‘शेवटचं पत्र कधी लिहिलं?’, असं जर कोणाला
विचारलं तर किमान पंधरा-वीस वर्षे झाली असतील, असे उत्तर मिळेल. कदाचित कोणाचंतरी पत्र आलं होतं, या गोष्टीलाही त्यापेक्षा अधिक
कालावधी झालेला असेल.
आता पत्र खेळातही
राहिलेलं नाही. ‘मामाच पत्र हरवलं तेच आम्हाला सापडलं’, असं खेळणारी मुलं मोठी झाली आहेत. पत्रातील छोटसं आकाश शोधण्यासाठी
जणू ती बाहेर पडली आहेत.
पूर्वी आठवण आली,
आनंदाचा किंवा दुःखाचा प्रसंग घडला, साधा निरोपही जरी असला तरी पंधरा पैशांचं
पोस्टकार्ड पाठवला जायचं. अगदीच दहा-पंधरा वाक्यात मांडलेल ते पत्र कितीदा तरी
वाचलं तरी प्रत्येक वेळेला अधिकच आनंद देऊन जायचं.
प्रेमीयुगालांनी तर
पत्राचा आधार सर्वाधिक घेतला. आता व्यक्त होण्याची साधनं बदलली आहेत. स्वरूप बदललं
आहे. पण आजही कोणाला पत्र वाचायला मिळालं तर तोच आनंद होणार किंबहुना जुन्या आठवणी
अधिक जिवंत होतील.
पत्र जीर्ण होऊ शकतं
पण पत्रातील ओलावा कधीच आटत नाही.
‘पत्राची परंपरा परत सुरू होईल का?’, तर
कदाचित उत्तर ‘नाही’ असं असेल. परंतु ‘कुणाचं पत्र आलं तर कसे वाटेल?’, याचे उत्तर
मात्र स्वाभाविकच ‘आनंद होईल’ असेच असेल.
पत्र पाठवण्याचा एक लाभ मात्र
सर्वांना नक्कीच झालेला आहे. आनंदाला भाषा असते, हे पत्रामुळेच तर कळालं. आनंदला शब्दाचा आकार देता
येतो. तो आनंद कधीही ही इच्छा झाली की पुन्हा अनुभवता येतो, हे पत्रामुळेच तर शक्य
झालं.
अशा न संपणाऱ्या आनंदाचा नित्य
स्त्रोत म्हणजे पत्र.
काळ कितीही पुढे सरकला तरी पत्र आपलं स्थान अबाधित ठेवून आहे. कारण व्यक्ती कालसापेक्ष असते.
पण पत्रातून व्यक्त केलेली भावना कोणत्याही काळात आनंद देणारी राहिलेली आहे आणि
राहील देखील.
©हेमंत विनोद पोहनेरकर
2 comments:
Hemant barobar aahe tumch yala karnibhut aahe smart phone phone smart zhala pan manus smart nahi zhala
Nice article dada
Post a Comment