"तू नुसता अव्यय आहेस." वारंवार समजावून सांगून, शिकवुणही संस्कृत न समजणार्या मित्राला, एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी रागवले. आम्ही दहावीला होतो. शहरातील नावाजलेले व्यक्तिमत्व, एक गुरू म्हणुन संस्कृतचे पंडित आम्हाला संस्कृत विषयाचे शिक्षक म्हणून आले होते. अनुभव आणि वय या दोन्हीतूनही त्यांचा पांडित्य आम्ही अनुभवत होतो. परंतु त्या दिवशी त्यांनी 'अव्यय' असे संबोधल्याने त्याच्याप्रमाणे आम्हीदेखील गोंधळलो. सुरुवातीला आपल्याला काहीतरी छान उपाधी दिली आहे की काय असे वाटत होते.
पण नंतर ते शिक्षक म्हणाले, "अव्यय कळतो का?" तरीही तो शांत होता. "अरे! 'अव्यय' म्हणजे तुझ्यासारखा दगड, नर्मदेचा गोटा." शिक्षकांनी स्पष्टीकरण दिलं. आणि आता त्याच्या तोंडावर समजण्याची सगळी चिन्ह दिसायला लागली. तशी आमच्याही. कारण इतक्या उच्च प्रतीचे रागावणं कधी कोणाकडून झालंच नव्हतं. आमची एकंदरीत 'गुणवत्ता' नाही तर 'इयत्ता' तरी वाढल्यासारखं वाटलं.
पुढे शिक्षकांनी समजावून सांगितले की, ज्या शब्दांच्या मूळ रुपात कोणताही बदल होत नाही, त्यांना 'अव्यय' असे म्हणतात. उदाहरणार्थ इथे, तिथे, खाली, वर, आज, काल, सगळे अनेक, पण, परंतु इत्यादी. वाक्यात प्रयोग करत असताना मूळ शब्द जशास तसा राहतो. अर्थात अविकारी.
नंतर व्यवहारी जगात पदार्पण केल्यानंतर हे अक्षर वाङ्मय, अक्षय साहित्य, आणि अव्यय शब्द समजावून घेत, अनुभव घेत असा 'अ' उपसर्गाचा अनुभव घेत अनंत अवधी ओसंडला. 'अनुप्रास'च असावा.
परंतु अनुभव हा येत गेला की, आमच्यात 'बदल' नाही तर 'भेसळ' अधिक झाली आहे, एक मराठी भाषा म्हणून. आणि बहुधा अन्य भाषांपैकी मराठी मध्ये हे प्रमाण अधिक जाणवलं. सहजपणे हिंदी बोलणं किंवा इंग्रजीचा आकर्षण असं आहेच. परंतु त्याहूनही गंभीर बाब म्हणजे मराठी भाषिकांमध्ये आहे ती म्हणजे नकळत अमराठी शब्दांचा उपयोग नित्य व्यवहारात करणे.
परेशान, वापस, दरवाजा, घर खाली करणे, मेहनत, आलू, चेहरा, खुश होणे इत्यादी असे कितीतरी शब्द सांगता येतील जे आपण नकळतपणे व्यवहारांमध्ये उपयोगात आणतो. परंतु या सगळ्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द अगदी साधे, सोपे आहेत. परंतु परकीय आक्रमणांमुळे म्हणा किंवा एकंदरीतच अजाणतेपणा मुळे म्हणा, असे शब्द मराठीत 'मराठी' म्हणून सध्या वास्तव्य करत आहेत.
मुळात ज्या संकल्पना आपल्या नाहीत अशा संदर्भात काही शब्द परभाषेतून आले तर एक तर त्यांना आपल्याला नवा शब्द मराठीत अक्षरशः शब्दशः निर्माण करावा लागतो. किंवा तो मूळ शब्द जशास तसा स्वीकारावा लागतो. सावरकरांचे योगदान या क्षेत्रात अमराठी शब्दांना पर्यायी मराठी शब्द देण्यात प्रचंड मोठे आहे. त्यावर स्वतंत्र लेख किंबहुना पुस्तकही लिहिलेली आहेतच.
आणि जसा जसा काळ उलटत जातो तसे तसे नवनवीन शब्द ही येत जात असतात. तर भाषा म्हणून आपण त्यांना पर्यायी शब्द देऊ शकलो, तर तो मराठीचा गौरव असेण.
काही दिवसांपूर्वी फेसबुक वरील एका समूहात 'मराठी कल्चर अँड फेस्टिवल' या अमेरिकेतून भारतीयांनी चालवणाऱ्या समूहात 'हिटर' या शब्दाला पर्यायी मराठी शब्द 'उष्मक' सुचवण्यात आला. अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय उपक्रम होता.
अर्थात हा मराठीचा अभिमान, ही मराठी भाषेची अस्मिता आपण जपलेली आहेच. परंतु एकंदरीतच बदललेल्या शिक्षण पद्धतीमुळे ही बाब चिंतेची झाली आहे. काही मुलांशी बोलत असताना अनुभव आला, साधारण आठवी ते दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बालकवी, केशवसुत, कुसुमाग्रज, विंदा, ग्रेस किंवा अशी कोणतीही नावं ठाऊकच नाही आहेत.
अभ्यास क्रमचाही तो विषय राहिलेला नाही. किंवा पालकांना एव्हाना 'संस्कार शाळेतून मिळावेत', असे वाटू लागले आहे, म्हणून असे झाले असावे.
बाब इतकी गंभीर होती की, अशा विद्यार्थ्यांपैकी एकाला चक्क 'मराठीची शिकवणी' लावत असताना पाहायचं दुर्दैव वाट्याला आलं.
आणि वाटलं आता हा नवा 'अव्यय'.
आम्ही आमच्या दहावीच्या वेळी खचित संस्कृतभाषेची क्लिष्टता समजू शकलो नव्हतो. परंतु आताची पिढी माय मराठीच समजू शकत नसेल तर अस्मिता, अभिमान अस्तित्त्वातच राहणार नाही. आपण आत्ममग्न होऊन जाऊ 'अव्यय' राहून.
No comments:
Post a Comment