Sunday, 13 September 2020

सेलिब्रेशन

 

तो अत्यंत काटकसरी. आणि ती बिनधास्त. हात सोडून खर्च करणारी. पण योग असा की तो तिच्या प्रेमात पडला. आणि तिने देखील होकार दिला.लग्न झाले.

खरंतर दोन विरुद्ध ध्रुवाच्या व्यक्ती एकत्र आल्या होत्या. तसे पहाता दोघांच्याही घरची परिस्थिती सर्वसाधारण होती. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली. पण स्वभावाने मात्र पूर्ण वेगळी.

त्याला त्याच्या वडीलांनी कधी त्याच्या स्वतःसाठी काही खर्च करायला वस्तू, कपडे घेण्यासाठी पैसे दिले तर तो ती वस्तू ते कपडे, बूट इत्यादी लागणाऱ्या वस्तू तर आणायचा पण त्याच्याजवळ काही पैसे देखील शिल्लक राहायचे. ही एकंदरीत त्याची काटकसर.

आणि तिला वडिलांकडून पैसे मिळाल्यानंतर ती ती वस्तू विकत घेऊन घरी यायची. आणि वरतून वडिलांना पैसे मागायची. 'थोडेसे पैसे कमी पडले ते तात्पुरते मैत्रिणीकडून घेतले', आणि शिवाय काही वस्तू विकत घ्यायच्या राहिल्या ते वेगळेच. असा एकंदरीत तिचा स्वभाव.

लग्नाच्या पूर्वी अगदी सुरुवातीला दोघे वारंवार भेटायला लागले, त्यावेळेस त्याने तिला विचारले होते, "तुला काय काय आवडतं?" त्या प्रश्नाचे तिने जे उत्तर दिले होते, त्याने तो प्रचंड धास्तावला होता. ती म्हणाली होती, "मला खरेदी करायला खूप आवडतं."

" आता आपला संसार कसा होणार?", याच विचारात तो सतत असायचा.

लग्नानंतरच्या पहिल्या खरेदीचा प्रसंग आला. त्याने स्वतःच्या मनाची खूप तयारी केली. 'आता बराच खर्च होणार', म्हणून. पण एव्हाना तिलाही त्याचा काटकसरी स्वभाव कळाला होता.

दोघेही बाजारात गेली. घरातील कार्यक्रमानिमित्त सगळ्यांसाठीच काही ना काही वस्तू घ्यायच्या होत्या. नि ती बिनधास्तपणे खरेदी करत सुटली. तिने खरेदी करताना कुठलीही कमतरता ठेवली नाही. अगदी प्रत्येकासाठी तिने खूप छान आणि सुंदर वस्तू विकत घेतल्या.

तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला वाटले होते 'ती थोडीशी समजून घेईल. हात आखडता येईल'. पण उलट ती अजून बिनधास्त झाली होती.

खरेदी करून बाहेर पडल्या नंतर त्याचा चेहऱ्यावरची चिंता आणि तिच्या चेहऱ्यावरुन ओसांडून वाहणारा आनंद टिपण्यासारखा होता.

त्यावर ती म्हणाली, " मी आनंदाचा प्रत्येक क्षण सेलिब्रेट करते. आनंद दाबून ठेवण्यात काय अर्थ आहे? आणि मग खरेदी केली की, मला अधिक मोकळ वाटतं. मग ती खरेदी, तो खर्च स्वतःसाठी असो नाहीतर घरच्यांसाठी."

त्याला खर्चाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला होता. आता तो बिनधास्त होत होता. 'सेलिब्रेशन'चे जणू नवे 'गिफ्ट' त्याला मिळाले होते....


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

4 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय आपल्या नावासहीत अवश्य कळवावे.

Virag Pohnerkar said...

छान। विराग

Unknown said...

खुप छान लीहतोस मित्रा

Unknown said...

Khupcha Chan Likhan ahe wa wa

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...