळत नव्हते. आणि समोर तुम्ही दोघे देखील नव्हता. मग मी काय करायचे?", रडवलेल्या स्वरात सिंबा म्हणाला.

सिंहिन म्हणाली, "शुराप्रमाणे ठाम उभे राहायचे. आणि गर्जना करायची." सिंहीणीचे बोलणे मध्येच थांबवत सिंबा म्हणाला, "हो मला देखील तुमच्याप्रमाणे गर्जना करायची आहे."

"वेडा कुठला", सिंबाला पाठीवर घेत सिंह म्हणाला, "अरे गर्जना करणे हा तर आपल्यातील उपजत गुण आहे. तुला शिकायची गरज नाही. तू जसा जसा मोठा होत जाशील तशी तुला देखील गर्जना करता येईल." काहीतरी कळल्यासारखे करत मान डोलवत सिंबा बाबांच्या पाठीवर बसून पुन्हा जंगलाची सर करण्यास निघाला.

काही दिवस असेच निघून गेले. सिंबा आता मोठा होत होता. त्याचे खेळणे बागडणे सुरू होतेच.

आणि एके दिवशी असेच खेळता खेळता सिंबाला झाडाझुडपांमध्ये लपलेल्या एका महाकाय अजगरान पकडले. सिंह आणि सिंहिन त्याच्यापासून दूर होते. पण बहुदा त्याने काय होत आहे हे त्यांना दिसत नव्हते.

आता मात्र प्रसंग ओळखून सिंबा सावरला. नि त्याने एकच मोठी गर्जना केली. सगळे जंगल त्या गर्जनेने दणाणून निघाले. अजगराला तर घाम फुटला. त्याला कळालेच नाही की, आपण प्रत्यक्ष जंगलाच्या राजाला पकडले आहे. अजगराने घाबरून क्षणाच्या आत सिंबाभोवतीचा पिळ सोडला.

 सिंबा लगेच त्याच्या तावडीतून सुटला. पण पळून न जाता समोर उभा राहिला. नि त्याने पुन्हा एकदा सिंहगर्जना केली.

तितक्यात सिंबाच्या आई-बाबा देखील आले. आता अजगर दिसेनासा झाला होता. झाडाझुडपात गुडूप झाला होता.

 सिंबा ने दिलेल्या पहिल्या गर्जेनेमुळे त्याच्या आई-बाबांना सिंह आणि सिंहिनीला प्रचंड आनंद झाला होता. त्यांनी सिंबाची खूप माया केली.

 परत एकदा सिंहगर्जना करत सिंबा आई-बाबांचा पाठीवर न बसता त्यांचा सोबत डौलाने चालत चालत जंगलाचा फेरफटका मारायला निघाला.

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 2 October 2022

अलक

 मुले मोठी होत गेली तशी त्याने मुलांना लावलेली वाचनाची सवय देखील वाढत गेली.

मुलीचे लग्न ठरले. तेंव्हा ती म्हणाली, "बाबा, मला माझ्या रुखवतावर केवळ पुस्तकेच हवी आहे."

तो म्हणाला, "अश्या अवघड कल्पना राबवताना खूप अवहेलना स्वीकारावी लागते."

ती स्मित हास्य करत उत्तरली, "हि प्रगल्भता यावी म्हणूनच तुम्ही आम्हाला वाचनाची सवय लावली ना !"

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...