Tuesday, 12 February 2019

मुलीच्या बाबाचे मुलीच्या आईस पत्र


प्रिय सखी,


खरं तर पत्राची सुरुवात 'प्रिये', 'प्राणप्रिये', 'अर्धांगिनी', 'जीवनसाथी' यासारख्या विशेषणांनी करायची होती. 

परंतु 'सखी' मधील सख्यत्व या क्षणी अधिक व्यापक वाटले.

शिवाय भावना व्यक्त करण्याकरिता पत्रासारखे माध्यम निवडले. आपण एकमेकांना पत्र लिहून आता अनेक वर्षे उलटली आहेत. तरीही भावना व्यक्त करण्याचे यापेक्षा अधिक प्रभावी माध्यम आजही अस्तित्वात नाही.

म्हणून पत्राचाच आधार निवडला आहे.

एव्हाना आपल्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. संसाराच्या या दहा वर्षात अनेक जबाबदाऱ्या तू यशस्वीपणे पार पाडल्या. एक कर्तव्यदक्ष सुन, प्रेमळ भाऊजय, मायाळू आई, तत्पर आदरातिथ्य करणारी गृहिणी आणि जीवापाड प्रेम करणारी पत्नीही आहेस. म्हणूनच तुझा उल्लेख 'सखी' म्हणून अधिक समर्पक वाटतो.

खरं तर लग्नाच्या अनेक वर्षानंतर मी हे का लिहितोय, असे तुला वाटत असेल. पण हवं तर माझे हे पत्र म्हणजे 'माफीनामा' समज. तुझ्या प्रेमात पडल्यापासून ते लग्नानंतरही अनेक वर्षानंतर हे लिहितोय यालाही विशेष कारण आहे.


वेळोवेळी मी म्हणत आलो आहे की, तुझ्या इतकं प्रेम मला नाही करता येत. म्हणूनच तू माझ्या घरात येऊनही माझ्यापेक्षाही सर्वांची अधिक लाडकी आहेस. खरंच तुझा हेवा वाटायचा. पण तुझ्या या वागण्याचं गुपितही तू सांगितलं होतंस, 'समोरच्यावर एवढा जीव लावायचा की त्याला कुठल्याही प्रकारे विश्वास तोडत आला नाही पाहिजे'.


खरं तर हे सगळं कळत होतं. पण अभावानेच अनुभवता आलं. पण आता मात्र वेगळा अनुभव घेतो आहे.

आणि तो म्हणजे आपल्याला मुलगी झाल्यापासून.

ती रांगायला लागली, दुडू दुडू चालायला लागली, आई म्हणण्याआधी पहिला शब्द 'बाबा' म्हणाली. तेव्हापासून ते माझ्या हाताने मऊ भात खाण्याऐवजी माझ्या ताटातील पोळी मलाच भरवायला लागली. तुला माझ्यासाठी चहा करताना पाहून 'बाबा चहा' म्हणत रिकामा कप घाईघाईने माझ्यापर्यंत आणून देण्यापासून ते 'बाबा ऑफिश' 'बाबा बॅग' म्हणून माझ्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला लागली. 'बाबा ऑफिसला जाऊ नको', असं म्हणण्याऐवजी 'लवकर ये', माझा फोन, माझे ऑफिसचे सामान, माझे कपडे या सगळ्यांची काळजी घ्यायला लागली. इथं पर्यंत.


खरंच या साऱ्या क्षणांमुळे, आपल्या मुलीमुळे मी पहिल्यांदा प्रेमळ झाल्याची जाणीव झाली.


ती मला जीव लावत होती. आणि मी अधिक भावूक होत होतो. प्रेमळ होत होतो.

तिच्या बोबड्या बोलांनी आणि कोमल हातांनी माझे रुक्ष कर्तव्य हळवे होत होते, याची मला जाणीव होत गेली. 

'प्रेम माणसाला एक चांगला माणूस बनवतं', हे प्रत्यक्ष अनुभवतो 
आहे. बहुदा 'श्रेयसा'कडे झुकणारे पित्याचे पात्र एका छोट्याशा जीवा मुळे 'प्रेयासा'कडे जाते आहे. हे वास्तवच पित्याची भूमिका समृद्ध करणारे आहे.
भगवंताचे रूप साऱ्या जगाला प्रेम देते, आनंद देते.
परंतु पोटाच्या पोरीच्या जीव लावण्यामुळे प्रेयस झालेलं माझे रूप, मला वाटते अधिक अनुभवण्याचे आहे. 

माझ्या वागण्यातून नव्याने आलेलं प्रेम तू निश्चितच अनुभवले असशील. म्हणूनच की काय आता कुठेतरी वाटू लागले आहे की, मी तुला अधिक प्रेम देऊ शकेन.


मी खूप धाडस करून हे पत्र लिहितोय. कारण एक पिता मुलीकडून जीव लावणे शिकतो आहे ही, भावनाच खूप निराळी आहे. 


पण उशिरा का होईना मला तुझ्यासारखं तुझ्याइतकं तुझ्यावर प्रेम करायला आपल्या मुलीने शिकवलं, यात खरंच एक वडील म्हणून मी खूप धन्य झालो आहे.


आणि अजून एक महत्वाचे, ती अगदी हळुवारपणे जशी जशी माझी काळजी घेत होती, तसा तसा माझा तुझ्या बद्दलचा काळजी करण्याचा दृष्टीकोण व्यापक होत गेला. कदाचित तुझ्या बाबां इतकी मी तुझी काळजी करतोय का, याचं उत्तर तूच देऊ शकशील. पण एका गोष्टीची मी नक्की खात्री देईन की, प्रेमा बरोबर तुझ्या विषयीचा आदर माझ्या मनात नक्कीच वाढला आहे.

अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं की, भक्ती ही मुळातच पूर्णावस्था आहे. आणि भक्तीचे साध्यही भक्तीच आहे. 

कदाचित सांसारिक जीवनात प्रेमाचेही असेच असेल. म्हणून ही प्रेमळ अवस्था जीवनाच्या प्रत्येक छोट्या क्षणात तुझ्यासह अनुभवायची आहे. 

खरं तर असे म्हणणे औपचारिक होईन, पण मी आपल्या मुलीचा जीवनभराचा ऋणी झालो आहे. 

असो. आता थांबतो.
पण आता तुझ्या पत्राच्या प्रतीक्षेत आहे. प्रेम सगळ्या चौकटीतून अनुभवायचे आहे म्हणून...

सदैव,
तुझाच...

क्षमेची टीप : खरंतर पत्राचा शेवट 'आपल्या मुलीचा बाबा' असे करायचे होते. पण समर्पित राहायला आपल्या मुलीने शिकवले म्हणून, 'सदैव तुझाच'.

©हेमंत विनोद पोहनेरकर

21 comments:

Dr NILESH J Joshi said...

Too good...��Dentistry wyatirikta ha chhand suddha changa aahe..

हेमंत पोहनेरकर said...

धन्यवाद सर

Gajanan Bhoskar !nstinct said...

Nice one

Unknown said...

Very nice hemantji

Unknown said...

खूप छान

Ilyas shaikh said...

अति सुंदर

Dr Vinod Bhala said...

Hemantaji khup bhavanik
Kharach Prem eak sarvottam Anubhav aahe jar sibat vatsalya asel

Manoj perkar said...

Very nice hemant

Kirtida Karkhanis said...

खूपच छान.

Raja Kadam said...

सदैव तुझाच....! खुप हळवं केलस रे हेमंत ! तुझ्या जिवनाचे ऋतू असेच समृद्ध होऊ दे आणि तूझ्या नितांत सुंदर लिखाणाने आमची रसिकता न्हाऊन निघू दे. सखी आणि सख्यामधील कुटुंबवत्सल सख्य तू अप्रतिम मांडलस.

Unknown said...

Chan

Virag Pohnerkar said...

P virag खुप छान

Virag Pohnerkar said...

P virag खुप छान

Unknown said...

खूप सुंदर

संतोष इसादकर said...

मुलीचा बाबा ...,... खरंच खुप छान.

girish said...

खुप छान was not knowing about this angle

Unknown said...

खूप छान, हेमंतजी..

Shrikrishna said...

हेमंत लेख खूपच उत्तम आहे लेखातून व्यक्त केलेल्या अर्धांगिनी साठीची कृतज्ञता कौतुकास्पद आणि पुढील वाटचालीसाठी तिला प्रेरणा देणारी सुद्धा आहे तुझा लेख म्हणजे ती करत असलेल्या एक प्रेमाची पोचपावतीच आहे

Shrikrishna said...

हेमंत लेख खूपच उत्तम आहे लेखातून व्यक्त केलेल्या अर्धांगिनी साठीची कृतज्ञता कौतुकास्पद आणि पुढील वाटचालीसाठी तिला प्रेरणा देणारी सुद्धा आहे तुझा लेख म्हणजे ती करत असलेल्या एक प्रेमाची पोचपावतीच आहे

Dr Anita Kale said...

Khup chan

Jagannath S Patil (Padaladakar) said...

हेमंत जी खूप छान पत्र लिहिलंत ! हे पत्र वाचून कोरडे माणसं ही नक्कीच ओले होतील! हे पत्र म्हणजे मुळातच प्रेमळ पण उघड न दाखविणाऱ्या माणसांच प्रतिनिधित्व करायला पुरेसे आहे. पुष्कळांना अशी व्यक्त व्हायची संधी ही मिळत नाही.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...