खरं तर तुला मूर्त रुपात येऊन काही दिवसच झाले आहेत.
पण
माझ्या जाणत्या वयापासून तू माझ्या सोबत आहेस.
माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून तू
सातत्याने मला व्यक्त होत गेलीस.
तुझ अमूर्त रूप मला नेहमीच भगवंताच्या निराकार रुपाची आठवण
करून देतं.
तू शब्दांची शक्ती. अगदी साधी सहज सरळ समजून येणारी.
कुठल्याही अलंकाराशिवाय.
तू सातत्याने जाणीवेच्या विश्वात घेवून जाणारी.
तू प्रतिभेचं रूप साकारणारी. तू तेज आणि तिमिराचा अर्थ
सांगणारी.
तू उत्पती आणि लय यांची साक्ष देणारी. प्रतिमा आणि प्रतिमान
यातील अंतर समजावून सांगणारी.
रूप, रंग, गंध या लेण्यांनासाज चढवणारी. कला, कलाकृती आणि
कलाकार यांना शब्दातून व्यक्त करणारी.
तुझ्या सख्या व्यंजना आणि लक्षणा यांच्याशी कोणतीही तुलना न
करता सहज सुंदरता जपणारी.
गुंतागुंत, दुर्बोधता, कठीणता उलगडून दाखवणारी.
तू विश्वरूप दर्शन स्पष्टपणे मांडणारी. तू प्रत्यक्ष
विनायकाला जयग्रंथात स्थान बद्ध करणारी.
तुझ वर्णन अनादी, अनंत असंच आहे.
जीवनाच्या शेवटच्याक्षणापासून ते आत्म्याच्या प्रवासापर्यंत
वर्णन करण्याकरिता केवळ तुझीच तर सोबत आहे.
अभिधा, तुझ्या या निर्गुण, निराकाररूपाचं व्यक्त होणार भांडार
आमच्या समोर सातत्याने प्रगट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
©हेमंत पोहनेरकर
8 comments:
Wonderful. जग आहे तसच आहे. आपण कोणत्या दृष्टीकोनातून बघतो ते महत्वाचे. शब्दब्रह्म उलगडत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
छान
Mast !
Perfect !!!!
खूप छान
Wah wah very nice H P
अभिदेच सुंदर अभिदान !
👍👍👍👌👌
Post a Comment