Saturday, 11 May 2019

द्वितीय पुरुषी बहुवचनी


बाबांचे बालमित्र घरी येणार होते. खूप वर्षानंतर त्यांची भेट होणार होती. शिवाय त्यांच्या मित्राला घेऊन त्यांना कोणा एका संस्थाचालकांच्या भेटीसाठी ही जायचे होते. म्हणून, बाबा घरी त्यांची वाट पाहत होते.

थोड्या वेळा नंतर त्यांचे मित्र आले. स्वाभाविकच गळाभेट झाली. मनमोकळ्या गप्पा झाल्या. अगदी शाळेपर्यंत च्या सगळ्या आठवणींना दोघांनी उजाळा दिला. अशा बराच वेळ गप्पा रंगल्या.
बाबांनी त्यांच्या मित्राबद्दल आम्हाला आधीच सगळीच माहिती सांगितली होतीच, पण परत त्यांच्यासमोर त्यांची नव्याने ओळख करून दिली. मग मी ही माझे नाव सांगितले.
कॉलेजच्या पहिल्या वर्षात होतो. ‘कमीअधिक कळायला लागले आहे’, असे वाटत होते. म्हणून मी ही त्यांच्याशी थोड्या गप्पा मारायचा प्रयत्न केला. आणि बोलत असताना काही वेळेला ‘तुम्ही’, ‘तुमचं’ असा स्वाभाविकच उल्लेख झाला.

मग थोड्या वेळाने ते हात पाय धुण्यासाठी आत गेले. कारण त्यांना जेवणे आटपून पुढे भेटीसाठी जायचे होते. ते आत जाताच बाबा हळूच माझ्या जवळ आले आणि म्हणाले, “अरे! आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना ‘तुम्ही’, ‘तुमचं’ असं म्हणू नये. ‘आपण’ असा उल्लेख करावा.”

मला काहीच कळले नाही. शब्द बदलण्याने व्यक्ती बदलणार नाही, असा विचार करून मी तो विचार तिथेच सोडून दिला.

थोड्यावेळाने जेवणे आटोपली. त्या दोघांची निघायची वेळ झाली. आणि त्यांच्या मित्रांनी निघता निघता सहजच म्हटले, “चल. आमच्या बरोबर येतो का?” अचानक आलेल्या निमंत्रणाला मी टाळू शकलो नाही. काही म्हणायच्या आतच ते म्हणाले, “चल चल जाऊ या.” मग मीही त्यांच्याबरोबर निघालो.

संबंधित संस्थाचालकांच्या घरी पोहोचलो. अगदी घरात प्रवेश करताच बाबा आणि त्यांचे मित्र त्या संस्थाचालकांना उद्देशून म्हणाले, “कसे आहात ‘आपण’? ‘आपली’ प्रकृती कशी आहे? ‘आपण’ इतक्यात आमच्या गावी आला नाहीत.”

एकामागून एक अशी त्यांची वैयक्तिक विचारपूस करणारी वाक्य बाहेर आली. आणि प्रत्येक वाक्यात ‘आपण’ हा शब्द होता.
आता माझ्या कानात बाबांनी सांगितलेले वाक्य घुमायला लागले.
त्यांचं पुढचं संभाषण मग मला काय होत होतं याचं भान बिलकुल राहिलं नाही. मी ‘आपण’ या शब्दाभोवती फिरत होतो.

भेट संपली. घरी आलो. तसेच सार्वजनिक वाचनालय गाठले. मराठी विश्वकोश धुंडाळला. मराठी व्याकरणाची पुस्तके शोधली. ‘आपण’ शोधायचे होते ना. अगदी काही शिक्षकांनाही भेटलो.
आणि मग लक्षात आले की, मी एवढी धावपळ करतोय. चार पुस्तक वाचायला लागलो आहे, म्हणून खूप कळायला लागले आहे, असे वाटत होते. पण केवळ एका शब्दानेच बाबांनी कितीतरी अर्थ उलगडून दाखवला होता. एका मोठ्या उंचीवर आणून सोडले आहे.

लहानपणीच ‘मी’ पासून अर्थात प्रथम पुरुषी एकवचनी पासून सुरू झालेला प्रवास, त्यांनी कधी काळीच ‘आपण’ अर्थात ‘आपणसगळे’ या प्रथम पुरुषी बहुवचना पर्यंत आणून ठेवला होता. केवळ ‘मी’ नाही तर ‘आपण’ ही व्याप्ती फार पूर्वीच मिळाली होती.

पण तारुण्याच्या उंबरठ्यावर बाबांनी त्याहीपुढे मला आणून सोडलं. ते ‘आपण’ या द्वितीय पुरुषी बहुवचनी सर्वनामा पर्यंत.

वडीलधाऱ्या मंडळींना द्यावयाचा आदर किती सोप्या प्रकारे शिकवला. या प्रसंगाने मी पुरता हरवुन गेलो. आणि विचारात पडलो की काय वेडया प्रमाणे मी पुस्तके शोधत होतो.
उलटपक्षी माझ्याच घरात चालतं फिरतं ग्रंथालय आहे.
व्यवहारज्ञान शिकवण्याचा या पेक्षा चांगला मार्ग कुठला असू शकतो?

म्हणूनच प्रथम पुरुषी एक वचनापासून द्वितीय पुरुषी बहुवचना पर्यंतचा प्रवास ‘आपणां’समोर याकरिता की, पितृऋणातून कधीही मुक्त होऊ नये आणि ‘आपणां’सर्वांचा सहवास आणि आशीर्वाद यांनी सदैव युक्त राहावे म्हणून...

©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९



No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...