Wednesday, 20 May 2020

गर्दीची मानसिकता

कामानिमित्त नेहमीच बाहेर गावी जाणं होत असतं. असेच एकदा पहाटे पहाटे उठून तीन-चार तास प्रवास करून परगावी कामाला गेलो. दिवसभराचे काम आटोपले. जेवण केले. साधारण रात्रीचे नऊ-सव्वा नऊ झाले असतील. परतीच्या प्रवास सुरू झाला. बस पूर्णपणे भरलेली होती. मला अगदी शेवटच्या सीटवर जागा मिळाली. आणि दिवसभर बहुदा पायी चाललो असल्यामुळे की काय आणि नंतर पोटभर जेवण झाल्यामुळे स्वभाविकच बस निघाल्या निघाल्या डोळा लागला.

थोडेसे अंतर पुढे गेल्यानंतर रस्त्यात बस अचानक थांबली. तेव्हा जोराचा आरडाओरडा सुरू झालेला होता. 'बॉम्ब- बॉम्ब' असे प्रवासी ओरडत होते. जो तो जीव मुठीत घेऊन खाली उतरण्याची धडपड करत होता. बायका,मुले, वृद्ध सगळेच घाबरलेले होते. परंतु बसमध्ये अचानक उसळलेल्या या गर्दीमुळे काहीच कळत नव्हते. प्रत्येक जण केवळ एकमेकाला ढकलत बाहेर पडायची घाई करत होता. आणि पुढच्या काही वेळातच सगळे प्रवासी खाली उतरले. परंतु मी आणि माझ्या सीटवरील पाच प्रवासी स्तब्ध होऊन उभे होतो.

कारण आमच्या सीटच्या समोरील सीट खालूनच धूर निघत होता. आणि तो सगळ्या बसमध्ये पसरला होता. परंतु आमच्यापैकी कोणाचीही धाडस झाले नाही त्या सीटच्या पुढे जाण्याचे. बसमधील मागची आपत्कालीन खिडकी उघडण्याचा ही बराच प्रयत्न केला. पण ती खिडकी तारेने भरलेली होती. कारण माहित नाही.
कदाचित काळ आला होता.

पण बहुदा वेळ आलेली नव्हती. रस्ता देखील अगदीच निर्मनुष्य होता. दुसरे कोणते वाहन ही शेजारून गेले नाही. आणि दूरपर्यंत कुठेही प्रकाशही दिसत नव्हता.

काही क्षण नीरव शांतता पसरली. उतरलेल्या प्रवाशांचाही आता आवाज येत नव्हता. थोड्या वेळाने बसमधील तो धूरही बाहेर पडत होता. थोडेसे दिसायला लागले होते. तसा एक तरुण बसमध्ये त्या धूर निघणाऱ्या सीटच्या दिशेने येत होता.
आता बाहेरील प्रवासी पुन्हा ओरडायला लागले. 'नको जाऊ. नको जाऊ', असे ते ओरडत होते. पण तो अगदी शांतपणे त्या सीट जवळ आला. आणि त्याने त्या सीट खाली पडलेली एक छोटीशी सिलेंडरची टाकी बाहेर काढली. आणि बस बाहेर परत चालत गेला. आम्ही देखील त्याच्या मागे अगदी सावकाश आणि खूप अंतर ठेवून खाली उतरलो.

खाली उतरल्यावर तो तरुण म्हणाला, "ही नायट्रोजन सिलेंडरची टाकी आहे. ती आडवी पडल्यामुळे यातून धूर बाहेर आला. पण घाबरण्याचे काहीच कारण नाही. ही टाकी फुटणार नाही आहे."

सगळ्यांना एकदम हायसे वाटले. पण लोकांनी त्याला मारायचेच शिल्लक ठेवले होते, एवढे त्याला बोलले होते. सगळ्यांनी मिळून दिलेल्या शिव्या खाऊन तो तरुण गयावया करायला लागला, रडायला लागला. पण थोड्यावेळानी प्रकरण निवळले. आता सगळ्या प्रवाशांची बस मध्ये परत चढण्याची घाई परत सुरु झाली होती.

मी अगदी बसच्या दाराशी उभा होतो. मी बसमध्ये चढणार तोच अचानक मी मागे वळून प्रवाशांकडे पाहिले आहे. कारण काहीतरी वेगळे वाटत होते. तर लक्षात आले की, प्रत्येक प्रवाश्याच्या हातात स्वतःची पिशवी, बॅग असे अगदी सगळे प्रवासी संपूर्ण सामानासह खाली उतरलेले होते. मी लगेच बस मध्ये चढून फळ्यांवर पाहिले, आता धूर तर मुळीच नव्हता. पण बसमध्ये अगदी नावापुरती देखील एकही बॅग सामानाच्या फळीवर नव्हती.

मी आचंभित होऊन पाहत राहिलो. आताही मनात पूर्वी इतकीच भीती तयार झाली होती. पण तिचे कारण वेगळे होते.
'एकीकडे अत्यंत निष्काळजीपणे सिलेंडरची टाकी घेऊन प्रवास करणारा तो तरुण. आणि दुसरीकडे जीवावर बेतलेला प्रसंग आला असतानाही सगळ्या सामनासह खाली उतरलेले प्रवासी..."

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...