Friday, 9 April 2021

३१ व्या शतकातील मानव


भविष्य पाहण्यात केवळ सामान्य माणसांनाच नाही तर थोरामोठ्या मंडळींनाही आनंद मिळत असतो. 'पुढे काय होणार', ही उत्सुकता असणे अगदी सामान्य मानवी स्वभाव असतो. तसाच काहीसा भाव त्याचाही होता.

        तो वैद्यकशास्त्रात प्रगत असा शास्त्रज्ञ होता. भारतात राहून त्याने पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असताना सुवर्णपदक मिळवले होते. पण अमेरिकेत जाऊन पिएचडी देखील मिळवली.

        अर्थातच मायदेशात परत आल्यानंतर त्याचे भरभरून स्वागत केले गेले. तो ही खूप भारावून गेला होता. महाविद्यालयात शिकत असताना असे येणारे अनुभव तो लिहून ठेवायचा. 'रोजनिशी' म्हणता येणार नाही. कारण तो खूपच खाजगी विषय होईल. म्हणूनच त्याच्या या लिखाणाला एक साहित्यिक किनार होती. विज्ञान आणि कला यांचा तो दुग्ध-शर्करा योग होता.

        मिळवलेल्या पीएचडी नंतर त्याचे मन अधिक अस्थिर झाले. आणखी 'नवे शोध' या गोष्टींचा जणू त्याने ध्यास घेतला. आणि प्रत्येक नव्या अपयशानंतर तो तो प्रयोग लिहून ठेवायचा. अशा अनेक 'अयशस्वी प्रयोग कथा' त्याने लिहिल्या. त्या प्रकाशित देखील केल्या. लोक मात्र 'भविष्यकालीन वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणून त्याचा आस्वाद घ्यायचे.

        अशाच त्याच्या एका कथेने मात्र तो स्वतः अस्वस्थ झाला. एका अर्थाने त्याला मनस्वी आनंद देखील झाला होता. पण ती देखील कथा 'साहित्य रंजन' म्हणून मर्यादित राहणार होती. म्हणून त्याने ती प्रकाशित करता प्रत्यक्ष प्रयोगांवर लक्ष केंद्रित केले.

        आता तो अठरा-अठरा तास प्रयोग करत होता. ती कथा मात्र त्याच्या अभ्यासाच्या टेबल वर जणू देवाप्रमाणे ठेवून त्याच्या प्राप्तीसाठी तो प्रयत्न करत होता.

        अनेक वर्ष उलटून गेले. एव्हाना तो जख्ख म्हातारा झाला होता. पण उत्साह, उमेद, आणि संशोधनाची तयारी या गोष्टींची कुठेही कमतरता नव्हती.

        आणि अशाच एका शांत पहाटे झोपेतच त्याने शेवटचा श्वास घेतला.

        त्याच्या प्रयोगांमुळे नि कथांमुळे तो पूर्वीच अमर झाला होता.

        या गोष्टीलाही जवळजवळ एक हजार वर्षे उलटून गेले होते. ती ३१ नव्या शतकाची सुरुवात होते. मानवाने जनुकीय बदल यशस्वीरित्या पार पाडले होते. आता कोणता आजार रोग प्रतिकारक्षमतेला आव्हान देऊ शकत नव्हता. मनुष्य केवळ वार्धक्याने निधन पावेल एवढेच होत होते.

        आणि त्यातच कुणीतरी त्याची एकविसाव्या शतकात लिहिलेली कथा 'जनुकीय बदल' इंटरनेटवरुन व्हायरल केली...


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

 

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...