Sunday, 13 December 2020

बस




'बस'. जीला बस म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये 'एसटी' अधिक म्हणल्या गेले किंबहुना अजूनही म्हंटले जात आहे, ती ही 'बस' नेहमीच जवळची वाटत आलेली. बालपणी 'झुक झुक गाडी'चे आकर्षण होतेच. पण मामाच्या गावी किंवा इतर कुठेही जाण्यासाठी सहज उपलब्ध असलेली बसच असायची. त्यामुळे बसचा प्रवास नेहमीच आनंददायी वाटायचा.

आता बस खूप विकसित झाली आहे. साधारण तीस एक वर्षांपूर्वीची ही लालपरी काही वेगळीच होती. खिडकीची जागा तशी सगळ्यांनाच आवडते. पण मला लहानपणी आवडायची ती चालकाच्या मागची लांबलचक सीट. खिडकी पेक्षाही या सीटवर गुडघ्यांवर उभे राहून बस पुढे पुढे कशी जात आहे, हे पाहतानाची गंमत खूप छान असायची. आपल्या शेजारून धावणाऱ्या झाडांपेक्षाही समोरून धावत येऊन मागे जाणारी झाडे आणि केवळ आपल्यालाच दिसणारा समोरचा डोंगर अधिक आनंददायी असायचा.

आपली बस इतर कोणत्याही वाहनाच्या पुढे जात आहे, ही भावनादेखील नसायची. बहुदा असा आविर्भाव चालकांच्याही मनात नसावा, म्हणुनच.

एका संयमी गतीने कुणालाही घाईघाईने न ओलांडता स्वतःचा वेगात सातत्य ठेवत बस पुढे जायची.  तेव्हा रस्ते एकेरी होते. पण तरीही त्या प्रवासाची सुरक्षितता होती. आणि बहुतांश प्रवास हा दिवसाचा असायचा. कुठेही जायचे म्हटले की अंतर उणेपुरे दोन किंवा तीन तासाचे असायचे. क्वचित कधी रात्री देखील बसने प्रवास झाला. त्यात तर गंमत अधिक असायची. दिवसा पाहिलेल्या गोष्टी शोधायचो. किंवा विशेष करून किलोमीटरचा दगड शोधण्यातील मजा अधिक असायची. 

बसने प्रवास करताना वेळ किती लागतो, हा विचारही तेव्हा कल्पनेत नसायचा. उलट आपल्याला एवढे किलोमीटर जायचे आहे याचाच अधिक आनंद असायचा.

स्वाभाविकच सगळ्या सुट्ट्यांच्या कालावधीतच प्रवास व्हायचा. अर्थातच उन्हाळा असायचा, पण बसने प्रवास करताना ऊन खूप आहे, खूप तापले आहे, असे आम्हाला कधी जाणवले नाही. ना कधीही वडीलधाऱ्यांना बोलताना पाहिले. बहुदा बसमधील हा प्रवास सगळ्यांच्या अंगवळनी पडलेला होता. विशेष करून उन्हाळ्यातील.

कदाचीत त्याकाळी कुणी वातानुकूलित बस ची कुणी कल्पनादेखील केली नव्हती. अनुभव तर मुळात नव्हताच. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस अशा तीनही ऋतूंमध्ये प्रवासात कधी 'बस लागली' नाही. पण ज्यांना बस लागते त्यांच्याबद्दल कायमच राग येण्यापेक्षा वाईट अधिक वाटत आलेले आहे. कारण प्रवासाचा आनंद काही वेळ निघून जायचा.

बसमध्ये जागा मिळवणे, हा देखील एक आनंददायी प्रकार असायचा. वयाने लहान आणि प्रकृतीनेही सडपातळ त्यामुळे कधी चालकाच्या बाजूने चढून समोरची जागा मिळवायची. तर कधी उतरत असणाऱ्या प्रवाशांच्या मधून चढून आपल्या आवडत्या जागेपर्यंत पोहोचणे. सारेच मजेशीर असायचे.

बसची वाट पाहणे हादेखील एक आनंददायी प्रकार असायचा. कारण तेव्हा बसची फार वारंवारता नव्हती. त्यामुळे ठराविकच बस पकडावी लागायची. पण त्याही गर्दीमध्ये कधी कंटाळा नव्हता. लिंबूटिंबू होऊन, अर्ध्या तिकिटात खूप प्रवास केला. आजी आजोबांपासून ते आई बाबां पर्यंत सगळ्यांसोबत खूप फिरलो. त्यामुळे बालपणीच्या प्रवासाच्या आठवणी बहुतकरून या बसशीच निगडित आहेत.

आता ही बसने फिरतो. पण एकटाच असतो. नोकरीनिमित्त गावोगावी जावे लागते. बहुतांश वेळा वातानुकूलित बस उभ्या असतात. पण मी मात्र लालपरीतच बसतो. बालपण परत अनुभवायचे असते. पण एक खंत सदैव आहे, चालकाच्या मागची सीट हरवली आहे आणि त्यावरचे बालपण देखील....

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...