भांडण
लग्नानंतर नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले. दोघांत कडाक्याचे भांडण झाले. दोघेही आपापल्या मतांवर ठाम होती. तशी ती रागारागात घर सोडून बाहेर पडली. त्यानेही तिला अडवले नाही.
थोड्या वेळानंतर मात्र तो अस्वस्थ झाला. पण स्वतःहून तिला फोन करण्याचे त्याला धाडस झाले नाही. नंतर जवळ जवळ सहा-सात तासानंतर ती घरी परतली. नि सोबत भलेमोठे सामान होते.
म्हणाली, "मला राग आला की, मी मन शांत होईपर्यंत मी शॉपिंग करण्यासाठी जात असते, आजही असेच केले."
त्यानंतर लग्नाला खुप वर्षे उलटली तरी दोघांत कधीही भांडण झाले नाही. अगदी एका अक्षराचे देखील...
२
एकता
'एकता', त्याने 'उत्स्फूर्त वक्तृत्व' स्पर्धेकरीता चिठ्ठी उचलली त्यावेळेस आलेला हा विषय.
मग पुढील तीन मिनिटांत त्याने 'एकसंघ भारताच्या एकतेतील विविधता मांडली...'
३
मुहूर्त
एकदा एका भक्ताने सद्गुरुंना प्रश्न विचारला, "एखादी चांगली गोष्ट सुरू करण्याचा मुहूर्त कसा पहावा?"
त्यावर ते सद्गुरू म्हणाले, "खरंतर मुहूर्त पाहून कार्य करणे, ही एक तांत्रिक बाब आहे. पण खरा मुहूर्त तोच ज्याक्षणी तुमच्या मनात ती चांगली गोष्ट करण्याची इच्छा निर्माण झाली..."
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

No comments:
Post a Comment