Sunday, 1 December 2019

तीन घासांचे प्रयत्‍न ( तो, ती आणि त्यांच्या कथा)


तिच्या नावडतीची भाजी आईने नेमकी तिच्या ताटात वाढली. तशी ती लगेच म्हणाली, "मला नाही आवडत. मी नाही खाणार".
त्या दोघांच्या लग्नानंतर, तो, ती आणि त्याची आई असा त्यांचा एकत्र बसून जेवणाचा पहिलाच योग होता. तिचं घरातील वावरणं नेमकंच सुरू झालं होतं. गेल्या काही दिवसात सातत्याने आनंदाचं वातावरण होतं. लगबग होती. सगळं कार्य अगदी शांतपणे पार पडलं होतं. आणि आता  खऱ्या अर्थाने संसाराला त्यांच्या
सुरुवात झाली होती. त्यात सासु आणि सुन, असं नातं म्हणून अनुभवण्याचा जणू पहिलाच प्रसंग आला होता.

तो तिच्याकडे पाहून खुणेने म्हणाला, "तीन घास खा, केवळ." ती बिनधास्त. म्हणाली, "मला नाही आवडत. मी एकही घास खाणार नाही".

त्याच्या आईची एकही प्रतिक्रिया नव्हती.
त्याच्या लहानपणी आईने त्याला लावलेली ही सवय, एकतर ताटात कधीच काही टाकून द्यायचे नाही. म्हणून जर नावडतीची भाजी खायचा प्रसंग ओढावलाच तर केवळ तीन घासांची भाजी ताटात घ्याची आणि ती खायची देखील. उद्देश एकच, नावडतीच्या गोष्टींची सवय असायला हवी. मग त्यासाठी वाढणाऱ्याला न दुखावता, केवळ तीन घासचं खायचे.

तिच्या थेट प्रतिक्रिया कडे दुर्लक्ष करत, इतर गप्पा मारत, त्यांची जेवणे झाली. तो मात्र अस्वस्थ होता. आणि शांत.

जेवण आटोपल्यावर तो तिला बाजूला घेऊन म्हणाला, "तुला तीन घास खायला काही अडचण होती का?" त्यावर परत एकदा तिने स्वतःचा ठाम नकार सांगितला.

मग त्याने त्याला आईने 'तीन घासांची' लहानपणी लावलेली सवय सांगितली. त्यावर ती म्हणाली, " बाळा, तू आता मोठा झाला आहेस. तुझे लग्न झाले आहे. तेव्हा असे पोरखेळ मला नाही चालणार."

अर्थातच त्याला वाटले होते, आईने लावलेली तीन घासांच्या प्रयत्नांची सवय तिला ही आवडेल. पण ती ही तिच्या सवयींवर ठाम होती.

तो हिरमसून गेला. तिलाही जाणवले. पण ती बदलणारी नव्हती. माघार घेणारी नव्हती.

मग अचानक काहीतरी सुचले असे जाणवून तो तिला म्हणाला, "आता दोन घासांचे प्रयत्न राहिले".

आता मात्र ती गालातल्या गालात हसली, म्हणाली, "हो. तीन घासांचे प्रयत्न व्हायलाच हवेत."

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 3 November 2019

माहेरची माणसं


"मामा, मावशी ही नावं भाजीवाला, दूधवाला, भांडेवाली, फरशी पुसणारी अशा लोकांसाठीच का वापरतात? यांना काका, काकू किंवा आत्या का म्हणत नाहीत ?" चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने प्रश्न केला. मी महाविद्यालयात शिकत असताना शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायचो. विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढावी त्यांना नवा दृष्टिकोन मिळावा या उद्देशाने मी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर काही प्रश्न विचारून त्यांना विचार करायला भाग पाडायचो. नाती-गोती, सणवार, परंपरा यांच्या शास्त्रीय पारंपरिक महत्वा पासून ते ब्रम्हांड पर्यंतच्या अभ्यासक्रम बाह्य सगळ्या विषयांची मांडणी त्यांच्यासमोर करायचो. तालुक्याच्या ठिकाणी जरी राहत असलो तरी तुलनेने ग्रामीण भागातच होतो. म्हणून विद्यार्थ्यांना वास्तविक आणि व्यावहारिक माहिती कळावी, त्याचा अनुभव यावा, हा दृष्टिकोन होता. म्हणून त्यादिवशी मी विद्यार्थ्यांना, "तुम्ही प्रश्न विचारा", असे म्हणून सांगितले होते. तर पहिल्याच प्रश्नांमध्ये त्या विद्यार्थिनीने मला कोड्यात पाडले होते.

खरंच, माहेरच्या माणसांच्या नावानेच ही समाजातील तथाकथित हलकी कामं करणाऱ्यांना का हाक मारली जाते!
मी शिक्षक म्हणून त्यादिवशी वेळ मारून नेली. म्हणालो, "आई इतकेच ते जवळचे वाटावे म्हणून आपण त्यांना मामा किंवा मावशी म्हणून हाक मारतो."

माझ्या उत्तराने ती विद्यार्थिनी समाधान पावली का नाही माहित नाही. परंतु मान हलवून ती खाली बसली. पण उरलेल्या तासात मग अशीच काही प्रश्न-उत्तरे झाली. तास झाला. शिकवणी संपली. पण प्रश्न संपला नव्हता. तो अधिक डोके वर काढून उभा होता.

'हलकी काम करणारी सगळी माहेरची माणसं का?' या प्रश्नाने मी चिंतेत पडलो होतो. तसाच दुखावलाही गेलो होतो. प्रवाहाच्या ओघत समाजात कालपरत्वे कूरिती निर्माण होत असतात. पण त्याच प्रमाणात या नष्टही होत असतात. त्या कधी निर्माण झाल्याची व त्यांची कारणे काय होती, हे शोधणे अशक्य असते. किंवा कारण मिळाले तरी कोणाला तरी दोष देखील देता येत नाही. कारण वर्तमानात त्यावरचा उपाय, हेच त्याच्या निराकरणासाठीचे कारण महत्त्वाचे असते.
म्हणून प्रश्नांची कारणं भूतकाळात शोधायची नाही तर उपाय शोधण्यावर लक्ष देण्याचे निश्चित केले.

खरे तर उपाय मिळाला तरी हा सामाजिक प्रश्न होता. त्यात माझ्या एकट्यामुळे निश्चितच फरक पडणार नव्हता. पण त्या विद्यार्थिनी समोर मी नि:संकोच मनाने जाऊ शकणार होतो, एवढेच. म्हणून मी प्रयत्न करायला लागलो.

आता भाजीवाला, दूधवाला, भांडे घासणारी, फरशी पुसणारी यांना कोणालाही मावशी किंवा मामा म्हणायचे नव्हते. म्हणून मी पर्यायी संबोधन शोधायला लागलो. अगदी सुरुवातीला काका किंवा काकू असे म्हणण्याचा प्रयत्न केला. परंतु एक-दोन प्रयत्नातच समोरील व्यक्तीने अगदी आश्चर्यकारक नजरेने माझ्याकडे पाहिले. बळजबरीचा रामराम  शक्य होणार नव्हता. म्हणून तो प्रयोग फसला. मला परत असे करता आले नाही.

थोडासा अधिक विचार करून काही दिवसांनी या सगळ्यांना मी भाऊ किंवा ताई असे हाक मारायचे ठरवले. परंतु वयातील अंतराने तेही जमेनासे झाले.
महाविद्यालयात शिकत होतो. चार पुस्तक वाचयला लागलो होतो. त्यात शिकवणीही घेत होतो. म्हणून असाही विचार केला की, कधीतरी कोणाला 'सर' म्हणून उल्लेख करावा. पण हे ग्रामीण भागात शक्यच नव्हते. म्हणून हा केविलवाणा विचार तिथेच सोडून दिला.

मग आता अशा ज्या-ज्यावेळी अशी कोणतीही व्यक्ती समोर आली तरी 'ओ' शब्दावर मग मी वेळ मारून न्यायला लागलो. पण प्रश्न मानगुटीवर चांगलाच बसला होता. माझा पिच्छा सोडायला तयार नव्हता. यात कालावधीही खुप गेला. पूढेपूढे मार्गही दिसेनासा झाला. आणि मग थोडासा विसरही पडला.

पण एका मंगल दिवशी नवा दृष्टिकोन मिळाला. नवरात्रातील नवमीचा दिवस होता. अर्थात नवरात्रातील नवमी म्हणजे कुलाचाराचे नवमी. घरी सवाष्ण-ब्राम्हणाला जेवायला बोलावले जायचे.
परंतु त्या दिवशी थोडेसे वेगळे झाले होते. कदाचित माझ्या मनात पडलेला गेल्या दोन-तीन महिन्यातील हा प्रश्न आई-बाबांना कळाला होता की काय, कोणास ठाऊक? बहुधा त्यांनी मला कृतीतून याचे उत्तर द्यायचे ठरवले होते, असे असावे.

त्यादिवशी आई-बाबांनी आमच्या घरी येणारे दूधवाले आणि भांडेवाली यांना जेवायला बोलावले होते.
मी केवळ आश्चर्यचकीत होऊन हे सगळे पाहत होतो.
जेवणे झाली. आणि त्यानंतर आई-बाबांनी त्यांना आहेरही केला. भांडेवाली आणि दूधवाला यांच्या चेहऱ्यावरील कृतार्थतेचा भाव मी स्पष्टपणे पाहू शकत होतो. त्यांच्या प्रमाणे मीही भारावून गेलो होतो. आणि निघत असताना ते जेव्हा आई बाबांच्या पाया पडले. तेव्हा म्हणाले, "आई-बाबा, तुम्ही आम्हाला घरी बोलून जो मान दिला त्याचे खूप उपकार झाले."

एकाच क्षणाला मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दोन प्रकारे मिळाले होते. एक कृतीतून तर दुसरे संबोधनातून. आई-बाबांनी प्रत्यक्ष कृतीमधून व्यक्ती त्याच, संबोधने तीच, परंतु व्यवहार बदलला होता. म्हणून मी समाधानी झालो होतो.
तर दुसरीकडे दुधवाला आणि भांडवाली यांनी संबोधने बदली होती. ज्या माहेरच्या माणसांपासून वेगळी संबोधने शोधायचा मी प्रयत्न करत होतो, त्याऐवजी 'आई' असा उल्लेख करून त्यांनी मला नवा दृष्टिकोन आणि नवीन संबोधन दिले होते.

आता माझ्या मनातील मळभ दूर झाले होते. मनातील संकोच निघून गेला होता. त्या विद्यार्थिनी समोर तर निसंकोच पणे जाऊ शकणार होतो. पण तिच्या प्रश्नामुळे मला नवी दृष्टी आणि नात्यांतील नवी सृष्टी मिळाली होती.

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

Thursday, 17 October 2019

गाढवाला गोपाळशेठ म्हणावे


अगदी शुल्लक गोष्टीवरून सुरू झालेल्या गप्पांचे रुपांतर वादांत झाले. मित्र त्याचे म्हणणे मांडत होता. नि मी माझं. वस्तुस्थितीत माणसांच्या अशा वादांच्या विषयांमध्ये त्यांना स्वतःला असे काही करायचे नसते. बहुतांश वेळा गप्पांचे विषय सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी असे जागतिक स्तरावरील असतात. आणि आपलं मत मांडत असताना कुठेतरी त्याचा दुराग्रह होतो. आणि त्याचे रूपांतर पुढे वादांत होत जात असते. असेच त्या दिवशीही झाले.

गप्पांमध्ये मी अगदी संदर्भ देऊन सांगत होतो. माझं मत मांडत होतो. पण सगळं काही कळत असताना, अगदी जिवाभावाचा मित्र मात्र चुकीच्या दिशेने जात होता. त्याचे म्हणणे खोटे आहे, हे बहुदा त्यालाही कळत होते. तरीही तो त्याच्या मतांवर तो ठाम होता. माझी चिडचिड झाली. मी तसाच विषय अर्धवट टाकून निघालो. घरी पोहोचलो.

अर्थात घरी पोहोचल्यानंतर आमच्या मुखकमलावरून बायकोने ओळखलेच,  आज नक्कीच कोणाशी तरी वाद झाला असेल म्हणून.
असा मानसिक हवामानाचा अंदाज बायकां व्यतिरिक्त चांगलं कोणीही सांगू शकत नाही.

हात पाय धुऊन झाल्यावर इतर कोणताही विषय न करता पाणी आणि चहाचा कप पुढे करत तिने थेट प्रश्न केला, "काय, आज कोणाशी भांडण झालं?" बरे झाले तिने विषयाला वाट मोकळी करून दिली म्हणून. मग मी ही मनातील सगळी भडास बाहेर काढली. आणि बोलून मोकळा झालो.
तर त्यावर तिने समारोपाचा विधान केलं,  म्हणाली, "जाऊद्याना, आपण केवळ 'गाढवाला गोपाळशेठ म्हणावे.' "
आणि स्वयंपाकाच्या तयारीला निघून गेली.
मी मात्र आवाक झालो होतो.

माझ्या मित्रा सोबत झालेल्या एकंदरीत वादांवर तिने अगदी रामबाण उपाय दिला होता. समोरचा चुकतो आहे, कदाचित हे त्यालाही कळते आहे. आपल्याला कळत असतंच. पण समोरचा जर स्वत:चे म्हणणे मान्य करत नसेल तर ते म्हणने आपण मान्य करायचे, चुकीचे असताना देखील!
आणि 'गाढवाला गोपाळशेठ म्हणायचे'!!! अर्थात उघडपणे नाही.

वादाने भंडावून गेलेलं माझा डोकं शांत झालं. आणि लहान मुलाला जणू नवीन खेळणी मिळावी, तसा प्रचंड आनंद झाला. खुप वेळ त्या म्हणीच्या भोवती घुटमळत राहिलो. नि मग ठरवलं ज्या ज्या वेळी असे वादाचे प्रसंग निर्माण होतील, त्या त्या वेळेला हाच उपाय अवलंबवायचा, म्हणजे आपल्याला शांतता मिळेल.

या आनंदाच्या मन:स्थिती मध्ये आणखी थोडा वेळ गेला. आणि वीज कडकडावी तसा साक्षात्कार झाला.
मी बसल्या जागेवरून बायकोकडे पाहायला लागलो. की, आजवर कितीतरी वेळा आमच्या दोघांमधील वादांमध्ये तिने माझ्या म्हणण्यात हो मधे हो मिसळले होते. जणू माघार घेण्यात तिचा पुढाकार अनेक प्रसंगांमधे असायचा. मलाही विजयाचा आनंद मिळाला होताच. बहुदा माझा पुरुषीबाणाही तिने जपला होता.
म्हणजे एवढ्या वर्षात मी अनेकदा चुकलो असेल म्हणा, पण त्या प्रत्येक वेळेला बायको शांत राहिली होती आणि मला 'गोपाळशेठ' म्हणाली होती!!!

बापरे! मी मात्र समजायचो बायको खूपच 'शांत' आणि 'समजूतदार' आहे, म्हणून. पण आज कळाले याही पेक्षा ती 'चाणाक्ष' अधिक आहे.

तसा कोणत्याही पुरुषाचा संसार टिकण्यामागे बायकाच असतात म्हणा. पण तो टिकवण्याचा हा आधुनीक मंत्र खूपच भयंकर होता. अर्थात माझ्या दृष्टीने.

मी आजवर घडलेले असे सगळे वादाचे प्रसंग आठवले, आणि त्या-त्या वेळी तिने घेतलेली माघार ही आठवली. थोडासा हिरमुसून गेलो आणि बराचसा सुखावलो देखील.
हवं तर 'गोपाळशेठ'ला आनंद झाला असे म्हणा...

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

Monday, 7 October 2019

साधना रंगदेवतेची


रंगदेवतेच्या साधकांनी केलेल्या परमोच्च  साधनेचे प्रसंग अगणित आहेत. बहुदा रंगदेवतिची साधना करण्याची तयारी बाळकडू मिळाल्याप्रमाणे लहानपणापासूनच अभिजात कलाकारांमध्ये असते. ज्याचे प्रकटीकरण प्रत्यक्षात प्रायोगिक किंवा व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केल्यावर होत असते.  तसेच अशी रंगदेवतिची साधना कुठेना कुठेतरी रसिक प्रेक्षकही करत असतात. सगळेच कलाकार असू शकत नाहीत. पण सगळेच साधक मात्र नक्की असतात. काही रंगमंचावरील तर काही रंगमंचासमोरील.

आणि असाच प्रसंग अनुभवायला मिळाला, तो रंगमंचासमोरील रंगदेवतेच्या साधकाचा.

"काय आपण दर्दी प्रेक्षक आहोत. सतत दीड वर्ष झाले तरी परभणीतील एकही नाटक चुकवले नाही."
अशी आमच्या आजवरच्या एकंदरीत सगळ्याच नाटकांच्या उपस्थितीबद्दल मी आणि माझा मित्र एक नाटक पाहत असताना बोलत होतो. आणि ते खरंही होतं.
सर्वसाधारणपणे कॉलेज संपले की, हे सर्व छंद व्यावसायिक जीवनात लुप्त होऊन जातात. जवळ उरतात त्या फक्त आठवणी. नि मग त्याच आयुष्यभर उगाळात रहायच्या.

पण आम्ही दोघेही कॉलेज संपून नोकरी करत असताना दीड वर्ष झाले तरी कुठलेच नाटक चुकवले नव्हते. म्हणून त्या दिवशी आम्हाला खरोखरच लक्षात आलं होतं की, गेल्या दीड वर्षात घर सांभाळत असताना (तसे पाहता दोघांचेही लग्न झाले नव्हते म्हणा‌‌) नाटकांचं वेड जपलं होतं. बहुदा हा थोडासा अभिमान नि बरचसा गर्व झाला होता.

ज्या गर्वाच्या 'गर्वहरणा'चे नाटक पुढील काही क्षणातच पार पडले. आणि ज्यांच्यामुळे असे झाले ते आजी-आजोबा आमच्या शेजारीच बसलेले होते.
बहुदा त्यांनी आमचे बोलणे ऐकले होते.

थोड्या वेळानंतर आजोबा म्हणाले, "मी पुर्णेत शिक्षक आहे. पुढच्या वर्षी निवृत्त होईन. लग्नाआधी एकटा आणि लग्नानंतर आम्ही दोघं असे परभणीला नाटक पहायला येतोय. संध्याकाळी डबा घेऊन येतो. नाटक साधारण साडेबाराच्या सुमारास सुटते आणि मग रात्री एकच्या रेल्वेने परत जातो. असे आम्ही गेली जवळजवळ २८-२९ वर्ष करत आहोत."

एवढे बोलून आजोबा थांबले. अर्थातच आम्ही नि:शब्द झालो होतो. आमच्या गर्वासमोर आजोबांनी, रंगदेवतेच्या एका निस्सीम साधकाने स्वतःच्या साधनेचा प्रचंड मोठा पडदा मोकळा केला होता.

©हेमंत पोहनेरकर

Wednesday, 25 September 2019

लाडो


दारावरची बेल वाजली.
आई हातामधे पोळीचा तुकडा घेऊन तयार होतीच. लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी पहिल्यांदा घरी येत आहे, तिला ओवाळायचे आहे, म्हणून. सबंध रात्रभर कोणालाही डोळा लागला नाही. तशी तिची पोहोचण्याची वेळ सकाळी सात ते आठच्या सुमारास होती.  धाकटा भाऊ तिला घ्यायला गेला होता. पण त्याला ही जाऊन बराच वेळ झाला होता. तिचे आई आणि बाबा अगदी आतुरतेने तिची वाट पाहत होते.

आणि विशेष करून तिचे बाबा. तिचा जन्म झाल्यानंतर, पहिली मुलगी झाल्यानंतर अगदी ज्याकाळी मुलगाच पाहिजे, असाच समज असायचा त्याकाळी तिच्या वडिलांनी सगळ्यांना अगदी वेड्याप्रमाणे पेढे वाटले होते. कितीतरी आनंद त्यांना झाला होता. त्यांनी कधीही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला नाही.

आईने दार उघडले. तिच्या अंगावरून पोळीचा तुकडा उतरवून बाजूला ठेवला. पायावर पाणी घातलं न घातलं तोच आई समोर असताना तिचा प्रश्न, "बाबा कुठे आहेत?" आईला हे माहीत होतेच की, तिचा हा प्रश्न येणार म्हणून. आई काही बोलायच्या आत सगळं सामान धाकट्या भावाजवळ दारात सोडून ती तशीच घरात शिरली.

ते पूजा करत होते. तिच्या लहानपणी जसे ते तिला हाक मारायचे अगदी तशीच आज सासुरवाशीण झालेल्या मुलीला त्यांनी तशी हाक मारली, "लाडोsss".

सोवळ्यात पूजा करत असलेल्या बाबांना ती तशीच बिलगली. ही तिची वेळ नि  सवय लहानपणापासूनची. बाबा पूजेला बसलेले असायचे आणि तिची उठायची वेळ एकच असायची. मग ती तशीच पारश्यानेच बाबांच्या मांडीवर जाऊन पूजेला बसायची. आज अनेक वर्षांनी तसाच प्रसंग आला होता.
धाकटा भाऊ आणि आई हे दृश्य पाहत होतेच. पण आता त्या दोघांनाही या गोष्टीची सवय झाली होती. या बाप लेकीला रागावून काही उपयोग नाही.
तिच्या कोणत्याच गोष्टीला त्यांनी कधीही विरोध केला नाही, उपदेश केले नाही, शिकवले नाही, केवळ जीव लावत गेले.

डोळ्यातून वाहणाऱ्या आनंद अश्रूंचा ओघ कमी झाल्यानंतर तिने नेमका हाच प्रश्न बाबांना विचारला,
"तुम्ही मला एवढा जीव का लावला?"
कार्त्यव्याचे कठोर दायित्व पार  पडणाऱ्या पित्याला जणू  त्यांच्या कन्येने थेट प्रश्न विचारला होता की, 'नात्यांमधे 'कर्तव्य' आणि 'प्रेमा'ची सांगड कशी घालायची ?'

ते हसले म्हणाले, "लाडो, तू आहेसच गोड, म्हणून."
ती म्हणाली, "नाही. मला खरं उत्तर हवं आहे."
तिचे बाबा म्हणाले, "वेडाबाई, तुम्ही बायकां स्वयंपाक करत असताना, तो अधिक गोड व्हावा, अधिक तृप्तता वाटावी म्हणून त्यात जीव ओतता. अगदी तसेच मी तुला जीव लावला, एवढेच."

पण अशा कोणत्याच वेगळ्या उत्तराने तिचे समाधान होणार नव्हते.
ती म्हणाली, "नाही. मला  नेमके उत्तर हवे आहे."

मग तिचे बाबा म्हणाले, "तुम्ही मुली मुळातच खूप गुणी असता. आईच्या पोटातून सगळं काही शिकुन येता. आम्हां पुरुषांना शिकण्याची खरी गरज असते. म्हणून मी नेहमी या गधड्याला रागवत असतो. तुम्हाला वेगळं काही शिकण्याची मूळी गरज नसते.
पण कोणतेही नाते तीन मूळ गोष्टींवर टिकून असते.
आणि त्या तीन गोष्टी म्हणजे,
'प्रेम', 'विश्वास' आणि 'आदर'.
आणि त्यात तुम्ही मुली 'गृहिणी' झाल्यावर दोन्ही घरांची ओळख बनता, म्हणून या तीनही गोष्टींचे संस्कार तुला न शिकवता मी उदाहरणांमधून मांडत गेलो आणि त्याकरिता 'जीव लावत' गेलो. एवढेच."

आता तिने बाबांच्या पोटाशी अजूनच घट्ट आवळले. आनंदाश्रू आता थांबत नव्हते.

सकाळच्या देवपूजेच्या मंगलप्रसंगी अगदी देवादिकांनाही धन्यता वाटावी, असं जीवनातील प्रत्येक नात्यांचं सार बाबांनी लाडो समोर मांडलं होतं.

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

Sunday, 4 August 2019

कुपमंडूक - कथा उत्तरार्धाची


समुद्रातील बेडुक शेवटी विहिरीतल्या बेडकाला खूप त्रासून, अगदी वैतागून म्हणाला की, " तू चल माझ्यासोबत समुद्र पाहण्यासाठी अन्यथा तू 'कुपमंडूक'च राहशील."

आता ही गोष्ट विहिरीतल्या बेडकाला चांगलीच जिव्हारी लागली. म्हणून त्याने मान्य केले. ज्याला तो 'जग' समजत होता त्याच्या बाहेर काही आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे त्याने ठरवले. जी गोष्ट कधी पाहिलीच नाही,  तिच्यावर केवळ कल्पनेने कसा विश्वास ठेवायचा? म्हणून, प्रत्यक्ष अनुभूतीसाठी तो बाहेर पडला.

दोघीही समुद्राजवळ आले. समुद्राची केवळ दृष्टीने दिसणारी व्यापकता पाहून विहिरीतला बेडूक हिरमुसून गेला. त्याला खूप दुःख झाले. 'कशाला आपण जग म्हणायचो?', या विचाराने तो खूपच खिन्न झाला.

पुढे, त्या समुद्रातील बेडकाने त्याला समुद्राची सफारी करविली. अगदी ढेकीमधे तो त्याला सगळीकडे मिरवत होता. सगळ्या जीवांची ओळख करून दिली. वनस्पती दाखवल्या.
विहिरीतील बेडकाने अनेक वेळा समुद्राची खोली मोजण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक वेळेस तो अपयशी ठरला. अनेक वेळा समुद्राला कवेत घेण्याचा केविलवाणा प्रयत्न ही त्याने केला. पण तो पुरता थकून गेला. एक प्रकारचा त्याच्यात न्यूनगंड तयार झाला की, आपण कसे जीवन जगत होतो.

म्हणून मग त्याने बदल म्हणून काही दिवस समुद्रातील बेडकांसोबत घालवायचे ठरवले. त्यांच्यासोबत तो फिरला. बाहेरचे व्यावहारिक जग कसं आहे, याचा त्याने अनुभव घेतला. भावना आणि व्यवहार यांचा संबंध कसा आहे, हे त्याने ओळखलं.

आणि असं सगळं सार रूपाने स्वतःच्या मनात साठवून तो परत विहिरीकडे, स्वतःच्या जगाकडे जायला निघाला.

पण आता विहिरीतल्या बेडकाला जाताजाता काय अनुभव आला आणि त्याच्या दृष्टिकोनात काय बदल झाला, हे पहावे म्हणून समुद्रातील बेडकाने तसा विहिरीतल्या बेडकाला प्रश्न विचारला.

क्षणभरासाठी उत्तर द्यावे न द्यावे, या विचारानी विहिरीतला बेडूक थांबला. पण न राहून तो समुद्रातल्या बेडकाला म्हणाला, "तुझं म्हणणं खरं होतं. तुमचं जग खूप मोठा आहे. विशालतेची अगदी शब्दशः अनुभूती मला आली. पण मी तेवढाच दुःखी झालो आहे. आणि माझ्या दुःखाचे कारण तुम्ही आहात."

या वाक्याने मात्र समुद्रातील बेडूक आश्चर्यचकित झाला.

"जेवढे तुमचे जग मोठे आहे. तेवढेच तुमचे मन संकुचित आहे. माझ्याजवळ दृष्टिकोणच नव्हता. पण तुमच्या जवळ असून तुम्ही आत्मसंतुष्ट आहात. केवळ स्वतःच्याच म्हणणं खरं आहे, असा तुमचा प्रत्येकाचा व्यवहार असतो. तुमच्या जगात इतरांना स्थान नाही", विहिरीतल्या बेडकाने आपले म्हणणे पुर्ण केले.

समुद्रातील बेडूक खूप मोठा विजेचा झटका लागुन सावरावे, तसे जागा झाला. अर्थातच त्याचा एकंदरीत प्रयत्न हाच होता की, आपलं मोठं जग त्याला दाखवावे. त्याचे जग व्यापक व्हावे, या  दृष्टिकोणातून समुद्रातील बेडकाने विहिरीतल्या बेडकासाठी प्रयत्नच केला नव्हता.

आणि आता 'कुपमंडूक' कुणाला म्हणावे? या प्रश्नाच्या विचारात तो गुरफटून गेला...



©हेमंत पोहनेरकर 
९५९५९६९९८९

Friday, 19 July 2019

नाही


'नाही'.
दोन अक्षरीच शब्द पण मन दुखावणारा. अगदी एखादं वाक्य किंवा उतारा हवा आहे, असेही नाही. मन दु:खी व्हायला 'नाही' हा दोन अक्षरी शब्द पुरेसा आहे.

पण गंमत अशी की, 'नाही' असो वा 'हो' असो, हे दोन्ही शब्दांच उगमस्थान एकच. आणि ते म्हणजे नाभी. अर्थात उत्तर पोटातून दिलेले असते, आणि म्हणूनच की काय, कदाचित त्याचा परिणाम मार्गात येणाऱ्या हृदयावरती होतो.

'नाही' हा मग प्रेमातील असो वा व्यवहारातील मन मोडणे हे पक्कच आहे. अर्थातच उत्तराची प्रतिक्षा करणारा हा नेहमीच आशाळभूत असतो. त्याचे कष्ट वा त्याची इच्छा वा त्याचा काही व्यक्तिगत लाभ ही असू शकतो, पण 'नाही' ऐकताच विषय संपतो.

आणि क्वचित प्रसंगी नवीन विषय पण निघत नाही. कारण 'नाही' ऐकल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल मनात कुठेतरी आढी  निर्माण होते. आपली मागणीच काय ती आपल्याला योग्य वाटत असते. आणि बहुतांशवेळा तिच्या अनुकूल घडावं वाटणे  पण स्वाभाविक आहे.

पण बहुदा 'नाही' ऐकणे हे सहन करणे हे वर पाहता अवघड किंवा नकोसे वाटते.

परंतु त्याहीपेक्षा 'नाही' म्हणणे, हे जास्त कठीण आहे. विंदांच्या 'देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या' कवितेप्रमाणे आहे. 'नाही' म्हणायला नुसतंच धाडस असावं लागत  नाही तर मन नाजूकही असावं लागतं. 'नातं तुटले तर ?' हा विचार मनात येण्यापूर्वी, 'हो' म्हणुन बळजबरीने इच्छा नसताना प्रसंग ओढवून नात्यातील रुक्षता टाळण्याइतकं मन प्रगल्भ असावं लागतं.

हा सगळा केवळ दृष्टिकोनातील फरक नाही तर दूरदृष्टी देखील असावी लागते.

'नाही' म्हणण्याचे परिणाम काही काळापुरते आहेत. पण 'नाही' म्हणायचं असताना 'हो' म्हणाल्यावर जास्त काळ सोसावे लागते. आणि विशेष करून 'नाही' म्हणणार्‍याला जास्त सहन करावं लागतं. 

आणि अनेकवेळा या 'नाही'च्या ऐवजी  काही नवे पर्याय शब्द 'नाही' म्हणायचं असणाऱ्याला सापडतात.

आणि ते म्हणजे, 'पहातो',  'सांगतो', 'बघतो'.

थेट 'नाही' म्हणायचं धाडस नसतं. समोरच्याच्या मनाचा अधिक विचार झालेला असतो. किंबहुना नातं नाजूक असतं. 'नाही' म्हणणं नवीन नात्यात वितुष्ट निर्माण करेल, असं वाटत असतं, म्हणून 'नाही' ऐवजी 'सांगतो',  'पाहतो', 'बघतो' म्हटलं की, सुटका झाल्यासारखं वाटतं.

पण खरंतर हे पर्यायी शब्द देवून 'नाही' म्हणायचं टाळणारा अधिक अडकतो. कारण आता समोरचा आश्वासित झाल्यासारखा राहतो. त्या प्रत्यक्ष प्रसंगा पर्यंत त्याची वाट पाहत असतो. थोड्याच वेळात 'सांगतो' म्हणाले होते, ते आता 'हो' म्हणतील. कदाचीत प्रसंग जवळजवळ येत असताना 'सांगतो' म्हणाले होते ते केवळ टाळण्यासाठीच, ही भावना मनामध्ये जागी होते. आणि अशावेळी या 'नाही' न म्हणण्यामूळे मन अधिक दुखावले जाते.

प्रसंग निघून जातो. 'नाही' न म्हणल्याचा कालावधीही लोटतो. आणि दोघांची प्रत्यक्ष भेट होते. आणि 'नाही' न म्हणू शकलेला नमस्कार-चमत्कार करण्यापूर्वीच स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करतो. की तो का, 'सांगतो', 'पाहतो', 'बघतो', असे म्हणाला होता. आणि कसे त्याला जमले नाही.

आणि या क्षणाला मात्र दोघांनाही माहित असतं की, ही वरवरची मलमपट्टी आहे. दोघेही उसणं हसू तोंडावर घेउन, असं होतच असतं, अशी स्वतःची फसवणूक करून निघून जातात.

'नाही' म्हणण्याचे धाडस परत कधी करू असं, म्हणून प्रसंग निभावून नेला जातो. पण तो पुढचाही 'नाही' म्हणण्याचा प्रसंग कधी येत नाही.

तेव्हा एक गोष्ट स्वीकारायला हवी, जेव्हा 
जेव्हा प्रेमात होकार घ्यायचा असतो किंवा द्यायचा असतो, त्या वेळेला 'हो' म्हणून सांगण्यासाठी प्रत्येक वेळेला शब्दांची गरज भासत नाही. 'या हृदयीचे त्या हृदयी',  असं प्रेमात शक्य होतं.

तर तेवढ्याच पवित्र, स्वच्छ आणि नि:संकोच मनाने 'नाही' म्हटलं तर स्वीकारले जाईल ना. नाही का?

©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९


Saturday, 6 July 2019

संयमाचा कालावधी



तीन मिनिट.
संयमाचा कालावधी सांगत असताना अगदी कुठल्याही लेखाला असणारी प्रस्तावना असावी तशी करता, अगदी तीन वाक्य, तीन शब्द किंवा तीन अक्षरही थांबता येईल, एवढा संयम एव्हाना  नसल्यामुळे पहिल्याच अक्षरात किंवा शब्दात संयमाचा कालावधीत सांगून टाकला.

तसेच आपल्याला फ्लॅशबॅकचीही आता खुप सवय झाली आहे. कथानकाच्या शेवटाशी संबंधित प्रसंग सुरुवातीला सांगायचा नंतर कथानक रंगवत न्यायचं, हा साहित्याचा अत्यंत सुंदर प्रकार आहे. पण या प्रकारातही संयम लागतोच. असो.

वैयक्तिक संयम सामाजिक संयम अशी बहुदा संयमाची विभागणी देखील करता येईल. पण तूर्तास वैयक्तिक संयमाचा सुविचार करूया.

अगदी छोटया छोटया उदाहरणांपासून सुरुवात केली, तर काही प्रसंग अनुभवास आलेले असतील. जसे,

बराच वेळ आपण कोणासाठी तरी वाट पाहून पाहून थकतो, मग निघून जातो. आणि नंतर लक्षात येतं, कळतं की, ती व्यक्ती पुढच्या काही मिनिटातच पोहोचली होती.
हाच प्रसंग कोणाची तरी घरी जेवणाकरिता वाट पाहत असताना देखील घडतो,
आपण ताटावर बसतो आणि ती व्यक्ती हजर होते.

आपल्याला हवी असणारी गोष्ट आपण घरात कुणाला तरी सांगतो आणि त्याच क्षणी ती नाही मिळाली की, आपण व्यक्त होतो.

आपल्या आवडीच्या सार्या गोष्टी आपण घरात सांगून ठेवलेल्या असतात.
पण नावडती गोष्टी नेमकी समोर आली की, आपण लगेच पाढा वाचायला सुरुवात करतो.

असेच सगळे छोटे छोटे प्रसंग नेहमीच घडत असतात.
आणि विशेष म्हणजे आपल्या कामाची आपल्या प्रतिक्रियेची घरातील सगळ्यांना सवय देखील झालेली असते. आपल्या अशा सवयींना त्यांनी देखील स्वीकारलेलं असतं.

पण थोडंसं थांबता आलं तर नवं काहीतरी घडू शकतं. वय निश्चितच थांबवता येणारं नाही. पण सवय कुठेतरी थांबवता येईल. आणि तो थांबण्याचा कालावधी तीन मिनिटांचा आहे.
तो कालावधी संयमाचा आहे.

या छोट्या प्रसंगांचं जसं आहे. तसेच तुलनेने थोडे मोठे पण अधिक परिणाम करणारेही काही प्रसंग आहेत. जसे,

क्रियेनंतर प्रतिक्रीया किंवा फारच प्रगल्भता असेल तर प्रतिसाद देण्यासाठी केवळ संयमाचा बांध लागत नाही तरी बहुतांशी वेळा उत्तर क्रियेतच असते तेच शोधण्यासाठी समोरच्याला वेळ देण्यासाठी संयम लागतो.

वादविवादात रागावर नियंत्रण मिळवण्यासाठीच केवळ संयम लागत नाही तर सुखसंवादाचा मार्ग अशा गंभीर प्रसंगात शोधण्यासाठी संयम लागतो.

निर्णय घेतल्यानंतर परिणामांशी लढण्यासाठी संयम लागत नाही तर नेमकी फलनिष्पत्ती खचित मनाविरुद्ध असतानाही निर्णय घ्यावा लागतो, याकरिता संयम लागतो.

कर्तव्याच्या अशा सगळ्या आयामांमधे संयम अपेक्षित आहे. पण तो उपेक्षित अवस्थेत असतो. अनपेक्षित घडणाऱ्या प्रसंगांची वाट पाहण्यापेक्षा, सुरक्षितपणे संयमाचा कालावधी उपयोगात आणणे कधीही सोयीचे आहे. आणि तो संयमाचा कालावधी तीन मिनिटांचाच असतो.

जगातील सगळ्या छोट्या-मोठ्या घटना या तीन मिनिटांच्या कालावधीत घडलेल्या आहेत.
अन्यथा असे आपण अनेक वेळेला म्हणताना पाहिले आहे की,
थोडसं थांबायला हवं होतं’,
चुकून बोलून गेलो’,
थोडीशी घाई झाली’,
असे म्हणत नंतरचा पश्चाताप टाळण्यासाठी  तीन मिनिटांचा संयमाचा कालावधी आवश्यक आहे.

अर्थातच संयम समोरच्याला जिंकण्यासाठी नसतोच मुळी. तसाच तो केवळ स्वतःला जिंकण्यासाठी ही नसतो. तर संयम समयासोबत राहण्यासाठी असतो. कारण या नश्वर जगात समय तेवढा शाश्वत आहे.
समयासोबत राहणे, हे अर्थातच प्रगतीचे आणि प्रगल्भतेचे लक्षण आहे.

मुमुक्षूआणितितिक्षाअसे शब्दप्रयोग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमधे केले आहेत. आणि त्यांचे सुंदर विवेचनही केले आहे. पण ती कदाचित ती सिद्ध पुरुषाची लक्षणे आहेत.
अनेक संसारीक त्या मार्गावर गेलेही आहेत.
पण सर्वसामान्याला, प्रत्येकाला या मार्गावर जाण्यासाठीचे पहिले पाऊल असेल ते संयमाच्या कालावधीचे. अर्थात तीन मिनिटांचे.


©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९









सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...