Sunday, 4 August 2019

कुपमंडूक - कथा उत्तरार्धाची


समुद्रातील बेडुक शेवटी विहिरीतल्या बेडकाला खूप त्रासून, अगदी वैतागून म्हणाला की, " तू चल माझ्यासोबत समुद्र पाहण्यासाठी अन्यथा तू 'कुपमंडूक'च राहशील."

आता ही गोष्ट विहिरीतल्या बेडकाला चांगलीच जिव्हारी लागली. म्हणून त्याने मान्य केले. ज्याला तो 'जग' समजत होता त्याच्या बाहेर काही आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे त्याने ठरवले. जी गोष्ट कधी पाहिलीच नाही,  तिच्यावर केवळ कल्पनेने कसा विश्वास ठेवायचा? म्हणून, प्रत्यक्ष अनुभूतीसाठी तो बाहेर पडला.

दोघीही समुद्राजवळ आले. समुद्राची केवळ दृष्टीने दिसणारी व्यापकता पाहून विहिरीतला बेडूक हिरमुसून गेला. त्याला खूप दुःख झाले. 'कशाला आपण जग म्हणायचो?', या विचाराने तो खूपच खिन्न झाला.

पुढे, त्या समुद्रातील बेडकाने त्याला समुद्राची सफारी करविली. अगदी ढेकीमधे तो त्याला सगळीकडे मिरवत होता. सगळ्या जीवांची ओळख करून दिली. वनस्पती दाखवल्या.
विहिरीतील बेडकाने अनेक वेळा समुद्राची खोली मोजण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक वेळेस तो अपयशी ठरला. अनेक वेळा समुद्राला कवेत घेण्याचा केविलवाणा प्रयत्न ही त्याने केला. पण तो पुरता थकून गेला. एक प्रकारचा त्याच्यात न्यूनगंड तयार झाला की, आपण कसे जीवन जगत होतो.

म्हणून मग त्याने बदल म्हणून काही दिवस समुद्रातील बेडकांसोबत घालवायचे ठरवले. त्यांच्यासोबत तो फिरला. बाहेरचे व्यावहारिक जग कसं आहे, याचा त्याने अनुभव घेतला. भावना आणि व्यवहार यांचा संबंध कसा आहे, हे त्याने ओळखलं.

आणि असं सगळं सार रूपाने स्वतःच्या मनात साठवून तो परत विहिरीकडे, स्वतःच्या जगाकडे जायला निघाला.

पण आता विहिरीतल्या बेडकाला जाताजाता काय अनुभव आला आणि त्याच्या दृष्टिकोनात काय बदल झाला, हे पहावे म्हणून समुद्रातील बेडकाने तसा विहिरीतल्या बेडकाला प्रश्न विचारला.

क्षणभरासाठी उत्तर द्यावे न द्यावे, या विचारानी विहिरीतला बेडूक थांबला. पण न राहून तो समुद्रातल्या बेडकाला म्हणाला, "तुझं म्हणणं खरं होतं. तुमचं जग खूप मोठा आहे. विशालतेची अगदी शब्दशः अनुभूती मला आली. पण मी तेवढाच दुःखी झालो आहे. आणि माझ्या दुःखाचे कारण तुम्ही आहात."

या वाक्याने मात्र समुद्रातील बेडूक आश्चर्यचकित झाला.

"जेवढे तुमचे जग मोठे आहे. तेवढेच तुमचे मन संकुचित आहे. माझ्याजवळ दृष्टिकोणच नव्हता. पण तुमच्या जवळ असून तुम्ही आत्मसंतुष्ट आहात. केवळ स्वतःच्याच म्हणणं खरं आहे, असा तुमचा प्रत्येकाचा व्यवहार असतो. तुमच्या जगात इतरांना स्थान नाही", विहिरीतल्या बेडकाने आपले म्हणणे पुर्ण केले.

समुद्रातील बेडूक खूप मोठा विजेचा झटका लागुन सावरावे, तसे जागा झाला. अर्थातच त्याचा एकंदरीत प्रयत्न हाच होता की, आपलं मोठं जग त्याला दाखवावे. त्याचे जग व्यापक व्हावे, या  दृष्टिकोणातून समुद्रातील बेडकाने विहिरीतल्या बेडकासाठी प्रयत्नच केला नव्हता.

आणि आता 'कुपमंडूक' कुणाला म्हणावे? या प्रश्नाच्या विचारात तो गुरफटून गेला...



©हेमंत पोहनेरकर 
९५९५९६९९८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...