तिच्या नावडतीची भाजी आईने नेमकी तिच्या ताटात वाढली. तशी ती लगेच म्हणाली, "मला नाही आवडत. मी नाही खाणार".
त्या दोघांच्या लग्नानंतर, तो, ती आणि त्याची आई असा त्यांचा एकत्र बसून जेवणाचा पहिलाच योग होता. तिचं घरातील वावरणं नेमकंच सुरू झालं होतं. गेल्या काही दिवसात सातत्याने आनंदाचं वातावरण होतं. लगबग होती. सगळं कार्य अगदी शांतपणे पार पडलं होतं. आणि आता खऱ्या अर्थाने संसाराला त्यांच्या
सुरुवात झाली होती. त्यात सासु आणि सुन, असं नातं म्हणून अनुभवण्याचा जणू पहिलाच प्रसंग आला होता.
तो तिच्याकडे पाहून खुणेने म्हणाला, "तीन घास खा, केवळ." ती बिनधास्त. म्हणाली, "मला नाही आवडत. मी एकही घास खाणार नाही".
त्याच्या आईची एकही प्रतिक्रिया नव्हती.
त्याच्या लहानपणी आईने त्याला लावलेली ही सवय, एकतर ताटात कधीच काही टाकून द्यायचे नाही. म्हणून जर नावडतीची भाजी खायचा प्रसंग ओढावलाच तर केवळ तीन घासांची भाजी ताटात घ्याची आणि ती खायची देखील. उद्देश एकच, नावडतीच्या गोष्टींची सवय असायला हवी. मग त्यासाठी वाढणाऱ्याला न दुखावता, केवळ तीन घासचं खायचे.
तिच्या थेट प्रतिक्रिया कडे दुर्लक्ष करत, इतर गप्पा मारत, त्यांची जेवणे झाली. तो मात्र अस्वस्थ होता. आणि शांत.
जेवण आटोपल्यावर तो तिला बाजूला घेऊन म्हणाला, "तुला तीन घास खायला काही अडचण होती का?" त्यावर परत एकदा तिने स्वतःचा ठाम नकार सांगितला.
मग त्याने त्याला आईने 'तीन घासांची' लहानपणी लावलेली सवय सांगितली. त्यावर ती म्हणाली, " बाळा, तू आता मोठा झाला आहेस. तुझे लग्न झाले आहे. तेव्हा असे पोरखेळ मला नाही चालणार."
अर्थातच त्याला वाटले होते, आईने लावलेली तीन घासांच्या प्रयत्नांची सवय तिला ही आवडेल. पण ती ही तिच्या सवयींवर ठाम होती.
तो हिरमसून गेला. तिलाही जाणवले. पण ती बदलणारी नव्हती. माघार घेणारी नव्हती.
मग अचानक काहीतरी सुचले असे जाणवून तो तिला म्हणाला, "आता दोन घासांचे प्रयत्न राहिले".
आता मात्र ती गालातल्या गालात हसली, म्हणाली, "हो. तीन घासांचे प्रयत्न व्हायलाच हवेत."
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
2 comments:
wa
वा वा फारच छान
Post a Comment