"मामा, मावशी ही नावं भाजीवाला, दूधवाला, भांडेवाली, फरशी पुसणारी अशा लोकांसाठीच का वापरतात? यांना काका, काकू किंवा आत्या का म्हणत नाहीत ?" चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने प्रश्न केला. मी महाविद्यालयात शिकत असताना शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायचो. विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढावी त्यांना नवा दृष्टिकोन मिळावा या उद्देशाने मी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर काही प्रश्न विचारून त्यांना विचार करायला भाग पाडायचो. नाती-गोती, सणवार, परंपरा यांच्या शास्त्रीय पारंपरिक महत्वा पासून ते ब्रम्हांड पर्यंतच्या अभ्यासक्रम बाह्य सगळ्या विषयांची मांडणी त्यांच्यासमोर करायचो. तालुक्याच्या ठिकाणी जरी राहत असलो तरी तुलनेने ग्रामीण भागातच होतो. म्हणून विद्यार्थ्यांना वास्तविक आणि व्यावहारिक माहिती कळावी, त्याचा अनुभव यावा, हा दृष्टिकोन होता. म्हणून त्यादिवशी मी विद्यार्थ्यांना, "तुम्ही प्रश्न विचारा", असे म्हणून सांगितले होते. तर पहिल्याच प्रश्नांमध्ये त्या विद्यार्थिनीने मला कोड्यात पाडले होते.
खरंच, माहेरच्या माणसांच्या नावानेच ही समाजातील तथाकथित हलकी कामं करणाऱ्यांना का हाक मारली जाते!
मी शिक्षक म्हणून त्यादिवशी वेळ मारून नेली. म्हणालो, "आई इतकेच ते जवळचे वाटावे म्हणून आपण त्यांना मामा किंवा मावशी म्हणून हाक मारतो."
माझ्या उत्तराने ती विद्यार्थिनी समाधान पावली का नाही माहित नाही. परंतु मान हलवून ती खाली बसली. पण उरलेल्या तासात मग अशीच काही प्रश्न-उत्तरे झाली. तास झाला. शिकवणी संपली. पण प्रश्न संपला नव्हता. तो अधिक डोके वर काढून उभा होता.
'हलकी काम करणारी सगळी माहेरची माणसं का?' या प्रश्नाने मी चिंतेत पडलो होतो. तसाच दुखावलाही गेलो होतो. प्रवाहाच्या ओघत समाजात कालपरत्वे कूरिती निर्माण होत असतात. पण त्याच प्रमाणात या नष्टही होत असतात. त्या कधी निर्माण झाल्याची व त्यांची कारणे काय होती, हे शोधणे अशक्य असते. किंवा कारण मिळाले तरी कोणाला तरी दोष देखील देता येत नाही. कारण वर्तमानात त्यावरचा उपाय, हेच त्याच्या निराकरणासाठीचे कारण महत्त्वाचे असते.
म्हणून प्रश्नांची कारणं भूतकाळात शोधायची नाही तर उपाय शोधण्यावर लक्ष देण्याचे निश्चित केले.
खरे तर उपाय मिळाला तरी हा सामाजिक प्रश्न होता. त्यात माझ्या एकट्यामुळे निश्चितच फरक पडणार नव्हता. पण त्या विद्यार्थिनी समोर मी नि:संकोच मनाने जाऊ शकणार होतो, एवढेच. म्हणून मी प्रयत्न करायला लागलो.
आता भाजीवाला, दूधवाला, भांडे घासणारी, फरशी पुसणारी यांना कोणालाही मावशी किंवा मामा म्हणायचे नव्हते. म्हणून मी पर्यायी संबोधन शोधायला लागलो. अगदी सुरुवातीला काका किंवा काकू असे म्हणण्याचा प्रयत्न केला. परंतु एक-दोन प्रयत्नातच समोरील व्यक्तीने अगदी आश्चर्यकारक नजरेने माझ्याकडे पाहिले. बळजबरीचा रामराम शक्य होणार नव्हता. म्हणून तो प्रयोग फसला. मला परत असे करता आले नाही.
थोडासा अधिक विचार करून काही दिवसांनी या सगळ्यांना मी भाऊ किंवा ताई असे हाक मारायचे ठरवले. परंतु वयातील अंतराने तेही जमेनासे झाले.
महाविद्यालयात शिकत होतो. चार पुस्तक वाचयला लागलो होतो. त्यात शिकवणीही घेत होतो. म्हणून असाही विचार केला की, कधीतरी कोणाला 'सर' म्हणून उल्लेख करावा. पण हे ग्रामीण भागात शक्यच नव्हते. म्हणून हा केविलवाणा विचार तिथेच सोडून दिला.
मग आता अशा ज्या-ज्यावेळी अशी कोणतीही व्यक्ती समोर आली तरी 'ओ' शब्दावर मग मी वेळ मारून न्यायला लागलो. पण प्रश्न मानगुटीवर चांगलाच बसला होता. माझा पिच्छा सोडायला तयार नव्हता. यात कालावधीही खुप गेला. पूढेपूढे मार्गही दिसेनासा झाला. आणि मग थोडासा विसरही पडला.
पण एका मंगल दिवशी नवा दृष्टिकोन मिळाला. नवरात्रातील नवमीचा दिवस होता. अर्थात नवरात्रातील नवमी म्हणजे कुलाचाराचे नवमी. घरी सवाष्ण-ब्राम्हणाला जेवायला बोलावले जायचे.
परंतु त्या दिवशी थोडेसे वेगळे झाले होते. कदाचित माझ्या मनात पडलेला गेल्या दोन-तीन महिन्यातील हा प्रश्न आई-बाबांना कळाला होता की काय, कोणास ठाऊक? बहुधा त्यांनी मला कृतीतून याचे उत्तर द्यायचे ठरवले होते, असे असावे.
त्यादिवशी आई-बाबांनी आमच्या घरी येणारे दूधवाले आणि भांडेवाली यांना जेवायला बोलावले होते.
मी केवळ आश्चर्यचकीत होऊन हे सगळे पाहत होतो.
जेवणे झाली. आणि त्यानंतर आई-बाबांनी त्यांना आहेरही केला. भांडेवाली आणि दूधवाला यांच्या चेहऱ्यावरील कृतार्थतेचा भाव मी स्पष्टपणे पाहू शकत होतो. त्यांच्या प्रमाणे मीही भारावून गेलो होतो. आणि निघत असताना ते जेव्हा आई बाबांच्या पाया पडले. तेव्हा म्हणाले, "आई-बाबा, तुम्ही आम्हाला घरी बोलून जो मान दिला त्याचे खूप उपकार झाले."
एकाच क्षणाला मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दोन प्रकारे मिळाले होते. एक कृतीतून तर दुसरे संबोधनातून. आई-बाबांनी प्रत्यक्ष कृतीमधून व्यक्ती त्याच, संबोधने तीच, परंतु व्यवहार बदलला होता. म्हणून मी समाधानी झालो होतो.
तर दुसरीकडे दुधवाला आणि भांडवाली यांनी संबोधने बदली होती. ज्या माहेरच्या माणसांपासून वेगळी संबोधने शोधायचा मी प्रयत्न करत होतो, त्याऐवजी 'आई' असा उल्लेख करून त्यांनी मला नवा दृष्टिकोन आणि नवीन संबोधन दिले होते.
आता माझ्या मनातील मळभ दूर झाले होते. मनातील संकोच निघून गेला होता. त्या विद्यार्थिनी समोर तर निसंकोच पणे जाऊ शकणार होतो. पण तिच्या प्रश्नामुळे मला नवी दृष्टी आणि नात्यांतील नवी सृष्टी मिळाली होती.
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
4 comments:
कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे
फारच छान अशा नात्यातुनच आपुलकी निर्माण होते
खूप चांगला लेख. असेच लिहिणे चालू असू द्या.
lihite raha
Post a Comment