Sunday, 21 August 2022

हेल-बॉपचा धूमकेतू

 

अवकाश विज्ञाना विषयी हा लेख नाही. परंतु मनातील एका अविष्कारा विषयी निश्चितच आहे. नव्हे मनातील अवकाश एवढे विस्तृत आणि विशाल असते की, त्यात अनेक धूमकेतूंची भावतरंग उठत असतात. असो.

हेल आणि बॉप या दोन वेगवेगळ्या खगोलशास्त्रज्ञांनी एकाच दिवशी अवकाशातील एका नव्या धूमकेतूंची नोंद केली. ही घटना साधारण १९९५-९६ च्याकाळातील आहे. वर्तमानपत्रातून यावर प्रकाशित झालेले अनेक लेख वाचले. ग्रहताऱ्यांचे, आकाशगंगे विषयीचे कुतूहल होतेच. परंतु या घटनेत मुख्य लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे 'एकाच वेळी दोन वेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या शास्त्रज्ञांनी एकाच गोष्टीचा लावलेला शोध'.

वैज्ञानिक इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे होते की, दोन भिन्न व्यक्ती एकाच वेळी एकाच गोष्टीचा शोध लावला. ही गोष्ट वारंवार मनात घोळत राहिली.

आणि जाणवले की, चांगल्या-नव्या गोष्टींच्या शोधा करिता आपण प्रयत्न केला नाही तर त्याच वेळेला त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणारा अन्य कुणी तरी यशस्वी होऊ शकतो. अर्थात नवनवीन कल्पना या आपल्या प्रमाणे इतरांच्याही मनात येत असतात. आणि कदाचित हुबेहूब तीच कल्पना जी की आपल्या मनात आहे, ती कोणताही फरक न असता.

पण आपण त्या दिशेने पावले उचलली, प्रत्यक्ष कल्पना साकार करण्याकरीता अपार कष्ट घेतले. तर खचितच ती कल्पना आपल्या स्वतःच्या नावाने नवारुपास येईल. अन्यथा तिचे प्रकटीकरण व मालकीहक्क अन्य कोणी तरी घेऊन जाईल.

एक मराठी किंवा भारतीय व्यक्ती म्हणून बहुदा आपण 'श्रेयसा' पासून दूर रहावे असेच आपल्याला बालपणापासून शिकवले जाते. याउलट पाश्चात्त्य जगात अतिरेक असेलही. परंतु चांगल्या गोष्टींचा शोध, मांडणी, सादरीकरण आणि त्यावर स्वतःचे नाव कोरणे, हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे आहे.

आणि विशेष म्हणजे अगदी सामान्यतः सर्वसामान्यांच्या मनात अनेक नवनवीन कल्पनांचे तरंग उठत असतातच. पण 'त्या तरंगांची तीव्रता म्हणाला भिडते का? वस्तुस्थिती काहीही असो, परिस्थिती कशीही असो, ती कल्पना साकार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातात का?' तर कदाचित नकारात्मक उत्तरच अधिक असेल. अपयशाची भीती, चाकोरीबाहेर जाण्याचे धाडस नसणे, नेहमीपेक्षा वेगळं काही करायचं तर समाज काय म्हणेल, अशा कितीतरी गोष्टी असतील. आणि कदाचित त्याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे 'आळस'. हा खरंतर खूप मोठा शाप आपणांस आहे.

बहुतांश मराठी माणसाचा स्वभाव भिडस्त. स्वतःहून नव्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी संकोचच अधिक. अगदी वैयक्तिक स्तरावर शालेय जीवनापासून याचा अनुभव आलेला. वर्गात अनेक वेळा शिक्षकांनी कधी अभ्यासक्रमबाह्य विषय घेतले. आणि त्यावर 'प्रश्न विचारा' असे म्हणाले. तरी देखील मनात निर्माण झालेल्या कुतूहलापोटी देखील फारसे प्रश्न विचारण्याचे धाडस कधी झाले नाही. पण या थोड्याच क्षणात मनातील तेच 'कुतुहल' अन्य कुणाकडून तरी विचारले जायचे. व्यष्टी ते समष्टी हाच अनुभव सार्वत्रिक आहे. आणि व्यावसायिक जीवनातही याच गोष्टीची प्रचिती येते.


या सगळ्या प्रकाराला अपवाद असणारे ही आहेतच. परंतु त्या 'अपवादां'पासून अपवादाने प्रेरणा घेणारे तुरळकच.

कदाचित अध्यात्मिक पातळीवर विचार केला तर लक्षात येईल की, आपल्या सर्वांचेच वैश्विकमन एकच आहे. म्हणून या मनात निर्माण होणारे तरंग हे दुसऱ्या मनाला जाणवतात, भावतात. आणि भावनिक पातळीवर वाटते की, दुसऱ्याच्या मनातील विचार अगदी जसाच्या तसा आपल्याही मनात आला होता. म्हणून ज्या क्षणी असा विचार, भावना, संकल्पना उत्पन्न होते, त्याच क्षणी ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली तर कदाचित या कल्पनेला साकारणारे आपण एकमेव असू किंवा तितक्याच प्रमाणात अन्य कुणीतरी प्रयत्न केला असेल तर ती कल्पना देखील हेल-बॉपच्या धुमकेतू सारखी ओळखली जाईल, हे निश्चितच...

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...