ही कविता आज आठवण्याचे कारण हेच की, माझी आई आजारी पडली होती. आणि स्वाभाविकच सगळ्या घराची दैना झाली. 'परीक्षा नसत्या तर', 'देश बंद पडला तर' हे विषय जसे खरे ठरले. तसा हा देखील विषय खरा ठरला की 'आईने सुट्टी घेतली तर....'
अगदी बाल्यावस्थेपासून माझा हा सदैव कुतूहलाचा विषय राहिलेला आहे की, आई झोपते आणि उठते केव्हा. मी अनेक वेळा लवकर उठायचा प्रयत्न केला पण आई त्यापूर्वी ऊठलेली असते. कष्टाची जणू तिची मैत्री आहे, अशी ती वावरत असते. आणि वरतून आपण एवढे कष्ट करू नको असे म्हणालो तर म्हणते की, 'मी कष्ट मुळी करतच नाही. मी तर घरभर आनंद पसरवण्याचा प्रयत्न करते.' या आईच्या वागण्यामुळे तिला थकलेलं कधी पाहीलच नाही.
घरी कार्यक्रम झाला किंवा एखादा सोहळा पार पडला तरी 'आता थोडीशी विश्रांती घेउ काही दिवस' असे म्हणताना आईला कधी ऐकले नाही. आता वय होत आले आहे, साठी उलटली तरी पाय दुखतात, कंबर दुखते असे कधीही ती म्हणाली नाही. याउलट मी कधीकधी घर काम करतो (अर्थातच क्वचितच) तर त्यातच ती म्हणते तुला खूप कष्ट पडले आहेत, पाठ शेकते, पायाला तेल लावून देते.
माया, ममता, वात्सल्य हाच एकमेव धागा आहे, ही सगळी आई जवळची ऊर्जा असण्याचा.
पण तीच आई आजारी पडली तर... खरं तर अशी कल्पना कोणीही करणार नाही. पण आई आजारी पडली. अर्थात आजच्या या कोरोना महामारी ने आईलाही ग्रासले. सोबत बायकोही कोरनाग्रस्त. अर्थात प्रसंग इतका बिकट की, माझी आई आणि माझ्या मुलांची आई दोघेही एकाच वेळी आजारी.
आता घराची सगळी मदार माझ्यावर आली. कष्टाचा वारसा आईकडून आला होताच. त्यात कमतरता नव्हती. पण प्रत्यक्ष अनुभवही वेगळा असतोच.
आता घरातील सगळी कामे मला करावी लागत होती. झाडून, पुसून काढणे भांडी घासणे, मुलांचे सगळे काही करणे आणि शिवाय ऑफिसमधील काम घरी बसून सांभाळणे. माझी उडालेली त्रेधातिरपीट मी शांतपणे अनुभवत होतो. पहिल्याच दिवशी आईच्या सुट्टीच्या माझे कंबरडे मोडले. एवढी भांडी घासण्याचा अनुभव कधीही नव्हता तसे नसणे देखील स्वाभाविक आहे म्हणा.
एकदा तर सातत्याने येत असलेली ही छोटी छोटी अशी अनेक कामे पाहून मी वैतागून गेलो, दिवसभर सतत काही ना काही तरी करत राहिलो आणि दिवसाच्या शेवटी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला तर ठोस असे काहीच काम केले नाही असे जाणवले. शिवाय दुखत असलेल्या कंबरेमुळे विशेषतः भांडे घासण्यामुळे मी एकंदरीत दिवसभरात किती भांडी घासायला पडतात हे देखील मोजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण ही सगळी आईची कामी आणि तिचे कष्ट पाहिले तेव्हा लक्षात आले की, तिने कधीही कोणत्याही गोष्टीची तक्रार केली नाही, हे आठवले आणि अधिक खजील झालो.
या दिवसात खाण्यापिण्याची आबाळ कधीही झाली नाही. नातेवाईक, शेजारी, मित्र तसेच भाऊ या सगळ्यांकडून जेवणाचा डबा अगदी व्यवस्थित आणि परिपूर्ण असा येत होता. पण त्यानंतर जेवणानंतर पडलेल्या भांडे आणि प्रसार यामुळे मात्र मी पुरता थकून जायचो.
खरे तर पुरुषांना अशी सगळी घरातील कामे कधीच करावी लागत नाही पण एवढे मात्र शिकलो की, असे करावे लागले तर आपल्या कष्टाचे पाढे नक्की वाचू नये. केवळ आईचे स्मरण करायचे. कारण हाच वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. मुलांना द्यायचा आहे.
आणि खरंतर या कठीण प्रसंगात मुलांनीही प्रचंड साथ दिली. दोन्ही मुले देखील इतकी गुणी की, त्यांनी देखील प्रत्येक कामात मला मदत केली. मुली तर मुळातच समजूतदार असातात. तिची आई घरात समोर दिसत असताना 'आईकडे जाता येत नाही' हे तीच मला सांगायची.
थोडक्यात काय तर आईच्या अनुपस्थितीत मुलांनीच मला सांभाळून घेतले. आपण कधी बेजबाबदारपणे वागलो तर आपल्याला नीट समजून सांभाळून घेते तसा मी मुलांसाठी प्रयत्न करत होतो, पण मुलेच समजूतदार निघाली, हा अनुभव सुखद होता.
एकदा तर दिवसभराच्या या सततच्या कामामुळे मी एवढा थकून गेलो नि स्वतःची म्हणालो 'मला स्वतःला वेळ द्यायला दिवसभरात वेळच नाहीये. मी माझं वाचन, लिखाण, माझे शब्द कसे जोपासू?'
आणि डोळ्यासमोर लख्ख प्रकाश पडला. 'आईचा छंद कोणता आहे? तो ती कसा जोपासत असेल? घरातील सर्वांसाठी कष्ट करणे हाच तिचा छंद का?' या विचारांनी मन खूप दुःखी झाले. आईच्या केवळ काही दिवसांच्या अनुपस्थितीमुळे खूप जाणीव झाली. कष्टा करिता मुळीच नाही. तर घरातील चैतन्या करीता आई आजारी पडायला नको.
एक पुरुष म्हणून, वडील म्हणून मुलांकरिता आणि घराकरिता मी आईची सगळी कामे करायचा प्रयत्न करत होतो, थोडक्यात 'आई बनण्याचा' प्रयत्न करत होतो. पण मला एकंदरीतच पुरुषांसाठीची ही आयुष्यभराची कमतरता जाणवली की, कितीही जरी प्रयत्न केला तरी घरात एकंदरीत प्रसन्नतेचा आणि चैतन्याचं वातावरण एक वडील आई बनुन नाही करु शकत. पण याउलट मात्र आई वडील बनूनही सगळ्या गोष्टींची पूर्तता करते.
'पावसात भिजुन ही आई आजारी पडली नाही', या कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा आठवत राहिलो. आणि देवाकडे प्रार्थना केली की, कितीही मोठी महामारी येवो कधीच कोणाचीच आई आजारी पडू नये...
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

6 comments:
कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे
Khupach sundar... kunachi aai kadhich aajari padu naye... ti aajari aski ki ghar aajari aste... ti chan asli ki sagle watawaran chaitnypurna aste...
खरच खुप छान लिहिले आहेस भैय्या👌👌आईंच्या कामाचं मोजणार पारडं अजून तरी आले नाही येणार नाही...आपल्याला सवय झालीये थोडं जरी काम केलं मग ते घरचं असूदे की ऑफिस मधलं लगेच बोलून दाखवतो... पण आईच्या कामाकडे, प्रेमाकडे, तिच्या त्यागाकडे पाहिलं की आपल्याला आपण काहीच असं फारसं करत नाही याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही...असेच लिहित रहा आणि share करत रहा भैय्या...धन्यवाद🙏
खरच खुप छान लिहिले आहेस भैय्या👌👌आईंच्या कामाचं मोजणार पारडं अजून तरी आले नाही येणार नाही...आपल्याला सवय झालीये थोडं जरी काम केलं मग ते घरचं असूदे की ऑफिस मधलं लगेच बोलून दाखवतो... पण आईच्या कामाकडे, प्रेमाकडे, तिच्या त्यागाकडे पाहिलं की आपल्याला आपण काहीच असं फारसं करत नाही याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही...असेच लिहित रहा आणि share करत रहा भैय्या...धन्यवाद🙏
निशांत दिगंबरराव भुजबळ🙏
Khup chan likhan kele ah आई var💖💖
Post a Comment