'कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच'.
'सुंभ जळाला पण पीळ नाही जळाला'.
'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही'.
'स्वभावाला औषध नसतं'.
या आशयाच्या म्हणी किंवा वाक्प्रचार आपण अनेक वेळा एकलेले आहेत. खरंतर म्हणी किंवा वाक्प्रचार हे सार असतं कुठेनाकुठे तरी घडलेल्या घटनांचं. नव्हे प्रत्येक म्हणी मागे एक गोष्ट असते. एखादी गोष्ट पूर्णपणे वर्णन करून सांगण्याऐवजी अगदी एका वाक्यात मांडायची असेल तर या म्हणी खूप परिणामकारक ठरतात. आणि अशा अनेक म्हणी आजही व्यवहारात प्रचलित आहेत. नव्हे त्या आपल्या मराठी भाषेचे सौंदर्य ही प्रकट करत असतात.
अशाच म्हणींपैकी एक प्रचलित म्हण म्हणजे ‘स्वभावाला औषध नसतं’.
नेमकी या म्हणीमागे काय गोष्ट आहे, ते सांगता येणार नाही. पण ही म्हणा आपण अनेक वेळा ऐकलेली आहे, अनुभवलेली आहे. पण एव्हाना काळ बदलत जात आहे. आपण आधुनिक युगात आहोत. आपण विकसिततेकडे जात आहोत. आणि अर्थातच विकसततेकडे जात असताना, काही जुने संदर्भ बदलले जातात. नवनवीन मापदंड तयार होतात. काळानुसार बदल हा सृष्टीचा नियम आहे. तसेच डिजिटल भाषेत सांगायचे झाले तर प्रत्येक वेळी ‘अपडेशन’ करावे लागते. अन्यथा आपण ‘आउटडेटेड’ होऊन जातो.
मग हे ‘अपडेशन’ केवळ भौतिक गोष्टींनाच लागू करायचं का? का काही गोष्टींचा विचार स्वतःच्या बाबतीतही करायाचा. आणि मग लक्षात येतं की, ‘स्वभावाला औषध नसतं’ हे देखील बदलता येऊ शकते. आणि म्हणता येऊ शकतं की, होय, ‘स्वभावाला औषध असतं’.
आणि कदाचित त्या औषधाचे नाव आहे, ‘प्रयत्न’.
खरे तर ‘प्रयत्न केला पाहिजे’, हे सांगणे काही नवे नाही. परंतु दृष्टिकोन नवा आहे. गोष्टी त्याच असतात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की तीच गोष्ट नव्याने समोर येते. परंतु तसे होत नाही. हीच खरी मेख आहे. म्हणूनच ‘स्वभावाला औषध नसतं’, यासारख्या म्हणींच अस्तित्व राहते. म्हणून हा सगळा विषय स्वभावाशी संबंधित आहे.
‘माझा स्वभावच नाही अमुक काही करण्याचा’.
‘माझा मूळ स्वभावच तापट आहे’.
‘मी अगदी शांत स्वभावाचा आहे’.
‘माझा स्वभावच असा आहे, की मी कोणाला रागावू शकत नाही’.
‘मुळात माझा स्वभावच सहन करण्याचा आहे’.
‘काय करू? माझा स्वभाव खूपच घाईचा आहे'.
यासारख्या कितीतरी गोष्टी आपण अनेकांकडून त्यांच्या स्वभावाविषयी ऐकत असतो. जेव्हा या गोष्टी आनंद देणाऱ्या असतात, छान वाटणाऱ्या असतात, त्या ठिकाणापर्यंत ही स्वभावाची सारी वाक्य छानच वाटतात.
परंतु जेव्हा इतरांना क्लेशदायक असतात, तेव्हाची परिस्थिती गंभीर असते. आणि तरीही वाक्यं ऐकवली जातात, ‘काय करू माझा स्वभावच तसा आहे आणि शेवटी काय स्वभावाला थोडीच औषध असतं’, हे अधिक गंभीर आहे.
पण व्यवस्थितपणे विचार केला तर लक्षात येतं की, रागाच्या प्रसंगी खरी शक्ती लागते ती शांत राहायला. राग व्यक्त करून मोकळं होणं, हा स्वभावाचा भाग असतोच. पण एक छोटासा प्रयत्न केला की, या क्षणापुरता हा स्वभाव बदलायचा आहे, तर परिणाम नक्कीच बदलू शकतो, वेगळा असू शकतो.
कारण 'पश्चाताप' हे सगळ्यात मोठं विष आहे. बोलून झाल्यानंतर शब्द मागे घेण्याचे कोणतेही यंत्रतंत्र, अस्त्रशस्त्र कधीही अस्तित्वात येणार नाही. ‘माझ्या अशा स्वभावामुळे कळलंच नाही’, म्हणत माफी मागणे हे देखील योग्य नाही. कारण ‘माफी’ ही खरंतर नंतरची वरवरची मलमपट्टी असते. परंतु नंतरची ही सगळी सारवासारव करण्यापेक्षा एक प्रयत्न करायला काय हरकत आहे.
तसेच सहन करणाऱ्या स्वभावाच्या एखाद्या व्यक्तीने कधी राग व्यक्त करून पाहावं, हा प्रयत्न करावाच, खूप हलके वाटेल. आणि लक्षात येईल की स्वभावाला प्रयत्नरुपी औषध असतं.
आपणच आपलेच स्वभावाला धरून बसलेलो असतो. आपल्याला बांधणारा मुळी इतर कोणी असूच शकत नाही. असतो तो आपला स्वभावच. त्याला प्रयत्नरुपी औषध दिलं की, त्याचा प्रवास आनंदाच्या मार्गाने सुरू होतो. मग तो मार्गही आनंदाचा असतो आणि अंतिम टप्पा ही आनंदाचाच असतो.
अर्थात अवघड गोष्टींची सुरुवात नेहमीच नकोशी वाटते. म्हणून तर ‘स्वभावाला औषध नसतं’, यासारख्या उक्तींच आजवर फावत आले आहे.
‘प्रयत्नांती परमेश्वर’.
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’.
या म्हणींचही अस्तित्व अनंत काळापासून आहेच की. परंतु या म्हणींचा उपयोग केला गेला, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आयुष्यातील असाध्य असे ध्येय साध्य करण्यासाठी. आणि असे ध्येय, स्वप्न प्रयत्नांची पराकाष्ठा करत अनेकांनी पूर्ण केले आहे. या गोष्टींसाठी अशा सगळ्यांनाच दाद दिली पाहिजे.
पण एक वेळ तोच प्रयत्न या सगळ्यांनी कधी स्वभावासाठी केल्याचे ऐकिवात नाही. अगदी प्रमाण सांगता येणार नाही पण काही वेळा मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तींचा स्वभाव विक्षिप्त आहे, असेही आपण पाहिलेले असेल. खरंतर ‘विक्षिप्त’ हा शब्दच स्वभावासाठी निर्माण झाला की काय, असं वाटतं.
तात्पर्य प्रयत्नांचा प्रयोग किंवा आचरण स्वभावाच्या संदर्भात कधी झालंच नाही. कधी या दृष्टिकोनातून कुणी पाहिलंच नाही. म्हणूनच हा सगळा स्वभावाचा भाग होत गेला.
म्हणूनच 'प्रयत्न'रुपी औषध रोज घ्यायचं. मग कालांतराने लक्षात येईल की, ‘स्वभावाला औषध असतं’, या म्हणीची ही आता आवश्यकता राहिलेली नाही. कारण तेव्हा ही म्हण जुनी झाली असेण, हे अगदी प्रयत्नपूर्वक सांगतो. कारण स्वभाव तर स्वभावच असतो ना!
©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९