Sunday, 26 September 2021

महापुरुषांचा पराभव होत नसतो


‘पेला अर्धा भरला आहे’, हा सकारात्मक दृष्टिकोण. तर ‘पेला अर्धा रिकामा आहे’, हा नकारात्मक दृष्टिकोण. बहुदा तो काळ येऊन ठेपला आहे, जिथे ही दोन्ही विधाने अपूर्ण वाटतात. म्हणून आता गरज आहे संपूर्ण सकारात्मक दृष्टीकोणाची. आणि ती कदाचित पूर्ण होईल ती या विधानाने, 

‘पेला अर्धा हवेने भरला आहे व अर्धा पाण्याने भरला आहे.अर्थात पूर्ण भरलेला आहे’.

तात्पर्य एवढेच की, घडणाऱ्या गोष्टींकडे संपूर्ण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे. आणि हेच जर सामान्य गोष्टींच्या बाबतीत लागू होत असेल तर मोठ्या-महान गोष्टींचा विचारही अधिक व्यापक करावा लागेल.

आजवर आपण ‘महापुरुषांचा पराभव’ किंवा ‘महापुरुषांच्या पराभवाची कारणे’ वाचली असतील, ऐकली असतील. पण आता याच विषयाला पूर्णतः वेगळ्या दृष्टीकोणातून पहावे लागेल. अर्थात संपूर्ण सकारात्मक दृष्टीकोणातून.

आणि विषयाच्या सुरुवातीला संस्कृतातील प्रसिद्ध वाक्प्रचार लक्षात येतो.
‘वदतोव्याघात’. अर्थात जी गोष्ट आपण बोलत आहोत तेच पुढच्या वाक्यात व पुढच्या क्षणाला आपण स्वत:च खोडून काढणे.

‘महापुरुषांचा पराभव’ या वाक्याची ही तीच गडबड आहे. एकीकडे ‘महापुरुष’ असा शब्दप्रयोग होतो. तर लगेचच त्यांच्या पराभवाचा विचार होतो. ज्या अर्थी कुणाला आपण महापुरुष संबोधतो किंवा ते महापुरुष असतात. तेव्हा त्यांना सामान्यपुरुषांचे नियम लावायचे का? हा विपर्यास आहे.

महापुरुषांनी पेलेली आव्हाने, ही वैयक्तिक पातळीवरील नसून समाज पातळीवरील असतात. ती आव्हाने काळानुसार असतात. जुन्या चालीरिती, रूढी, परंपरा विषयी असतात. काळ बदलतो. नवे आव्हान उभे राहतात आणि आपण मापदंड लावतो जुन्या आव्ह्नांचा, महापुरुषांच्या कार्याचा. महापुरुषांना मोजण्याच्या मापदंडात त्यांचे अनुयायी, विचारसरणी, कार्यपद्धती, संघटना, आंदोलने, कार्यक्रम हे सगळे आपण घेत जातो आणि आज त्यांची काय स्थिती आहे किंवा त्यांच्या काळातही ते कुठवर पोहोचली हे पाहतो.

वरकरणी ही विचारसरणीच काल विसंगत आहे. महापुरुष असे भौतिक पातळीवर मोजणे कितपत योग्य आहे. एकीकडे आपण शांतीच्या तिन अवस्था मानतो, जपतो. अर्थात आपण मंत्र उद्घोष करतो ‘ओम शांती: शांती: शांती:’. अर्थात आपल्याला आदीभौतिक, आध्यात्मिक व आदीदैविक अशा तीनही प्रकारची शांती हवी असते. मग या शांतीचे पुजारी जे महापुरुष असतात, त्यांना केवळ भौतिक पातळीवर मोजून चालेल का?

आपण आपल्या समस्यांशी झुंज देत असताना, आपल्या संबंध आयुष्याचा आलेख पाहतो. तेव्हा समाजाच्या समस्या पाहताना त्यांची तुलना व्यक्तीच्या आयुष्याशी निश्चितच करता येणार नाही. समाजाच्या आयुष्यात अनेक पिढ्या होत जात असतात. तेव्हा बदल घडत असतो, स्थित्यंतर होत जात असतात. आणि कदाचित यात कुठेतरी महापुरुष कारणीभूत असतात.

शिवाय आपण अवतारवादी आहोत म्हणून की काय, आपण महापुरुषांना कालनिरपेक्षतेच्या कसोटीवर पाहतो. पण त्यांचे कार्यही कालसुसंगत असते व ते ही कालसापेक्ष असतात. किंवा आपल्याला सातत्याने वाटत असते, महापुरुष हे दीपस्तंभासारखे असावेत. पण या साऱ्या विश्वाच्या पसाऱ्यात ते नंदादिपाप्रमाणे असतात. जिथे पृथ्वीच ब्रह्मांडात अगदी टिंबाप्रमाणे आहे. तिथे मानवाचे काय? नंदादीप जसे आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करतो. तसेच महापुरुष समाजजीवनाचा परिसर उजळून टाकतात. कालांतराने समाज बदलतो. आणि आपली अपेक्षा असते तेच सारे लागू व्हावे, तिच कार्यपद्धती योग्य आहे, तोच मार्ग योग्य आहे. परंतु काळानुरूप महापुरुषांनी कार्य केले नसते तर समाजजीवन उध्वस्त झाले असते. म्हणून प्रत्येक महापुरुषाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्याच्या स्वरूपाच्या व्यापकतेवर त्यांचा पराभव झाला म्हणणे योग्य नाही.

बहुदा महापुरुषांच्या पराभवाचा विचार श्रेयवादावरूनही होत असावा किंवा त्यांच्यावरच्या त्यांच्या अनुयायांच्या अधिकारवादावरून ही होत असावा. आपणच महापुरुष वाटून घेतो. आणि आपणच त्यांच्या कार्याच्या मोजमापाचे दाखले देतो. अर्थात हे दाखले आपल्या बुद्धिमत्तेची द्योतक असतात. 

समाजजीवन स्थिर आहे, असा कोणताही कालखंड नाही. म्हणूनच प्रत्येक कालखंडात वेगवेगळे महापुरुष होऊन गेले, पुढेही होत जातील. खरंतर हे वैविध्य आपल्या भूमीचे आहे, भारतभूचे आहे. म्हणून आपणच ठरवायचे आहे की, अशा काळाच्या सगळ्या मर्यादेसह आपण महापुरुषांना स्विकारायचं की, त्यांच्या पराभवाची चर्चा करून आपला पराभव करून घ्यायचा.

म्हणूनच खरी जवाबदारी सामान्य नागरिकांची आहे. सगळ्या महापुरुषांचा स्वीकार तर आहेच. शिवाय काळानुरूप त्यांच्या विचारांची छोट्या-छोट्या सामाजीक उपक्रमातून आणि नित्य वैयक्तिक आचरणातून अंमलबजावणी महत्त्वाची. अन्यथा आपली धन्यता आपण महापुरुषांची जयंती वा पुण्यतिथी करण्याइतपतच ठेवू.

©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९

9 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय अवश्य नोंदवावे

satish karlekar said...

Hemant loved it .. most relevant in today's time when everyday people are fighting on social media platforms and passing judgments on great leaders..

Pratibhajojarekulthe said...

"अन्यथा आपली धन्यता आपण महापुरुषांची जयंती वा पुण्यतिथी करण्याइतपतच ठेवू."अतिशय महत्वाचे वाक्य केवळ विचार वाचून जमणार नाही तर त्या विचारांवर कृती करणे आवश्यक आहे आणि ते स्वतः पडून सुरू करावे....प्रेरणा देणारा लेख धन्यवाद

Unknown said...

छान लेख धन्यवाद.

रत्नाकर कुलकर्णी said...

महापुरूषाच्या विचारांचे आचरण करणे हे महत्वाचे आहे.

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद, सतीश.

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद

हेमंत पोहनेरकर said...

मन:पूर्वक धन्यवाद

हेमंत पोहनेरकर said...

अगदी खरे आहे.
मन:पूर्वक धन्यवाद, रत्नाकरजी.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...