बायको.
छे! छे! कृपया गैरसमज करून घेऊ नका. खर्चास कारण बायको मुळीच असू शकत नाही.
अहो! प्रश्न कधीही अवघड नसतात. त्रासदायक असतात ते मूळ प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर उत्तरातून निर्माण होणारा पोटप्रश्न. म्हणूनच खर्च झाला तर ज्येष्ठ, जाणकार आणि अनुभवी मंडळी म्हणतात, "ठिक आहे. खर्च झाला तर होऊ दे. पण काही बचत आहे का? गुंतवणूक आहे का?" आता हा पोटप्रश्न निरुत्तरित करणारा असतो. अगदी कधीकधी वैफल्यग्रस्त करणारा देखील असतो. पोट प्रश्नाचे उत्तर जर सकारात्मक असेल तर मूळ प्रश्न सहजपणे हाताळल्या आणि सोडवल्या देखील जातो. पण तेच पोटप्रश्नाचे उत्तर नकारात्मक असेल, तर अवघड होऊन बसते.
म्हणून मी निर्माण होणाऱ्या पोट प्रश्नाचे उत्तर आधीच देऊन टाकले. 'गुंतवणूक, बचत आहे का?' या पोटप्रश्नाचे उत्तर आहे, 'होय आहे.' आणि ते उत्तर आहे, 'बायको'.
बायको आपल्या भविष्याची, संसाराची सगळ्यात मोठी गुंतवणूक असते. (असे माझेच नाही तर सगळ्यात संसारवीरांचे प्रामाणिक मत आहे).
या 'गुंतवणुकी'चा परतावा एवढा सुखदायक असतो की, अनेक वेळा संकटाच्या क्षणी नव्हे खर्चाच्या प्रसंगी ती तिच्या कष्टाचं, संयमाचं माप सांभाळून धरते. अगदी आपल्या घरात माप ओलांडून आल्याच्या क्षणापासून. आणि आपल्याला तारते.
तर असे पोटप्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर मूळ प्रश्नाचे उत्तर तर राहिलेच, 'खर्चास कारण की...' अर्थात त्याचे उत्तर 'मीच की' असेच आहे.
क्षमा करा. परत एकदा गैरसमज होण्याला वाव आहे. मी यात बायकोला काहीही म्हणत नाही आहे. 'मी' म्हणजे 'मी'च असे मी हे उपरोधाने, उपहासाने म्हणत नाही आहे.
पोळ्याच्या सणाला हातात पोवत बांधल्यानंतर आई मला पाठमोरा उभा करून, डोक्यावरून अक्षता टाकायची आणि विचारायची, "अतीत कोण?" आणि मला म्हणायला सांगायची, 'मीच की'. अर्थात अतीत म्हणजे सत्व, रज, तम या सगळ्या गुणत्रयींच्या पलीकडील अवस्था. अवधूत अवस्था. 'अतित कोण आहे?' तर 'मीच आहे'. अर्थात या धार्मिक रूढी, परंपरा आपल्यालाच आपणच ते 'परमतत्त्व' आहोत याची जाणीव करुन देत असतात. आणि त्यानुसार मग या सांसारीक जीवनातील बंधनात कार्य करावे, असा उद्देश असतो. असो.
तर असे लहानपणी अशी कधी तरी आलेली समज आणि लग्नानंतर लागलेली सवय 'मीच की' असा मंत्र ध्यास करावा लागेल, याची मुळीच कल्पना नव्हती!
पण सारेच पुरुष असे माहीत असताना या मोहजालात अडकतात. आणि घडलेल्या प्रत्येक घटनांना जवाबदार 'मीच की' असं म्हणत असतात. मी आपला त्या सगळ्यांचा मात्र एक प्रतिनिधी.
तर हे तर एव्हाना हे स्पष्ट झाले आहे की, 'खर्चास कारण मीच आहे'. पण क्षमा करा, मी आर्थिक खर्चाबाबत बोलत नाही आहे.
अहो! कोणत्या साहित्यीकाचे एवढे धाडस किंवा बुद्धी की, त्याने सुनियोजित अर्थार्जन करावं आणि खर्च करावा. साहित्यीकांचा आणि 'अर्था'चा अर्थाअर्थी संबंध नाही. नव्हे नसतोच. साहित्यीकांच्या जवळ 'अर्था'चे भांडवल नसतेच मुळी. त्यांच्याजवळ असतं ते केवळ शब्दांचे मुद्दल. जे ते खर्च करत असतात. अर्थात म्हणून मी ही शब्दांच्या खर्चा बाबतच बोलतो आहे!
बघा ना 'खर्चास कारण मीच आहे' आणि 'शब्द खर्च करतो आहे' हे सांगण्यासाठी मला आतापर्यंत किती खर्च करावा लागला शब्दांचा.
पण का कुणास ठाऊक या जगाच्या संसारात एवढी सुंदर सुंदर नाती आहेत आणि त्यांना बांधणार्या भावना आहेत, ज्यांनी हे जीवन सुंदर होतं. तृप्तता देणारं असतं. आणि नेमकं तेच साहित्यीकांच्या दृष्टीस पडतं आणि ते खर्च करतात तो शब्दांचा.
मुळात अशा सगळ्याच कलाकृती आधीच विद्यमान असतात. थोडीशी शब्दांची जुळवाजुळव झाली की, त्याला एक मूर्त रूप येतं. ज्याला साहित्यकृती म्हटल्या जातं.
संसारातील नाती ही सातत्याने उलगडत जाणारी नाती असतात. कधी दुःखाचे तर कधी सुखाचे अनुभव देणारी ही नाती असतात. म्हणूनच ही सुंदर नाती जोपर्यंत आहेत, तोपर्यंत साहित्यीकांचे शब्द आहेत. जे अशा प्रत्येक प्रसंगाला खर्ची पडत असतात. आणि तरीही ते कधीही संपून जात नाहीत, वाया जात नाहीत. कारण ते जगातील सगळ्या सुंदर नात्यांच्या 'अक्षय थाळी'तून निर्माण झालेले असतात, म्हणून.
एखाद्या साहित्यीकाने उद्योग थाटला असता आणि खर्च केला असता तर काय झाले असते? अर्थातच 'खर्च' शब्दाला समानार्थी 'कर्ज' शब्द जोडला गेला असता. पण साहित्यीकांच्या 'खर्चा'ला 'कर्ज' हा 'वर्ज्य' असतो. प्रसंगी त्यांचा खर्च होणारा शब्द कधीकधी 'खर्जा'तील असू शकतो. अर्थात तो ही आर्जवी असतो.
असं अर्थात शब्दांचं भांडार, मी मागणी घालत असताना बायकोसमोर मांडलं होतं. जी बापूडी त्यात अडकली.
त्यावेळेस माझ्या जवळ 'अर्थ' नाही, हे मी तिला पहिल्या भेटीतच सांगून टाकले होते. पण कदाचित खर्च होणाऱ्या शब्दांच्या अर्थाच्या प्रेमात ती पडली. आणि मूळ 'अर्था'चे तिला भानच राहिले नाही. आणि अडकली. तर अशी माझी एकंदरीत 'गुंतवणुकी'ची सुरुवात तेथूनच झाली.
कोण म्हणतं की, जगातल्या सुंदर साहित्यकृती ह्या लग्नाआधीच्या प्रियकर आणि प्रेयसीच्या निर्माण होणाऱ्या प्रेमातूनच निर्माण होत असतात म्हणून. अहो! लग्नानंतर बायकोला वेळेवर किराणा नाही आणून दिला तरी देखील सुंदर साहित्यकृती निर्माण होत असतात. अर्थात! हा माझा स्वानुभव आहे.
म्हणूनच 'बायको' ही केवळ माझ्या मुलांची जन्मदात्रीच नाही तर माझ्या खर्ची पडलेल्या अनेक शब्दांची देखील जन्मदात्री तीच आहे.
म्हणून लग्न झाल्यानंतर प्रेमाला किंवा साहित्यीकाला ओहोटी लागते, असे जे म्हंटले जाते ते साफ खोटे आहे. माझा अनुभव या बाबतीत पूर्णपणे उलटा आहे, जो माझ्या 'गुंतवणुकी'ने वेळोवेळी सिद्ध केला आहे. आता तर माझी छोटी मुलगी देखील म्हणते, 'बाबा! तू किती बोलतोस रे'. त्यावर तिला देखिली एखादी गोष्ट सांगावी लागते. शब्दांच्या जगात एक फेरफटका मारला की, तिच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद खूप समाधानकारक असतो. अशावेळी खर्ची पडलेल्या शब्दांमुळे तृप्तता लाभते. अर्थात खर्च मात्र वाढतच जातो. याला कारण अर्थातच मीच आहे.
असो तुर्तास थांबतो. 'गुंतवणूकी'ची काळजी घ्यायला हवी ना!
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
5 comments:
कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे.
खुप छान ऊत़्तरोतर प्रगति
विराग
फारच छान
Good
Post a Comment