Friday, 26 June 2020

भेटवस्तू

'एकदा का एखाद्या व्यक्तीला आपलं म्हणून स्वीकारलं की तिचे गुणही आपले आणि दोषही आपलेच', हा जीवनाचा मंत्र त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या लग्नात कानमंत्र म्हणून दिला.

खरंतर सासरी जाणाऱ्या नवरी मुलीला असा कानमंत्र देण्याची प्रथा आहे. परंतु परक्याची मुलगी आपल्या घरात आल्यानंतर तिच्या विषयीचा आपला दृष्टिकोन कसा असावा, याचे जणू स्पष्टीकरण त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते. कदाचित, त्याच्या लग्नात त्याला मिळालेल्या सगळ्या भेटवस्तू आणि आशीर्वाद यांच्यापेक्षा काकणभर वर अशी ही गोष्ट त्याला मिळाली होती.

पाठवणीच्या प्रसंगी ती स्वाभाविकच रडावलेली. परंतु आश्वस्त हाताने धरून तो तिला घरी घेऊन आला.

इतर कोणाही सामान्यांप्रमाणेच पाहण्याचा कार्यक्रम, बोलाचाली, साखरपुडा, लग्न इत्यादी कार्यक्रम पार पडले होते. प्रेमविवाह किंवा पूर्वीचा परीचय असे काही नव्हते.

नात्यांची गुंफण उलगडायला लागली. दिवस मागे भराभर पडत होते. आणि अधूनमधून आता कुरबुरही व्हायला लागली. 'नवरा-बायको म्हंटलं की, असे छोटे-छोटे वाद होणारच', असे सुरुवातीला त्याला वाटले. म्हणून त्याने सुरुवातीच्या वादांकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर नंतर प्रकरण वाढत जात होते. त्याने खूप विचार केला. वडिलांनी दिलेला कानमंत्र आठवून तो शांत व्हायचा.
परंतु होणारी ही छोटी-छोटी भांडणे कशी थांबवयाची, यावर त्याला मार्ग सापडत नव्हता.

पाहता पाहता लग्नाला एक वर्ष होत आले. लग्नाचा पहिला वाढदिवस जवळ येऊन ठेपला. पण त्याचे मन अजूनही अस्थिर होते. तिला भेटवस्तू घेण्यासाठी तो खूप फिरला. कोणतीही वस्तू पाहिली की, त्याला काहीतरी उणीव जाणवायची. परंतू ती मात्र खूप उत्साहात होती.

प्रत्यक्ष लग्नाचा वाढदिवसाचा दिवस उजाडला.
घरातल्या घरातच अगदी साधेपणाने खूप छान तयारी तो, ती आणि त्याच्या आईबाबांनी मिळून केली होती. संध्याकाळी गोडधोड केले. जेवणे झाली. त्याच्या आईने त्या दोघांनाही ओवाळले. दोघे आई बाबांच्या पाया पडले. मग तिनेही त्याच्यासाठी आणलेल्या खूप सार्‍या भेटवस्तू त्याला दिल्या.

आणि आता तो काय देतो, यासाठी हात पुढे करून त्याच्या समोर ती उभी ठाकली.
त्यावर त्याने त्याचा हात तिच्या हातात दिला.
पाठवणीच्या वेळी घेतलेल्या आश्वस्त हाताला आता अनुभवाची जोड होती. 

'काय साध्य करायचे', हे त्याच्या बाबांनी सांगितले होतेच, पण ते 'कसे करायचे', हे त्याने शोधले होते.
आणि आता तिच 'भेटवस्तू' 'वचन' म्हणुन त्याने तिला दिली.
थोड्या अधिक प्रमाणात होणारी चहाच्या कपातील वादळं जणू आता शमणार होती.

भारावलेल्या प्रगल्भ स्वरात तो तिला म्हणाला, "मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध अप्रतिमच असतो. पण गजरा करून केसात माळले की, त्याला सौंदर्यही प्राप्त होते. तद्वतच आपल्या या सुंदर नात्यातील वेलीवर प्रेमा सोबतच मी तुझा आनंदाच्या किंवा कसोटीच्या अशा प्रत्येक क्षणी 'आदर'ही करेण..."

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

11 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे.

Unknown said...

छान लेख आहे

Ganesh_Wayal said...

अप्रतिम भावनात्मक आणि पारिवारिक संदेश.

Amol Lale said...

अप्रतिम लेख ...

Unknown said...

अप्रतिम भावनाशिल लेख परिवार संदेश .भेटवस्तु सुंदर

G Chandrashekhar said...

खुप छान

संतोष इसादकर said...

छानच वचन पुर्ती

Unknown said...

Chan👌

Manoj perkar said...

वा वा फारच छान लेख लिहिला आहे

Yash mane said...

खूप मस्त हेमंत सर 😇

हेमंत पोहनेरकर said...

सर्वांचे खूप खूप धन्यवाद...

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...