Sunday, 19 January 2020

लग्नानंतरची माणसं ( तो, ती आणि त्यांच्या कथा)


"लग्नानंतर माणसं खूप बदलून जातात". तिची अनुभवी मैत्रीण तिला म्हणाली. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल मैत्रिणीला खूप काही सांगत होती. तसे पाहता तिचा काही प्रेमविवाह नव्हता. पण तिच्या मैत्रिणीच्या या विधानानंतर तिचं भरभरून बोलणं एकदमच थांबलं.

लग्न ठरल्यानंतर त्या दोघांच्या खूप भेटी होत होत्या. स्वभाविकच प्रेमातील काही वचनंही दिली गेली होती. 'तिच्यावरचे प्रेम कधीही कमी नाही होऊ देणार', 'तिची जीवनभर काळजी घेईन', अशा आशयाची वचने.
किंवा त्याचा नोकरीच्या सगळ्या वेळा सांभाळून तिला आवर्जून भेटणं आणि तिच्यासाठी काहीतरी भेट आणणं. हे तिच्यासाठी सारंच सुखकारक होतं.

पण मैत्रिणीच्या बोलल्यानंतर ती खूप दुखावल्या गेली. खरंतर नव्या संसाराला नेमकी सुरुवात होणार होती. त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या चांगल्या-वाईट प्रसंगाचा अनुभव वेळेनुसार मिळणार होताच. तिने बराच विचार केला. आणि मोकळेपणाने त्या दोघांच्या पुढच्या भेटीत त्याला मैत्रिणीने सांगितलेली वाक्य तिने सांगितले.

स्वाभाविकच त्याच्यासाठीही तो धक्का होता. तिच्याप्रमाणे तो ही अंतर्मुख झाला. पुढे काही क्षण दोघेही शांतपणे बसले. मग थोड्या वेळाने तो निघून गेला. जात असताना 'येतो' देखील म्हणाला नाही. आता मात्र ती खूपच रडावली.

दिवसात आठ-दहा फोन आणि किमान एक भेट हा नित्याचा क्रम आता थांबला. त्याने जवळजवळ आठ दिवस तिला फोनही केला नाही. ती बिचारी मात्र त्याच्या फोनची आणि भेटीची अशी दोन्हीच्याही प्रतीक्षेत राहिली.

पण तो खूपच अंतर्मुख झाला होता. कारण हा प्रसंग त्याच्यासोबत दुसऱ्यांदा घडत होता. तो पदवीच्या शिक्षणाच्या निमित्ताने शहराच्या ठिकाणी त्याच्या काकांकडे काही दिवस राहायला होता, तेव्हा त्याची धाकटी चुलत बहीण त्याला अशाच आशयाचे वाक्य बोलली होती. की, 'एकदा का नोकरी-व्यवसाय सुरू झाला की, कुणी लक्षात ठेवत नाही. आणि कुणी परत साधं भेटायलाही येत नाही.' त्यावेळेस 'माझ्याबाबतीत तरी असं काही होणार नाही', असं तो बहिणीला ठामपणे म्हणाला होता.

पण त्यानंतर त्याचे पदव्युत्तरचे शिक्षण झाले आणि नोकरीलाही तीन-चार वर्ष होत आली होती. आणि या तीन चार वर्षानंतर तोच प्रश्न नव्या स्वरूपात आणि नव्या व्यक्तीमार्फत समोर आला होता. आणि खरंच तो त्याच्या चुलत बहिणीला या तीन-चार वर्षात भेटलाही नव्हता.

आता मात्र जीवनातील वास्तविकतेची जाणीव त्याला झाली. त्याने मग तिला खूप विचारपूर्वक अगदी एका ओळीचे पत्र  लिहीले. पत्रातील ती एक ओळ वाचून ती  सुखावलीच नाही तर स्थिरावली देखील. कारण त्याने कोणतेही 'कारण' दिले नव्हते. एक ओळीचा एक छोटासा प्रश्न विचारला होता. ज्याची तिने मूकसंमती देऊन टाकली होती.
आणि तो प्रश्न किंवा ती ओळ होती,
'लग्नानंतर बदलणाऱ्या माणसांकडे जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर येत जाणाऱ्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणारी माणसं, या दृष्टिकोनातून पाहूया का?'


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

2 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे.

Manoj perkar said...

फारच सुंदर हे वास्तविक पाहता प्रत्येक माणसाला हा अनुभव येतो

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...