'तू मोठा आहेस ना', हे वाक्य ऐकून मी आता खूप कंटाळलो आहे. 'दादा' होण्याचा एवढा मोठा तोटा असतो, हे मला हे वाक्य ऐकून आता कळाले आहे.
मी आठ वर्षांचा आहे. माझी छोटी बहिण चार वर्षांची आहे. पण ती फक्त नावालाच छोटी आहे. तिचीच दादागिरी घरामध्ये असते. ती म्हणेल ती गोष्ट सगळेजणं करतात. आई, बाबा, आजी, आजोबा तिचेच लाड करतात. माझ्यासाठी पण काही गोष्टी घेऊन येतात. पण माझ्या प्रत्येक गोष्टींवर तिचा डोळा असतो. घरात खाऊ आणला की, एखाद्या खादाडखाऊ राक्षसाप्रमाणे लगेच ती फस्त करते. आणि मी आपला थोडं थोडं करून खातो. जास्त वेळ मजा यावी म्हणून. तर तिला त्याच्यातीलही हिस्सा द्यावा लागतो.
बरं खाण्यापिण्याच्या वस्तू जाऊ द्या. पण माझ्या अभ्यासाच्या आणि खेळण्याच्या वस्तू तर तिच्या कामाच्या नाहीत ना. पण त्यादेखील तिला पाहिजे असतात. आई-बाबा म्हणतात, 'अरे, ती थोडावेळ खेळेल आणि मग टाकून देईल'. पण तसे होत नाही. जोपर्यंत मला अभ्यास करायचा असतो, मला खेळायचं असतं, तोपर्यंत ती माझ्या मागेच असते. माझ्या अनेक होमवर्कवर तिने रंगरंगोटी केली आहे. आणि इथपर्यंत तिला हात लावू दिला तर आई-बाबा मलाच रागवतात. वाक्य तेच, 'तू मोठा आहेस ना! तुला कळत नाही का?'
मला खरंच कळत नाही मी कसं वागायचं? परवा माझा वाढदिवस सगळ्यांनी मिळून खुप छान साजरा केला. सगळ्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणले होते. मला ते गिफ्ट खूप आवडले. मी खूप आनंदी होतो. पण जसे जसे आम्ही गिफ्ट काढून घरात पाहत होतो, तशी या ढमाबाई ने लुडबूड करायला सुरुवात केली.
एक तर मी मुलगा, त्याहूनही माझ्या वयाचे सगळे गिफ्ट वेगळे. पझल, चेस, बुमर असे सगळे. मला सांगा हे सगळे गिफ्ट तिच्या कामाचे तरी आहेत का?
पण नाही. ती खूप रडली. मग मीही खूप रडलो. आई-बाबांना म्हणालो, "उद्या गिफ्ट खराब झाल्यावर मलाच तुम्ही रागवाल."
आणि खरंच असंच होतं नेहमी.
मी असा छोट्या बहिणीमुळे रडायला लागलो की आजी आजोबा म्हणतात, "अरे तू तर लाडोबा आहेस. तुझे खूप लाड झाले. आणि आम्ही प्रत्येक जण अगदी रोज तुझ्यासाठी काही ना काहीतरी आणायचो."
पण या सगळ्याचा काय उपयोग? मला तेव्हा कळत नव्हतं. आणि जेव्हापासून कळत आहे, तेव्हापासून या ठमाकाकूंची दादागिरी पाहतो आहे.
बरं या सगळ्यांच्या गोष्टी आपापल्या सोईप्रमाणे असतात. म्हणजे मला केवळ माझ्या छोट्या बहिणीच्या बाबतीत 'तू मोठा आहेस ना' हे वाक्य ऐकवले जाते. पण मी जर इतर काही गोष्टी करत असेल, आई-बाबा किंवा आजी-आजोबांसोबत जायचे असेल, काही करायचे असेल तर मला लगेच ऐकवतात 'तू लहान आहेस तुला कळणार नाही.'
आता असं दोन्ही बाजूने हे सगळे वागत असतील तर मला कळणार तरी कसं!
पण परवा मला काहीतरी वेगळे कळाले. नाही, यावेळेस मला कोणी समजावून नाही सांगितले. तर त्यांच्या वागण्यातून मला ते कळाले.
खुप दिवसानंतर आत्तू घरी आली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. खूप दिवस राहिली. सोबत दादू, त्याची छोटी बहिण ही होती. आम्ही खूप धमाल मस्ती केली. बाबानीही काही दिवस सुट्टी काढली होती. बाबा आत्तू पेक्षा मोठा आहे. पण बाबा अगदी प्रत्येक गोष्ट आत्तूला विचारून करत होता. तिच्या आवडीच्या वस्तू, तिला फिरायला नेणे, पिक्चर असं सगळं त्याने आत्तूच्या आवडीचे केले. आणि तिच्या सोबत खूप खूप वेळ गप्पा देखील मारल्या.
आत्तूला जेव्हा आम्ही स्टेशनवर सोडण्यासाठी गेलो तेव्हा मला थोडेसे काहीतरी वेगळे कळाले. की, बाबा असं का वागला? किंवा मी दादा आहे, मोठा आहे म्हणजेच कसं वागलं पाहिजे.
जाता जाता आत्तू बाबांना म्हणाली, "दादा, तू अगदी सगळं बाबांप्रमाणे करतो. तू माझा मोठा भाऊ आहे, याचा मला खूप अभिमान आहे."
त्या दिवसापासून मात्र मी ठरवले की, आता हा 'अभिमान' शोधायचा. तो काहीतरी भारी असतो. अगदी गिफ्टपेक्षा ही भारी.
आणि म्हणुन असं काही करायचं की, आत्तूने बोललेले वाक्य माझी छोटी बहिण देखील मला म्हणेल. थोडासा त्रास होईल, ऐकावे लागले तरी ऐकेन ते नेहमीच वाक्य 'तू मोठा आहेस ना'
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९









