Sunday, 28 August 2022

अलक

 त्यां दोघांत बऱ्याच दिवसांत भांडण झाले नव्हते.

दोघांनाही काहीतरी चुकल्याचुकल्या सारखं वाटत होतं.

मग त्याने तिच्या माहेरचा विषय काढला.

Monday, 22 August 2022

अलक

 जरठ- कुमारी विवाह प्रथा बंद झाली, हे कुटुंब कल्याण विभााचे फार मोठे यश आहे, असे मानत शासनाने मोठा कार्यक्रम घेतला.

त्याची बातमी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्रकाशित करण्यात आली.

त्याच शेजारी दुसरी बातमी छापलेली होती, 'सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याचा नवोदित तरुण अभिनेत्रीशी प्रेमविवाह.'

Sunday, 21 August 2022

हेल-बॉपचा धूमकेतू

 

अवकाश विज्ञाना विषयी हा लेख नाही. परंतु मनातील एका अविष्कारा विषयी निश्चितच आहे. नव्हे मनातील अवकाश एवढे विस्तृत आणि विशाल असते की, त्यात अनेक धूमकेतूंची भावतरंग उठत असतात. असो.

हेल आणि बॉप या दोन वेगवेगळ्या खगोलशास्त्रज्ञांनी एकाच दिवशी अवकाशातील एका नव्या धूमकेतूंची नोंद केली. ही घटना साधारण १९९५-९६ च्याकाळातील आहे. वर्तमानपत्रातून यावर प्रकाशित झालेले अनेक लेख वाचले. ग्रहताऱ्यांचे, आकाशगंगे विषयीचे कुतूहल होतेच. परंतु या घटनेत मुख्य लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे 'एकाच वेळी दोन वेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या शास्त्रज्ञांनी एकाच गोष्टीचा लावलेला शोध'.

वैज्ञानिक इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे होते की, दोन भिन्न व्यक्ती एकाच वेळी एकाच गोष्टीचा शोध लावला. ही गोष्ट वारंवार मनात घोळत राहिली.

आणि जाणवले की, चांगल्या-नव्या गोष्टींच्या शोधा करिता आपण प्रयत्न केला नाही तर त्याच वेळेला त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणारा अन्य कुणी तरी यशस्वी होऊ शकतो. अर्थात नवनवीन कल्पना या आपल्या प्रमाणे इतरांच्याही मनात येत असतात. आणि कदाचित हुबेहूब तीच कल्पना जी की आपल्या मनात आहे, ती कोणताही फरक न असता.

पण आपण त्या दिशेने पावले उचलली, प्रत्यक्ष कल्पना साकार करण्याकरीता अपार कष्ट घेतले. तर खचितच ती कल्पना आपल्या स्वतःच्या नावाने नवारुपास येईल. अन्यथा तिचे प्रकटीकरण व मालकीहक्क अन्य कोणी तरी घेऊन जाईल.

एक मराठी किंवा भारतीय व्यक्ती म्हणून बहुदा आपण 'श्रेयसा' पासून दूर रहावे असेच आपल्याला बालपणापासून शिकवले जाते. याउलट पाश्चात्त्य जगात अतिरेक असेलही. परंतु चांगल्या गोष्टींचा शोध, मांडणी, सादरीकरण आणि त्यावर स्वतःचे नाव कोरणे, हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे आहे.

आणि विशेष म्हणजे अगदी सामान्यतः सर्वसामान्यांच्या मनात अनेक नवनवीन कल्पनांचे तरंग उठत असतातच. पण 'त्या तरंगांची तीव्रता म्हणाला भिडते का? वस्तुस्थिती काहीही असो, परिस्थिती कशीही असो, ती कल्पना साकार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातात का?' तर कदाचित नकारात्मक उत्तरच अधिक असेल. अपयशाची भीती, चाकोरीबाहेर जाण्याचे धाडस नसणे, नेहमीपेक्षा वेगळं काही करायचं तर समाज काय म्हणेल, अशा कितीतरी गोष्टी असतील. आणि कदाचित त्याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे 'आळस'. हा खरंतर खूप मोठा शाप आपणांस आहे.

बहुतांश मराठी माणसाचा स्वभाव भिडस्त. स्वतःहून नव्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी संकोचच अधिक. अगदी वैयक्तिक स्तरावर शालेय जीवनापासून याचा अनुभव आलेला. वर्गात अनेक वेळा शिक्षकांनी कधी अभ्यासक्रमबाह्य विषय घेतले. आणि त्यावर 'प्रश्न विचारा' असे म्हणाले. तरी देखील मनात निर्माण झालेल्या कुतूहलापोटी देखील फारसे प्रश्न विचारण्याचे धाडस कधी झाले नाही. पण या थोड्याच क्षणात मनातील तेच 'कुतुहल' अन्य कुणाकडून तरी विचारले जायचे. व्यष्टी ते समष्टी हाच अनुभव सार्वत्रिक आहे. आणि व्यावसायिक जीवनातही याच गोष्टीची प्रचिती येते.


या सगळ्या प्रकाराला अपवाद असणारे ही आहेतच. परंतु त्या 'अपवादां'पासून अपवादाने प्रेरणा घेणारे तुरळकच.

कदाचित अध्यात्मिक पातळीवर विचार केला तर लक्षात येईल की, आपल्या सर्वांचेच वैश्विकमन एकच आहे. म्हणून या मनात निर्माण होणारे तरंग हे दुसऱ्या मनाला जाणवतात, भावतात. आणि भावनिक पातळीवर वाटते की, दुसऱ्याच्या मनातील विचार अगदी जसाच्या तसा आपल्याही मनात आला होता. म्हणून ज्या क्षणी असा विचार, भावना, संकल्पना उत्पन्न होते, त्याच क्षणी ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली तर कदाचित या कल्पनेला साकारणारे आपण एकमेव असू किंवा तितक्याच प्रमाणात अन्य कुणीतरी प्रयत्न केला असेल तर ती कल्पना देखील हेल-बॉपच्या धुमकेतू सारखी ओळखली जाईल, हे निश्चितच...

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 14 August 2022

अलक

एक सामाजिक संघटना निर्माण झाली.

तिने आपली घटना प्रसिद्ध केली.

ज्यात नमूद केले होते 'समर्थ, सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचे ध्येय'.

काही समीक्षकांनी खूप आलोचना केली.

पण ती सामाजिक संघटना अनेक वर्षे डळमळीली नाही.

त्यांनी आदर्श बुद्धांच्या तत्वज्ञानाला मानले होते.

त्याप्रमाणे ते कार्य करत होते.

-  बुद्धम् शरणम् गच्छामि. धम्मम् शरणम् गच्छामि. संघम् शरणम गच्छामि...

Monday, 8 August 2022

अलक क्र. १००


'उतिथ्य', 'त्वष्टा' असे काही शब्द वाचनात आल्यानंतर त्यांचे अर्थ समजून घेण्याकरिता तो मराठी विश्वकोश वाचनात गढून गेला होता.

त्याला एव्हढे मोठे पुस्तक वाचताना पाहून त्याची इटुकली लाडो म्हणाली,

"बाबा, या मोठ्ठया पुस्तकात कोणाची गोष्ट आहे?"

स्मित हास्य करत तो म्हणाला,

"तुझीच अभिधा."

Sunday, 7 August 2022

अलक क्र.९९

 

सांज खुलली की ती बेभान होऊन नाचत असे.

एकदा न राहवून तिची मैत्रीण तिला म्हणाली,

"एव्हढ्या तन्मयतेने कोणासाठी नाचतेस?"

ती उत्तरली,

"'मनोहरा'ला कधी नावात अडकवता येतं का?"

Saturday, 6 August 2022

अलक क्र.९८


हसणाऱ्या प्रत्येक मनुष्याला तो विचारायचा, "तुम्हाला एखादं कधीतरी मोठं दुःख झालेले आहे का?"

अर्थातच प्रत्येक मनुष्याचे 'हो' असेच उत्तर यायचे.

एकदा एका वयोवृद्ध मनुष्याला हसताना पाहून तो तोच प्रश्न विचारत पुढे म्हणाला,

"मी गर्भ श्रीमंतीत वाढलो आहे. मला दुःख माहीत नाही. म्हणून आनंद देखील कळत नाही".

स्मित हास्य करत ते वयोवृद्ध गृहस्थ म्हणाले, "अगदी सोपं आहे. इतरांच्या दुःखात सहभागी हो".

Friday, 5 August 2022

अलक क्र. ९७


       त्याला दुकानदाराने फसवले आहे, हे त्याच्या लक्षात आले तोपर्यंत त्याने पैसे दिले होते.

त्याला अधिकचे पैसे गेल्याचे दुःख होत नव्हते तर फसवल्या गेल्याचे वाईट वाटत होते.

स्वतःला सावरत तो परत दुकानात गेला. दुकानदाराला वाटले आता हा वाद घालेल.

तो मोठा उद्योजक होता. स्वतःचे कार्ड देत म्हणाला, "कधी काही गोष्टींची गरज पडली तर नि:संकोच फोन कर."

नि दुकानाबाहेर पडत मनातल्या मनात विचार केला,

 'मी याला माफ केले नसते तर याने काही दिवस का होईना माझ्या मनात घर केले असते.'

Thursday, 4 August 2022

अलक क्र.९६


आयुष्यात एकदतरी विमान प्रवास करण्याची त्याच्या आईची खूप ईच्छा होती.

परंतू सर्व सामान्य करकुनाची नोकरी करून घर खर्च सांभाळत त्याला हा खर्च परवडणारा नव्हता.

शिवाय आता मुलं मोठी होत होती. त्यांच्याही शिक्षणाचा विचार करावा लागणार होता.

असेच एकदा घरात आईच्या विमानप्रवासाचा विषय निघाला.

तो टाळण्याचा प्रयत्न करत होता.

तोच त्याचा मुलगा म्हणाला, "बाबा, अगदी हलाखीच्या परिस्थितीतही आजी-आजोबांनी तुमच्या लहानपणी तुमचे सगळे लाड पुरवले असतील ना!"

Wednesday, 3 August 2022

अलक क्र.९५


त्याला आमदारकी हवी होती.

पक्षाकरिता कितीही काम केले तरी प्रत्येकवेळी त्याला डावलण्यात आले.

शेवटी कंटाळून पक्षप्रमुखांनी त्याला खात्रीने पडणाऱ्या जागेची उमेदवारी दिली.

पण आश्चर्यकारकरीत्या तो जिंकला.

आता पक्ष प्रमुख भविष्यात तो धोकादायक ठरू नये म्हणून त्याच्या निलंबनाचा उपाय शोधत आहेत.

Tuesday, 2 August 2022

अलक क्र. ९४

 

जनरेशन गॅप टाळण्यासाठी तो तरुण मुलाच्या सवयी, आवडी-निवडी समजावून घ्यायचा.

म्हणूनच की काय मुलासोबत त्याचे फार कमी वेळा मतभेद झाले.

एके दिवशी मुलगा म्हणाला, "मला माझी प्रायव्हसी हवी आहे.

मी वेगळा राहण्याचा निर्णय घेतला आहे".

त्यानंतर त्याने मुलाला सगळ्या सोशल प्रोफाइल मधून उन्फ्रेंड केले.

Monday, 1 August 2022

अलक क्र.९३

 त्याने भिकाऱ्याला काही पैसे देऊ केले

आणि त्याच्या गालात एक जोरात चापट मारली.

भिकारी एकदम त्याच्या अंगावर धाऊन गेला.

त्याने लगेचच भिकऱ्याचे पाय धरले आणि म्हणाला,

"सद्गुरूंच्या आदेशाचे पालन करतो आहे.

'मनुष्याला त्याचा अभिमान सर्वस्वी असतो',

हे प्रत्यक्ष अनुभवन्याचे".

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...